शिक्षकांना प्रेरणा देणार्या ‘शिक्षकांसाठी साने गुरुजी’(मनोविकास प्रकाशन) या हेरंब कुलकर्णी यांच्या पुस्तकातील लेखकाचे साने गुरुजींविषयीचे व आजच्या शिक्षकाविषयी मनोगत ***************************************************************
साने गुरुजीचा शोध घेताना....
पांडुरंग सदाशिव साने
काय संबंध आहे या माणसाशी माझा ?
माझ्या ज्न्मापूर्वी च २१ वर्षापूर्वी मृत्यू पावलेला हा
दडपण मानावं तर फार मोठ्या पदावरचाही हा माणूस नव्हता .त्या काळात एका वसतिगृहाचा अधिक्षक.. फारतर एका विनांनुदानित शाळेत ४ ते ५ वर्षे शिक्षक
माझी तर त्याच्या ५ पट वर्षे चांगली २५ वर्षे नोकरी आता झालीय ना...
मग मी इतका ज्येष्ठ,अनुभवी असताना त्यांना का मानावं ?
पण कितीही दुर्लक्ष करावं म्हटलं तरी मला गुरुजींकडे दुर्लक्ष नाही करता येत...
कितीही टाळले तरी त्या प्रसिद्ध फोटोतील गंभीर करूणामयी भावाकडे नाही दुर्लक्ष करता येत...
त्यांच्या त्या करुण अहिंसक नजरेला नजर नाही देता येत...
....
गुरुजींचा नव्याने शोध घ्यावासा वाटला.याचे कारण शिक्षक बदलण्यासाठी गुरुजी हे मला खूपच महत्वाचे वाटू लागले. शेवटी शिक्षक हुशार असण्यापेक्षा संवेदनशील आणि उत्तरदायी असणेच जास्त महत्वाचे वाटायला लागले. आज ज्या शिक्षकांचे नंबर मेडीकल इंजिनरिंग ल लागू शकले असते अशी मुले प्राथमिक शिक्षक झाले आहेत.पण तरीही लिहिता वाचता न येणार्याम मुला मुलींची संख्या वाढते आहे. याउलट मागच्या पिढीत शिक्षक अतिशय कमी शिकलेले होते. ते शिक्षक इंग्रजीही शिकलेले नसत पण धोतर,कोट,टोपी घालणारे ते शिक्षक ‘देवा तुझे किती सुंदर आकाश’ ही प्रार्थना म्हणत दिवस सुरू करत आणि हातात घड्याळ नसलेली ती माणसं रात्री मुले झोपेपर्यंत कामच करत राहत.कुटुंबासाठी गैरसोयी झेलत ते त्या खेड्यात राहत . ती तळमळ ही आजच्या या हुशार मुलामध्ये कशी आणायची..? कशी संक्रमित करायची ?पण त्यांच्या हाताखालील मुले खर्या अर्थाने घडली .ही विसंगती कशी समजून घ्यायची...?? याचे उत्तर शोधायला गुरुजींकडे जावे लागेल. शिक्षक हा जितका स्वप्नाळू भाबडा आणि भावुक तितका तो अधिक चांगला शिक्षक होण्याची शक्यता जास्त हे लक्षात येत गेले. इथे बुद्धिमत्तेपेक्षाही मुलांविषयी कणव वाटणे सर्वोच्च महत्वाचे आहे हे समजल्यावर साने गुरुजी हीच लस पुन्हा एकदा द्यावी लागेल याची खात्री पटली... रजनिश म्हणाले होते की शिक्षण क्षेत्रातून पुरुष हटवा आणि फक्त महिलाच फक्त राहू द्या कारण हे प्रेमाचे हळुवारतेचे क्षेत्र आहे ..ओशोंना हे गुरुजिंकडे बघून तर सुचले नसेल ना ...?
.
मला गुरुजी शिक्षकांसाठी खूप महत्वाचे वाटतात. आज प्रशासन नावाची गोष्ट शिक्षकांना प्रेरणा देण्यात पूर्णत: अयशस्वी ठरले आहे. तेव्हा शिक्षकात ही स्वयंप्रेरणा कशी जागविता येईल? प्रशासन म्हणून या हुशार शिक्षकातील हुशारी,चिकाटी आपण टिकवू शकलो नाहीत.त्यांच्या स्वयंप्रेरणेला आपण जागवू शकलो नाही,कागदात बुडालेल्या प्रशासनात अनागोंदीत या तरुण मुलांना आपण स्वप्नाळू ठेवू शकलो नाहीत.नोकरीचा उत्साह जशीजशी वर्षे वाढत जातात तसातसा मावळत जातो... तेव्हा शिक्षकात ही स्वयंप्रेरणा कशी जागविता येईल? नोकरीत सुरवातीच्या काळात असलेला उत्साह नंतर टिकत नाही..याचे कारण काय असावे ? याचे एक कारण हे ही आहे की आजच्या प्रशासन व्यवस्थेत ‘चांगल्याचे कौतुक नाही आणि वाईटाला शिक्षा नाही.’असा प्रशासनाचा स्वभाव बनला आहे. यामुळे वाडी वस्तीवर काम करणारे शिक्षक निराश होतात .विदर्भाच्या एका छोट्या गावातून एकदा जाताना एका शाळेने एक प्रभात फेरी काढली होती.कुणी गावकरीही फारशे बघायला नव्हते .आम्ही गाडीतून उतरलो आणि त्यांचे कौतुक केले.ते शिक्षक भरून पावले आणि बारीक चेहरा करून म्हणाले की तुम्ही आलात म्हणून खूप बरे वाटले पण आम्ही खूप वेगवेगळे उपक्रम करतो पण कुणीच दखल घेत नाही हो ..” मला तेव्हा काम करणार्या माणसांचे दू:ख कळाले..मी एका दुर्गम शाळेत गेलो होतो .तिथल्या शिक्षकाचा वर्ग तपासला .तो फार चांगला नव्हता. त्याला रागावलो. तेव्हा तो जे म्हणाला ते शब्द अजून आठवतात की आम्हाला रागावले तरी चालेल पण रागावायला सुद्धा आमच्या शाळेत कुणी येत नाही. तेव्हा कौतुकाला येणे तर दूरच राहिले.
पुन्हा शिक्षणाचा विस्तार करतानाही काही मर्यादा येतात.विस्ताराचा आणि गुणवत्तेचा अनेकदा विषम सहसंबंध असतो त्याचाही परिणाम होतो. आपल्या राज्यातही साने गुरुजींनंतर त्यांच्या प्रेरणेतून आणि स्वातंत्र्य आंदोलनातील मूल्यांचा परिणाम ध्येयवाद राष्ट्रीय शाळा गांधीच्या बुनियादी शिक्षणाचा प्रभाव यातून एक ध्येयवादी कार्यकर्ते असलेली पिढी शिक्षक झाली..पण पुढे नोकर भरतीत होणारा भ्रष्टाचार.शिक्षक मान्यता,बदली यात सुरू झालेल्या आर्थिक भ्रष्टाचाराने शिक्षण क्षेत्राचा प्रवास उलट्या दिशेने सुरू झाला.ध्येयवाद अधिक केविलवाणा झाला..या सर्वातून ध्येयवाद हा थट्टेचा विषय झाला.
कोणतीही शिक्षणव्यवस्था ही तेथील अर्थव्यवस्थेला आणि राजव्यवस्थेला पूरक ठरणारी पिढी निर्माण करीत असते. ज्या वेगाने आपली अर्थव्यवस्था उद्योगप्रधान आणि आता सेवा क्षेत्राला प्राधान्य देणारी बनली. त्यातून तर शिक्षणाचा आशय च तंत्रप्रधान बनला..व्यावसायिक नजरेने चालविल्या या शाळेतली मूल्ये पुन्हा वेगळीच झाली. त्यावर नकळत परदेशी जीवनशैलीचा प्रभाव राहिला.
अशा वेगवान बदलांच्या काळात शिक्षणात ध्येयवाद आणि भावनांक विकसन या गोष्टी खूप दूर गेल्या.
या व्यवस्थेविषयी, शिक्षक, शाळा, संस्था, याविषयी असे विश्लेषण अनेक प्रकारे करता येईल. पण मुख्य प्रश्न हे सारे बदलायचे कसे हा आहे. शिक्षणक्षेत्रात ध्येयवाद आणायचा कसा ? मुलांचा भावनांक कसा वाढवायचा ?या नव्या पिढीला संवेदनशील कसे बनवायचे ? हे कळीचे प्रश्न आहेत.हे होण्यासाठी शिक्षणाच्या रचनेत मूलगामी बदल करावे लागतील. शिक्षकांचे सेवापूर्व व सेवांतर्गत प्रशिक्षण यात बदल करावे लागतील. त्यासाठी संघर्ष सुरू ठेवताना दुसरीकडे शिक्षण क्षेत्रातील महत्वाचा घटक शिक्षक हा डोळ्यासमोर ठेवून आपल्याला शिक्षक व्यक्ती म्हणून त्याला घडवावे लागेल.प्रेरणा द्यावी लागेल.शेवटी व्यवस्थेचा आकार बदलायचा की त्या व्यवस्थेतील माणसे बदलायची ? दोन्हीही एकाच वेळी करावे लागेल. . त्यासाठी शिक्षक आणि अधिकार्यांसना प्रेरणा देणारे साने गुरुजींसारखे जगणे शिक्षकांना परिचित करून द्यावे लागेल. या अर्थाने मी साने गुरुजींच्या जगण्याकडे बघतो .त्यांच्या शिक्षक असण्याकडे बघतो आहे.पण केवळ साने गुरुजींची महानता शिक्षकांना जवळची वाटणार नाही. तर त्यांचे जगणे शिक्षकांना आपले वाटायला त्यांच्यातील शिक्षक उलगडून दाखविला पाहिजे.जर आपण हे केले नाही तर असे महापुरुष केवळ आदरणीय वाटत राहतात. अनुकरणीय वाटत नाही. अनेकदा महापुरुषांचे मोठेपण अंगावर येते आणि त्या ओझयाखाली दाबून देवत्व दिले जाते
साने गुरुजींचे वैशिष्ट्य आणि लोकप्रियतेचे लक्षण हे आहे की ते आपल्यासारखे साधे माणूस वाटतात. त्यांचा साधेपणा खूप जवळचा वाटतो.त्यांनी जे काही शिक्षक म्हणून केले ते कुणीही शिक्षक अमलात आणू शकतो. यामुळेच गुरुजींवर लिहिणे महत्वाचे वाटले..
पालकांसाठी गुरुजी मला महत्वाचे त्यांच्या गोष्टींसाठी वाटतात.. साने गुरुजींच्या श्यामच्या आईने आणि त्यांच्या बालसाहित्याने महाराष्ट्राच्या किमान ५ पिढ्यांवर हे संस्कार केले आहेत. बालसाहित्य हाच तो रस्ता आहे. तेव्हा साने गुरुजींचे पुन्हा जागरण करताना गुरुजींच्या या प्रेरणेकडेही मी आशेने बघतो आहे. साने गुरुजी ही जादू अजूनही तशीच आहे. मला वाटायचे की जुन्या पिढीचे काही शिक्षक ,पालक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी गुरुजी एक हळवी जागा असतील पण प्रत्यक्षात गुरुजी हे सर्वच थरातल्या आणि सर्व वयोगटातील लोकांसाठी अजूनही आकर्षणाचे विषय आहेत.अगदी वृद्धाश्रमातील वृद्धेपासुन तर थेट अमळनेर च्या तरुण शिक्षकांपर्यंत गुरुजी मना मनात अजूनही तसेच आहेत. गुरुजी अगदी काल गेले इतकी त्यांच्याविषयीची हुरहूर आणि ओढ अजून कायम आहे. गुरुजी हे इथून पुढच्याही पिढ्यांना जवळचे वाटतील हे मला वाटते हे त्यामुळेच. आज काळ तंत्रज्ञानाचा आहे शाळा डिजिटल होताहेत, मग साने गुरुजी या पिढीला आपले वाटतील का ?असे अनेकजण विचारतात ..पण तरीही ‘मुलांवर प्रेम करण्याचे ‘कोणतेही सॉफ्टवेयर येत नाही व ‘करुणा’ हे मूल्य अजूनही कोणत्याही वेबसाइट वरुन डाउनलोड करता येत नाही.तोपर्यंत साने गुरुजी हे नव्या पिढीच्या पालक आणि शिक्षकांना हाकारत राहतील
हेरंब कुलकर्णी
‘शिक्षकांसाठी साने गुरुजी’ या पुस्तकातून
आज काळ तंत्रज्ञानाचा आहे शाळा डिजिटल होताहेत, मग साने गुरुजी या पिढीला आपले वाटतील का ?असे अनेकजण विचारतात ..पण तरीही जोपर्यंत ‘मुलांवर प्रेम करण्याचे ‘कोणतेही सॉफ्टवेअर येत नाही व ‘करुणा’ हे मूल्य कोणत्याही वेबसाइट वरुन डाउनलोड करता येत नाही.तोपर्यंत साने गुरुजी हे नव्या पिढीच्या पालक आणि शिक्षकांना हाकारत राहतील
साने गुरुजी आदर्श वाटण्या पेक्षा अनुकरनीय वाटावेत.आणि चंद्र सूर्य असे पर्यंत साने गुरुजी हे प्रत्येकाला अनुकरनीय आणि आदर्श असणार आहेत.
उत्तर द्याहटवागुरूजीला साजेशे लेखन आणि शैली.
उत्तर द्याहटवातुमच्यासारखे गुरुजीना प्रेरणा देणा-या व्यक्ती या सध्याच्या काळात असतील तर निश्चितच शिक्षकांत सानेगुरूजी जन्मास येतील.
उत्तर द्याहटवा