साने गुरुजी आणि विद्यार्थी यांचे नाते कसे होते ?



                      
                     साने गुरुजी आणि विद्यार्थी यांचे नाते

                    मुलांची गुरुजींना टोकाची काळजी असे.कृष्णा परळीकर हा विद्यार्थी आजारी पडला आणि गावाकडे गेला. गावाकडून तो पत्र पाठवायचा. पुढे पत्र येणे बंद झाले. तेव्हा गुरुजी त्याच्या गावाला गेले. त्याला विषमज्वर झालेला होता. गुरुजी तिथेच राहिले आणि त्याची सेवासुश्रुषा केली. या सुमारास गुरुजींचे आजोबा आजारी असल्याची तर आली आणि नंतर त्यांचे देहावसान झाले पण गुरुजी कृष्णा बारा होईपर्यंत त्याच्या गावीच राहिले.
                  यशवंत पवार हा विद्यार्थी श्रीमंत कुटुंबातील होता.तो खोली झाडत नसे.त्याची खोली तशीच घाण असे. गुरुजी स्वत: त्याच्या खोलीत गेले आणि झाडू लागले मग त्याला काही वाटले आणि तो ही खोली झाडू लागला. घरून काही चांगले पदार्थ आणीत असे पण इतर मुलांना देत नसे. गुरुजींनी एकदा दुसर्‍या एका गरीब मुलाने गावाकडून आल्यावर त्याला डबा सोडायला लावला आणि त्यातले पदार्थ सर्वांना खायला दिले.यशवंत पवारला ही बोलावून घेतले. त्याने खाल्ले आणि लगेच म्हणाला की गुरुजी माझ्या डब्यात पण काही पदार्थ आहेत.ते मी आणतो. तो गेला आणि आणले.त्याने इतर मुलांना ते दिले. त्यानंतर तो खूप बदलला. अमळनेरच्या छात्रालयात मुले होती. ती नेहमी सहभोजन करीत.
                    आपले पदार्थ इतरांना द्यावे हा उपदेश गुरुजी स्वत: ही पाळत असत.एकदा गुरुजींच्या मावशीने बडोद्यावरून त्यांना श्रीखंडाच्या वड्या पाठवल्या. एक मुलगा गावाकडे चालला होता.गुरुजींनी त्याच्यासोबत त्या वड्या दिल्या. तो मुलगा आल्यावर म्हणाला की गुरुजी माझ्या आईला या वड्या खूप आवडल्या. गुरुजींनी बडोद्याच्या मावशीला पत्र लिहून पुन्हा वाद्य मागवल्या आणि त्या मुलाच्या घरी पाठवल्या.
       . गुरुजी लेखनाला बसताना मृगाजिनावर बसत पण ते मृगाजिन जीर्ण झालेले होते. तडवी नावाच्या सातपुड्याच्या पायथ्याशी राहणार्‍या मुलाने ते बघितले आणि सुटीत गेल्यावर एका काळवीटाची शिकार करून ते मृगाजिन काढून आणले. आनंदाने गुरुजींना दिले.त्याला वाटले इतकी किमती वस्तु दिल्यावर गुरुजी खूप आनंदी होतील. पण गुरुजींच्या डोळ्यात्च पाणी आले.गुरुजी म्हणाले “तडवी,माझ्याकरता का एका स्वश्चंदी आनंदी प्राण्याला तू ठार केलेस ? किती आनंदाने खेळला असेल आतापर्यंत ? कुणालाही त्याचा उपसर्ग तर नव्हता ना ?का मारलेस त्याला ? किती मऊ त्याचे अंग खडबडीतपणा जणू नाहीच कशात ?जवळ घ्यावे यावे धावत.खावे झाडपाला नि कोवळे गवत. तू माझ्याकरता एका निरापराध प्राण्याला ठार मारलेस ?माणसाच्या माणुसकीवर या प्राण्यांचा किती विश्वास .रंग जशी वैराग्याची ध्वजाच ! फार फार प्रसन्न हा प्राणी . मरण आले ठारह त्याचे मृगाजिन घ्यावे हो. त्यासारखे  “ तडविला हे ऐकल्यावर खूप वाईट वाटले.मुलांना भूतदया गुरुजींच्या अश्रुंनी त्या दिवशी करून दिली.        
           एक दिवस एका गुलाबाला कळी लागली. त्या रात्री छात्रालयातील मुलांना घेऊन बगीच्यात बसून गुरुजींनी त्या गुलाबाच्या फुलाचा जन्मोत्सव साजरा केला. त्या रोपट्याला रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यांनी गुरुजींनी सजविले.मुलांनी गाणी म्हटली.बासरी वाजवली. यातून मुलांना निसर्गविषयी वेगळेच प्रेम निर्माण झाले. गुरुजी एकदा शिकवत होते .तेवढ्यात पाऊस सुरू झाला.गुरुजींनी शिकविणे थांबविले आणि म्हणाले “बाहेर पाऊस पडताना मी का शिकवत बसू ? आणि वर्ग सोडून दिला.
                   शाळेत द.मा.वैद्य नावाचा विद्यार्थी होता.या विद्यार्थ्याला फी भरता येत नसल्याने शाळा सोडून द्यावी लागणार होती.गुरुजी त्याला म्हणाले तुला वर्षभर मी फी देईन पण शाळा सोडू नकोस “आणि गुरुजी खरोखर दर १ तारखेला त्याच्या वर्गासामोर उभे राहून त्याला बाहेर बोलावत आणि फीच्या पैशांची पुडी बांधून त्याला देत. नीलकंठ कुलकर्णी यांच्या घरच्यांनी त्यांना ओल्या दुष्काळामुळे मदत पाठविणे शक्य नाही तेव्हा परत निघून यावे असे पत्र लिहिले. तो वसतिगृह सोडणार तेव्हा गुरुजींना समजले.त्यांनी त्याला एक वर्षभर १० रुपयांची मदत केली.
                     समानतेची शिकवण गुरुजी मुलांना कृतीतून देत. छात्रालयात जेवण एकाच पंगतीत दिले जाई. नवीन मुलांना ते थोडे जड जाई पण हळूहळू त्यांनाही त्याची सवय होई. छात्रालयातला गोपाल नावाचा सेवक आजारी पडला..गुरुजी व मुलांनी त्याची २१ दिवस सुश्रुषा केली .गुरुजींनी त्याला आपल्या खोलीत कॉटवर ठेवले. पण २१ दिवसांनी तो वारला.गुरुजींनी त्याला स्वत: खांदा दिला. इतकी समानतेची भावना त्यांच्या मनात आणि कृतीत असायची.
                          एकदा मुले आणि गुरुजी सहलीला गेली.रात्री झोपताना मुलांनी गुरुजींसाठी गादी आणली पण गुरुजी म्हणाले जर मुले सतरंजीवर झोपली आहेत तर मग मी  गाडीवर झोपणार नाही. गुरुजी ही मग सतरंजीवर झोपले.
                    मुलांची माफी मागण्याइतका उमदेपणाही गुरुजीकडे होता.एकदा शाळेचे प्रतिनिधी निवडण्यावरून मतभेद झाले.तेव्हा गुरुजींनी त्याला जवळ थांबवून जे बोलले ते कोणत्याही शिक्षकाला अंतर्मुख करणारे ठरावे. गुरुजी त्याला म्हणतात “बाळ चुकलो हो मी. रागावू नकोस हो माझ्यावर. सहवासाने मला छात्रालयातल्या मुलांविषयी मला अधिक प्रेम वाटले हे मी नाकबूल करत नाही.सहवासाने जरा चुकत होतो पण बाळ तुझ्या स्वाभिमानाने मला सावध केले. नको रागावूस बाळ. मी का तुमचा नाही ?छात्रालयातील मुले का तुझी नाहीत ?
                     त्याकाळात खादी वापरण्याची चळवळ जोरात सुरू होती. गुरुजी मुलांनाही खादी वापरायला प्रोत्साहन देत. त्यामुळे मुले मोठ्या संख्येने खादी वापरत असत. काही मुले घरच्यांचा विरोध न जुमानता खादी वापरत होती.. जळगाववरून खादीचे गठ्ठे घेवून लोक येत ते विक्री करायला गुरुजी त्यांना मदत करत. शाळेत एक जज्जचा मुलगा होता. एकदा शिक्षक त्याला परदेशी धोतरा वरून बोलले. तेव्हा त्या जज्जने तक्रार केली. तेव्हा त्या शिक्षकाची बाजू घेत “शिक्षकाचे काम काय फक्त पुस्तकेच शिकवायचे असते काय ? ही त्यांची शिक्षण दृष्टी होती
                १९२८ साली राष्ट्रीय वातावरणात अमळनेर ला आचार्य कृपलानी यांचे व्याख्यान झाले. गुरुजी छात्रालयातील सर्व विद्यार्थ्यांना घेवून व्याख्यानाला गेले. रात्री आल्यावर मुले झोपली. गुरुजी फेर्‍या मारत राहिले. शेवटी राहवेना तेव्हा त्यांनी मुलांना उठवले आणि म्हणाले “अरे तुम्हाला झोपा तरी कशा येतात ?इतके चांगले व्याख्यान ऐकल्यावर तुम्ही देशासाठी झिजेन खादी वापरीन “अशी शपथा घ्यायला हव्यात “
        शहरात कॉलरा साथ आली तेव्हा गुरुजींनी विद्यार्थ्यांचे पथक उभारले. पाणी उकळून घ्या अशी सूचना मुले सर्वत्र करत होते.
             वसतिगृहात मुलांचे आणि गुरुजींचे हे नाते बघून शाळेतील गावात राहणारी मुले ही तिथेच येवून थांबत खेळत. फक्त जेवायला आणि झोपायला घरी जात. संपूर्ण खांदेशात या वसतिगृहात प्रवेश मिळावा म्हणून रीघ लागली. प्रवेश नाकारता नाकारता वैताग आला.
            शिक्षणातील उच्च तत्व शिकविण्याची छात्रालय ही एक प्रयोगशाळा बनली. सकाळ संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी गुरुजी खूप काही मुलांशी बोलत. जगातल्या विविध महापुरुषांची माहिती सांगत. गुरुजी येणार्‍या वर्तमानपत्रातील मुलांनी नेमके काय वाचावे यावर खुणा करुण ठेवीत. महात्मा गांधींचा यंग इंडिया तिथे येत असे.अमृतबझार पत्रिका ही तिथे येत असे. त्यातील निवडक माहिती मुले वाचत असत.
           मुलांना गुरुजी समान पातळीवर वागवत असत. मुलांमध्ये मूल होऊन राहणे त्यांना सहज साध्य होते. मुले मैदानावर असताना गुरुजी तिथे जात. त्यांच्यात भाग घेवून खेळत. त्यांच्यात भाग घेवून प्रोत्साहित करत असत. विटीदांडूचाही खेळ खेळत.
मुलांपर्यंत आपला ध्येयवाद,भावना पोहोचत नाही ही तगमग ते एके ठिकाणी छात्रालय मासिकात व्यक्त करतात. छात्रालयात रोजच्या दैनिकात एकदा गुरुजींनी लिहीले 
अगदी मुलांमध्ये भूतदया जागृत व्हावी म्हणून गुरुजींनी शिमग्याच्या दिवसात मुले गाढवांना जो त्रास देतात त्याविरोधात काम करणार्‍या गर्दभ क्लेशनिवारण मोहिमे ला प्रोत्साहन दिले. गाढव हा किती कष्टाळू प्राणी आहे याविषयी लिहिले.”गाढव हा अत्यंत सहनशील प्राणी आहे. खायला कागदाचे कपटेही चालतात. कामात अंगचोरपणा याला माहीत नाही. अशा या गुणसंपन्न प्राण्याला मुले खूप छळतात तेव्हा शिमग्याला गावात फिरून आपण याला आळा घालू या . त्यानुसार मुलांनी गावात जाऊन अनेक ठिकाणी गाढवांची मुक्तता केली.  
              गुरुजी सर्व मुलांची फी भरून टाकत. एकदा पुण्यात शिकणारी दोन महाविद्यालयीन मुले गोखलेंना छात्रालयाजवळ गुरुजी कडे जाताना भेटली.त्यांनी गोखले गुरुजींना सांगितले की पुण्यात आम्ही शिकू शिकतो कारण साने गुरुजी आम्हाला दर महिन्याला १० रुपये देतात..विद्यार्थी मासिकाला गुरुजी पैसे घालत होते आणि आता मुलांची फी ही गुरुजी फी भरतात हे बघितल्यावर गोखले गुरुजी भारावून गेले. गुरुजींनी शिक्षणासाठी जे कष्ट घेतले होते. उपासमार सहन केली होती फी अभावी एकदा नाव काम कमी झाले होते .ते सारे त्यांना आठवले आणि ते मुलांना फी साठी मदत करू लागले.
       
                                                                                                 हेरंब कुलकर्णी 



( 'शिक्षकांसाठी साने गुरुजी' या हेरंब कुलकर्णी यांच्या  पुस्तकातून  
हे पुस्तक मनोविकास प्रकाशन ने प्रसिद्ध केले आहे )

टिप्पण्या