शिक्षण क्षेत्रात मी निराश का आहे ? अस्वस्थ का आहे ? हेरंब कुलकर्णी



 माझी शिक्षण परिक्रमा ( राजहंस प्रकाशन)   या माझ्या  १० वर्षाच्या अनुभवावर लिहिलेल्या पुस्तकातील हे माझे समारोपाचे प्रकरण  (हेरंब कुलकर्णी )
----------------------------------------------------------------------------------
अनेकांना वाटेल की आणखी खूप काम करायचे असूनही, अनुभव घ्यायचे असूनही कशासाठी इतक्या कमी काळावर लिहीले ?हे काय आत्मचरित्र आहे आहे का ? नक्कीच नाही. हे आत्मचरित्र नाही तर दशकभराच्या प्रवासाच्या आठवणी नाहीत...या १० वर्षात मला जितके फिरता आले आणि अनुभव घेता आले ते इतके विविधांगी आहेत आणि समाजमन आरपार तळातून दाखविणारे आहेत सजग वाचकाला शिक्षण हे समाजाचे कसे चित्रण असते ?आणि शाळेच्या एका खोलीत घडणार्यार साध्या सुध्या शिक्षण प्रक्रियेवर परिणाम करणारे किती तरी घटक असतात याचे भान हे सारे अनुभव देतील. राजकारण,सामाजिक प्रश्न ,नोकरशाहीची मानसिकता,भ्रष्टाचार, सांस्कृतिक वेगळेपण,दारिद्रयाचा शिक्षणावर होणारा परिणाम हे सारे सारे तानेबाणे उलगडत जातील. त्यामुळे शिक्षणात काम करणार्यांनना,सामाजिक भान असणार्याण वाचकांना,समाजचिंतक आणि कार्यकर्त्याना आणि मुख्य म्हणजे धोरण ठरविणार्याु प्रशासनाला उपयुक्त ठरावे म्हणून हे सारे अनुभव ललित शैलीत मांडले आहेत. जाणीवपूर्वक शिक्षणाचे तात्विक विश्लेषण करणे टाळले आहे. हेतु हा की ते अनुभवच वाचकांशी बोलावेत आणि त्यातून शिक्षणाचे एक चित्र उभे राहावेत. घटनेला एक कर्ता असावा म्हणून फक्त त्यात ‘मी’ आलो आहे अन्यथा तो कर्ता हा या देशातील अनुभव घेणारा सामान्य नागरिकच आहे .
नर्मदा परिक्रमा करणारी व्यक्ती ही व्यवहारात कोणत्याही पदावर असली तरीही परिक्रमा करताना तिची ओळख ही साधक किंवा परिक्रमावासी हीच तर असते. तसे या रस्त्यावरून जाणारा कुणीही म्हणजे मी आहे इतकेच. त्यात मी किती फिरलो आहे ?मी किती लिहिले आहे ? हा अभिनिवेश नक्कीच नाही.
या १० वर्षाच्या भटकंतीतून काय पदरात पडले ? असा विचार करतो की साधक नर्मदा परिक्रमा करताना नर्मदेला काही देवू शकत नाही तर नर्मदाच त्याला एक उच्च अनुभवाने समृद्ध करते. इतक्या विस्तीर्ण प्रदेशातील शिक्षणव्यवस्थेत आपण काही बादल घडवू शकतो हा अहंकार तर नक्कीच नव्हता. पण या माझ्यामुळे शिक्षण बदलले नसले तरी मी मात्र या अनुभवांनी समृद्ध झालोय. माझ्या जीवनविषयक धारणा मुळातून हलल्या आणि या व्यापक अनुभावातून व्यापक पट सतत अनुभवविश्वाला खुणावत राहतो.कोणत्याही प्रश्नाचा विचार करताना नंदुरबारच्या टेकड्या दिसतात ,मेळघाटातील ती केविलवाणे माणसे दिसतात ,गडचिरोली चे विस्तीर्ण जंगल दिसते आणि शहरी भागातील मोठ्या पूलाखाली झोपलेली माणसेही दिसतात.
खरं तर मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलो.तिथे गरीबी वगैरे काही माहीत असायचे कारणच नव्हते.मध्यमवर्गीय मुलांच्या जशा करियरच्या कल्पना असतात तशा कल्पना माझ्याही होत्या.पण पुढे वाचन करताना सामाजिक वास्तवाची जाणीव सखोल होत गेली आणि प्रत्यक्ष नोकरीत आल्यावर जेव्हा झोपडपट्टी बघितली तेव्हा मध्यमवर्गीय संस्कारांना धक्के बसू लागले. आपण जगतो त्यापलीकडे एक अभावाचे जग आहे याने हललो. त्यातून एक कायमचा तुलना करणारा अपराधीभाव असलेला मी झालो ...नोकरीला लागलो तेव्हा पाचवा वेतन आयोग आला. त्याकाळात या अपराधीभावनेने मला वेतनवाढ घेणे बोचु लागले.’त्यातून मी मला मिळणारी वेतनवाढ नको असे प्रतिज्ञापत्र शासनाला पाठवले...त्यात भाबडेपणा होता..अपराधीपणा होता.माझं वय तेव्हा अवघ २७ वर्षाचे. शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले पण त्या कृतीने सारा संघटित वर्ग माझ्यावर तुटून पडला.शिव्यापासून विविध टोकाचे अनुभव घेतले. हादरून गेलो पण त्यानिमित्ताने सर्व सामाजिक चळवळींशी नकळत जोडला गेलो. ‘नाही रे’ वर्गाचे विश्व परिचित झाले.
त्यानंतर सामाजिक ललित लेखन करायला लागलो. विविध राजकीय सामाजिक विषयावर विडंबन कविता करायचो,विनोदी लेखन करायचो. त्यातून खूप लोकप्रियता मिळाली. त्यातच लेखन करियर नक्की झाले. वृत्तपत्रीय लेखन,आणि विनोदी कविता याच परिघात फिरू लागलो. पण दिवंगत नरेंद्र दाभोळकर यांनी मला वंचितांचे शिक्षण या अंकाचे संपादन करण्याची जबाबदारी दिली.त्यातून पुढे सर्व शिक्षण अभियानात काम करण्याची संधि मिळाली.विविध निमित्ताने महाराष्ट्रात फिरता आले. दुर्गम आदिवासी भाग बघता आला आणि माझे अनुभवविश्वच बदलून गेले. एका व्यापक परिघावर सारे काही बघू लागलो. माझ्यासाठी ही फार मोठी उपलब्धी आहे. माझ्यासारखा इंडिया त जगणारा माणूस भारताशी जोडला गेला हे श्रेय या माझ्या शिक्षणपरिक्रमेला आहे. मी जर ‘वंचितांचे शिक्षण’ या विषयाकडे वळलो नसतो तर खूप भरकटलो असतो .विनोदी लेखन करताना केवळ स्वान्तसुखाय लिहीत राहिलो असतो आणि मध्यमवर्गाचे मनोरंजन करीत राहिलो असतो. अधिक आत्मकेंद्रित होत जाऊन माझी प्रतिभा केवळ पैसा प्रतिष्ठा मिळविण्यासाठी खर्ची घातली असती आणि जारी हा व्यापक परीघ न बघता जर शिक्षणात आलो असतो तरी मग मुलांच्या दप्तराचे ओझे ,मुलांच्या डब्यात काय द्यावे ? क्लासेस ला मुलांना पाठवावे की नाही ?अशा विषयांवर बोलत राहिलो असतो. पण या वास्तवाच्या साक्षात्काराने माझ्या सर्व बोलण्याला लिहिण्याला आणि कामाला एक दिशा आली. प्रत्येक व्यक्त होण्यामागे हा परीघ सतत कार्यरत राहिला आणि सतत या नाकारलेल्या माणसांसाठी आपण काम करावे ही प्रेरणा हलवत राहिली.
लेखन ही माझी या परिक्रमेतील सांत्वना आहे .लेखन हीच माझी ओळख आहे .लेखन हीच माझी ऊर्जा आहे. मी काम खूप कमी केले पण लेखनातून सतत व्यक्त होत राहिलो. या लेखनातून आपण पोहोचतो.एखाद्या प्रश्नाला गती मिळते हे जसे मी अनुभवले त्याचप्रमाणे अनेकदा ठिकठिकाणी गेल्यावर लक्षात आले की ज्या ज्या माणसांना विशिष्ट प्रेरणेने काम करताना एकटेपणा वाटतो त्या त्या माणसांसाठी माझे लेखन एक सांत्वना आणि सोबत म्हणून काम करते आहे. आपण जे बोलू शकत नाही ते प्रश्न या लेखनात वाचायला मिळतात अशी भावना अनेकदा ऐकायला मिळाली. लेखनातून गावोगावी आपल्याशी मनाने जोडलेले प्रियजन भेटतात की ज्यांना आपण कधीच भेटलेलो नसतो. अनेक जण माझे अनेक लेख कापून ठेवलेले कात्रणे दाखवतात. कोणत्या लेखात मी काय म्हटले होते ? हे सांगतात तेव्हा खूप भरून येते. तुमचे लेख वाचून नैराश्य गेले वगैरे ऐकून आपले नैराश्य जाते.या परिक्रमेत माझा सारा संताप ,नैराश्य या लेखनात विसर्जित झाला .एक प्रकारचे विरेचन झाले आहे.या विरेचनाने मी नॉर्मल राहिलो अन्यथा फुटून गेलो असतो. आजच इतक्या कमी वयात डायबेटीस जडलाय लेखनाचे विरेचन नसते तर काय झाले असते ?
‘वामन निंबाळकरांची कविता माझ्यासाठी अगदी खरी आहे
स्वत:वरचा,जगावरचा विश्वास जेव्हा उडून जातो /
माऊलीची कूस बनून शब्द च मला जवळ घेतात //
माझ्यासाठी या लेखनाने हे काम नक्कीच केले आहे. याचे कारण एखाद्या दुर्गम गावाला भेट दिल्यावर ,आश्रमशाळेला भेट दिल्यावर पर्यटकाच्या आनंदात तुम्ही परत येवू शकत नाही.. आश्रमशाळेत जेवण आणि शिक्षण न मिळणारी मुले बघून .दुर्गम भागातील अमानुषतेने उध्वस्त केलेले जगणे बघून तुम्ही संतापाने थरथरता, तुमच्यातला माणूस अश्रुचा आधार शोधायला लागतो आणि आपण हे बदललण्यासाठी फार काही करू शकत नाही. या आपल्या अगतिकतेने चडफडत राहतो. ते बघून आपण अस्वस्थ होतो.दिवसेंदिवस ते वास्तव आपल्याला विषण्ण करून टाकते.आपल्या स्वत:च्या मर्यादा आपल्याला आपलीच चीड आणतात.अशावेळी लेखन आपल्याला आधार देते .सांत्वना देते आणि विरेचन करते.या लेखनाने मला समतोल ठेवले आहे . वेदना इतरांपर्यंत पोहोचवून त्यांना या वेदनेचे भागीदार बनविले आहे.
लेखनाचा एक महत्वाचा फायदा माझ्या लक्षात आला. माझे लेखक मित्र शांताराम गजे नेहमी म्हणतात की एखादा प्रश्न जर सुटायचा असेल तर त्या विषयाचे साहित्य निर्माण व्हावे लागते. त्यामुळे तो प्रश्न सुटायला मदत होते.दलित साहित्य निर्माण झाले आणि त्याने दलित चळवळ उभी राहायला खूप मदत केली. मला नेहमी वाटते की शिक्षण हा सामाजिक महत्वाचा प्रश्न व्हायचा असेल तर ग्रामीण भागातील शिक्षणाचे प्रश्न,आश्रमशाळा, शालाबाह्य मुले ग्रामीण शिक्षणाचे प्रश्न हे समाजाच्या केंद्रस्थानी येण्यासाठी ते प्रश्न साहित्यात यायला हवेत. याचे कारण असे की समाजातील मध्यमवर्ग आणि बोलका वर्ग हा शहरात राहतो. हे प्रश्न त्यांच्या अनुभवाचा भाग नाही. त्यामुळे शहरी माणसांच्या खेड्यातील शिक्षणाच्या काहीशा रोमॅंटिक कल्पना असतात. खेड्यात शाळा कुठेतरी झाडाखाली शाळा भरतात इथपासून अनेक कल्पना. त्यामुळे या सहानुभूतीखाली खरे चित्र आणि प्रश्न झाकले जातात. वस्तुनिष्ठ चित्र पोहोचत नाही. ग्रामीण राजकारण, अध्यापन पद्धती, कार्यसंस्कृती,संघटना,सरकारचे दुर्लक्ष,ग्रामीण माणसांची शिक्षणातील समज वाढविणे,शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण शाळातील कमी सुविधा असे सारे कवेत घेणारे साहित्य निर्माण व्हायला हवे. लेखन करताना ही साक्षरता शहरी मध्यमवर्गीय वाचकात निर्माण व्हायला मदत झाली असे मला इतके वर्ष सतत लिहिल्याने नम्रपणे वाटते आहे. ज्या कार्यकर्ते आणि नेते प्रत्यक्ष कामासोबत लेखन करू शकले त्यांचे काम अधिक प्रभावी झाले हे आपल्याला गांधी,आंबेडकर,शरद जोशी ते महाश्वेतादेवीपर्यंत लक्षात येते.
पण लेखनाच्या काही मर्यादा ही अलीकडे त्रास देतात. लेखन करताना आपण एखादा प्रश्न मांडतो . त्यामुळे तो लेख सरकारी अधिकार्यां नी वाचावा आणि त्यावर काहीतरी करावे असे वाटणे स्वाभाविक आहे पण सरकारी अधिकारी महत्वाच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले लेख वाचतसुद्धा नाहीत असा अनेकदा अनुभव येतो. त्यावर कृती तर दूर राहिली.अशावेळी निराशा येते. ज्या समाजाच्या प्रबोधनासाठी आपण हे सारे लिहितो ते ही त्यावर व्यक्त होत नाहीत. पूर्वी सामाजिक संघटना नावाचा एक घटक असायचा .एखादा लेख आला की त त्यावर लगेच काहीतरी कृती करायचे. पण आज त्यामुळे लेखनात फक्त आपण ओरडलो आणि आपला अपराधीभाव कमी झाला इतकेच फक्त समाधान उरते. एका उदाहरण देतो. शिक्षक संघटना त्यांच्या अधिवेशनाच्या काळात अधिकृत शासकीय सुटी मिळवतात. त्यासाठी पावती फाडून शिक्षकांकडून पैसे गोळा करतात आणि महाराष्ट्रातील शाळा एक आठवडा बंद राहतात. हा प्रश्न आतापर्यंत प्रत्येक अधिवेशन काळात मी मांडला. त्यावर लिहिले. टीव्ही च्या चर्चेच्या कार्यक्रमात मांडला. पण त्यावर ज्यांची मुले तिथे शिकतात त्या गावातील गावकर्यां नी आक्रमक व्हायला हवे होते जाब विचारायला हवा.पण काहीही घडले नाही. याउलट शिक्षक संघटना आक्रमक आणि संघटीत होत्या. त्यांनी विरोध करणार्यां्ना टार्गेट करीत सोशल मिडियात मेसेज फिरवले. अशावेळी लेखन परिणाम करीत नाही असे वाटते. सोशल मिडियात आपण लेख टाकावेत तर न वाचताच like येतात किंवा कमी वाचले जाते. आपण भ्रष्टाचार किंवा इतर आक्रमक विषयांवर लिहून जेव्हा त्याची दखल घेतली जात नाही तेव्हा उद्विग्नता येते. हे केवळ शिक्षणविषयक नाही तर सर्वच सामाजिक विषयांबाबत खरे आहे.
त्यामुळे इतके लिहूनही आणि लेखन ही ओळख असूनही लेखन कमी करून प्रत्यक्ष रस्त्यावर उतरावे असे वाटू लागते. इतर माध्यमे फारशी नसताना लेखन जितके समाजाला आणि शासनावर जितके प्रभाव टाकत होते तेवढी त्याची परिणामकारकता कमी कमी होते आहे. लेखनाचा जाणीवजागृतीसाठी नक्की उपयोग होतो आहे पण प्रत्यक्ष एखादा प्रश्न सोडवायला कमी उपयोग होतो आहे .ही खंत ही परिक्रमेवरून परतताना मनात आहे. आचार्य अत्रे एक गोष्ट सांगायचे. एकदा जंगलातून एक व्यापारी आणि त्याची बायको जाताना एक गुंड आला. तो तिच्या सोबत चालत छेडछाड करायला लागला आणि व्यापार्याएला दोघांच्या डोक्यावर छत्री धरायला सांगितले. जंगल संपल्यावर तो गुंड पळून गेला. ती नवर्याावर खूप संतापली. त्याला म्हणाली की तुम्ही माझा नवरा असून काहीच विरोध केला नाही ..? तेव्हा तो म्हणाला “असे कसे म्हणतेस ? मी खूप विरोध करीत होतो. जेव्हा तो तुला छेडत होता तेव्हा मी छत्री हलवून त्याला उन्हाचे चटके देत होतो “कोट्यावधीचे भ्रष्टाचार, आश्रमशाळेतील अत्याचार, शिक्षणातील असंवेदनशीलता यावर माझे लेखन कधीकधी मला केवळ उन्हाचे दिलेले चटके वाटू लागतात. आपण या भ्रष्ट माणसांना थेट शिक्षा करू शकत नाही हे अत्याचार थांबवू शक्त नाही याने केवळ उद्विग्नता येत राहते. आपला हा दखल घेतला न जाणारा प्रतिकार खूप केविलवाणा वाटू लागतो. थेट हे सारे थांबवून रस्त्यावर उतरावे की स्वत:ल पणाला लावावे असे वाटायला लागते. सार्त्रने नोबेल पुरस्कार मिळाल्यावर थेट कृतीसाठी कम्युनिष्ट पक्ष निवडला होता व मोर्च्यात सहभागी झाल्याचे वाचले होते. आपणही लेखनापलीकडे लेखन करताना प्रत्यक्ष कृती करायला हवी असे आता वाटू लागले आहे.
शाळा वेगाने बदलू लागल्यात, शिक्षणाच्या प्रश्नाबाबत लोकांत जागृती होऊ लागली आहे पण तरीसुद्धा गेल्या १० वर्षात शहरी आणि ग्रामीण भागातील शिक्षण सुविधा आणि वेग यात खूप अंतर पडते आहे. तो भारत आणि इंडिया यातील अंतर सांधण्यापलीकडे जाऊ लागले आहे हे मात्र तीव्रतेने जाणवते आहे. एकीकडे आमची पुण्या मुंबईत एका एका बिल्डिंगमधली अनेक पोरं सिलिकॉन व्हॅली त शिकताना तिकडे आदिवासी पोरं मेळघाट व्हॅली त पाखरं मारीत आहेत. आपली पोर हातात लॅपटॉप घेवून बसताना तिकडे आदिवासी खेड्यात अजून धड पाटीवर पोरं अक्षरही गिरवत नाहीत. इकडे आमची पोरं फास्ट फूड खाताना तिकडे पोरांना नीट आश्रमशाळेत नीट खायला मिळत नाही आणि आमची पोरं वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा देताना तिकडे अनेक आदिवासी गावात पन्नास वर्षे शाळा असूनही धड ७ वी शिकलेला पोरगा सापडत नाही हे अंतर कसे सांधायचे ही माझी चिंता आहे. एकच उदाहरण देतो. मेळघाटात फिरताना एका गावाबाहेर एका तरुण मुलाने गाडीला हात केला. त्याला गाडीत घेतले आणि त्याचे गाव येईपर्यंत गप्पा मारल्या. तो निरक्षर होता. डोक्याला रुमाल बांधलेला. त्याला मग मी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कोण हे विचारले. त्याला फक्त गावचा फक्त सरपंच माहीत होता.त्याने सर्वात मोठे शहर म्हणजे फक्त जवळचे अमरावती शहर बघितले होते. हॉटेलात आजपर्यंत काय खाल्ले तेव्हा त्याने भेळ आणि गुडीशेव सांगितले आणि एकदा सिनेमागृहात जाऊन सिनेमा बघितला होता. अनेक धक्के बसल्यावर मी त्याला शेवटचा प्रश्न विचारला की लोक कधी भारत म्हणतात तर कधी इंडिया म्हणतात तर मग हे एक देश आहेत की दोन देश आहेत ?तो गंभीरपणे म्हणाला : “ साहब, नाम दो है ,इसका मतलब देश भी दो होगे ना ...” पुढे त्याला काहीच विचारायची हिंमत झाली नाही....हे वास्तव आणि या दोन जगत पडलेलं अंतर कसं सांधायचे हा मला पडलेला प्रश्न आहे. मी मोबाईलमधून सेल्फी कधीच काढली नाही पण एक सेल्फी काढण्याचा मला मोह होतो...स्मार्टसिटी आणि बुलेटट्रेनच्या घोषणा असलेल्या बोर्डखाली मला भेटलेला हा तरुण आणि मुंबईतल्या इंटरनॅशनल स्कूलमधला पास झालेला मुलगा यांच्यासोबत मला एक सेल्फी काढायची आहे....शिक्षण आरोग्यापासून जीवनाच्या सर्वच क्षेत्रात हा ‘भारत- इंडिया’ कसा मिटवायचा हा खरा प्रश्न आहे.
शिक्षणात इतके विदारक अनुभव घेतल्यामुळे माझ्या एकूण व्यक्त होण्यात काहीसा कडवटपणा आणि तिरकसपणा आला आहे. इतके वाईट वाईट वास्तवाचे अवतार बघितल्यामुळे सरकार नावाची यंत्रणा काही बदलू शकेल असे वाटतच नाही किंवा जरी ती बदलू शकेल असे असले तरी तिला ते बदलवण्यासाठी हलवण्याचे काम आपल्या आवाक्याबाहेरचे आहे असेच वाटू लागले आहे. ही निराशा असेल किंवा अगतिकता पण माझ्यासारख्या मन:स्थितीतून आज सर्व क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते जात आहेत. सरकारी यंत्रणा आज सर्व विभागात ज्याप्रकारे काम करते आहे त्याचे समर्थन करणे मुश्किल आहे आणि त्याला पर्याय म्हणून खाजगी व्यवस्थेचे समर्थन करणे अवघड जाते.या कोंडीत आज कार्यकर्ते सापडलेत. सरकारी शाळा नीट चालेनात म्हणून लोक इंग्रजी शाळेकडे जातात.सरकारी दवाखान्यात डॉक्टर भेटेना म्हणून लोक खाजगी दवाखान्यात जातात.पोस्टाचे टपाल वेळेत मिळेना लोक कुरीयर शोधू लागतात. असे सर्व सेवांबाबत होऊ लागले आहे .खाजगी पर्याय हा लूटमार करू लागतो आणि सरकारी पर्याय हा अकार्यक्षमतेने नाकारला जातो. हे कसे समजून घ्यायचे ? आज झोपडपट्टीतली माणसे सरकारी शाळेत पुस्तके आणि जेवण मिळतं असूनही खाजगी शाळेचा पर्याय निवडला जात आहे. याचा अर्थ तो पर्याय दर्जेदार नाही पण ती प्रतिक्रिया आहे. तेव्हा गावातील या सेवा सुधारण्यात कार्यकर्त्यांनी आयुष्य घालायचे की काय ? त्यामुळे सरळ सरकारने व्हाऊचर द्यावेत आणि बाजूला व्हावे या टोकाच्या निष्कर्षावर येवून परिक्रमेच्या शेवटी मी थांबलो आहे ... मला मान्य आहे की यात धोके आहेत पण असंवेदनशील प्रशासन,उत्तरदायित्व नक्की नसलेली यंत्रणा आणि राजकीय व्यवस्था नावाचा धोका घेण्याची जास्त भीती वाटते. दोन अधिक दोन हे उत्तर नसलेल्या वळणावर येवून मी उभा आहे ..... नर्मदेत उडी मारून स्वत:तील हा संघर्ष संपवून टाकावे असे कधीकधी वाटते पण एखाद्या वाडीवस्तीवरचा प्रयोगशील शिक्षक ,एखादा ध्येयवेडा अधिकारी मला हाकारतो आणि निराशेच्या डोहाकडून मी पुन्हा मागे फिरतो आणि परिक्रमेला पुन्हा नव्या उमेदीने चालायला लागतो....
उत्तर न सापडलेली ही माझी प्रश्नयात्रा आहे
हे माझे आत्मचरित्र नाही.
या केवळ आठवणी,निरीक्षण आहेत माझ्या शिक्षण क्षेत्रातील भटकंतीची. फक्त मला खूप विविधांगी अनुभव घेता आले म्हणून लिहिलेत. आश्रमशाळा पासून तर इंटरनॅशनल स्कूलपर्यंत. गावाच्या चावडीपासून तर केंद्रीय नियोजन आयोगापर्यंत. केंद्र समेलनापासून तर पंचतारांकित परिषदांपर्यंत. सरपंचापासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत. ही विविधांगी अनुभव शिक्षण क्षेत्रात काम करणार्याव कुणालाही उपयोगी पडतील.
नर्मदा परिक्रमेसारखी ही शिक्षण परिक्रमा. नदी सारखं शिक्षण शतकानुशतके वाहतेच आहे. माझ्यासारखे हजारो पथिक परिक्रमा करीतच आहेत.मी फक्त काही घाट उतरून पाण्यात उतरलो इतकेच.
शिक्षणाची ही नदी लाखो पांथस्थांना तृप्त करते आहे.
या वाटेवरून चालताना अनेकदा नैराश्य आले,पण चालत राहिलो
या परिक्रमेने आपण इतरांना काही देवू की नाही हे माहीत नाही पण आपण खूप समृद्ध झाल्याची भावना आहे
हा शिक्षणाचा शतकानुशतकाचा प्रवाह... गुरुकुलापासून आता online होमस्कुलिंग पर्यंत
वाहतोच आहे ..मी चालतोच आहे काठाकाठाने
नर्मदा परिक्रमेत कुठेतरी एकदा भळभळती जखम वाहणारा अश्वत्थामा एकदा भेटतो अशी श्रद्धा आहे. मला या शिक्षणपरिक्रमेत या देशातील ‘शेवटचा माणूस ’त्याच्या डोक्यावर चिरंतन दारिद्रयाची भळभळती जखम वाहत असलेला भेटला ..... त्या जखमेवर तेल घालायला उर्वरित आयुष्यात समर्पित व्हावे असे वाटते आहे....
*************************************************************************



'माझी शिक्षण परिक्रमा'
राजहंस प्रकाशन 
हेरंब कुलकर्णी
पुस्तकाच्या समारोपाचे प्रकरण

टिप्पण्या

  1. आपल्या अनुभवसंपन्न लेखनाने आंम्ही समृद्ध होतो हे नक्की सर!आपली तळमळ अन् त्यातून लेखनातील पोटतिडकीने व्यक्त होणारी भावना भिडते अंतरंग ढवळून टाकते.आपल्या लेखनाचे हे विशेष की सहज सोपी भाषा ...पण संवेदनांची पेरणी असते त्यात..म्हणूनच माझ्यासारख्या संवेदना जाणणाऱ्या अन् जपणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला,व्यक्तीला आपण आपले वाटता हे खरे!

    उत्तर द्याहटवा
  2. सर तुम्ही शिक्षण क्षेत्राला दिलेले योगदान अमूल्य आहे. समाजातील तळागाळातील विद्यार्थ्याला त्याच्या जीवनाला उपयोगी पडणारे शिक्षण मिळावे यासाठीची तळमळ आम्हा सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी आहे

    उत्तर द्याहटवा
  3. सर आजही तिच परीस्थिती आहे काम न करणाऱ्यांची संख्या जास्त आहे पर्यवेक्षीय यंत्रणा कुचकामी आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. व्यवस्थेविषयी मांडलेले विचार खरच सर उद्विग्न करतात तुमची शालाबाह्य मुलांबद्दल मांडलेले विचार भटक्या विमुक्तांच्या मुलांबद्दल आणि स्थलांतरित मुलांबद्दल वास्तव चित्रण यातून अगतिकता आमच्यासाठी तुम्ही शिक्षकाचा खरा धर्म शिकविणारे सानेगुरुजी आहात एक दीपस्तंभ आहात हि परिक्रमा अशीच चालू राहु द्या

    उत्तर द्याहटवा
  5. या शिक्षण परिक्रमेने तुम्ही सम्रद्ध झालात तसे तुमच्या या लेखनाने आम्ही सम्रुद्द झालो. पण आमच्यासारख्या निष्क्रिय बुद्धिवंतांनी सगळ्याच व्यवस्था मुर्दाड करून टाकल्या आहेत. कोणाच्या तरी अभ्यासपूर्ण व कळकळीच्या लेखनाने अस्वस्थ होण्यासाठी आमच्या मनात आता संवेदनशीलता उरले नाही . क्रुती तर फार दुरची गोष्ट.
    पण आता उठाव करण्याची वेळ आली आहे नक्की.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा