शिक्षकांसाठी साने गुरूजी


            शिक्षकांना ऊर्जा देणारे शिक्षकांसाठी साने गुरुजी

शिक्षकांसाठी साने गुरुजी या हेरंब कुलकर्णी
यांच्या पुस्तकाला पद्मश्री विखे पाटील
साहित्य पुरस्कार वितरीत होतो आहे
त्यानिमित्ताने या पुस्तकाचा परिचय
करून देणारा लेख  


            पांडुरंग सदाशिव सानेंना सर्वजण साने गुरुजी म्हणतात. पण गुरुजींनी शिक्षक म्हणून कसे काम केले ? हे मात्र फारसे माहीत नव्हते . त्यामुळे गुरुजींना प्रेरणा मानणार्‍या माझ्यासारख्या शिक्षिकेला गुरुजींविषयी खूप उत्सुकता होती. हेरंब कुलकर्णी यांच्या शिक्षकांसाठी साने गुरुजी (मनोविकास प्रकाशन) या पुस्तकाने ती उत्सुकता पूर्ण केली. या पुस्तकात साने गुरुजींनी फक्त शिक्षक म्हणून केलेले काम प्रभावीपणे मांडले असल्याने माझ्यासारख्या सर्वच शिक्षकांसाठी ते प्रेरणादायी ठरले आहे.

               हेरंब कुलकर्णी यांची सर्वच  पुस्तके ही स्वतः फिरून,संबंधित ठिकाणी भेटी देऊन,मुलाखती घेऊन,निरीक्षण आणि अभ्यासअंती लिहिलेली असतात. हे पुस्तकही अमळनेर,पालगड या ठिकाणी भेटी देवून अनेकांशी बोलून लिहिल्याने जीवंत झाले आहे..सानेगुरूजीइतकीच  संवेदनशीलता आणि मुलांप्रति असणारी निष्ठा,तळमळ ही हेरंब कुलकर्णी यांच्याकडे असल्याने पुस्तकाच्या या शब्दशिल्पाबरोबरच प्रत्येक पानावर सानेगुरुजींचा वावर जाणवतो. त्यांच्या लेखणीतून शब्दाशब्दांत संवेदना पाझरलेली, वाचकाला जाणवल्याशिवाय रहाणार नाही.

                    . 'संवेदनशीलता' हा तर गुरुजींचा स्थायीभाव होता. गुरुजींची संवेदनशीलता आज तंत्रज्ञानयुगात  किती आवश्यक आहे, या पुस्तकाच्या मनोगतात हेरंब सर म्हणतात "सानेगुरुजींची तळमळ आमच्यासारख्या शिक्षकांत कशी आणायची? हा बदल कायद्याने होणार नाही. हा बदल नियम मोडून होणार नाही. शिक्षकांपुढे गुरुजींना 'रोलमॉडेल' म्हणून उभं करणं,हेच त्याचं उत्तर मला सुचत आहे'. पण हे करायचं कसं? यातून त्यांच्यात निर्माण झालेल्या अस्वस्थतेतूनच 'शिक्षकांसाठी साने गुरुजी' हे पुस्तक साकारल्या गेले.

               'शिक्षकांसाठी सानेगुरुजी' हे पुस्तक दोन भागात विभागले गेले आहे. यात ' भाग १ : शिक्षक सानेगुरुजी' आणि 'भाग २: आजच्या शिक्षकांसाठी सानेगुरुजी' असे दोन भाग  आहेत.  भाग १ मध्ये 'सानेगुरुजी-जीवनपरिचय', 'सानेगुरुजी: अपूर्व शुभंकर व मंगलकारी सत्शक्ती', 'साहित्यिक सानेगुरूजी', 'सृष्टीचे मित्र सानेगुरुजी', 'पांडुरंग साने नावाचा ज्ञानपिपासू विद्यार्थी', 'सानेगुरुजी शिक्षक म्हणून कसे होते?', 'मुलांसाठी 'छात्रालय' मासिक', 'साने गुरुजींची आंतरभारती', 'विद्यार्थ्यांना साने गुरुजींचा सांगावा' अशी प्रकरणे आहेत. सानेगुरुजी शिक्षक म्हणून कसे होते,त्यांची ज्ञानपिपासूवृत्ती,त्यांची कर्तव्यतत्परता,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असणारी अखंड धडपड आणि अखंड भारताचे स्वप्न साकारू पहाणारी आंतरभारतीची उभारणी,हे सर्व वाचतांना आपण थक्क होतो.

    तर भाग २ मध्ये आजच्या शिक्षकांनी गुरुजींपासून प्रेरणा घेऊन आपले रोजचे काम कसे अर्थपूर्ण करावे ? याचे तपशीलवार मार्गदर्शन आहे.'शिक्षक म्हणून केलेले प्रभावी अध्यापन', 'गुरुजींची संवेदनशीलता आणि आजची असंवेदनशीलता', 'आज गुरुजी असते तर ..?' 'गोष्टी हरवल्या आहेत', 'गुरुजींची आंतरभारती आणि आपली जबाबदारी', 'श्यामची आई आणि माझं पालकत्व', 'मुलांच्या सामाजिकीकरणाची माध्यमं व लोकशिक्षक गुरुजी', 'गुरुजींचं स्मारक' अशी प्रकरणे समाविष्ट आहेत. या सर्व प्रकरणात शिक्षकांनी आपले रोजचे काम कसे प्रयोगशील आनंनदादायी व ध्येयवादी करू शकतो याचे उपक्रम दिले आहेत.

   ज्यांना वाटतं, की मला सानेगुरुजी चांगले  माहीत आहेत त्यांनी पुस्तकाचा पहिला भाग वाचला नाही तरी चालेल परंतु आजच्या ज्ञानरचनावाद,शैक्षणिक क्षेत्रात येणारे नवनवीन शासन आदेश यात गोंधळलेल्या, शिक्षकांनी मात्र या पुस्तकातील दुसरा टप्पा आवर्जून वाचायलाच हवा. ज्यांना विद्यार्थ्यांसाठी खूप काही करण्याची इच्छा आहे,त्यांच्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक आहे, तर जे शिक्षक आपल्या पेशाला कुटुंबनिर्वाहाचे साधन किंवा या क्षेत्राकडे फक्त एक व्यवसाय म्हणून पहात असतील,त्यांच्यासाठी  हे पुस्तक डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ठरेल. शिक्षणातील ध्येयवाद आणि भावनांक विकसन या गोष्टी दूर गेल्या आहेत असे लेखक स्पष्टपणे मांडतो. हा ध्येयवाद आणायचा कसा ? नव्या पिढीला संवेदनशील आणि सामाजिक जाणिवा असलेले कसे बनवायचे ? हेच शिक्षणातील आज कळीचे प्रश्न लेखक मानतो.. साने गुरुजी हेच यावरील एकमेव औषध असल्याचे लेखक ठामपणे पुस्तकात अनेकदा मांडतो.

साने गुरुजी लिहितात की,'पांढरपेशे रोमन लोक श्रमजीवी लोकांना तुच्छ मानू लागले,हे रोमन साम्राज्याच्या ऱ्हासाचे एक महत्त्वाचे कारण आहे'.असे इतिहासकार गिबन म्हणाला. अशीच काहीशी अवस्था आज आपल्या देशाची आहे श्रमजीवी आणि बुध्दिजीवी एकत्र यायला हवेत' त्यासाठी शिक्षक समुदायाने पुढाकार घ्यावा असे गुरुजींना वाटते. या अर्थाने शिक्षकाने सामाजिक कार्यकर्ता व्हावे, समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करावे अशी गुरुजींची अपेक्षा आहे. समाज,देश घडवणाऱ्या शिक्षकामधील(सानेगुरूजीमधील) जाणीव, संवेदनशीलता! या पुस्तकात कुलकर्णी सरांनी शिक्षकांसाठी सामाजिक बांधिलकी रुजविणार्‍या उपक्रमांची मांदियाळी दिलेली आहे. "शिक्षणाचे वाढते प्रमाण आणि संवेदनशीलतेचा होणारा ऱ्हास यातील सहसंबंध शिक्षणाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करतो" अशी खंतही कुलकर्णी सरांनी यात मांडली आहे.
   
 हे पुस्तक वाचतांना खरा शिक्षक अंतर्मुख झाल्याशिवाय रहात नाही. आणि अंतर्मुख झालेला शिक्षक स्वस्थ बसणार नाही. म्हणून मला वाटते,हे पुस्तक प्रत्येक शिक्षकाने वाचायलाच हवे,इतकेच नाहीतर शिक्षणक्षेत्रात या पुस्तकाची पारायणे व्हावीत.गुरुजींपासून प्रेरणा घेवून शिक्षकांनी प्रभावी अध्यापन, गोष्टी सांगणे, वंचित मुलाविषयी असलेले प्रेम, सतत लेखन करणे ,विद्यार्थ्यांच्या सामाजिकीकरणाचे उपक्रम आणि शिक्षक म्हणून मी लोकशिक्षक कसा होऊ शकेल ? याची चर्चा आहे. गुरुजींना केवळ देवत्व न देता त्यांचे आपण अनुकरण कसे करू शकतो ? माझ्यातील शिक्षक मी गुरुजींच्या प्रेरणेला कसा जोडू शकतो ? हे अगदी सोपे सोपे उपक्रम देवून लेखक शिक्षकांना प्रेरित करतो. त्यादृष्टीने शिक्षकांसाठी हे दिशादर्शक पुस्तक आहे.

 कुलकर्णी सर म्हणतात त्याप्रमाणे,"स्वतःला झोकून देणं एवढाच गुरुजींचा उपक्रम घेता येईल" आणि "ज्यादिवशी वर्गातले मूल तुम्हाला स्वतःचे वाटेल त्यादिवशी तुम्ही जे काही कराल,तेच उपक्रम असतील,तीच अध्यापनाची पध्दत, जो विचार कराल तेच शैक्षणिक तत्वज्ञान असेल      असा पुस्तकांचा सारांश लेखक सांगतो. हे पुस्तक वाचल्यावर आपण सानेगुरुजींचे वारसदार आहोत ही जाणीव शिक्षकात येईल आणि सहजपणे शिक्षक आपले सामाजिक उत्तरदायीत्व निभावेल इतकी साने गुरुजी या नावाची ऊर्जा आहे म्हणून हे पुस्तक प्रत्येक शिक्षकाने वाचले पाहिजे
  संगीता देशमुख,
 वसमत* जि. हिंगोली                                                    
शिक्षकांसाठी साने गुरूजी -- लेखक हेरंब कुलकर्णी
मनोविकास प्रकाशन पृष्टे  १६०
किंमत १६०


टिप्पण्या