आज गाडगेबाबाचा स्मृतिदिन. त्यांच्या अनेक
गुणांचे आज स्मरण होते पण मला ते भावतात ते पुस्तकांच्या जगापासून दूर असलेल्या
अशिक्षित जनतेशी ते संवादी असण्याबाबत. बाबांनी अशा पुस्तक वर्तमानपत्र या जगापलीकडे
असलेल्या जगाचे प्रबोधन केले. मला माझ्यासाठी ती खूप महत्वाची गोष्ट वाटते. याचे
कारण आज आपण आपले विचारविश्व आणि अभिव्यक्ती केवळ आपण मध्यमवर्ग आणि वर्तमानपत्र
पुस्तके वाचणारा वर्ग आणि फारतर सोशल मिडीयापर्यंत संपर्क करतो आहोत. कोणत्याही
विषयावर आपण फक्त या समूहापर्यंत आपले विचार पोहोचवतो आहोत. यात चूक काही नाही. मध्यमवर्ग
हा निर्णयप्रक्रियेवर प्रभाव टाकत असतो त्यामुळे त्यांचे मन बनविणे नक्कीच
महत्वाचे आहे पण ज्या मोठ्या परीघावर इथली लोकशाही उभी आहे त्या पुस्तके आणि सोशल
मिडीयापलीकडच्या जगाशी माझे काय नाते आहे ? काहीच नाही.
आज महाराष्ट्राचे उदाहरण घेतले तर १२ कोटीच्या महाराष्ट्रात सर्व प्रमुख
वर्तमानपत्रांचे खप ५० लाखाच्या आसपास असतील. त्यातही अग्रलेख उपलेख पुरवणी
वाचणारा वर्ग धरला तर गंभीर वाचक १ कोटीच्या आसपास असेल. सोशल मिडीया वापरणारी
संख्या ४ कोटी इतकी आहे. या परिघापलीकडे
किमान ८ कोटी इतकी संख्या ही पुस्तके न
वाचणारी अग्रलेख उपलेख न वाचणारी व सोशल मिडीया न वापरणारी आहे. या लोकसंख्येशी
आपण कसा संवाद करणार आहोत हा प्रश्न मला गाडगेबाबा विचारतात. त्या प्रश्नाचे उत्तर
माझ्याकडे नाही. मी केवळ या चार कोटीच्या
जगात फिरत राहतो. माझी पुस्तके, माझे वर्तमानपत्र, माझे टीव्हीवरील भाष्य,माझी
व्याख्याने परिसंवाद परिषदा पोस्ट, लाईक, comment, फेसबुक, whatsapp,twitter हे
सारे सारे फक्त आणि फक्त या एक ते चार कोटीच्या जगात फिरणारे आहे.
आपल्याला जो पुरोगामी महाराष्ट्र अपेक्षित आहे. जे समाजपरिवर्तन अपेक्षित
आहे. जो शोषणमुक्त समाज अपेक्षित आहे तो निर्माण होण्यासाठी बोलक्या मध्यमवर्गाशी
बोलावे लागेलच पण जो समूह आपल्याला बदलायचा आहे तो बदलण्यासाठी आपण त्यांच्याशी
संवाद कसा करणार आहोत. अंधश्रद्ध आणि धार्मिक राजकारणाला बळी पडणारा हाच समूह आहे.
तो बदलायचा असेल तर त्यांच्याशीच बोलावे लागेल ना ?
पण त्याची माध्यमे ही पुस्तके वर्तमानपत्र सोशल मिडीयाला यांना ओलांडून
जाणारी असतील. गाडगेबाबांनी जे कीर्तनमाध्यम वापरले तशी माध्यमे आपल्याला निर्माण
करता येतील का ? संत साहित्याने जे वेगवेगळे माध्यम वापरले त्याचे आज कालसुसंगत
रूप आपल्याला शोधावे लागेल. या जनसमुहाला सोबत घेवून आंदोलन करणे हा खूप दुरचा
मुद्दा आहे पण किमान त्यांच्याशी आपण संवादी नाहीत. आपण त्यांचे प्रश्न मांडतो आहे
पण त्यांच्याशी बोलू शकत नाही.
या गरीब समूहाशी बोलणे ही खूप अवघड असते. गाडगेबाबाकडून ते ही शिकावे
लागेल. मी शहरी वेशभूषा करून आदिवासी पाड्यावर गेलो तेव्हा लक्षात आले की आपली शारीर
भाषा हीच समस्या आहे. आपण या लोकांशी त्यांच्या भाषेत संवाद करू शकत नाही. त्यांना
आपले नाही वाटत.तिथे गाडगेबाबा मोठे वाटतात. ज्या समुहाशी बोलायचे त्यांच्यासारखे
राहायचे. त्यांच्या भाषेत बोलायचे हे मला जमेल का ? जी माणसे बदलावीत असे मला
वाटते त्या समुहाचा मी भाग व्हायला तयार आहे का ? त्यांची भाषा आणि शरीरभाषा मला
आत्मसात करता येईल का ? शेवटी यां देशात महात्मा गांधीनी कोट काढून टाकला आणि पंचा
नेसला तेव्हाच या गरीब माणसांना बापू आपला वाटला. मला या माणसांच्या जगाचा भाग
होऊन यांच्याशी बोलावे लागेल ना ?
गाडगेबाबा चा फोटो जेव्हा जेव्हा मी बघतो तेव्हा तेव्हा मला हे सारे आठवते.
मला माझीच लाज वाटते. मी एक कोटीच्या परिघात विचारवंत व्हायला निघालोय. मला फक्त बोलक्या
वर्गाला प्रभावित करायचे आहे पण ज्या वर्गासाठी मी लिहितो बोलतो त्या वर्गाशी
मात्र मला संवाद करता येत नाही किंवा ती मला गरज ही वाट्त नाही. गाडगेबाबा मला
हादरवून टाकतात. मला माझ्या बनचुक्या संकुचित जगातून ओढून बाहेर यायला सांगतात. पण
मी पुन्हा त्याचीही पोस्ट तयार करतो आणि त्यांना स्मृतिदिनानिमित्त वंदन करून माझी
सुटका करून घेतो आणि जुनेच उद्योग सुरु ठेवतो ..किमान नव्या वर्षात थोडे बदलावे हे
ठरवतो आहे
---------------------------------------------------------------------------------------------
(हेरंब कुलकर्णी
८२०८५८९१९५ )
अगदी बरोबर सर, असे लोक ग्रामीण भागात जास्त आहे, प्रवचन कीर्तन माध्यमातून त्यांच्याशी संवाद बरेचसे प्रबोधनकार सध्या करत आहे.. त्याची व्याप्ती वाढवणे ही काळाची गरज आहे.
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेख. .....आजही वाचक वर्ग. ...सखोलतेने वाचणारे लोक हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहेत. .सर आपले निरीक्षण नेहमीच अचूक असते.
उत्तर द्याहटवापूर्वी गावांचा परीघ छोटा होता. लोकसंख्याही कमी होती.परस्परांशी सुसंवाद उत्तम होता. त्यामुळे पारावर,मंदिरात ,एखाद्या प्रतिष्ठिताच्या ओसरीवर पाहता पाहता जनसमुदाय जमत असे. आता मात्र communication फास्ट असले तरी गाव शहरांचा परीघ वाढला आहे ,TV मुळे लोक बाहेर पडत नाहीत , तत्कालीक मनोरंजनाकडे जास्त कल आहे , सामुदायिक बैठका कमी झाल्या आहेत ,पूर्वी सारखे एकत्र जमत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. (अगदी खेड्यात परिस्थिती वेगळी असू शकेल. ) त्यामुळे अशा स्थितीत एखाद्या गावात जाऊन फक्त सुमुदाय जमवून प्रबोधन करणे जिकरीचे झाले आहे. भागवत ,कीर्तन साठी येणारा बहुतांश वर्ग वृद्धअसतो. तरुण पिढी अशा ठिकाणी जमत नाही. ही मंडळी टवाळ विनोद करून तथाकथित प्रबोधन करण्याऱ्या कीर्तनकार महाराजांच्या कार्यक्रमांना हजर असते . ह्या कार्यक्रमांमधून निव्वळ मनोरंजनशिवाय काही साध्य होत असेल असं मला वाटत नाही
उत्तर द्याहटवाअसो
Positive Approach ठेऊन विचार केल्यास ..... खेड्यांमध्ये ग्रामसभा हे एक चांगले व्यासपीठ होऊ शकेल असं वाटत. सरपंच हाताशी घेऊन बैठक आयोजित करणे शक्य आहे. अल्प शिक्षित आणि अल्पसंस्कृत तरुण वर्गात मोबाईल चा उपयोग फक्त तात्कालिक मनोरंजनासाठीच होतो त्याविषयी सुद्धा प्रबोधन करावे लागेल. म्हणजे वाचक वर्ग निर्माण होईल
भागवत वगैरे प्रवचन निमित्त समुदाय हेरून सुद्धा अर्ध्या एक तासाचे व्याख्यान ठेवता येईल पण अशा ठिकाणी लोकांचा मूड वेगळाच असतो. (मी अशा कार्यक्रमांना देणगी न देता आरोग्य विषयक व्याख्यान देईल असे म्हणत असतो चार पाचदा गेलोही होतो पण लोकांचा समज /अपेक्षा मोफत आरोग्य शिबीर असते.) तथापि मी प्रत्येक वेळेस देणगी ऐवजी व्याख्यानाचाच प्रस्ताव मांडत असतो . हळूहळू कान तयार होतील असा विचार करतो.
अर्थात माझा प्रयोग हा शहरातील आहे. खेड्यात मी कधी गेलो नाही परंतु तुमचा हा ब्लॉग वाचून तसा विचार करीत आहे ... तुमचे लिखाण कार्यप्रवण करणारे आहे.
मी अशातच सामाजिक जाणिवेवर उतरलो आहे त्यामुळे माझे विचार अगदीच Primitive असे असू शकतात.🙏
आपण जो लेख लिहिला तो आवार्जुन अंमलात आणणे काळाची गरज आहे.सुंदर विचार 💐🙏💐
उत्तर द्याहटवाआजच्या समाजाचा विचार केला तर तो अतिशय स्वार्थी होत चालला आहे. इतरांबद्दल काहीतरी चांगलं वाटावं ही भावनाच मुळात नष्ट झाली आहे.आजच्या काळात पुन्हा गाडगे बाबा होतील ही पण त्यांना स्वीकारणारे लोक नसतील.
उत्तर द्याहटवा