'त्या' हत्तीणीच्या बाळाने कोणती कविता म्हटली असती ...??


      केरळमध्ये मारल्या गेलेल्या हत्तीणीच्या पोटातील बाळाला जन्माला यायचे का ? असे विचारले असते तर ते नाही म्हणाले असते व त्याने ही प्रसिद्ध इंग्रजी कविता ऐकवली असती...माणसांच्या क्रूर जगाचे वर्णन करणारी व म्हणून या जगात न येण्याची इच्छा नसणारी (हेरंब कुलकर्णी )
                     (लोकमत सखी पुरवणीत ९ जून २०२०रोजी प्रसिद्ध झालेला लेख )
  त्या हत्तीणीचे बाळ कोणती कविता म्हणेल ?  ‘A prayer before birth’                         केरळमध्ये हत्तीण ज्या क्रूरपणे मारली गेली आणि त्यात ती गर्भवती होती त्यामुळे अधिक वाईट वाटले. त्या जन्माला न आलेल्या जीवाविषयी सार्वत्रिक वेदना व्यक्त झाली.पण मला प्रश्न पडला जर इतका वाईट अनुभव आल्यावर त्या बाळाला तुला जन्माला यायचे आहे का ? असे विचारले असते तर इतका वाईट अनुभव जन्मापूर्वीच घेतल्यावर त्याला यां जगात नक्कीच यावेसे वाटले नसते. त्याने मृत्यू पत्करणेच पसंत केले असते.
         या पिलाची भावना व्यक्त करणारी इंग्रजीत एक सुंदर कविता आहे ‘A prayer before birth’ या Louis Macneice या कवीची. गर्भातील बालक जन्माला येण्यापूर्वी काही मागण्या करते आहे आणि त्या तुम्ही पूर्ण करणार असाल तरच मी जन्म घेईन अन्यथा मला इथेच मरू द्या असी त्याची भूमिका आहे. हत्तीणीच्या पिलाने हीच भूमिका घेतली असती. त्यामुळे या संवेदना व्यक्त करताना आपण ही कविता वाचायला हवी. हे जग निरागस माणसांसाठी उरले नाही असे आपल्याला लक्षात येईल
          या कवितेतील बोलणारी व्यक्ती अजून जन्माला यायची आहे. ती आईच्या गर्भातून बोलते आहे .जगातील क्रौर्य इतके टोकाला गेले आहे की अगदी गर्भातील बाळालाही इथली भीषणता माहीत झाली आहे.त्यामुळे तुम्ही जगातील वास्तव बदलणार असाल तरच मी जन्माला येतो असे तो म्हणतो आहे. कवितेच्या प्रत्येक कडव्यात तो हे तुम्ही बदलणार असाल तरच मी जन्माला येईल असे म्हणत राहतो.  
         कवितेच्या सुरुवातीला तथाकथित गूढ आणि धार्मिक आक्रमणापासून,सैतान शक्तीपासून माझा बचाव करणार का आणि अनेक प्रकारच्या साथीच्या आजारांपासून माझे रक्षण करणार का ? असे तो विचारतो. त्यानंतर तो मानवी वंशापासून माझे रक्षण करा असे सुनावतो. ही कविता १९४४ साली लिहिली असल्याने त्याकाळात हिटलरने  वंशसंहार मोठ्या प्रमाणात केला होता तेव्हा मानवाला सर्वात मोठा धोका निसर्ग किंवा प्राणी यांच्यापासूनच असल्याने मानवापासूनच माझे रक्षण करा असे तो विनवतो व मानव किती धोकादायक आहे याची जाणीव करून देतो. त्याचप्रमाणे थेट युद्धखोरीपासून माझे रक्षण कर असे सुनावतो. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर ही कविता लिह्ल्यामुळे युद्धाचे किती भीषण परिणाम होतात ते कवीने अनुभवले होते त्यामुळे ते बालक युद्धापासून माझे रक्षण कर असे म्हणणे अगदीच स्वाभाविक आहे. त्यापुढे जाऊन हे बालक चांगल्या दर्जाचे जीवन मागते आहे की जे दारीद्र्यापासून मुक्त असेल. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दारिद्र्य वाढले महागाई झाली होती आणि त्याकाळात वस्तूंचा तुटवडा होता अशा स्थितीत हे बालक किमान सुविधा मिळतील आणि चांगल्या दर्जाचे जीवन मिळावे अशी मागणी करते. मला आकाश पक्षी गवत आणि नद्या यांचा आनंद घेता आला पाहिजे असे ते बालक म्हणते याचे दोन अर्थ आहे की औद्योगिक विकासात निसर्गावर आक्रमण होऊ नये त्यांची शुद्धता तशीच राहावी प्रदूषण होऊ नये अशी अपेक्षा करते आणि दुसरा अर्थ हा की निसर्ग आणि कला यांचा आनंद माणूस तेव्हाच घेऊ शकतो की जेव्हा त्याच्या भौतिक गरजा भागलेल्या असतात त्यामुळे भौतिक जीवन नीट जगता यावे आणि त्यानंतर कलात्मक जीवनाचा आनंद घेता यावा अशी भावना हे बालक व्यक्त करते याचाच अर्थ असा की बाहेरच्या जगात आज तसे जगता येत नाही.  
                  नंतरच्या कडव्यात हे बालक बाहेर आल्यावर त्याच्याकडून जे गुन्हे होतील त्याबाबत अगोदरच मला क्षमा करावी असे म्हणते याचा अर्थ ते हेतुत: गुन्हे करणार नाही तर बाहेर युद्ध सुरु आहे रक्तरंजित जगात त्याला जगण्यासाठी कदाचित हिंसा करावी लागेल इतके जगणे अनिश्चित झाले आहे त्यामुळे त्याला तसेच हिंसक व्हावे लागेल त्यासाठी ते क्षमा मागते आहे आणि बाहेरचे जग किती असुरक्षित झाले अआहे हे अधोरेखित करते आहे. पुढे ते बालक देवाला मोठ्या वयाचे लोक त्याला जे योग्य आणि अयोग्य सांगतील त्याबाबत शहाणपणा दे असे मागते आहे. हा मुद्दा विविध विचारसरणी त्याचा ताबा घेतील आणि हिंसक आणि प्रतिगामी विचारसरणी सुरवातीला अतिशय आकर्षक असतात त्यामुळे योग्य अयोग्य निवडण्याची ताकद दे असे ते बालक म्हणते आहे.यातून जगात चुकीच्या विचारसरणी निरागस मुलांना आणि माणसांना आपल्या जाळ्यात कसे ओढतात याकडे तो लक्ष वेधतो आहे.  जी माणसे स्वत:वर संयम ठेवू शकत नाहीत अशा माणसांपासून मला दूर ठेव आणि जी माणसे स्वत:ला ईश्वर समजतात त्यांच्यापासून मला दूर ठेव असे ते बालक म्हणते. यातून ते बालक चंगळवादी संस्कृती वाढते आहे याकडे निर्देश करते आणि आज स्वत:ला देव जाहीर करून धार्मिक शोषण करणाऱ्या जगभरच्या धार्मिक बाबा बुवांपासून स्वत:चे रक्षण करावे असेही कवी सुचवतो आहे . स्वत:लां देव समजणे हे राजकीय नेत्यांबद्दल ही कवी म्हणतो आहे कारण हिटलर मुसोलिनी यांनी आपणच जनतेचे तारणहार आहोत असा अविर्भाव आणून त्यांचे भक्त देशभर तयार करून युद्धाचा उन्माद केला होता आणि ते देव नसून सैतान आहेत हे लोकांना होरपळ झाल्यावर लक्षात आले होते त्यामुळे असे स्वत:चे दैवतीकरण करणाऱ्यापासून मला दूर ठेव अशी नेमकी मागणी हे मुल करते. युद्धाबाबत कवी अगदी थेट विरोध या बाळाच्या तोंडातून व्यक्त करतो. हे बालक म्हणते की कोणत्याही युद्धात मला मारण्यासाठी यंत्र बनू देऊ नको. केवळ माणसे मारण्याचे मशीन म्हणून मला प्रशिक्षित व्हायचे नाही. युद्धात आणि दंगलीत हजारो माणसे केवळ चेहरा नसलेले यंत्र असतात त्यांची विचारशक्ती मारली जाते असे माझ्याबाबत होऊ देवू नको. मी विचार असलेली व्यक्ती व्हावी अशी अपेक्षा तो व्यक्त करतो.
 शेवटच्या कडव्यात माझे मृत्युपासून रक्षण कर असे युद्धाच्या दिवसात तो अगदीच स्वाभाविक अपेक्षा करतो पान त्यापेक्षाही मला दृष्ट वाईट व्यक्ती होऊ देऊ नको अशी प्रार्थना तो करतो. बाहेरील जे द्वेषाचे आणि युद्धाचे वातावरण आहे ते बघता या मुलातील चांगुलपण कसे टिकेल हा प्रश्न त्याला पडला आहे. There cannot be a moral man in an immoral society या प्रसिद्ध वचनाप्रमाणे आजच्या अनैतिक आणि युद्धखोर हिंसक आणि द्वेषपूर्ण समाजात नैतिकता कशी टिकेल असा प्रश्न त्याला पडला आहे. या प्रवाहात आपण पडलो की वाहत जाणार प्रवाहपतित होणार हे त्याला दिसते अआहे अशा स्थितीत स्वत:चे सत्व टिकून राहावे अशी त्याची कामना आहे प्रार्थना आहे आणि जर असे जग माझ्यासाठी तुम्ही निर्माण करणार नसाल तर मग मला जन्मालाच घालू नका असे हे मुल आपल्याला बजावते. थोडक्यात हे जग आंपण निरागस जीवांना जन्माला येण्याच्या लायकीचे ठेवले नाही असेच ते बजावते आणि असे जग जर तुम्ही निर्माण करणार नसाल तर मग मला मारून टाका असे कवितेच्या शेवटी हे मुल स्पष्ट बजावते.   
    एका अर्थाने आजचा समाज किती हिंसक आणि पतित आहे हे ही कविता दाखवते आणि त्याचवेळी अशा समाजात कोणत्या गोष्टी व्हायला हव्यात हे ही मागणे करते आणि अशा दृष्ट हिंसक जगात आपण लहान लेकरांना आणावे का ? त्यांचे निरागस जगणे या जगात आपण प्रदूषित करावे का ? त्यांना मृत्युच्या खाईत लोटावे का ? असे अनेक प्रश्न ही कविता विचारते. 
             ही कविता आठवली ती हत्तीनीचे पिलू जन्माला आले नाही म्हणून हळहळ करण्याविषयी. पण जर त्या पिलाला विचारले असते की जन्म घ्यायचा आहे का ? तर आपल्या आईशी इतके नीच वागलेल्या जगात त्याने जन्माला येणे नक्कीच नाकारले असते आणि ही कविता त्याने आपल्याला ऐकवली असती. रवींद्रनाथ टागोर म्हणायचे की जन्माला येणारे मुल हे याची साक्ष आहे की परमेश्वराने माणसावरचा विश्वास अजून गमावला नाही पण परमेश्वराने नाही पण जन्माला येणारया लेकरांनी, प्राण्यांच्या पिलांनी मात्र माणसावरचा विश्वास गमावला आहे
                                                        हेरंब कुलकर्णी
                                                       herambkulkarni1971@gmail.com
                                                                                                    फोन ८२०८५८९१९५ 
                                          मूळ इंग्रजी कविता  poem was written by Louis MacNeice in 1944 towards the end of World War Two; a time of bombings in Britain and emerging reports of atrocities and genocide in Germany and… K246


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा