महाराष्ट्रातील तंत्रस्नेही राष्ट्रपती पुरस्कार विजेते जिल्हा परिषद शिक्षक


                                           
           
                                   
  महाराष्ट्रातील ३ शिक्षकांना तंत्रज्ञानाच्या नवोपक्रमशील वापरासाठी यावर्षीही पुन्हा राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. या शिक्षकांच्या कामाविषयी लोकमत च्या मंथन पुरवणीत प्रसिद्ध झालेला हेरंब कुलकर्णी यांचा लेख (फोन नंबर विक्रम अडसूळ ९९२३७१५४६४ रवी भापकर ९४२३७५१७२७ सोमनाथ वाळके ९८३४५०२१६१ )
-------------------------------------------------------------------------------------------------------------------                      भारत सरकारच्या वतीने तंत्रज्ञानाच्या नवोपक्रमशील वापरासाठी शिक्षकांना राष्ट्रीय आय सी टी पुरस्कार दिला जातो.राष्ट्रपती पुरस्काराइतकाच हा देशपातळीवर प्रतिष्ठीत पुरस्कार आहे. २०१० सालापासून हा पुरस्कार दिला जातो पण २०१० ते २०१५ या पाच वर्षात या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून कोणीही पात्र ठरले नाही. २०१६ साली संदीप गुंड,सुनील आलूरकर व मनीषा गिरी या शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला व २०१७ च्या पुरस्कारासाठी परीक्षण होऊन यावर्षी देशभरातून 43 तर महाराष्ट्रातून तीन शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सुरवातीला प्रत्येक जिल्ह्यातून ३ नावे पाठवली जातात. प्रधान सचिवांची समिती त्यातून फक्त ६ नावे राष्ट्रीय स्तरावर पाठवते.प्रत्येक राज्याचा कोटा ठरलेला असतो. दिल्लीत ज्युरी महाराष्ट्रासाठी ३ शिक्षक निवडतात. यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील बंडरगरवस्ती शाळेतील विक्रम अडसुळ,याच जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद सरदवाडी शाळेतील रवी भापकर व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद पारगाव जोगेश्वरी शाळेतील सोमनाथ वाळके यांना जाहीर झाला आहे.
              महाराष्ट्रात तंत्रस्नेही शिक्षकांची चळवळ सुरु झाली.तंत्रज्ञानाचे विविध अविष्कार ग्रामीण भागातील शिक्षकांनी शालेय कामात दाखवून दिले.तंत्रस्नेही शिक्षकांनी एकत्र येऊन त्याची संमेलने घेतली इतकी ही चळवळ बहरली.मागील वर्षीपासून शिक्षकांना मिळालेले ICTराष्ट्रीय पुरस्कार तंत्रस्नेही चळवळीचा सन्मान आहे.            
              
     विक्रम अडसूळ हे महाराष्ट्रातून यावर्षी राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले एकमेव शिक्षक आहेत. 

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मेंढपाळ कुटुंब असलेल्या वस्ती असलेल्या बंडगरवस्ती  या शाळेत ते तंत्रज्ञानाचे प्रयोग करतात. या वस्तीकडे जायला धड रस्ताही नाही. या पार्श्वभूमीवर हे यश अधिकच उठून दिसते.सुरवातीला अडसूळ यांनी   छोट्या-छोट्या लघुपटांची निर्मिती केली . अध्यापन करताना ते फेसबुक, यु-ट्युब वरील अभ्यासोपयोगी व्हीडियो विद्यार्थ्यांना दाखवितात . व्हीडियो कॉन्फरसिंगद्वारे  परदेशातील शाळेंशी मुलांचा संवाद साधला जातो.  krutishilshikshak.blogspot असा ब्लॉग तयार करून त्यावर  विविध शैक्षणिक विषयावर लेखन केले आहे  . विशेष म्हणजे त्यांनी तंत्रज्ञानाला शिक्षणात गती देण्यासाठी   क्टीव्ह टिचर्स महाराष्ट्र’ असा तंत्रस्नेही शिक्षकांचा समूह तयार केलेला आहे.यात १०,००० शिक्षक आहेत. त्यात ते इ magazine काढतात. या समूहामध्येही विविध नाविण्यपूर्ण राबविलेल्या उपक्रमांची माहितीचे आदान-प्रदान केले जाते. 

या शिक्षकांची शिक्षक संमेलने सुटीच्या काळात घेतली जातात व विविध कार्यशाळाही घेतल्या गेल्या. त्यात विविध इ आशय निर्माण करताना त्याच्या वापराबाबत त्यात मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे ग्रामीण शिक्षकात तंत्रज्ञान वापराचा आत्माविश्वास आला आहे. परराज्यातील मुलांशी झूम मिटिंग संवाद साधतो. बिहार व उत्तर प्देशाच्या मुलांशी गप्पा मारून तिथल्या शैक्षणिक प्रगतीची माहिती मुले घेतात.राज्याच्या  अभ्यासक्रम समिती सदस्य म्हणून काम करताना ६ वी व ७ वी च्या पाठ्यपुस्तकात QR कोड चा वापर करण्यासाठी तसेच इ – कंटेंट निवडण्यासाठी अडसूळ यांनी काम केले. पहिली दुसरीच्या मुलांसाठी कोरी पाटी,ATM प्रश्नपेढी सारखे app तयार केले आहेत.विद्यार्थी मूल्यमापनासाठी online व offline टेस्ट व प्लीकर्सचा वापर केला जातो.तंत्रज्ञानाच्या वापराने मुलांची गळती व गैरहजरी कमी झाली आहे.  पालकांना शाळेतील विविध उपक्रम कार्यक्रम तसेच पाल्याविषयी माहिती देण्यासाठी way to sms चा वापर केला जातो.           

                      सोमनाथ वाळके यांनी शाळेत तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी संगणक, लॅपटॉप, प्रोजेक्टर, टॅबलेट, स्मार्टबोर्ड, सोलर सिस्टीम, इन्व्हर्टर, अँड्रॉइड टीव्ही, VR बॉक्स, 3D क्लासरूम आदी बाबी लोकसहभागातून उभ्या केल्या आहेत. 
                                   

शाळेतील विद्यार्थी टॅबच्या मदतीने शिकत आहेत तसेच विविध शैक्षणिक व्हिडीओ, पीपीटी, शैक्षणिक सॉफ्टवेअर, अभ्यासक्रम विद्यार्थी प्रोजेक्टरवर पाहून शिकतात तसेच इंटरऍक्टिव्ह स्मार्टबोर्ड च्या साहाय्याने विविध शैक्षणिक कृती करत आनंददायी शिक्षण घेत आहेत. पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषदेची शाळा त्यांनी स्काइप च्या साहाय्याने जगभराशी जोडलेली असून विद्यार्थी जगातील विविध शाळा,शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या साहाय्याने चर्चा करत नवनवीन बाबी शिकतात. 
                                     

जगभरातील विविध प्रेक्षणीय स्थळे, प्राणिसंग्रहालय आदींची सफर शाळेत बसून करतात.शाळेत रेकॉर्डिंग स्टुडिओ उभारला असून त्या ठिकाणी पाठ्यपुस्तकातील विविध कविता, प्रार्थना, समूहागीते यांना चाली लावून रेकॉर्ड केले जाते. या नवोपक्रमास राज्यातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सुद्धा मिळाले आहे.शाळेतील वीज समस्येवर उपाय म्हणून सोलापूरच्या प्रिसीजन फौंडेशनच्या सहकार्याने त्यांनी शाळेत सोलर सिस्टीम बसविलेली आहे त्यामुळे शाळा वीजबिल मुक्त झाली आहे.
          शासनाच्या दीक्षा व मित्रा या अँप साठी त्यांनी डिजिटल शैक्षणिक साहित्य तयार केले आहे. ‘शिक्षककट्टा’ शैक्षणिक ब्लॉग  तयार केला असून स्वतःचे युट्युब चॅनेल तयार केले आहे.   यापूर्वी मायक्रोसॉफ्ट तर्फे मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट हा पुरस्कारही मिळाला आहे. वर्गात तंत्रज्ञान कसे वापरावे ? या विषयावर त्यांनी राज्यभर शिक्षकांच्या कार्यशाळा घेतल्या असून हजारो शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे.त्यांनी राज्यभरात आतापर्यंत 70 पेक्षा जास्त तंत्रज्ञान  कार्यशाळा घेतल्या आहेत.
           राज्यातील पहिला म्युझिक स्टुडीओ लोकसहभागातून उभा केला आहे .कलेसारख्या  दुर्लक्षित विषयाचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी कसा फायदा करून घेता येतो हे या शाळेतील हायटेक रेकॉर्डिंग स्टुडिओ पाहिल्यानंतर लक्षात येते.हा स्टुडिओ एकदा चोरीला गेल्यानंतर सुद्धा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सहकार्याने सोमनाथ वाळके यांनी हा स्टुडिओ पुन्हा उभा केला. आजमितीस या शाळेत कॅसिओ,ऑक्टापॅड, काँगो, डफ, ढोल,ताशा,ढोलकी, खंजीर, ट्रँगल, बिगुल अशी अनेक प्रकारची भारतीय व पाश्चात्य वाद्ये आहेत,शाळेतील विद्यार्थी ही सर्व वाद्ये लीलया वाजवतात. शिक्षककट्टा ब्लॉगवर विविध प्रकारची शैक्षणिक माहीती,सॉफ्टवेअर ,लेख उपलब्ध करून दिले आहेत.

                      रवी भापकर हे गेल्या सहा वर्षांपासून अध्यापनात संगणकाचा वापर करत असून यामध्ये विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान घेताना येणा-या अडचणी लक्षात घेवून त्या सोडविण्यासाठी शिक्षण विभागाला त्या कामाची  मदत होत आहे.
                 

पाच वर्षांपूर्वी भापकर यांनी शाळेतील विदयार्थी खाजगी संस्थेच्या स्पर्धा परिक्षेत बसविली होती.त्यावेळी त्यांनी पॅकेजमध्ये एक आॅनलाईन टेस्ट मोफत दिली होती ही टेस्ट मुलांनी उत्साहाने सोडविली. त्यानंतर दुस-या टेस्ट साठी संस्थेने 100 रूपये फी  ठेवली होती. पंरतू ही फी मुलांना भरणे शक्य नव्हते. अशा वेळी मुलांची ज्ञानांची कक्षा उंचवावी. म्हणून भापकर   गुगल ,युटयुबच्या मदतीने  आॅनलाईन टेस्ट बनवयला शिकले, व विद्यार्थ्यांसाठी भरपूर टेस्ट बनवल्या. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा म्हणून ब्लॅागची निर्मिती केली. व त्या द्वारे या टेस्ट राज्यात सर्वांपर्यत पोहचविल्या. यामुळे भापकर यांचे ते संकेतस्थळ राज्यातील सर्वाधिक आवडते बनले. या संकेतस्थाळावर 27 लाख पेक्षा जास्त विदयार्थी व शिक्षकांनी भेटी देवून लाभ घेतला आहे.
                                     

राज्यातील विदयार्थी व शिक्षक यांना सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी. म्हणून त्यांनी www.ravibhapkar.in  या संकेतस्थाळाची निर्मिती केली. विदयार्थीसाठी विविध एंड्रॉइड अॅप्स ची निर्मिती केली. राज्यातील प्रत्येक शिक्षक तंत्रस्नेही व्हावा यासाठी पुणे,मुंबई,औ.बाद, नागापूर ,नाशिक सह राज्यात 100 च्या वर कार्यशाळा घेवून शिक्षकांना मार्गदर्शन केले.  शिक्षणाची वारी’ या शासनाच्या उपक्रंमातर्गत सलग 2 वर्ष राज्यातील विविध ठिकाणी जावून शिक्षकांना मार्गदर्शन इ.1 ली ते 10 वीच्या पाठयपुस्तकातील क्यू आर कोडसाठी लागणाा-या ई.कंटेट ची निर्मिती केली . त्यांनी बनविलेल्या डिजीटल कंटेटचा बालभारतीच्या  पुस्तकात वापर होत आहे. शासनाच्या मित्रा तसेच दिक्षा अॅप विकासनात महत्वाची भुमिका, ग्लोबल नगरी उपक्रमातर्गंत विदेशी भारतीयांशी शाळेतील मुलांच्या विडीओ काॅन्फरन्सचे आयोजनात महत्वपूर्ण सहभाग. त्यांच्या कामाची दखल स्वःत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी  घेतली. व त्यांनी स्वःताच्या फेसबुक पेजवरून उपक्रमचा फोटो टाकून पोस्ट करून सन्मान केला. तसेच बालभारती पाठयपुस्तकातील क्यू आर कोडमधील ई. कंटेट निर्मिती बाबत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी देखील सन्मान केला आहे. तसेच मायक्रोsoft या कंपनी कडून इनोव्हेटीव्ह एज्युकेटर म्हणून देखील सन्मान झाला आहे.
          
          मागील वर्षीचे व यावर्षीचे हे सहा शिक्षक हे सगळे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत. हे सर्वजण ग्रामीण भागात काम करतात. ते अशा ग्रामीण गावात काम करतात की जेथे कोणतेच प्रोत्साहन नाही किंवा ते जे प्रयोग करतात त्याचे तपशील त्या पालकांना कळतही नसेल.पण तरीही हे शिक्षक नवे नवे प्रयोग तंत्रज्ञानात करत राहतात. आपली उमेद टिकवतात आणि नवे नवे प्रवाह शिकत राहतात. त्यांच्यातील या जिज्ञासेचा आणि प्रयोगशीलतेचा हा सन्मान आहे. यातून महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा प्रवाह अधिक बळकट होईल
                                                         हेरंब कुलकर्णी
                                              herambkulkarni1971@gmail.com 
                                            फोन ८२०८५८९१९५ 


             हेरंब कुलकर्णी यांच्या याच शोधयात्रा blog वरील इतर लेखही जरुर वाचा 

   



टिप्पण्या