चला आपण सारे वाचू या ..
हेरंब कुलकर्णी
शिक्षकांना वाचनाचा उपदेश सारेच करतात पण
शिक्षकांनी नेमके काय वाचायचे हे सांगितले जात नाही . शिक्षकाचे काम अधिक परिपूर्ण
रीतीने करण्यासाठीची आणि त्यांना प्रेरणा देणारी पुस्तके जर सुचवली तर शिक्षक ती
पुस्तके मिळवतात व वाचतात असा माझा अनुभव आहे. व्याख्यानातून मी अनेकदा तोत्तोचान
टीचर, सारख्या पुस्तकांची गोष्ट सांगायचो. तेव्हा
शिक्षकांच्या डोळ्यात एक चमक दिसायची आणि व्याख्याना नंतर ही पुस्तके कुठे मिळतील
हे विचारायचे.. . तेव्हा लक्षात आले की शिक्षकांना प्रेरणा देणारी पुस्तके अशी स्वतंत्र
वाचन चळवळ सुरू व्हायला हवी. त्यातून शिक्षक समृद्ध बनेलच पण तो हे वाचता वाचता
इतर ही साहित्य वाचू लागेल. मराठीत आज जवळपास ८० पेक्षा जास्त पुस्तके फक्त थेट
शिक्षकांशी निगडीत असलेली आहेत .जी शिक्षकांना प्रेरणा देणारी व व्यवसाय समृद्ध
करणारी आहेत.
मी जेव्हा माझी स्वत:ची जडणघडण
बघतो तेव्हा ही प्रयोगशिक्षणाची वाट, जगातल्या
प्रतिभावंत समर्पित शिक्षकांची ओळख ही या शिक्षणविषयक प्रेरक पुस्तकांनीच करून
दिली असे लक्षात येते . व्याख्यानानंतर पुस्तकांचे पत्ते मागणारे शिक्षक मोठ्या
संख्येने भेटू लागल्यावर मग मी पुस्तकांच्या याद्या करू लागलो पण लक्षात आले की
केवळ पुस्तकाचे नाव सांगून त्या पुस्तकाविषयी आकर्षण निर्माण होत नाही तर त्या
पुस्तकाचा सारांश थोडक्यात सांगायला हवा ..त्यातून मी ६० पुस्तकांचा सारांश च
एकत्र लिहून त्यावर ‘बखर शिक्षणाची(राजहंस प्रकाशन) हे
पुस्तकच तयार केले.
शिक्षकांना प्रेरणा देणारी जी पुस्तके आहेत त्याचे वर्गीकरण करता येईल . त्यात जगभरच्या शिक्षकांच्या प्रयोगाविषयीची अनुवादित व देशी पुस्तके आहेत. अरविंद
गुप्ताच्या पुढाकाराने मराठीत जगभरातली अनेक शिक्षंनविषयक पुस्तके अनुवादित झाली. प्रेरणा
देणार्या पुस्तकात तोत्तोचान (जपान ),टीचर,(न्यूझीलंड) फ्री अॅट लास्ट,(अमेरिका) माझे विश्व
मुलांचे,(रशिया) नीलची शाळा व टू सर विथ लव्ह,(इंग्लंड) आमादेर शांतिनिकेतन(भारत) दिवास्वप्न व गिजुभाई बधेकांची सगळीच पुस्तके आहेत.मराठीत शिक्षकांची चरित्रे आत्मचरित्र
मोठ्या संख्येने आहेत. त्यात कोसबाडच्या टेकडीवरून,
वटवृक्षाच्या छायेत ,कुडाळकरांची शाळा,
नदादीप - आठवणीतील साठवणी, माझी काटेमुंढरीची शाळा, हिंद्सेवक सारखी जुन्या पिढीच्या शिक्षकांची पुस्तके आहेत. भारतातील व
महाराष्ट्रातील प्रयोगशील शाळांविषयीची पुस्तके शिक्षकांना थेट उपक्रमाविषयी
मार्गदर्शन करतात. त्यात देशातील प्रयोगशील शाळांविषयीचे कणवू, महाराष्ट्रातील प्रयोगशील शाळांविषयीचे ‘शिक्षण
आनंदक्षण’ ‘सहजशिक्षणाची प्रयोगशाळा’ ‘शिक्षणप्रवाहाच्या उगमापाशी’
सरकारी शाळांतील उपक्रमाविषयी ‘शाळाभेट’ अशी पुस्तके आहेतच पण लीलाताई पाटील यांनी सृजनआनंद शाळेच्या ३०
वर्षाच्या प्रयोगावर लिहिलेली १२ पुस्तके ही प्रत्येक शिक्षकाने वाचलीच पाहिजेत. ‘एका ग्रंथपालाची प्रयोगशाळा’ हे नरेंद्र
लांजेवारांचे पुस्तक शाळेत वाचनसंस्कृतीचे कोणते उपक्रम करता येते याचे मार्गदर्शन
करते. शिक्षणातले तत्वज्ञान व प्रश्न मांडणारी पुस्तके आहेत. त्यात शिक्षणतज्ञ
रमेश पानसे यांची सर्व पुस्तके शिक्षणामागचे विज्ञान आणि तत्वज्ञान उलगडून दाखवतात.
जे. कृष्णमुर्ती ,ओशो रजनीश, गांधी ,विनोबा, कृष्णकुमार यांची अनुवादित पुस्तके, जनार्दन वाघमारे ,अरविंद वैद्य, यांची पुस्तके शिक्षणाविषयी आपली
भूमिका नक्की करायला मदत करतात. जे. कृष्णमुर्ती यांचे विद्यार्थी व शिक्षकांसोबत
गप्पा मारलेले ‘या गोष्टींचा विचार करा’ हे पुस्तक तर शिक्षक व मुले एकाच वेळी वाचू शकतात. कृष्णमुर्ती च्या
भारतातील सर्व शाळा बघून त्या शाळांवर प्रस्तुत लेखकाने पुस्तक लिहीले आहे.
शालाबाहय ,वंचित मुलांचे विश्व समजायला मराठीत खूप पुस्तके
आहेत. ‘नापास मुलांनी शिक्षकांना लिहिलेले इटलीतील जगप्रसिद्ध
‘प्रिय बाई’ हे पुस्तक मलाच लिहिले असे
वाटण्याइतपत आपण अंतर्मुख होतो. ‘न पेटलेले दिवे’ ‘प्रकाशाच्या उंबरठ्यावर’ ‘आमचा काय गुन्हा’ ‘का कराच शिकून’ ‘नापासांची शाळा’
स्टेशनवरच्या मुलांवरचे ‘प्लॅटफॉर्म न झीरो’ यासारखी पुस्तके वंचित मुलांचे जग शिक्षकांना उलगडून दाखवतात.
प्रत्यक्ष अध्यापनात मदत करतील
अशी पुस्तके ही सर्वच प्रकाशकांनी प्रसिद्ध केलीत. इंग्रजी सोप्या रीतीने कशी शिकवावी यापासून तर
चित्रकलेवरची पुस्तके, माधुरी पुरंदरे यांचे ‘लिहावे नेटके’ चे दोन प्रतिभावान खंड, भूगोल कोश, गणितातील कोड्यांची पुस्तके, अरविंद गुप्ता व इतरांची वैज्ञानिक प्रयोग,ओरिगामी, काडेपेट्यांची कोडी असे विपुल मनोरंजन उपलब्ध आहे.
या प्रकारची पुस्तके वाचता वाचता शिक्षक नकळत
इतर ही साहित्य वाचू लागतील. खरे तर डी एड, बी एड
च्या मुलांना पूरक वाचन म्हणून वरील पुस्तके लावायला हवीत.
मुलांना मी
नेहमी तुमच्या घरात किती पुस्तके आहेत ? हे
विचारतो तेव्हा अनेकदा एक अंकी संख्या असते तेव्हा पालकामध्ये वाचनसंस्कृती रुजणे
हे सर्वात महत्वाचे आहे. मुलं वाचत नाहीत अशी तक्रार करणारे आपण त्यांनी वाचावे
म्हणून काय करतो ?मुले पालकांचे अनुकरण करतात. त्यासाठी
पालकांनी गावावरून येताना खाऊ ऐवजी पुस्तकं आणायला हवी.घरात पुस्तके असतील तर ती
नक्कीच वाचली जातील. वरील शिक्षणविषयक पुस्तके ही पालकांनीसुद्धा ही
वाचायला हवीत कारण शिक्षण म्हणजे काय हे त्यांना कळायला हवे आहे. ते अजूनही जुन्या
साच्यातील अपेक्षा शाळा व मुलांकडून करत राहतात. तेव्हा त्यांनी ही पुस्तके वाचली
तर त्यांचे ही शैक्षणिक आकलन उंचावू शकेल.मराठीत आता पालकत्व या विषयावर अनेक
पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ‘नीलची शाळा’ सारखे पुस्तक आपल्या पारंपारिक शिस्तीच्या कल्पनाच बदलून टाकते. रमेश
पानसे मेंदूआधारित नव शिक्षणाची मांडणी करताहेत. ती पुस्तके पालकांना आपल्या
मुलांशी कसे वागावे हे शिकवतील. टीव्ही,मोबाइल,गेम च्या अतिरेकातून मुलांना वाचन हेच हळुवार दूर करू शकते .तेव्हा उगाच
चिडचिड करण्यापेक्षा घरात पुस्तके वाढवत नेण्याचा वाचन प्रेरणा दिनाला संकल्प
करावा. किमान ५ दिवाळी अंक खरेदी व बालमासिकांची वर्गणी भरणे, दर महिन्याला किमान १०० रुपये पुस्तकांसाठी अशा काही गोष्टी आपल्या
मुलांसाठी ठरवायला काय हरकत आहे. आपल्या वार्षिक उत्पन्नातील किती टक्के हिस्सा आपण
पुस्तकावर खर्च करतो याविषयी यादिवशी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. महिला
मंडळांच्या धर्तीवर महिलांची वाचन मांडले व्हायला हवीत त्यात पुस्तक भिशी सुरू
करायला हवी. संगमनेरमध्ये व इतरत्र
महिलांची वाचन मंडळे आहेत ती पसरायला हवीत.
मुलांचे वाचन विकसित करायला सुरुवात रविवार
पुरवण्यातले लेख ,गोष्टी वाचून दाखवाव्यात. मुलांना
थेट वाच म्हटले की ती वाचत नाहीत .सुरूवातीला कथेचा काही भाग एकत्र वाचला तर
त्यातली गम्मत त्यांना कळायला लागते. एकदम पुस्तक वाच म्हटले की वाचत नाही पण काही
भाग वाचायला देणे उपयुक्त ठरते . लहान मुलांसाठी प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक
आणावेत तर मुले वाचतील. वाचनाच्या, शाळेसारख्याच इयत्ता
असतात. त्यात राजा राणी पासून सुरुवात होऊन ती वैचारिक पुस्तकांपर्यंत जायचे असते.तेव्हा
या इयत्ता पार करायला मुलांना मदत करायची असते. सुदैवाने मराठीत इसापनीती ,पंचतंत्र पासून विज्ञान खगोलविश्वापर्यंत सर्व प्रकारची पुस्तके आहेत . सुरवातीला
मुलांसाठी उपदेशपर पुस्तकांपेक्षा त्यांना गम्मत वाटेल अशी पुस्तके निवडावीत.त्यात
जादूची पुस्तके, हसविणारी पुस्तके ,धाडशी
पुस्तके ,विज्ञान कथा असाव्यात.या वयात स्वप्नरंजन करणार्या
मनाला ही पुस्तके जवळची वाटतात.. श्याम, गोट्या, चिंगी व लंपन,सारखे अजरामर नायक आपल्या मुलांना
भेटवू या. इ बुक्स चीही मदत होईल. नॅशनल
बुक ट्रस्ट च्या अनुवादित पुस्तकांनी मराठी बालसाहित्य समृद्ध होते आहे.अरविंद
गुप्ता ,माधुरी पुरंदरे, यांनी यात
मोलाचे काम केले आहे. यात अनुवादीत पुस्तकामुळे आपल्या मुलांना जागतिक व भारतीय
कथाविश्व परिचित होते आहे. चित्रासह आकर्षक पुस्तके मुलांना वाचनाची गोडी लावतील. ‘हनाची सुटकेस’ सारखी नाझी छ्ळवादावरची कलाकृती
मुलांना कुठल्याही द्वेषापासून दूर ठेवील. ’बहुरूप गांधी ‘ सारखे अनुवादित पुस्तक मुलांना गांधी सहज समजून सांगेल. विज्ञान,प्राणी ,पक्षी ,खगोलविज्ञान या
विषयावर मराठीतल्या प्रमुख प्रकाशकांनी मालिका च प्रसिद्ध केल्या आहेत. शास्त्रज्ञ
,जिनियस यांच्या चरित्र मालिका येताहेत. हे मुलामधील
जिज्ञासा विकसित करील. आज आपल्या मुलांवर आपण सुखाचा मारा करतो आहोत. या देशातील
दू;ख, दैन्य ,सामाजिक
विषमता त्यांना माहीत झाली नाही तर ते अधिक आत्मकेंद्रित होत जातील. त्यांच्यात
सामाजिक बांधिलकी रुजवण्याला पुस्तके फार महत्वाची आहेत. महाश्वेतादेवी यांच्यापसून
साने गुरुजी यांची पुस्तके आहेत. दलित भटक्यांच्या आत्मचरित्राचा काही भाग वाचून
दाखवायला हवा.असेही जग आहे हे त्यांना कळाले तर ते संवेदनशील होतील. या जगाच्या
वेदना समजतील. साने गुरुजी कथामाला हा उपक्रम सर्व शाळात रुजायला हवा.शाळामध्ये व
घरात गोष्ट सांगणे कमी होते आहे. शाळेच्या २०० दिवसात किमान १०० गोष्टी सांगता
येण्यासाठी असे संग्रह तयार करायला हवेत.
शिक्षण विभागाने ‘वाचन प्रेरणा दिन ‘ करणं स्वागतार्ह आहे. शिक्षक वाचत नाहीत याचे महत्वाचे कारण आमची नोकरीच
आमच्याकडून वाचन मागत नाही . शिक्षक मूल्यमापणात वर्षभरात केलेले वाचन ,पुस्तक खरेदी यांना स्थान दिले तर नक्कीच पासबुक,फेसबुक
सोबत इतर बुक ही वाचली जातील.. वाचनप्रेरणा
वर्षभर रुजविण्यासाठी गावोगावीच्या शिक्षकांनी महिन्यातून एकत्र येवून वाचलेल्या
पुस्तकांवर चर्चा करणारे व पुस्तक भिशी सुरू करणारे अ-सरकारी गट शिक्षकांना सुरू
करायला शासनाने प्रोत्साहन द्यायला हवे. उदगीर, पाथर्डी, गडहिग्लज या ठिकाणी शिक्षक असे गट चालवितात. त्याचे सार्वत्रिकरण
व्हावे. शाळेत मुलांना व शिक्षकांना त्या महिन्यात वाचलेल्या पुस्तकांवर बोलते करण्याचा सोपा
उपक्रम करता येईल. बुलढाणा शहरात नरेंद्र लांजेवार यांनी शहरातील वेगवेगळ्या
गल्ल्यामध्ये मुलांनाच ग्रंथपाल बनवून पुस्तक पेटी देवून ५०बालवाचनालये सुरू केली
आहेत.या पुस्तक पेट्यातून मुले वाचू लागलीत.
यापासून प्रेरणा घेवून माझ्या घरात मुलांसाठी मी १५ oct. ला बालवाचनालय सुरू करतोय ..तुम्ही पण करणार का ...?
आपण आपल्या घरातली पुस्तके चला परिसरातील मुलांना खुली करून देवू या..
हेरंब
कुलकर्णी
herambkulkarni1971@gmail.com
शिक्षकांनी कोणती पुस्तके
वाचावीत ? अशा निवडक ६०
पुस्तकांचा परिचय करून देणारे हेरंब कुलकर्णी यांचे’ ‘ बखर शिक्षणाची’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.
|
माहिती अप्रतिम आणि खूप उपयुक्त असते।
उत्तर द्याहटवावाचनात शिवाय प्रगल्भता येत नाही म्हणून वाचन करावेच असे सांगितले जाते पण काय वाचावे हे आपण पाहिले सांगितले.
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
सुंदर वाचनाच्या टिप्स दिल्यात .या
उत्तर द्याहटवा