शिक्षकांसाठी साने गुरूजी - पुस्तक


शिक्षकांसाठी साने गुरुजी 

        



आज शिक्षणावर खूप चर्चा होते आहे,प्रयोग होत आहेत. ज्ञानाधिष्टीत समाज,कौशल्याधारित शिक्षण,विज्ञान तंत्रज्ञान,ज्ञानरचनावाद असे अनेक शब्द परवलीचे झाले आहेत. शासन शिक्षणाला     दिशा देण्याचे प्रयत्न करीत आहे. पण चित्र असे दिसते आहे की दिशा देण्याच्या प्रयत्नात शिक्षण मात्र जास्तीत जास्त दिशाहीन होते आहे. नवे प्रयोग त्यातून नव्या समस्या हे दुष्टचक्र थांबण्याची चिन्हे मात्र दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर शिक्षण कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेले शिक्षकांसाठी साने गुरुजी (मनोविकास प्रकाशन) हे पुस्तक वाचण्यात आले आणि शिक्षण बदलाची दिशा एकदम स्पष्ट झाली.

                                    साने गुरुजी केवळ साहित्यिक नव्हते,ते तत्वज्ञानी होते,क्रांतिकारक,कवि,समाजसेवक सारे सारे होते. त्या अंगाने साने गुरुजींवर अनेक लेखकांनी कार्यकर्त्यानी अनेकदा लिहिले. मृत्युचे चुंबन घेणारा महाकवी हा अत्रे यांचा लेख किंवा नानासाहेब गोरे यांचा स्वप्नभाषण हे लेख आजही आपल्याला हेलावून सोडतात. परंतु साने गुरुजी जूया गुरुजी उपाधीने प्रसिद्ध आहेत त्या साने गुरुजींची शिक्षक म्हणून असलेली कारकीर्द मात्र या तुलनेत मात्र नजरेआड राहत आली आहे. हेरंब कुलकर्णी यांच्या या पुस्तकात गुरुजी केवळ विद्यार्थी व शिक्षक म्हणून त्यांच्या मांडले आहेत त्यामुळे ही उणीव भरून निघाली.

               जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणार्‍या आजारांसारखी आज शिक्षणव्यवस्था ही व्याधिग्रस्त झाली आहे या पुस्तकाने शिक्षणात कोणती जीवनसत्व कमी पडत आहेत याचे निदान करणार्‍या वैद्याचे अचूक काम केले आहे. शिक्षकांना प्रेरणा देण्यात शासन आणि समाज अपयशी ठरला आहे सुरूवातीला लेखकाने मनोगतात नोंदवले आहे. शिक्षकाला पूर्वीच्या समाजजीवनात पूर्वीच्या तुलनेत कमी स्थान मिळते आहे त्याची कारणमीमासा केली आहे. आजच्या तंत्रज्ञान आणि वेगवान काळात शिक्षणातील ध्येयवाद आणि भावनांक विकसन या गोष्टी दूर गेल्या आहेत असे लेखक स्पष्टपणे मांडतो. हा ध्येयवाद आणायचा कसा ? नव्या पिढीला संवेदनशील आणि सामाजिक जाणिवा असलेल कस बनवायचे ? हेच शिक्षणातील आज कळीचे प्रश्न लेखक मानतो. त्याला उत्तर म्हणून पुन्हा एकदा शिक्षक,पालक,अधिकारी,राजकारणी यांना साने गुरुजी परिचित करून द्यावे लागेल. साने गुरुजी हेच यावरील एकमेव औषध असल्याचे लेखक ठामपणे पुस्तकात अनेकदा मांडतो.

      साने गुरुजी समाजाला पुन्हा एकदा श्रद्धास्थान वाटणे हा समाजाचा प्रवास विवेकाकडे आणि संवेदनशीलतेकडे जाणारा असेल यावर लेखकाची श्रद्धा आहे व हीच पुस्तक लेखनामागील प्रेरणा आहे.                      या पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात साने गुरुजींचा लेखक म्हणून, स्वातंत्रसेनानी म्हणून परिचय आहे. गुरुजी विद्यार्थी म्हणून कसे ज्ञानपिपासू होते, शिक्षक म्हणून कसे होते, शिक्षक म्हणून त्यांनी कोणते उपक्रम केले? वसतिगृहाचे अधिक्षक असताना त्यांनी मुलांवर किती उत्कट प्रेम केले असे अनेक प्रसंग आहेत.रोज पहाटे उठून दोन तास भित्तिपत्र्क लिहिण्याचा उपक्रम  त्याचबरोबर गुरुजींचे निसर्गप्रेम आणि त्यांची आंतरभारतीची कल्पना अशी तपशीलवार माहिती व गुरुजींचे शैक्षणिक चिंतन आहे.भावनांक विकसनासाठी गुरुजी कसे महत्वाचे आहेत याचीही चर्चा आहे. पुस्तकाच्या दुसर्‍या भागात आजच्या शिक्षकांसाठी साने गुरुजी कसे महत्वाचे आहेत ? याची चर्चा केली आहे. त्यात गुरुजींपासून प्रेरणा घेवून मी प्रभावी अध्यापन, गुरुजींची संवेदनशीलता, गोष्टी सांगणे ,वंचित मुलाविषयी असलेले प्रेम, सतत लेखन करणे, श्यामची आणि आपले पालकत्व,विद्यार्थ्यांच्या सामाजिकीकरणाचे उपक्रम आणि शिक्षक म्हणून मी लोकशिक्षक कसा होऊ शकेल ? याची चर्चा आहे. गुरुजींना केवळ देवत्व न देता त्यांचे आपण अनुकरण कसे करू शकतो ? माझ्यातील शिक्षक मी गुरुजींच्या प्रेरणेला कसा जोडू शकतो ? हे अगदी सोपे सोपे उपक्रम देवून लेखक शिक्षकांना प्रेरित करतो. त्यादृष्टीने शिक्षकांसाठी हे दिशादर्शक पुस्तक आहे.

     त्यामुळे गुरुजींना देवत्व न देता त्यांचे अनुकरण आपण शिक्षक म्हणून कसे करू शकतो ?......याची तपशीलवार माहिती या पुस्तकात आहे गोष्टी हरवल्या आहेत या प्रकरणात साने गुरुजींच्या गोष्टीविषयी लिहिले आहे आणि शाळेत रोज गोष्ट सांगितली जावी असा आग्रह लेखक धरतो. साने गुरुजी कथामाला उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन लेखक शिक्षकांना करतो.

हे पुस्तक लिहिताना गुरुजींच्या भावविश्वात जाण्यासाठी लेखक गुरुजींचे जन्मगाव, गुरुजींनी जिथे शिक्षक म्हणून काम केले त्या अमळनेरला, साने गुरुजी स्मारकाला भेट दिली. गुरुजींना बघितलेल्या व्यक्तींना,गुरुजींच्या विद्यार्थ्यांच्या भेटी घेतल्या. त्यातून पुस्तकात एक जिवंतपणा आला आहे. लेखकाची निरीक्षणशक्ती, जीवनाभिमुख दृष्टिकोन,बाल मानसशास्त्र यावर उभारलेले हे पुस्तक आहे.

त्यामुळे हे पुस्तक शिक्षकांसाठी लिहिलेले असतानासुद्धा ते पालक ,विद्यार्थी आणि सामाजिक भान असलेल्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. प्रत्येक पिढीत साने गुरुजी अजूनही हाकारत आहेत ही खूप आश्वासक आहे. तंत्रज्ञानाच्या युगात साने गुरुजी कितपत उरतील ? या प्रश्नाला जोपर्यंत प्रेम आणि करुणा ही मूल्ये डाउनलोड करता येत नाही तोपर्यंत गुरुजी अपरिहार्य आहेत हे लेखकाने दिलेले उत्तर उत्तर म्हणजेच पुस्तकाची आजच्या कालसुसंगता आहे

                             -शांताराम गजे

शिक्षकांसाठी साने गुरूजी -- लेखक हेरंब कुलकर्णी

मनोविकास प्रकाशन पृष्टे १६० किंमत        

टिप्पण्या