शिक्षणाची कक्षा आणि कक्षेचे शिक्षण. (हेरंब कुलकर्णी)


                    (कालनिर्णय दिनदर्शिकेत प्रसिद्ध झालेला हेरंब कुलकर्णी यांचा लेख)                                           शिक्षणाची कक्षा आणि कक्षेचे शिक्षण
                          

                 आमच्या गावाबाहेर कैकाडी जमातीची भटकी कुटुंबे आली. टोपल्या विकण्याचा त्यांचा व्यवसाय. मी नेहमीप्रमाणे तुमची पोर शाळेत घाला म्हणून मागे लागलो.माझी कटकट टाळायला मुलांना शाळेत घालू म्हणाली. मी जवळच्या आश्रमशाळेत त्यांच्या मुलांसाठी जागा राखून ठेवायला सांगितल्या आणि उत्साहाने फॉर्म भरायला गेलो.. आता सुटकाच नाही असे जेव्हा लक्षात आले तेव्हा त्यांच्यातील महिला चिडली म्हणाली “नाही घालायचे आम्हाला शाळेत.” मी वैतागलो. ती बाई म्हणाली “ १५ वर्षापूर्वी असाच एक शहाणा आला होता पालावर, त्याचे ऐकून पोरगं शाळेत टाकल. आम्ही गावोगावी टोपल्या विकत राहिलो आणि त्याला आईवडिलांकडे एका जागी ठेवले. आज १२ वी ला नापास झाल्यावर आज त्याने शाळा सोडली त्यामुळे नोकरीही नाही आणि त्याला टोपल्याही विणता येत नाही. आमच पोरगं तुमच्याकडूनही हुकले आणि आमच्याकडूनही हुकले “ त्या बाईच्या जळजळीत शब्दांनी मला संपूर्ण शिक्षणाव्यवस्थेचाच फेरविचार करायला लावला.

                    मला नेहमी प्रश्न पडतो की कुत्र्याचे पिलु शाळेत जात नाही, वाघाचे पिलु शाळेत जात नाही मग माणसाच्या पिलालाच शाळा का लागत असेल.. शाळा जर इतकी अत्यावश्यक गोष्ट असेल तर मग ती फक्त माणसाच्या पिल्लालाच का गरजेची असेल ? की आपण ती समजूत करून घेतली आहे ? नेमके काय ? प्राण्यांची पिले नैसर्गिक प्रेरणेला प्रतिसाद देत जगत राहतात. पिढ्यांपिढ्या त्यांनी प्राप्त केलेली कौशल्ये संक्रमित होतात आणि ती पिले जगू लागतात त्या सहज जगण्याला ते शिक्षण म्हणतात. त्यामुळे प्राणी आणि पक्षी शाळेत नसतील जात पण शिक्षण मात्र सुरूच राहते त्यांच्या नकळत. आपल्या आईच्या आणि त्यांच्या जमातीच्या परंपरा. सवयी आणि कौशल्ये त्या कळपात त्यांच्याही नकळत ते आत्मसात करतात तीच त्यांच्या शिक्षणाची मर्यादा आणि कक्षा असते. आणि तेच त्यांचे सामर्थ्य सुद्धा आहे. त्यामुळे प्राणी आणि पक्षी यांच्या जगण्यात एक उत्स्फूर्तता आहे. सहजता आहे. त्यांच्यात दुभंगलेपण नाही आणि तणाव किंवा आत्महत्या नाहीत.
                     पण ही सहजता मग माणसाच्या जगण्यात का आली नाही ? इतक्या सहजतेने माणसाला आपल्या पिल्लांच्या शिक्षणाची रचना का करता आली नाही ?  माणसाच्या पिलाला आपल्याला शाळा का काढून द्यावी लागली. शिक्षण हे कक्षेत का बांधावे लागले ? त्यामुळे सहजतेलाच मर्यादा पडल्या आहेत का ? हा एक महत्वाचा मुद्दा पुढे येतो. यालाच जोडून असे विचारावेसे वाटते की जी माणसे कधीच शाळेत जात नाहीत. ती शिक्षण घेवू शकतात की नाही ? शिक्षणासाठी शाळा ही सक्तीचीच आहे का ? शाळा आणि शिक्षण हे समानार्थी शब्द आहेत ? यावर चर्चा करायला हवी. गरीब कुटुंबातील आणि आदिवासी भटके यातील अनेक पिढ्या शाळेत न जाता शिकत आहेत... निरक्षर असूनही ते शिकत नाही असे म्हणण्याचे धाडस मात्र होत नाही. उलट आदिवासी निसर्ग आणि मागच्या पिढीकडून जितके व्यापक शिक्षण घेतात तितके क्वचितच कोणती जमात घेत असेल. पण या अनौपचारिक शिकण्याला पुन्हा अडचण ही आहे की विविध ज्ञानशाखांचे शिक्षण यात होत नाही, जग समजून घेण्याचे शिक्षणाचे उद्दीष्ट यात पूर्ण होत नाही व आर्थिक उन्नतीच्या सर्व संधी आपण औपचारिक शिक्षण घेतील त्या माध्यमात आणून ठेवल्यात त्यामुळे शाळेच्या चार भिंतीत जे शिकून पुढे जातील त्यांचाच आर्थिक विकास होतो आहे. आदिवासी किंवा बलुतेदारी शिक्षणात कितीही महत्वाची कौशल्ये असली तरी ती बाजारव्यवस्थेशी आणि पदवी शी जोडलेली नसल्याने त्याचा उपयोग आर्थिक विकासाला होत नाही आणि इथल्या व्यवस्थेची चलाखी ही आहे की बहुजनांची परंपरा ही हाताने काम करण्याची होती पण शिक्षणाची रचना ही केवळ स्मरण, सादरीकरण, संभाषण या कौशल्यावरच आयोजित केली गेली.त्यामुळे बहुजनांनाना सहज अवगत कौशल्ये सोडून ही कौशल्ये शिकावी लागली    इंग्रजीत एक वाक्य आहे. No literate society is poor and no illiterate society is other than poor. त्यामुळे ज्या जमातीत शिक्षणाचे प्रमाण जास्त त्या जातींकडे पैसा जास्त आणि ज्या जमातीत निरक्षरता जास्त त्या जमातीत दारिद्र्य जास्त.
                   थोडक्यात चार भिंतीचे शिक्षण आणि त्या कक्षेबाहेरच्या शिक्षणातली ही गुंतागुंत आहे. तेव्हा खरा प्रश्न हा वर्गातील शिक्षण आणि वर्गाबाहेरील शिक्षण यांच्यातील सांधा कसा जोडायचा हा आहे. आर्थिक उत्पन्नाचे सारे स्त्रोत आणि पॅकेजच्या सर्व नोकर्‍या या चार भिंतीच्या शाळेत गुंतल्याने त्या शिक्षणात कितीही मर्यादा असतील तरीसुद्धा तेच आपल्याला घ्यावे लागेल. पण व्यावहारिक शहानपणाचे शिक्षण, निसर्गाचे ज्ञान, परंपरेने मिळणारी कौशल्ये हे सारे शाळेबाहेर मिळाणारे ज्ञान मुलांना मिळण्याच्या पद्धती विकसित करायला हव्यात. आदिवासी जमातीत गोटुल या प्रयोगात परंपरेतून शिकण्याची अशी संधी निर्माण करून देण्यात आली. आदिवासी पाड्याच्या मध्यभागी गोलाकार गोटुल बांधले जाते व त्या पाड्यातील सर्व अविवाहित तरुण तरुणी व सर्व लहान मुले संध्याकाळी तिथे जमतात. मोठ्या वयाची मुले लहान मुलांना अनेक कौशल्ये शिकवतात. रात्री गाणी म्हणतात,नृत्य करतात. या संवादातूनच तरुण तरुणी आपले जोडीदार निवडतात. जगणे जगण्याची कौशल्ये शिकवणारी आदिवासींनी जगाला शिकवलेली ही पद्धती आपल्या तथाकथित अहंकाराच्या कक्षा ओलांडणारी आहे. जगण्याची कौशल्ये अशा अनौपचारिक पद्धतीने शिकवायला हवीत. ग्रामीण भागातील कुटुंबातील आजी आणि ज्येष्ठ नागरिक यासाठी तितकेच महत्वाचे आहेत. शहरी भागातील हे अनौपचारिक शिक्षण पूर्णत कोलमडले आहे. विभक्त कुटुंब व्यवस्थेत मुलांना कोणतेच शिक्षण मिळण्याची शक्यता नाही आणि बकाल होत चाललेल्या शहरी जीवनात संस्काराऐवजी वेगळीच कौशल्ये शिकण्याची शक्यता अधिक त्यामुळे चार भिंतीची शाळा आणि उरलेल्या वेळेत टीव्ही आणि सोशल मीडिया जे शिकविल ते इतकीच फक्त सहज शिक्षणाची कक्षा आता उरली आहे.       
    पुन्हा शिक्षणातून सामाजिक भान येणे, नैतिक मूल्ये विकसित होणे हे सारे चार भिंतीत होत नसते. त्या चार भिंतीच्या कक्षा ओलांडून बाहेर यावे लागते. शाळेच्या भिंतीवर आणि फळ्यावर लिहीलेल्या सुविचारांनी नैतिकता निर्माण होत नाही. याउलट जाणवते असे की शिकलेले लोक अधिक धूर्त आणि बनेल आहेत. रस्त्यावरचा पाकीटमार फार तर एक पाकीट मारेल पण उच्च पदावरील अधिकारी एका सहीने लाखो रुपये उडवतो. भ्रूणहत्येत सुशिक्षित सर्वात पुढे आणि आदिवासी भागात भ्रूणहत्या नाहीत ,बलात्कार नाहीत. तेव्हा ही नैतिक जगण्याची उत्तरे शाळेबाहेर शोधावी लागतात. शाळेच्या कक्षेची ही मर्यादा आहे. नैतिक मूल्ये विद्यार्थी आपले कुटुंब परिसर आणि समाज यांच्या निरीक्षणातून शिकत असतो. त्यामुळे समाज हीच या शिक्षणाची कक्षा (इयत्ता) आहे. त्यामुळे शाळेने जरी कितीही शिकवले तरी समाज ते पुसून टाकायला सक्षम आहे. त्यामुळे केवळ शाळेच्याच नाहीतर समाजाच्या नैतिक कक्षा रुंदावण्याची गरज आहे..         
            दत्ता सावळे नावाचे विचारवंत ठाणे जिल्ह्यात दामखिंडला मुलांची शाळा चालवत होते. सर्व आदिवासी मुले. बोलीभाषा वेगळी. ते बाराखडी शिकवत होते.निसर्गात रमणार्‍या या मुलांचे नेहमीच्या कंटाळवाण्या पद्धतीने शिकण्यात मन लागेना.म्हणून दत्ता सावळेंनी या मुलांची एका रविवारी जंगलात डोंगरावर सहल काढली. वर्गात खाली मान घालून गप्प बसणारी ती मुले डोंगरावर गेल्यावर एकदम खुलली. उड्या मारत होती, गाणी म्हणत होती. दत्ता सावळेना वेगवेगळ्या वनस्पतींची आणि फुलांची नावे सांगत होती पुन्हा तेच झाड फूल दिसल्यावर त्यांची नावे  विचारत होती. पाऊस पडत होता. दत्ताभाऊचे पाय सटकत होते. आणि वरही तोंडी परीक्षा सुरू. एवढे हाल झाल्यावर ते वैतागून पोरांना म्हणाले “ गप बसा रे पोरांनो “ त्यांचे ते हाल बघून झिपर नावाचा पोरगा झाडावरून म्हणाला “ मास्तर, आमचं भी असेच होत वर्गात ग म भ न शिकताना “ आजच्या शिक्षणावर भाष्य करायला हा प्रसंग पुरेसा आहे... समाजातून, निसर्गातून, आणि शाळेतून मिळाणारे शिक्षण एकमेकांशी जेव्हा जोडले जाईल तेव्हाच शिक्षणाच्या आणि जगण्याच्या कक्षा रुंदावतील ....इतकच

                                                             
  हेरंब कुलकर्णी  ८२०८५८९१९५    

टिप्पण्या

  1. खूप सुंदर लेखन आणि विचार मांडणी आमच्या सारख्या नवलेखकाना खूप शिकायला मिळतंय

    उत्तर द्याहटवा
  2. खूप सुंदर लेख....आदिवासी जमातींसाठी मुळात वेगळी शिक्षणप्रणाली निर्माण करून त्यांच्या कलेने घेणेच गरजेचे आहे..👌👍

    उत्तर द्याहटवा
  3. सर खरंच खूप छान लिहिलं आहे तुम्ही असा या गोष्टीचा सगळ्यांनी सारासार विचार केला तर आपल्या शिक्षण पद्धतीत बदल होतील. हे असं ही असू शकतं हे तुम्ही सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिल.या साठी खूप खूप धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  4. अगदी व्यापक विचार मांडलाय सर आपण ..शिक्षण चौकटीत बंदिस्त झालेय,जो साचा गुलामगिरीतून जन्माला आला तोच आजतागायत !त्यात कुठे झालाय बदल ?म्हणून तर आज कौशल्य,सर्जनशीलता यापेक्षा रट्टा मार यालाच शाळा शाळातून अधिक महत्त्व दिले जाते.बदलायला हवे हे ..आपण किती सहज,सुंदर शब्दात मांडता.आपले लेखन,पुस्तक परीक्षण ,मुलाखत हे सारे म्हणून भावते मला.

    उत्तर द्याहटवा
  5. Very excellent thought about what to teach? Education with skills and values is needed.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा