'कोण असतात ही माणसं ...........??' (स्थलांतरित मजुरांची पिळवटून टाकणारी कहाणी ) हेरंब कुलकर्णी

                           कोण असतात ही माणसं......???

 कोरोनाच्या काळात हजारो किलोमीटर चालत गावाकडे गेलेल्या मजुरांच्या आयुष्याची पिळवटून टाकणारी कहाणी  हे वर्ष संपताना  आठवायला  हवी ..या माणसांच्या  वेदनेची ही  तपशीलवार  कहाणी   

 (हेरंब  कुलकर्णी  )

 


१९४७  आणि २०२०....७३ वर्ष उलटली. पण या दोन वर्षात साम्य काय ? तर असह्य वेदनेने उन्हातान्हात चालणारी माणसे,आपल्या लहानग्याना,महिलांना वृद्धांना खुरडत खुरडत             सोबत






 घेऊन चालणारी माणसे या दोन्ही वर्षांनी बघितली.. ही चालणारी माणसे चालण्याच्या कष्टापेक्षाही दुखावली आहेत. खूप फसवणुकीच्या आणि नाकारण्याच्या भावनेने. ज्यांना आपण आपले म्हटले.ज्या भूमीवर आपण प्रेम केले त्या भूमीने संकटाच्या काळात आपल्याला आपले म्हटले नाही.ही या दोन्हीही रांगांची संदर्भ वेगळे असले तरी समान भावना आहे...फरक इतकाच त्या रांगेचे अश्रू पुसायला महात्मा होता. या रांगेतील माणसांना धीर द्यायला कोणीच महात्मा नाही ....

ही रांग संपतच नाही..अंगावरील कॅलरी जाळाव्यात म्हणून चालणारी आम्ही शहरी माणसे आणि पोटातील भूक मिटावी म्हणून आपल्या गावाकडे निघालेली ही माणसे..त्या शहरात सगळे प्रयत्न निरर्थक झाल्यावर ती अखेरचा पर्याय म्हणून आता निघालीत..पायी निघालीत म्हटल्यावर वाटलं इथेच जवळपास असतील यांची घरे .. शहरात आपली बस चूकल्यावर आपण निघतो पायी घराकडे तशी जवळपास निघाली असतील म्हणून सहज चौकशी केली. किती आहे दूर घर ? तर सरासरी अंतर आहे १५०० ते २००० किलोमीटर..दोन तीन राज्ये ओलांडून जायचे आहे.. हा वेडेपणा नाही का ?

 नक्कीच वेडेपणा असेल

पण किमान महिनाभर त्यांनी जे भोगले त्यापेक्षा हा वेडेपणा जास्त शहाणपणाचा आहे.

              कोण असतात ही माणसे?

 कशी जगतात ही माणसे?

 कुठून येतात आणि काय करतात इथे ?

ही माणसे देशात १४ कोटी असूनही तुम्हाला मला जाणवली का नाहीत?

 दिसली का नाहीत ? ती सर्वत्र असूनसुद्धा अदृश्य राहिली.ती या समाजभांजणीतइतक्या तळाशी उभी होती की जेव्हा सगळी गर्दी पांगली तेव्हा समाजाला सरकारला ती दिसली.मधले पाणी वाहून गेल्यावर तळाशी बुडालेली ही माणसे आम्हाला दिसली.अन्यथा ती आमची सगळी कामे करत होती पण आम्हाला त्यांचे चेहरे दिसत नव्हते..ते फळे विकत होते , रस्ते झाडत होते . गटारीत उतरत होते.मासे विकत होते. चहापासून सगळी हॉटेल चालवत होते. ओझे वाहत होते.रिक्षा taxi चालवत होते.त्यांच्या महिला आमच्या घरीभांडी घासत होत्या. मुले बालमजुरी करत होते. हे मजूर बांधकाम करीत होते, विटा पाडत होते. फरशी घासत होते.रस्ते बांधत होते. पूल बांधत होते. धरण बांधून आमच्यासाठी पाणी साठवत होते...कुठे ते नव्हते ? हा प्रश्न आहे. द्राक्षाच्या बागेपासून गुरांच्या गोठ्यापर्यंत जिथे अमानुष कष्ट. तिथे तेच होते पण देशाला कुलूप लागले आणि क्षणात आंम्ही त्यांना ओळख देणे थांबविले. आम्ही आमच्या खुराड्यात बंद झालो.रस्ते उजाड झाले सरकार नावाची गोष्ट अदृश्य झाली आणि ही माणसे एकटी पडली.ज्या उंच इमारती त्यांनी बांधल्या. तिथे दार ठोठावले पण या उंच इमारती किती खुज्या आहेत हे त्यांना उमजले. सरकार म्हणजे काठी मारणारा पोलीस इतकीच त्यांना व्याख्या समजली आणि यां कृतघ्नतेने ते हादरून गेले...हे गाव आपले उरले नाही या भावनेने ते आपल्या मुलखाला निघाले उदास होऊन..

गरीब राज्यातले हे मजूर अल्पभूधारक किंवा भूमिहीन. पावसाळ्यात जे पिकेल ते पिकवायचे. सिंचनाच्या सोयी नाहीत म्हणून दिवाळीनंतर शेतीत काहीच काम नाही.मग जगायला ते निघतात मोठ्या शहरांकडे. किती दूर जावे ? अगदी २००० किलोमीटरवर. बंगालमधला मजूर थेट मुंबईत. ओरिसातले मजूर थेट आंध्रमधील वीटभट्टीवर. जनावरे न्यावीत तसे रेल्वेच्या बोगीत कोंबून यांना नेले जाते. अगदी चेंगरून मृत्यू झालेत या मजुरांचे रेल्वेत.कामाच्या ठिकाणी होणारे अत्याचार, मानवी सुविधा नसणे, महिलांवरचे अत्याचार आणि आर्थिक फसवणूक, वेठबिगारी, कर्ज या सापळ्यात अडकलेले हे गरीब जीव कसेतरी जगत होते स्वत:ला पणाला लाऊन..पण ते ही गणित विस्कटले....



या मजुरांचे मन समजून घ्यावे, ते नेमके कसे जगतात हे जाणून घ्यायला म्हणून मजुरांशी बोलायचे होते. हैद्राबादवरून थेट बिहारला १४०० किलोमीटर पायी निघालेल्या ८ मजुरांशी नागपूरच्यासंघर्षवाहिनीने बोलणे करून  दिले.

मीत्या मजुरांना विचारले “तुमचेगाव किती दूर आहे, हे माहीत आहे का ?

” ते म्हणाले “१४०० किलोमीटर..

 “पण कसे काय पोहोचणार तुम्ही ? असे विचारले

 तेव्हा ते म्हणाले “कधीना कधी तरी आम्ही पोहोचू ना ?

 हा आशावाद ज्या अगतिकतेतून आला आहे.

 ती अगतिकता समजून घेतली. हैदराबादला बांधकामाच्या कामावर हे गेलेले. पण लॉक डाऊन झालं आणि त्यांना बिहारामधून आणलेल्या मुकादमाने फोन बंद करून टाकला आणि मूळ मालकाने हात वर केले. मग काय करणार ? जवळचे पैसे संपले शेवटी गावाच्या दिशेने निघाले पायी.. हे लोक इतक्या दूर का जातात ? हे विचारल्यावर बिहारचे समाजवास्तव उमजले. ते म्हणाले त्या आठजणापैकी ५ जणांना जमिनी नाहीत व ज्यांना आहे त्याही ३ ते ४ एकर. ती ही फक्त पावसाळ्यात पिकते. दिवाळीनंतर काय करणार ? बिहारात गावोगावी मुकादम असतात ते या मुलांना हैदराबादला घेवून गेले.अशीबिहारमधून राज्याराज्यात ही मुले जातात. बांधकाम जिथे सुरु होते तिथेच हे राहत होते.हाताने रोज स्वयंपाक करायचा आणि पैसे साठवून गावाकडे जायचे.अशा रचनेत लॉकडाऊन आले आणि सगळेच गणित विस्कटले. बिचारे पायी गावाकडे निघाले. गावाकडून आईवडील रोज फोन करतात .कुठपर्यंत आले विचारतात ? त्यांना कोणते शहर कुठे आहे हे ही माहीत नाही.आई वडील त्यांना म्हणतात की गावाकडे या. आहे तसे जगू आपण पण पुन्हा त्या शहरांकडे अजिबात जाऊ नका.

            


नदीचे पाणी उंचावरून खोलाकडे वाहते आणि मजुरीत मात्र गरीब राज्याकडून श्रीमंत राज्याकडे मजूरवाहतात. कोलमडलेल्या शेतीचे बळी असलेली ही माणसे

 


  आई वाढेना आणि बाप भिक मागू देईना’ ही म्हण या मजुरांसाठी तंतोतंत लागू पडली. शासन गावाकडे जाऊ देईना आणि इथेही सोय करेना.तीन महिन्याचे रेशन मिळेल असे सांगितले. तरत्यात डाळी आल्याच नाहीत. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यानाही देऊ अशी फक्त भाषा होती.प्रत्यक्षात दिलेच नाही.ज्यांचे रेशनकार्ड लिंक नाही त्यांचीही अडवणूक काही ठिकाणी झाली. परभाषिक मजूर की ज्या बिचार्यांना सर्वात जास्त गरज रेशनची या दिवसात गरज होती.पण त्यांच्याकडे रेशनकार्ड कुठून असणार?त्यांचे रेशनकार्ड असले तर त्यांच्या राज्यात. त्यामुळे बिचारे एक देश - एक रेशनकार्डकाआवश्यक आहे ? यावर तत्ज्ञांची चर्चा ऐकत राहिले. अखेर रेशन मिळालेच नाही.त्यांना ज्या मुकादमाने आणले त्यांनी हात वर केले. ज्या हॉटेल आणि दुकानात कामाला होते त्यांनीही पगार दिले नाहीत. उसने पैसे घेवून जगावे तर ओळखी फार नाहीत. त्यामुळे स्वयंसेवी संस्था जो किराणा वाटत होत्या त्यावर अवलंबून राहावे लागले त्यांना.किराणा शिजवून खायचे तर शिजवायलाgas भरावा लागणार. तितकेही पैसे नाहीत.मसाले,भाज्या आणायच्या. त्याला पैसे नाहीत. काही ठिकाणी फुकट जेवण दिले जात होते तर तिथे जायला पोलीस घराबाहेर पडू देईनात.



        बांद्रा टर्मिनल्स ला अचानक गर्दी जमली. सुरत मध्ये अनेकदा मारहाण करून लोक रस्त्यावर येत राहिले. दिल्लीत तेच घडले. केरळमध्ये लोक चिडून रस्त्यावर आले. त्यांची बेशिस्त बातम्यांची विषय झाली. गर्दी केल्याने कोरोना वाढेल एवढेही समजत नाही का ? याची चर्चा आम्ही टीव्हीपुढे चहा घेत करीत राहिलो. पंतप्रधान,मुख्यमंत्री सगळेच सांगत राहीले घरात बसा.पण घरात कसे बसावे? मजुरी नाही पैसा नाही हातात . झोपडपट्टीत पत्र्याच्या खोल्या.दुपारी अंगाची लाही लाही होतेय. एका खोलीत अनेक माणसे. अशा कोंडवाड्यात पोटात भूक घेवून कसे जगावे ? भुकेनेअस्वस्थ आणि उन्हाने कावलेली माणसे झोपडीतून बाहेर रस्त्यावर झाडाखाली सावलीला येऊन बसली की पोलीस अंगावर धावणार आणि टीव्हीचे कॅमेरे त्यांच्यावर फिरणार lockdownमध्ये लोक शिस्त पाळत नाहीत म्हणून...पण ही अगतिकता कोण समजून घेणार ? मुंबईत अनेकांची फसवणूक झाली.३५०० रुपये घेवून गावाकडे सोडतो असे शब्द दिले आणि नंतर मात्र काहींनी फसवले.काहीजण निम्म्या अंतरात गेल्यावर पोलिसांनी पकडले पण ज्यांनी पैसे घेतले त्यांनी पैसे परत दिले नाही.अगोदरच रोजगार नसल्याने अनेकांकडे पैसे नव्हते. कसेतरी उसनेपासने करून त्यांनी पैसे जमविले पण दुसरीकडे अशी फसवणूक..

 


lockdownच्या सुरवातीलाच ते गावाकडे निघाले होते पायी. पण मुख्यमंत्र्याच्या आवाहनाने आणि पोलिसांनी अडवल्यावर ते थांबले शासकीय निवारागृहात. शासनाचे आकडेवारी सांगण्यापुरते काम झाले. इतक्या मजुरांची सोय केली आहे व दोन वेळा जेवण नाश्ता दिला जात आहे हे सांगायला मोकळे. नागपूरचे संघर्षवाहिनीचे लढाऊ कार्यकर्ते दिनानाथ वाघमारे यांनी निवारांगृहाला भेट दिली. तर एक वेळांच फक्त जेवण मिळतेय. पुन्हा हे बिचारे मजूर तक्रार तरी कुठे करणार ? कोणत्या तरी जिल्हा परिषद शाळेत त्यांची सोय केलेली. वर पत्रा. पंखा नाही. पुरेसे पाणी नाही. अशा स्थितीत केवळ मजुरांची आम्ही सोय केली हे शासनाला सांगता यावे म्हणून. शेवटीअडचणीना वैतागून आणि रेल्वेही सुरु होईनात म्हणून पोलिसांना न जुमानता भीती झुगारून हजारो मजूर निघाले पायी आपआपल्या गावाकडे. सोबतबोचकी,कडेवर लहान लेकरे,एप्रिल महिन्यात उन्हाची काहिली आणि ते निघालेत. कसारा घाटात पत्रकार त्यांच्या मुलाखती घेत आहेत.विंध्यपर्वत ओलांडून अगस्ती ऋषी दक्षिणेकडे आले होते म्हणतात. हे आधुनिक वारस घाट आणि डोंगर ओलांडून निघालेत उत्तरेकडे. तो नक्कीच वेडेपणा आहे. हे कुणीही सांगेन.पण हा वेडेपणा करायची हौस आली का ?



          उसतोड कामगारांचे हाल हा तर स्वतंत्र्य वेदनेचा विषय. मार्च संपताना अनेक कारखान्यांचा सिझन यावर्षी संपत होता. त्यामुळे वेगाने कोयते चालत होते. तितक्यात lockdown लागला आणि संसर्गहोऊ नये म्हणून कारखान्यांनी उसतोड थांबवली.रोज जे पैसे मिळत होते ते थांबले आणि गावाकडेही जाता येईना.कारखाने हिशोबही करेना.त्यामुळे हातात पैसे नाहीत आणि बैलाचा माणसांचा खर्च मात्र चालूच.पैसे मागायला ज्यामुकादमानेत्यांना आणले त्याला फोन करावा तर त्याने फोन स्वीच ऑफ केला. बैलाला चारा मिळेना. कारखानेही लक्ष देईना अशा स्थितीत एक महिना कामगारांनी कारखान्यावर काढला. काही मजूर स्वखर्चाने गावाकडे जाऊ लागले तर गावाजवळ पोहोचलेले मजूर पोलिसांनी पुन्हा परत पाठवले. खूप आरडाओरडा झाल्यावर मग कारखान्यांनी जेवण द्यायला सुरुवात केली व विशेष निर्णय झाल्यावर मग गावाकडे मजुरांना पाठवण्यात आले पण संपूर्ण महिनाभर काम नसताना स्वत:खर्च करीत विनाकारण कारखान्यावर राहावे लागले. वीटभट्टीवर राहणाऱ्या मजुरांचीही अशीच स्थिती झाली. मालक हिशोब करत नसल्याने मजूर अडकून पडले.मजूर इतर जिल्ह्यातून काही विदर्भातून आलेले त्यांना गावाकडेही जाता येईना आणि खर्च मात्र सुरूच अशी अवस्था झाली.

 

         वीटभट्टीवर गेलो की मला लक्ष्मीबाईची आठवण येते. तिला मी तिचे गाव विचारले होते तेव्हा ती म्हणाली होती की मला गावच नाही. मला कळाले नाही.मी म्हणालो माहेरचे गाव सांगा. ती म्हणाली होती माझा जन्मच वीटभट्टीवर झाला.वडील वीटभट्टीवर राहायचे. माझे लग्नही भट्टीवर झाले आणि आताही भट्टीवर राहते मग मी गाव कोणते सांगू ? गाव म्हणजे महिलांना माहेरच्या आठवणी असतात पण हिच्या भावविश्वात फक्त माती आणि धूर होता..i have no motherland म्हणणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांशी नाते सांगणारी ही वेदना..वीटभट्टी मजुरांचे आयुष्य समजायला एवढे उदाहरण पुरेसे ठरावे..  

 


प्रवास तरी कशाकशाने करावा ? पायी जाणे हा शेवटचा पर्याय त्यांनी निवडला.पण मजूर कशाकशाने गेले ? बांधकामाच्या मिक्सरमधूनआणि दुधाच्या tankerमधून जेव्हा मजूर बाहेर काढले तेव्हा मात्र अंगावर काटा आला . अंग मुडपून बिचारे कसे बसले असतील स्वत:ला कोंडून. वर झाकण लावलेले आणि मनात सारखी भीती. गाडीचा वेग थोडा तरी कमी झाला तरी भीती,पोलीसआले की काय ? काहीजण रिक्षाने निघाले.काही हजार रिक्षावाले आपल्या कुटुंबियांना घेवून थेट उत्तरप्रदेशात निघाले. एका रिक्षात एकमेकाच्या मांडीवर बसून हजारो किलोमीटर प्रवास अनेकांनी केला.१५०० किलोमीटर रिक्षाचा प्रवास करून राजन यादव जौनपुरला निघाला तर तिथे त्यांना धडक बसली आणि मृत्यू झाला.घर फक्त २०० किलोमीटरवर उरले होते. इतके जवळ अन्तर असताना झालेला मृत्यू वेदानादायक होता.



एकाने हातगाडीवर गर्भवती पत्नी आणि मुलीला बसवले आणि हैदरबाद ते बालाघाट असा ८०० किलोमीटर प्रवास केला.१७ दिवस तो ती हातगाडी ओढत होता. बायकोला खांद्यावर घेवून जाणारा नवराही दिसला.मुंबईत अकोटचे कामगार काम करीत होते. ते मजूर ३३२ किलोमीटर चालत धुळ्यापर्यंत आले. एका नातवाने आजोबांना खांद्यावर बसवून चालत आणले होते.लाकडाची कावड करून त्यात दोन लहान लेकरांना बसवून चालणारा बापही या रस्त्यावर दिसतोय.सर्वात करुण चित्र इंदोरजवळ पतथरमुंडलाच्या राहुलचे होते. बैलगाडीत कुटुंबियांना बसवून तो बैलांसोबत स्वत:ला जुंपवून घेत चालला होता. दुसरा बैल त्याने आर्थिक नडभागवायची म्हणून ५००० रुपयांत फक्त विकला आणि स्वत: बैलाची जागा घेतली..



सायकलवर वडिलांना १२०० किलोमीटर गुरूग्रामवरून बिहारमध्ये नेणाऱ्या ज्योती पासवानचे थेट अमेरिकेच्या अध्यक्षांनी कौतुक केले. पणहे काही तिने रेकॉर्ड करायचे म्हणून केले का ? वडिलांचेoperation झालेले. आई बिहारमध्ये,घरमालक भाडे मागतोय, घरात पैसे नाहीत वडील काम करू शकत नाही अशा स्थितीत तिने उसने पैसे घेवून सायकल घेतली आणि वडिलांना पाठीमागे बसवून सलग दिवस प्रवास करीत ती पोहोचली...

हा कौतुकापेक्षा राष्ट्रीय शरमेचा विषय आहे...तेव्हा खांद्यावर बसवण्यापासून, सायकल,रिक्षा, हातगाडी, मिक्सर,tanker आणि स्वत:ला बैलगाडीला जुंपून घेण्यापासून सगळी वाहने या मजुरांनी वापरली...चालताना पाय अगदी सोलून निघालेत. चपला तुटून गेल्यात. आधीच त्या निकृष्ट स्वस्तातल्या चपला. एका मुलीने पाण्याच्या बाटल्या कापडाने पायाला बांधून त्याची चप्पल केलीय आणि तशीच रखडत रखडत चालली आहे..लहान मुलांची वेदना या सगळ्या प्रवासात बघवत नाहीये. थकून गेले तरी ते चालतच आहेत. वडिलांच्याउद्वेगापुढे आणि कष्टापुढे ते काही तक्रारही करू शकत नाहीत ,भूक लागली तरी काही मागू शकत नाहीत. एका बापाने तर हातगाडीवर सामानावरमुलाला पालथे झोपवले आहे आणि ढकलतोय हातगाडी. एका ट्रकमध्ये एखादी वस्तू खालून वर द्यावी तसे मुल लोंबकळय..मुलांचे हक्क वगैरे शब्द रक्ताळलेल्या रस्त्यावर केविलवाणे होऊन चालत होते.  

 


        माणसे तरी किती मरावीत ? कोरोनात माणसे मेली यात विषाणूवर लस नाही हे कारण तरी मनाची समजूत घालायला ठीक आहे पण या मजुरांच्या मरणाचे काय? भूक व आर्थिक ताण यामुळे ५८ मृत्यू झाले. चालताना व रांगेत २९ मृत्यू झाले.रस्त्यात चालताना अपघात होऊन ११२ मृत्यू झाले आणि रेल्वेप्रवासात ८१ मृत्यू असे अंदाजे २८० मृत्यू झाले. या मृत्यूबाबतमनाची समजूत घालण्यासाठी कारण कोणतेच नाही.व्यवस्थेची असंवेदनशीलता एवढेच कारण आहे फक्त. संसर्ग पसरल्यावर ज्या गाड्या सोडल्या त्या अगोदर महिनाभर सोडल्या असत्या तर हे जीव नक्कीच वाचले असते. कशाकशाने माणसे मरावीत ?चोरूनगावाकडे जाताना ठिकठिकाणी पोलीस मारहाणकरू लागले. सुरवातीला थांबवायला सरकार अतिशय आक्रमक. पकडले की टाकायचे एखाद्या शाळेत. त्यामुळे घाबरून रात्रीचे प्रवास सुरु झाले. पोलिसांना चुकवून रात्रीच्या अंधारात चालायला लागले. एका पहाटे मुंबईजवळ ८ मजूर भरधाव टेम्पोच्या धडकेने उडवले. यावेळी रस्त्यावर कोणी चालत असेल हेच driverने गृहीत धरले नसेल. आणि मग रस्त्यावर मरण्याचा सिलसिलाच सुरु झाला. अनेक रस्तावर धडक बसून मजूर मरु लागले.काहींचा अतिश्रमाने मृत्यू झाला.काहीजण गावाजवळ पोहोचले होते आणि मृत्यूने गाठले. औरंगाबादजवळचे मजूर असेच पोलिसांना चुकवत निघाले होते रेल्वेरुळाच्या कडेकडेने. अतिश्रमाने झोपले रुळावर आणि चिरडले २० मजूर मालगाडीने.त्यांच्याजवळच्या रुळावर सांडलेल्या पोळ्या फक्त सरकारला क्लीनचीट देत होत्या हे मृत्यू भुकेने झाले नाहीत म्हणून...काही मजुरांना भूक आणि ताणताणाव सहन होईना. पुण्यावरून परभणीला पायी निघालेला बाळू पवार ३०० किलोमीटर चालला आणि धानोराजवळ एका ठिकाणी झोपला आणि पुन्हा उठलाच नाही..अतिश्रमाने आणि भुकेने मृत्यू. भावाकडे काम शोधायला पुण्याला आला आणि निराश होऊन पायी परत निघाला होता. हैदराबादहून ओरिसात निघालेला एक मजूर उन्हाचा तडाखा लागून भद्राचलमजवळ मृत्यू पावला. हैदराबादवरून बालाघाटला जाताना नागपूरजवळ एक कुटुंब चालताना त्यांचे ४ वर्षाचे मुल बेशुध्द झाले.त्यांनी अनेक गाड्यांना हात केले पण कोणीच थांबले नाही आणि शेवटी ते मुल मृत झाले. आई खूप रडली शेवटी तिथेच नदीकाठी खड्डा खणून त्याला पुरले व जड अंतकरणाने ते कुटुंब पुढे चालत गेले..अनोळखी भूमीत लेकराला कायमचे सोडून जाताना आईच्या दु :खाची कल्पनाच करवत नाही. नाशिकहून मध्यप्रदेशात जाताना सतनाजवळ एक गर्भवती महिला चालताना बाळंतवेदना सुरु झाल्याने तिथेच झाडाखाली बाळंत झाली आणि तिथे कितीवेळ थांबणार ? त्या बाळाला कपड्यात गुंडाळून उठूनएक तासात चालू लागली. मला सरकारी महिला कर्मचार्यांना दिली जाणारी ६ महिन्याची बाळंतरजा आठवली. इथे ६ तास विश्रांती न घेणारी ही महिला आणि दुसरीकडे ६ महिन्याची रजा. हे सारे मृत्यू आणि वेदनाबघितल्यावर मार्क्सचे वचन आठवले   ‘माणसांच्या वाट्याला माणसांचे दुख यावे जनावरांचे दु:ख येऊ नये ‘



                         NDTV ची एक बातमी विसरताच येत नाही. नाशिकजवळ एक छोटा टेम्पो उभा.त्यात १९ मजूर बायका मुलांसह बसलेले. टेम्पो बिघडला. कसेतरी मेकानिक शोधून दुरुस्त केला. अनेक तासांनी टेम्पो सुरु झाला .आनंदाने सगळे ओरडतात. driverची स्टेअरिंगवर असताना हा पत्रकार मुलाखत घेतो. भिवंडीतून हे सगळे मजूर लखनौला निघालेत. मालक घरभाडे मागू लागले. gas संपला तो भरायला पैसे नाहीत. त्यामुळेसगळेच निघालेत.३ दिवसात पोहोचू लखनौला म्हणत हसत तो टेम्पो सुरु करतो त्याच्या शेजारी त्याची बायको आणि दोन लहान मुले बसलेली... आणि काही तासांनी ते पत्रकार पुन्हात्याच रस्त्याने परत येताना तो टेम्पो रस्त्याच्या कडेला पडलेला.एका गाडीने पाठीमागून धडक मारलेली.मगाशी हसत निघालेला तोच driver मृत्यू पावलेला. आपल्याही काळजाचा ठोका चुकतो. कुठे लखनौ कुठे भिवंडी .इतक्या छोट्या वाहनातून जोखीम घेऊन जीव पणाला लाऊन निघाले आणि मृत्यू.

 

अखेर रेल्वे सुटल्या. रेल्वेला नावच दिले श्रमिक ट्रेन. केवढा सन्मान दिला श्रमिकांना नाव देवून. वाटले आता महिनाभराच्या वेदनेतून सुटका होणार. मजूर आनंदले.पण पुन्हा तेच. मेडिकल सर्टिफिकेट आणा. पुन्हा रांगा लागल्या. अशा गरीब मजुरांकडूनही काही डॉक्टर २०० रुपये घेत होते.जे मजूर अनेक दिवशी उपाशी आहेत अशा मजुरांकडून पैसे घेताना त्यांचे हात थरथरले नाही. फक्त ताप मोजून सर्टिफिकेट देत होते.कागदपत्रे जमा करताना झेरोक्स दुकाने उघडी नाहीत.रेल्वेत नंबर लागावा म्हणून जीव काढत होते.अचानक बंद झाल्या तर पुन्हा..असे करून कसेतरी पोहोचले रेल्वेस्टेशनावर.सकाळी मजूर लहान मुलांना महिलांना घेवून स्टेशनावर आले आणि काही रेल्वे संध्याकाळी सुटल्या. दिवसभरउन्हात जेवण पाणी नसतांना हे मजूर वाट बघत राहीले.पण जणू पुढे होणाऱ्या छळाची ती सुरुवात असावी..केंद्र राज्याचे भांडण लागले. रात्री अडीच वाजता रेल्वे मंत्री रेल्वे सोडतात आणि राज्य सरकार धावपळ करते. त्यात अनेकांची रेल्वे सुटते.तिकीट कोणी काढायचे ? हा वाद मजूर गावात पोहोचले तरी संपत नाही.मजुरांनी ७०० रुपयांचे तिकीट २००० ने घेतले अशीही उदाहरणे आहेत.रेल्वेत मजुरांना जेवण पुरवण्यात येईल हा उदार कर्णाचाशब्द ऐकून मजुरांचे पोट न जेवताच भरले.. पण ‘गरिबांच्या सुविधा नेहमी अधिक ‘गरीब’ सुविधा बनतात...’ हे अमर्त्य सेन यांचे वाक्य रेल्वे रुळावर जिवंत होऊन जाते. अनेक ठिकाणी जेवण नाही.दिले तर काही ठिकाणी फक्त वडेपाव.एका स्टेशनावर रेल्वे कर्मचारी बिस्कीटचे पुडे फेकतोय अंगावर आणि मजूर एकमेकात ओढताहेत आणि हसत तो म्हणतोय ‘साहब का बर्थ डे है आज इसलिये दे रहे है ‘...इतररेल्वे स्टेशनावर विक्रेते नाहीत. त्यामुळे लेकरे उपाशी राहिली.

 


                  पाण्याची बाटलीही मिळेना. त्यात अनेक रेल्वेनी मार्ग बदलले. उत्तर प्रदेशाला जाणारी रेल्वे ओरिसात पोहोचली. तिथून झारखंड. ती चूकही मजूर समजून घेत होते, हरकत नाही पण किमान त्या प्रवासात जेवण तरी द्यावे ना ? मार्ग चुकलेली ट्रेन उपाशीपोटी मजुरांना घेवून धावत होती...ते शहरातही उपाशी होते आणि रेल्वेतही उपाशीच होते..संडासमध्ये पाणी नव्हते, रेल्वेचे डबे झाडलेले नव्हते आणि बेसिन तुंबलेले होते. कर्मचारीही हुशार कशाला लक्ष देतील?. या डब्यातून twitter account वापरणारे कोणीच प्रवास करणार नव्हते की जी तक्रार जाईल मंत्री आणि मिडीयात..अशा कोठडीतून मजूर प्रवास करीत होते ....रेल्वे पोहोचली आणि एक छोटी बातमी. रेल्वेच्या संडासजवळ एक प्रेत सापडले पोलीस ओळख पटवत आहेत. नका बाबांनो ओळख विचारू, लोकशाही अशा माणसाना ओळख देत नाही म्हणून तर असे मरून पडले.. मुजफ्फरनगर, दानापूर,सासाराम,गया, बेगुरसाय आणि जहानाबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेत प्रेत सापडली त्यात एका लहानमुलीचाही समावेश आहे. विश्वास ठेवा, मिडीयाने मोजलेले एकूण मृत्यू ८१ आहेत.जे केवळ रेल्वे प्रवासात झाले. शहरातअन्न मिळवायला गर्दीत गेले असते तर कोरोनाने मेले असते, तिथल्या घरात पोलिसांच्या भीतीने थांबले असते तर भुकेने मेले असते,रस्त्यात चालत निघाले असते तर अपघातांत गेले असते आणि रेल्वेने निघाले तरीही मेलेच..थोडक्यात मृत्यू गरिबांची पाठ सोडत नाही..आणि सर्वांना हादरवून टाकणारा तोvideo आला.मृत आईला रेल्वेस्टेशनावर उठवणारा तो लहान मुलगा.मजुरांचा अगतिक प्रतिनिधी होता. मृत होत असलेल्या संवेदनशीलतेला बधीर होत असलेल्या व्यवस्थेला जागा करणारा जणू. त्या मुलाची ती निरागस धडपड केविलवाणी सगळ्या आपल्याच पराभूत धडपडीची..या व्यवस्थेला कितीही ओरडले तरी जसे काहीच ऐकू येत नाही तसे ते लेकरू आणि ती मृत आई..या रेल्वेतील मृत्युबाबतआणि रेल्वेत पाणी नसणे जेवण न मिळणे याबाबत मानवाधिकार आयोगाने थेट नोटीस रेल्वेला काढली आहे यावरून मजुरांचे रेल्वेत किती हाल झाले याची कल्पना यावी. थोडक्यात शहरातील प्रशासन आणि रेल्वे यात जणू स्पर्धा होती की मजुरांचे कोण अधिक हाल करते ते ...

           पण गावापासून दूर होते म्हणून हे हाल झाले का ? मुळीच नाही.त्यांचे हाल झाले ते गरीब आणि असंघटीत होते म्हणूनच झाले. त्यांचा कोणताही दबाव व्यवस्थेवर नव्हता म्हणून हाल झाले. कारण यांच्यापेक्षा काहीजण कितीतरी दूर होते. त्यांची व्यवस्था किती चांगली झाली. ३१ देशात अडकलेल्या ३०००० भारतीयांना विमानाने भारतात आणण्यात आले. त्या मोहिमेत प्यायला पाणी नव्हते की विमानात जेवण मिळाले नाही अशी एकही तक्रार नाही. विमानात भुकेने मृत्यू झाल्याचे एकही प्रकरण नाही. या मोहिमेला नाव होते ‘वंदे भारतम ‘म्हणजे सरकारसाठी भारत हा फक्त पासपोर्ट वाल्यांचा आहे. रेशनकार्डवाल्यांचा नाही. त्यांच्या भारताच्या व्याख्येत हे गरीब मजूर येत नाहीत.त्यांच्या वेदनेसाठी सरकार संवेदनशील नसते.गुजराथ सरकार अडकलेले यात्रेकरू बस पाठवून आणते. विविध राज्यसरकार कोटात अडकलेले विद्यार्थी बस पाठवून आणते कारण ते सगळे मध्यमवर्गातील उच्च मध्यमवर्गातील असतात. शेवटी सरकार नावाची ही व्यवस्था कोणासाठी काम करते याचे उत्तर या सर्व घटनाक्रमाने दिले, गरीब मजुरांसाठी त्यांच्यात कोणतीही करुणा नाही हा कोरोनाचा धडा आहे. तेव्हातुम्ही किती अंतरावर आहात हा मुद्दाच नव्हता. तर तुम्ही कोणत्या आर्थिक गटातील आहात ? हा मुद्दा आहे. साधे उदाहरण बिहारमधून पुण्यात एखादा मजूर आला तर त्याला स्थलांतरित मजूर आपण म्हणतो पण पुण्याच्या आय टी कंपनीत एखादा तरुण नोकरीला आला तर त्याच्या मागे स्थलांतरित हा शिक्का लागत नाही इतका हा भेद स्पष्ट आहे. वर्ग बदलले की शब्दसुद्धा बदलतात...पुन्हा इथला धनिक वर्ग किती क्रूर वागू शकतो हे बंगलोरच्या बिल्डरांनी दाखवून दिले. जेव्हा रेल्वे सोडण्याचे जाहीर झाले. तेव्हा बांधकाम व्यावसायिक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटले आणि बांधकाम व्यवसाय आता सुरु होईल व हे मजूर जर निघून गेले तर आम्हाला मजूर मिळणार नाही तेव्हा हे मजूर राज्याबाहेर सोडू नका. आणि चक्क  मुख्यमंत्र्यांनी ५ रेल्वे लगेच रद्द केल्या. मजूर संतापून रस्त्यावर आले तेव्हा पुन्हा रेल्वे सोडण्याचा निर्णय झाला. मालकवर्ग आणि राजकारणी किती क्रूर असतात हे सांगायला हे पुरेसे आहेत. मजूर जर इतके महत्वाचे आहेत तर त्यांचे हाल lockdownच्या काळात होत असताना त्यांनी यांचीकाळजी का घेतली नाही ? त्यांनाधान्य किराणा पगार का पुरविले नाही ? केवळ वापरा आणि फेकून द्या इतका उपयोगितेचा दृष्टीकोन यातून अधोरेखित झाला.



                  मजूर गावी पोहोचले कसेतरी त्यांच्या राज्याच्या सीमेवर.पुन्हा तिथेही अडवणूक. गावाकडे इतक्या त्रासातून ते गेले तर तिथे कुणीच वाट बघत नव्हते त्यांची. उलट गावकरी वैतागून हे कोरोना घेऊन गावात आले की काय म्हणून त्यांच्यकडे बघत होते..

गावाकडे जाऊन आता या मजुरांना ५ महिने उलटले..काही पुन्हा शहरात परतले आहेत आणि काही परत येणारही नाहीतपण एखाद्या वृद्धाश्रमात टाकलेल्या आई  बापाची आणि या मजुरांची वेदना सारखीच आहे काहीशी..ज्याला उभे करायला मी हाडाची काडे केली त्याने माझ्याशीइतक्या कृतघ्नपणे का वागावे ? ज्या मजुरांच्या अनेक पिढ्यांनी आमची ही शहरे उभी केली. रस्तेबांधले. धरणे बांधली. पुलांनी गावे जोडली. हॉटेलमध्ये खाऊ घातले. शहरे झाडली स्वच्छ केली. स्वत: फुटपाथवर झोपून आमची घरे बांधून दिली. त्यांच्या मनात फक्त हीच भावना आहे की ज्यांची आम्ही घरे बांधली त्यांनी आम्हाला संकटात निवारा दिला नाही. ज्यांनी आम्ही धरणे बांधली त्यांनी आमच्या पाणीही दिले नाही .जिथे हॉटेलात आम्ही राबलो तिथे आमच्या भुकेल्या  लेकरांना खायला घास मिळाला नाही. जिथे पूल बांधून गावे जोडली तिथल्या माणसांनी आमच्याशी आत्मीय नाते जोडले नाही त्यामुळे उदास होऊन आम्हाला तिथून बाहेर पडावे लागले...आई बापाला जसे मुल मोठे करतानाचे सगळे प्रसंगसगळे वृद्धाश्रमात आठवत राहतात तसेच आठवत असेल त्या दूर दूर गेलेल्या मजुरांना.....गड्या आपुला गाव बरा म्हणत त्यांनी पाठ फिरवलीय या कृतघ्न शहरांकडे...श्रीमंतासाठी जे सरकारअसतेते या गरिबांसाठी शासन होते ..

 

हेरंब कुलकर्णी

                                     हेरंब कुलकर्णी                             

   महालक्ष्मी मंदिराजवळ,मुपोता अकोले जि अहमदनगर ४२२६०१

                          herambkulkarni1971@gmail.com

                               फोन ८२०८५८९१९५

 

                             ( हा लेख ऋतुरंग दिवाळी २०२० अंकात यावर्षी प्रसिद्ध झाला आहे ) 



टिप्पण्या

  1. या विषयाकडे एका वेगळ्याच नजरेने पाहणारे लेखन ,या माणसांचा असा विचार पूर्वी कुणीच केलेला नाहीये

    उत्तर द्याहटवा
  2. शब्द अपुरे पडतील अशी ही वेदना, जीचा माझ्यासारख्या सुखवस्तु मध्यमवर्गीयांना अदमासही येणार नाही... करोना काळात जमेल तशी मदत जरूर केली. एक देश, लोकशाही व्यवस्था म्हणुन या सर्व बांधवांना न्याय देण्यात, त्यांना संवेदनशीलतेने मदत करण्यात फक्त कमीच पडलो असे नाही, तर त्यांचे गुन्हेगारच ठरलो.. या अपराधाला, असंवेदनशीलतेला क्षमा नाही..

    उत्तर द्याहटवा
  3. माणूस म्हणून घ्यायला लाज वाटेल अशी ही कहाणी आहे

    उत्तर द्याहटवा
  4. No huminity,people's are like animals such treatment given by d government.np sympathy,no surety of there life.terific situation.no world's to say about Poor's.we remember long life.no such conditions come in future.i pray to God 🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  5. काय उपयोग या लोकशाहीचा जिथे इतक्या वेदना आणि दुःख उघड्या डोळ्यांनी बघावे लागले, मुलाला जन्म देतांनाच्या आणि मुलाचा मृत्यू अतिशय असंवेदनशील घटना,
    खरचं कुठेतरी कामी पडलो, कोरोना काळात अजून काम करण्याची गरज होती...

    उत्तर द्याहटवा
  6. खुपच ह्रदय द्रावक, सत्य परिस्थिती, भयानक वास्तव

    उत्तर द्याहटवा
  7. किती वेदनादायी आहे हे वास्तव!आपले लेखन अन् चित्र पाहून त्यातली भीषणता अधिक जाणवते सर!आपापली चौकोनी कुटुंब सांभाळत जगणारी पांढरपेशी मंडळी कुठे अन् जगण्यासाठी वणवण भटकंती करणारी ही माणसे कुठे!किती विरोधाभास हा...काय करावे आपण यांच्यासाठी?
    हा सल आत आत रुजतो हे सारे वाचून ... आपले संवेदन भिडते अंतरात अगदी आत आत !

    उत्तर द्याहटवा
  8. सरकारसह माणसांच्याही असंवेदनशीलतेचा कळस! 😢

    उत्तर द्याहटवा
  9. बापरे संपूर्ण वाचू शकले नाही सर

    उत्तर द्याहटवा
  10. अतिशय वेदनादायी काळ, वाचताना मनाला खूप वेदना होतात . शत्रुवर पण अशी वेळ येऊ नये . अतिशय भिषण वास्तव...

    उत्तर द्याहटवा
  11. अंगावर काटा उभा राहिला. स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतरही आपण श्रमिकांच्या मुलभूत गरजा भागवू शकत नाही ही शरमेची बाब आहे. माणुसकी, मानवता लोप पावली असेच म्हणावे लागेल. ज्यांनी या कठीण काळात मानवतेच्या भावनेने श्रमिकांना मदत केली त्या देवदूतांना सलाम.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा