साने गुरुजींनी शिक्षक म्हणून कसे काम केले ?


                      

                साने आणि गुरुजी हे दोन्ही शब्द अगदी समानार्थी असावेत अशी महाराष्ट्रात अजूनही स्थिती आहे. याबाबत नानासाहेब गोरे म्हणत की  गुरुजी म्हणजे साने गुरुजी असे समीकरण ज्यांनी उभ्या महाराष्ट्राला मांडायला शिकविले .गुरुजी या सामान्य नामाचे आपल्या गुणविशेषांनी त्यांनी विशेषणाम बनविले.
                    तेव्हा गुरुजींची पहिली ओळख ही शिक्षक म्हणून आहे.महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्राला साने गुरुजींनी प्रेरणा दिली.केवळ गुरुजींच्या प्रेरणेने अनेक प्रतिभावंत महाराष्ट्रात शिक्षक झाले.इतर कोणत्याही क्षेत्रात सहज यशस्वी होऊ शकले असते असे अनेकजण केवळ गुरुजीमुळे शिक्षक झाले.
                     पण इतके असूनही साने गुरुजींनी शिक्षक म्हणून काय काम केले हे फारसे पोहोचले नाही.गुरुजीच्या व्यक्तिमत्वाला अनेकविध पैलू असल्याने इतर पैलुमुळे त्यांच्या शिक्षक असण्याची फार चर्चा झाली नाही. गुरुजी खूप प्रेमळ आणि चांगले शिक्षक होते एवढेच फक्त लोकांना माहीत आहे.त्यांचे लेखक असणे ,’श्यामची आई हा गाजलेला चित्रपट,गुरुजींची लेखक म्हणून प्रतिमा ,त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात केलेले खूप मोठे काम यामुळे नकळत त्याचीच जास्त चर्चा झाली आणि एकूण बेरेजेत गुरुजी एक चांगले शिक्षक होते याबाबत आदर आहे पण त्याविषयी फार माहिती नाही असे झाले. 
                    त्यामुळे साने गुरुजी शिक्षक म्हणून कसे होते ?त्यांचे शिक्षणविषयक चिंतन कसे होते?याची चर्चा करायला हवी.शिक्षक समुदायाला त्यांचे शिक्षक असणे नक्कीच प्रेरणादायक ठरणार आहे.   
              गुरुजींच्या हयातीचा अर्धशतकाचा कालखंड हा महाराष्ट्रातील शिक्षणाचा ,शिक्षणविचारांचा,शैक्षणिक तत्वज्ञानाचा अत्यंत महत्वाचा प्रयोगकाळ म्हणता येईल. टिळक अण्णासाहेब विजापूरकर महर्षि कर्वे र.धो.कर्वे भाऊराव पाटील,पंजाबराव देशमुख हे सारे पडविणे शिक्षणशास्त्रज्ञ नव्हते तर मूलभूत प्रवृतीने शिक्षक व शैक्षणिक तत्वज्ञ होते.महात्मा फुलेंनी त्यापूर्वी वंचितांच्या शिक्षणाची मांडणी आणि कृती केलेली होती. 
              बालशिक्षण व संस्कार यासंबंधीचा गुरुजींचा विचारव्युव्ह हा एका हाडाच्या शैक्षणिक कार्यकर्त्याचा आहे. तो पदवीविभूषित शिक्षणशास्त्रज्ञाचा नाही. बाळशिक्षण म्हणजेच संस्कार व संस्कार म्हणजेच बालशिक्षण असे गुरुजीचे समीकरण आहे. आई व शिक्षक हे त्यांच्या शैक्षणिक व्यूहातील कळीचे घटक होते .बालशैक्षणिक क्षेत्रात आई व शिक्षक या दोन्ही भूमिका एकरूप असतात आणि घर व शाळा एकरूप असतात.                                                           
 शिक्षक म्हणून गुरुजींच्या संकल्पना आपल्यापर्यंत त्यांच्या कादंबरीतूनही पोहोचतात.                              
आपल्या तीन मुले या कथेत स्वामी या पात्राच्या तोंडी ते त्यांचाच सिद्धांत सांगतात.ते म्हणतात “मुलांभोवती जितके स्वस्छ पवित्र मोकळेपणाचे व आनंदांचे वातावरण तितके मुलांचे जीवन सुंदर.मुले सुधारायला पाहिजे असतील तर त्यांच्या भोवतालची सृष्टीच बदला. आदळ आपट आणि शिक्षा दंड ह्यांनी मुलांचा खरा विकास होत नाही.खरा विकास ह्रदयात शिरल्याने होईल,प्रत्यक्ष विकास ह्रदयात शिरल्याने होईल प्रत्यक्ष सेवेने होईल “
शिक्षक म्हणून गुरुजींनी नेमके कसे काम केले हे आपण समजून घेऊ. गुरुजींचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुजी अमळनेर च्या तत्वज्ञान मंदिरात फेलो म्हणून रुजू झाले. तिथे अद्वैत तत्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी देशाच्या विविध भागातून अभ्यासक राहत होते. गुरुजी एक वर्षभर तिथे राहत होते. तिथे त्यांनी खूप गंभीरपणे अध्ययन केले. परंतु तेथील अभ्यासकांचा जीवन व्यवहार बघून त्यांची निराशा झाली. तेव्हा इतरत्र जाण्यापेक्षा त्याच संस्थेच्या शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी काम करावे असे त्या शाळेचे गांधीवादी मुख्याध्यापक श्री.गोखले यांनी त्यांना सुचविले. 
             खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये १७ जून १९२४ ला साने गुरुजी शिक्षक झाले.वासुदेव भावे यांनी ही संस्था स्थापन केली. त्यांचे सहकारी हे वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे होते. बाळासाहेब गुणे यांनी नंतर कैवल्यधाम योग स्थापना केली. ग.भं. जांभेकर  लोकशिक्षण हे मासिक चालवत. हरिभाऊ मोहनी यांनी तर महात्मा गांधींच्या दांडीयात्रेत सहभाग घेतला होता. तेजस्वी शिक्षक व आमचा सनातन धर्म हे ग्रंथ लिहिले. असे अनेक नामवंत शिक्षक गुरुजींसोबत त्याकाळात होते. चंद्रोदय भट्टाचार्य हे बंगालचे शिक्षक त्यांना मिळाले. माधव ज्युलियन ही त्यांच्यासोबत दोन वर्षे सोबत शिक्षक होते.बंगाली मित्रासोबत ते अजिंठ्याला गेले होते. बंगाली गाणी ते म्हणून दाखवत. रविंद्र साहित्याचा परिचय त्यांना मित्रांनी करून दिला. ते कितपत चांगले शिक्षक होतील याची शंका अशासाठी होती की त्यांचा स्वभाव संकोची होता. पुन्हा ते एम. ए. होते त्यामुळे यांच्याकडे शिक्षण शास्त्राची पदवी नाही. त्यामुळे हे कसे शिकवणार हा प्रश्न होता .गरीब स्वभावामुळे ते मुलांवर छाप टाकू शकतील का ? मुलांनाही दरारा नसलेले व्यक्तिमत्व नसल्यामुळे मुलांना ही ते प्रभावी शिक्षक वाटत नव्हते. सुरवातीला त्यांचा तास सुरू असताना मुले उठून जात येऊन बसत पण गुरुजी त्यांना काहीच बोलत नसत. ते कोणाशीही समरस होण्याचा स्वभाव नव्हता. सतत गप्प राहण्याचा स्वभाव. पण अतिशय तळमळीने बोलत.
        काळी टोपी,ओठावर ठसठशीत मिशा,गळ्याभोवती गुंडाळलेले उपरणे आणि त्याचे लोंबते सोगे,काळा गळाबंद,लांब कोट,पायघोळ धोतर,पायात पुणेरी जोडा व हातात पुस्तक असा एकूण गुरुजींचा पेहराव असायचा.सुरवातीला ते ५ वीला इंग्रजी व संस्कृत आणि ६ वीला मराठी शिकवत.पुढे मॅट्रिकला इतिहास व मराठी शिकवत. शिकवताना गुरुजी खुर्चीवर बसत नसत तर टेबलाला खेटून उभे राहत. त्यांना शिकवताना पुस्तक लागत नसे. ५ वीला Tales of Shakespeare ते शिकवत.   
                  गुरुजींचा स्वभाव शांत असूनही त्यांना वर्ग शांत करण्यासाठी फार काही करावे लागले नाही. मुलांच्या वृत्ती उल्हसित झाल्या आणि विषयाशी ते सहज एकरूप झाले.ते सलग आणि अस्सखलीत बोलत .त्या बोलण्यात इतकी माहिती आणि जिव्हाळा असे की मुलांना त्यांचा तास संपूच नये असे वाटे. भाषा विषय शिकविण्यात गुरुजींची विशेषता होती. त्यांच्या बोलण्यात करुणरस असे आणि नकळत गुरुजींच्या डोळ्यात पाणी येत असे..If you love for me will not bring you here, do not let my letter’ या वाक्यावर डोळे भरून आले. व्हेनिसच्या व्यापार्‍याची गोष्ट सांगताना त्यांनी मैत्रीची भव्यता दाखवली. मुले आकर्षक व उत्तेजक भागात रमली.परंतु गुरुजींची खरी ओळख  गुरुजींच्या अश्रुंची किंमत खूप थोड्या मुलांनी समजली अशी आठवण त्यांचे त्यावेळचे विद्यार्थी श्री.ब.कुलकर्णी यांनी लिहिली आहे.
              अनेक व्यक्तिचित्रे त्यांनी उभी केली. मुले पुढे कधीच ती विसरली नाहीत. अनेक विद्यार्थी त्यांनी शिकविलेला कवि दत्त यांचा त्यांनी शिकविलेला पाळणा आणि शेक्सपियरच्या नाटकातला शायलॉकचा संवाद नंतर अनेक वर्षे एकमेकांना सांगत असत. श्री ब. ग. कुलक्रर्णी यांनी गुरुजींनी कवि दत्त यांचा पाळणा कसा शिकवला. याचे वर्णन केले आहे.सर्व वर्ग कारुण्याने मुग्ध झाला. मुले त्यात रमून गेली. गीत चढउतार घेऊ लागले तसेतसे गुरुजींना भरून आले. ते लिहितात “गुरुजी हे गीत शिकऊ लागले.श्यामच्या आईच्या कुशीत झोपलेले त्यांचे मन जागे झाले. आजूबाजूला पसरलेल्या विपन्नावस्थेची त्यांना आठवण झाली.... दारिद्रयामुळे झालेल्या श्यामच्या आईच्या आशा आकांक्षाचे उध्वस्त स्मशान त्यांच्या डोळ्यांपुढे आले. श्यामच्या आईने संयमाने दाबलेले अश्रु त्यांच्या डोळ्यांत दिसू लागले ते गीताशी तात्काळ एकरूप झाले..गुरुजी म्हणाले की आई असणे ही मानवी जीवनातील अति महत्वाची घटना आहे .आईचे प्रेम तेच खरे प्रेम “ कुलकर्णी सांगतात की मधली सुटी सुरू झाली पण तरीही मुले हलली नाहीत .इतर वर्गातील मुले डोकावून बघत की हा वर्ग का सुटला नाही. गीत संपल्यावर गुरुजींनी आणि मुलांनी डोळे पुसले    माझी जन्मभूमी ही कविता शिकविताना डोळे भरून आले असे गुरुजी सांगायचे.त्या कवितेतील नि: सत्व निर्धन तुला म्हणताती लोक ही ओळ त्यांनी म्हटली आणि त्यांचा कंठ भरून आला. डोळ्यातून अश्रु येवू लागल्याने पुढे शिकविणेच त्यांना अशक्य झाले. पुस्तक बंद करून ते वर्गाच्या बाहेर निघून गेले   
---------------------------------------------------------------------------------


  (शिक्षकांसाठी साने गुरुजी’ या हेरंब कुलकर्णी यांच्या पुस्तकातील हा निवडक भाग.. हे पुस्तक मनोविकास प्रकाशन ने प्रसिद्ध केले आहे  )       .



टिप्पण्या