माझ्या आयुष्यात गांधी कसे आले आणि त्यांचा प्रभाव कसा पडला याचा मी घेतलेला माझ्यापुरता शोध
गांधी १५० च्या निमित्ताने सगळ्याच स्तरावर प्रत्येक
क्षेत्रात गांधी किती व्यापून उरलाय याची चर्चा सुरु झाली आहे. मी ही मला ‘गांधी
कधी भेटला ?’ आणि तो किती खोल रुतून बसला आहे ? याचा शोध घेऊ लागलो.गांधींची माझी
पहिली आठवण इयत्ता ३ रीत असतानाची आहे. ३० जानेवारीचा दिवस होता. यादिवशी आमच्या
शाळेतील देशमुख गुरुजींनी संध्याकाळी शाळा सुटण्यापूर्वी सर्व विद्यार्थी एकत्र
केले आणि ‘रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम’ हे भजन सुरु केले. आमचे सगळे
लक्ष शाळा कधी सुटते याच्यावर लागले होते. गुरुजींचे भजन रंगात आले होते. बरोबर ५.३०
वाजले आणि ते थांबले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि भावपूर्ण आवाजात म्हणाले “मुलांनो,
अगदी याचवेळी बापुजीना मारले,आणि ते गांधींविषयी बोलू लागले. बोलताना त्यांचा आवाज
रडवेला झाला होता. जणू ती घटना नुकतीच घडली आहे इतकी वेदना त्यांच्या आवाजात होती.
कोण गांधी ? त्यांना कां मारले ? हे समजण्याचे वयही नव्हते तेव्हा आम्ही कधी शाळा
सोडताहेत याची वाट बघत होतो. पण त्या शिक्षकांचा भाऊक रडवेला झालेला चेहरा आज ४०
वर्षांनतर मला जसाच्या तसा आठवतो आहे. मला गांधी प्रथम असा भेटला आणि मनात रुतून
राहिला. त्या घटनेने गांधी खोल मनात उतरले. शिक्षकांनी ठरवले तर ते
विद्यार्थ्यांवर किती खोल परिणाम करू शकतात याचे हे एक उदाहरण ठरावे.
त्यानंतरचा मोठा परिणाम माझ्यावर
गांधी चित्रपटाने केला. मी संपूर्ण आयुष्यात फारतर २० चित्रपट बघितले असतील.
चित्रपट बघताना मला विलक्षण कंटाळा येतो पण गांधी चित्रपट मी किमान ७ वेळां बघितला
आणि गांधी मनात रुतून बसला तेव्हापासून......
शाळेत
असताना इतिहासाच्या पुस्तकात गांधी भेटत गेले. वेगवेगळी पुस्तके वाचताना भेटत
होते. पण खरे गांधी भावले मला त्यांच्या दोन तीन बाबींनी की ज्याचा परिणाम कायमस्वरूपी
टिकलाय माझ्या मनात. त्यात पहिली बाब ही की गरिबांविषयीची कणव माझ्या मनात रुजायला
गांधीनी मदत केली. गरिबी हा या देशातील सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि तो
विकासप्रक्रिया मोजण्याचा निकष असला पाहीजे हे गांधीनी लक्षात आणून दिले. मी
मध्यंतरी महाराष्ट्रातील गरिबीचा अभ्यास करण्यासाठी ४ महिने महाराष्ट्रातील
आदिवासी व ग्रामीण भागात फिरलो. त्यावर आधारित माझा ‘ दारिद्र्याची शोधयात्रा’(समकालीन
प्रकाशन) हा अहवाल प्रसिद्ध झाला पण यामागची
खरी खोल प्रेरणा मला गांधीनी दिली. माझ्या डोळ्यासमोर गांधी भारतात आले तेव्हा देश
समजून घेण्यासाठी सर्वप्रथम भारताच्या खेड्यापाड्यात फिरून देश समजून घेतला हेच
होते. बरीष्टर असलेल्या मोहनदास करमचंदचे रुपांतर महात्मा गांधीत होण्याला ही
भटकंती कारणीभूत ठरली. गांधींचा दृष्टीकोनच बदलून गेला. प्रत्यक्ष आपली माणसे बघण्यातून
आपल्याला खरा देश समजतो. आपल्या समजुतीना धक्का बसतो.आपल्याला माहीत नसलेले जग
परिचित होते. माणसांचे प्रश्न उमजतात. असे अनेक मुद्दे लक्षात आले. भारताने खुली
व्यवस्था स्विकारल्याला २०१६ साली २५ वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी दारिद्र्य कमी
झाले का ? यावर मिडीयात परस्परविरोधी मते व्यक्त झाली.काहींनी गरिबीची संख्या कमी
झाली हे सांगितले तर काहींनी गरिबांची संख्या वाढली असे सांगितले.सगळे तज्ञ
आकडेवारीत मग्न होते तेव्हा दारिद्र्याची
स्थिती नेमकी काय आहे ?याचा मला अभ्यास करावासा वाटला. त्यासाठी मला अहवाल वाचून बघण्यापेक्षा
प्रत्यक्ष गांधींच्या पद्धतीने
दारिद्र्य समजून घ्यावे असेच वाटले. त्यासाठी मी फिरलो. पुन्हा फिरताना निकष
गांधींचाच होता. गांधी म्हणायचे “जेव्हा कधी तुम्हाला
एखादा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा तुम्ही बघितलेल्या सर्वात दीन आणि गरीब माणसाचा
चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणा. तुमच्या निर्णयाने त्याचा काही लाभ होणार आहे का ?
याचा विचार करा आणि मग निर्णय घ्या” तेव्हापासून ‘अंतिम आदमी’ हा शब्द खूप
जवळचा झाला. त्यामुळे हा अभ्यास करतांना मी प्रत्येक जिल्ह्यात जावून एकच प्रश्न
विचारायचो की मला तुमच्या जिल्ह्यातील सर्वांत गरीब माणसांना भेटायचे आहे. त्यासाठी
मी त्या जिल्ह्यातील सर्वात गरीब तालुके निवडायचो त्यानंतर त्या तालुक्यातील
सर्वात गरीब गावे निवडायचो. त्या गरीब गावातील सर्वात गरीब वस्तीत जाऊन तिथल्या गरीब लोकांशी बोलायचो.तो माझ्यासाठी
अंतिम आदमी होता. त्याचे प्रश्न हे या राज्याचे आणि देशाचे प्रश्न होते.माझ्यासाठी
मानवतेचे प्रश्न होते. त्यां माणसांना भेटून मला व्यवस्थेचा क्रूर चेहरा बघता आला.
कल्याणकारी शासन हे कसे पोहोचत नाही हे बघता आले. लोकशाहीत ही माणसे किती दीन आहेत
हे बघता आले. शितावरून भाताची परीक्षा म्हणतात तसे व्यवस्थेत राहणारी ही केविलवाणी
माणसे सर्वत्र पसरलेली आहेत हे बघता आले.
ही अंतिम माणसे बघण्याची नजर मला गांधींनी
दिली. मी ज्या ज्या विषयावर लेखन केले
त्या त्या विषयात याच माणसांसाठी करावेसे वाटले. सर्व शिक्षा अभियानात शिक्षणात
गुणवत्ता बघण्याचा कार्यक्रम बघायला कुठे जाता हे विचारले तेव्हा मी थेट गडचिरोली,
चन्द्रपूर, मेळघाट, यवतमाळ, नंदुरबार, किनवट हा परिसर निवडला आणि तिथल्या शाळा
बघितल्या. आश्रमशाळा बघितल्य. तिथली उपाशी लेकरे बघितली. दुर्गम भागातील शिक्षण
किती दुर्लक्षित असते ते बघितले व त्यावर आधारित ‘ शाळा आहे शिक्षण नाही ‘ हे
पुस्तक मी लिहीले. शिक्षणातील तो अंतिम आदमी बघण्याचा प्रयत्न होता.त्यानंतर
शाळाबाह्य मुलांचा अभ्यास केला. ही सर मुले आदिवासी दलित भटके मुस्लीम यांची होती.
समाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास स्तरातील ही मुले होती. देशात दीड कोटी व
महाराष्ट्रात किमान ५ लाख मुले शाळेबाहेर होती. या मुलांना शाळेत कसे आणायचे
यासाठी लेखन केले. १९ जिल्ह्यात फिरून शालाबाह्य मुलांच्या प्रश्नाचा अभ्यास केला.
त्यात उसतोड कामगार ,वीटभट्टी, दगडखाण, बांधकाम मजूर यांची मुले बघितली. वेश्यावस्तीत
गेलो त्याच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न बघितला. बालकामगार बघितले. एकूणच होरपळणारे
बाल्य सगळीकडे बघू शकलो. बालकातील हे अंतिम आदमी होते पुन्हा गांधी.. या मुलांच्या
शिक्षणासाठी आम्ही मग आंदोलन करून सरकारला सर्वेक्षण करायला भाग पाडले.
अशीच मोहीम बालविवाहविरोधी सुरु केली.
तेव्हापासून माझे लेखनाचे विषय हे अंतिम आदमीविषयी आहेत. वाचन हि त्याच प्रकारचे
होते. सध्या सकाळ वर्तमानपत्रात मी एक मालिका लिहितोय. त्यात एका कष्टकरी समुहासोबत
मी एक दिवस राहतो आणि त्याचे जगणे मांडतो पुन्हा इथेही अंतिम आदमी कडेच लक्ष जाते
आहे. ही गांधींची देण आहे.
महात्मा गांधी च्या आणखी एका वाक्याने एका
मोठ्या विषयाशी जोडले गेलो. ते आंदोलन दारूबंदीचे. अनेकदा दारू पिण्याला प्रतिष्ठा
दिली जाते ते व्यक्तीस्वातंत्र्याशी जोडले जाते. त्यामुळे दारूबंदी ची मागणी करणे
अनेकांना मागास समजले जाते पण गांधींच्या दोन वाक्यांनी धीर दिला. ते म्हणतात की
मला जर एक दिवसासाठी हुकुमशहा केले तर मी सर्वप्रथम दारूबंदी लागू करील. अनेकदा
विकासासाठी दारुवरील कर उपयोगी ठरतो असे म्हटले जाते. त्यासाठी दारूविक्रीचे समर्थन
केले जाते. पण गांधीनी ती स्पष्टता दिली. ते म्हणतात की दारूच्या पैशातून जर विकास
होणार असेल तर आग लागो त्या विकासाला. असा विकास झाला नाही तरी चालेल. याने दृष्टीकोनात
नेमकेपणा आला. देशी दारूचा ग्राहक हा आजही अतिशय गरीब माणूस आहे. त्याचा प्रपंच
उध्वस्त होतो. गांधीना हे उमगले होते म्हणून तर गांधीनी स्वातंत्र्याच्या इतक्या
धकाधकीतही दारूबंदी आंदोलन सुरु केले. त्यांना या प्रश्नाची दाहकता कळाली होती. त्यामुळे
गरीब कुटुंबासाठी दारूबंदी किती महत्वाची असते हे लक्षात येईल. गांधींच्या
भूमिकेमुळे दारूबंदी साठी लढताना धीर आला. आज दारूबंदीचा विषय काढला की आपण
कोणीतरी मागास आहोत अशा नजरेने बुद्धीवादी लोक बघतात. गांधीच्या दारू आणि
दारिद्र्य यातील सहसंबंध लक्षात आला. गरिबांच्या हातात येणारा पैसा दारू हिरावते. तेव्हा
आरोग्य महिलांची सुरक्षितता आणि सन्मान यासाठी गरिबांची दारू सुटली पाहिजे. आम्हाला
हे काम करताना दारूतून मिळणारा पैसा हा विकासासाठी वापरावा असे सांगितले जाते
त्यावेळी गांधींची स्पष्ट भूमिका आठवते आणि त्याआध्रारे आम्ही ठाम भूमिका घेतो. तेव्हा
दारुबंदीत काम करतांना बापू उपयोगी ठरतात.
गांधींनी मला केवळ विचार
करण्यापेक्षा कृतीचे महत्व सांगितले.आज आम्ही फक्त विचारवंत होत आहोत आणि आमची
कृती ही केवळ सोशल मिडीयावर पोस्ट टाकून होते आहे. गांधी मला प्रत्यक्ष काम
करण्याची प्रेरणा देतात कारण जो जो प्रश्न त्यांच्या लक्षात आला त्या त्या
प्रश्नावर लगेच त्यांनी कृती केली केवळ बोलले नाहीत.त्यामुळे स्वातंत्र्य आंदोलन सुरु
असताना गांधीनी अस्पृश्यता निवारण, कुष्टरोग निर्मुलन, दारूबंदी, निसर्गोपचार, हिंदी
प्रसार असे अनेक विषयावर त्यांनी कृती केली. कोणत्याही विषयावर ते नुसते बोलून
थांबत नव्हते तर ते कृतीही करीत होते. मला
तेव्हापासून ही सवय लागली की एखाद्या प्रश्नावर मला बाकी लोक काय कृती करतील याची
मी वाट बघत नाही. मी काहीतरी करायला हवे असे मी मला बजावतो आणि किमान त्यावर पत्र
लेख लिहिणे व कार्यकर्ते संघटना यांच्या मदतीने काही करणे असे करत राहतो. हे
पुरेसे नाही पूर्ण रस्त्यावर उतरले पाहीजे अशीच माझी भावना आहे पण किमान कृतीचा मी
माझ्यासाठी आग्रह धरतो ही मला गांधीची देण आहे.
शिक्षणक्षेत्रात काम करताना
गांधींची बुनियादी शिक्षणाची मांडणी मला हलवून गेली. आज समाजात शारीरिक श्रम करणाऱ्याला
कमी मोबदला आणि बौद्धिक श्रम करणार्याला जास्त मोबदला याकडे गांधी लक्ष वेधून
श्रमाला प्रतिष्ठा शिक्षणात मिळायला हवी हा मुद्दा मांडतात. पाचव्या वेतन आयोगाला
विरोध करताना माझ्या मनात हा मुद्दा होता.बुनियादी शिक्षण राहिले असते तर आज श्रम
करणार्यांविषयी सन्मानाची भावना रुजली असती.शिक्षणातून नोकरी मिळण्यासाठी सारे
प्रयत्न करतात व आजच्या शिक्षणातून उद्योजक निर्माण होत नाहीत. बुनियादी शिक्षणाची
अंमलबजावणी झाली असती तर शिक्षण घेवून अनेकांनी रोजगार निर्मिती केली असती. शिक्षण
क्षेत्रात मला तसे प्रयत्न करता आले नाही पण असे उपक्रम करणार्या प्रकल्पाना भेटी दिल्या
त्यावर लिहीत राहिलो.पाबळचा शिक्षणप्रयोग मला त्या अर्थाने महत्वाचा वाटला. तिथे
अनेकदा जाऊन आलो. त्याच्या सार्वत्रिकीकरणासाठी लेखन केले. मला भारतातील आज ज्या
बुनियादी शिक्षणाच्या शाळा सुरु आहेत त्यांना भेटी देवून त्यावर एक पुस्तक करावे
असे नेहमी वाटते.
आतला आवाज हा शब्द मला सुरुवातीला खोटा
वाटायचा. गांधी इतरांवर प्रभाव लादायला तो वापरत होते असे मला वाटायचे पण असे
अनुभव मी घेतले तेव्हा जाणवले की आयुष्यात असा एक क्षण येतो की त्यावेळी आपण
समाजाचा किंवा कोणत्याही विरोधाचा विचार न करता आपण एखाद्या भूमिकेवर ठाम राहतो. पाचव्या
वेतन आयोगाची वेतनवाढ जाहीर झाली तेव्हा असाच क्षण माझ्या आयुष्यात आला. तेव्हा
माझे वय फक्त २७ वर्षाचे होते. मी माझ्या एका गरीब विद्यार्थ्याला भेटलो. तो फक्त
३०० रुपयात ३ माणसांचे कुटुंब चालवत होता. मी भयंकर अस्वस्थ झालो आणि आपण हि वाढ
घेता कामा नये असे इतक्या तळातून वाटले की मी प्रतिज्ञापत्र करून राष्ट्रपती
मुख्यमंत्री यांनाच पाठवून दिले थेट. परिणामाचा विचारही माझ्या मनात आला नाही. मोठ्ठे
आग्यामोहोळ मी उठवून घेतले. प्रचंड टीका माझ्यावर झाली पण किंचितही भीती त्या लहान
वयात मला वाटली नाही. पुढे सरकारने तो पगार मला सक्तीने दिला पण त्याक्षणी
नाकारताना मी अगदी खरा होतो निर्भय होतो. पुढे संप होताना एकट्याने शाळेत थांबलो
पण मला भीती वाट्त नाही. व्यक्तिगत आयुष्यत मी खूप भित्रां आहे पण अशा नैतिक
भूमिका घेताना मला माझा आतला आवाज मला ताकद देतो. गांधी माझ्यासोबत उभे
असतात.
गांधी मला आणखी महत्वाचे
वाटतात ते time management साठी. गांधीनी १९१५ ला भारतांत आल्यावर १९४८ या
मिळालेल्या ३३ वर्षात २३३८ दिवस तुरुंगात काढले म्हणजे जवळपास ६ वर्षे ते तुरुंगात
होते. उरलेल्या २७ वर्षात या माणसाने सगळा भारत पिंजून काढला. स्वातंत्र्य
आंदोलनात मोठी आंदोलने उभी केली आणि ते करताना अस्पृश्यता निवारण,निसर्गोपचार,
दारूबंदी, हिंदी प्रसार, स्त्री सक्षमीकरण, बुनियादी शिक्षणाच्या शाळा अशा कितीतरी
विषयाला गती दिली. ही कामे करतांना त्यांनी एकूण एक कोटी शब्द लिहिले म्हणजे रोज
किमान ७०० शब्द सरासरी ते लिहित होते. या सर्वांसाठी या माणसाने वेळ कसा काढला
असेल ? वेळेचे नियोजन काय दर्जाचे असेल. मला नेहमी हे गांधी आठवत राहतात आणि आपण
प्रत्येक क्षण असा वापरला पाहीजे असे मला वाटत राहते. ही गांधींची प्रेरणा खूप
महत्वाची ठरली. त्यामुळे मी कधी दुपारी झोपलो तरी मला अपराधी वाटते.मी टीव्ही बघतच
नाही चित्रपट बघत नाही. वेळेचे नियोजन मला गांधी शिकवतात.
असाच मी
एकदा सातार्याला गेलो होतो. देवदत्त दाभोळकर यांनी शिक्षणात प्रेरणा कशी निर्माण
करता येईल असे एक चर्चासत्र ठेवले होते. नरेंद्र दाभोलकरानी मलाही बोलावले. सगळे पारंपारिक मांडणी करीत
होते. जेवणाच्या सुटीत नरेंद्र दाभोलकर यांनी
मला गांधींचा वेगळाच पैलू सांगितला. ते म्हणाले की कोणता नेता जास्त
प्रभावी ठरतो ? तर मला जे स्वप्न पडते त्या स्वप्नाचा भागीदार
मी किती लोकांना बनवू शकतो ? ते स्वप्न जणू त्यांचेच आहे अशी भावना त्यांची व्हावी असे
वाटायला लावणे यात नेत्याचे यश असते. गांधींनी ते केले. त्यांची स्वप्न सगळ्या
भारताची आहेत असे इतके सहज इतरांना वाटायला लावले की महान आंदोलन उभे राहिले. मी
ते चर्चासत्र विसरलो पण नरेंद्र दाभोलकर यांचा हा गांधी मात्र पक्का लक्षात
राहिला. आता जेव्हा केव्हा कामात निराशा येते तेव्हा स्व्प्नांचे भागीदार आपण कमी
बनवतो आहोत असे लक्षात येते व कामाला लागतो.....तो गांधी मला नेहमी खुणावत राहतो...
हेरंब कुलकर्णी
फोन ८२०८५८९१९५
herambkulkarni1971@gmail.com
( अभिजित जोंधळे अंबेजोगाई यांच्या शब्दोत्सव दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख )
Apratim lekh sir !
उत्तर द्याहटवाखूप सघन ख आहे ...
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेख
उत्तर द्याहटवा