रवि देवांग यांचेवर कविता (हेरंब कुलकर्णी)



                          

शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष,विपश्यना आचार्य रवी देवांग यांच्या मृत्यूनंतर हेरंब कुलकर्णी यांनी त्यांच्यावर लिहिलेली कविता 
------------------------------------------------------------------------------

प्रिय रवि देवांग,

तुझ्या मृत्युने राष्ट्रध्वज खाली उतरला नाही
 की नाही झाला राष्ट्रीय दुखवटा
शेतकरी संघटनेच्या झेंड्यात गुंडाळून
तुला निरोप दिला शेतकरी भावा बहीणींनी
पण कोणत्याच पदावर नसणारा तू
लेखक सेलिब्रिटी नसणारा तू
माझ्यासारख्या अनेकांना,
आयुष्यभर पुरेल इतकी वेदना देवून गेलास
उत्प्रेरकासारखी तुझ्यासारखी माणसं
कोणत्याही अन्यायाविरुद्ध झोकून देतात
कोणतेही हिशोब न मांडता
तसाच तू फेकत राहिलास स्वत:ला
सेवादलापासून नर्मदेपर्यन्त
आणि स्थानिक प्रश्नापासून  शरद जोशीपर्यंत ...... 



जुन्या काळचा वास्तुविशारद असलेला तू
ठरवलं असतं तर असतास आज कोट्यधीश
पण प्रश्नांच्या ड्रॉइंग बोर्डावर
आखत राहिला डिझाईन वेगवेगळ्या आंदोलनांचे
बांधत राहिला विटेवर वीट माणसांची
चळवळीचा आर्किटेक्ट होऊन
यातून मिळाले तुला फक्त एक भणंगपण
जीवघेण्या व्याधी
आणि आयुष्याच्या शेवटी जाळल तुझ ऑफिस
लागला देशद्रोहाचा खटला आणि जीवघेणा शारीरिक हल्ला ही
पण तरीही बुद्धाच्या क्षमेला जागत
नाही केलास गुन्हा दाखल जीवघेणा हल्ला करणार्‍यांवर
 विपश्येनेची समता साधत
शिक्षा लागली तर ७ वर्षे तर विपश्यना करीन आनंदाने तुरुंगात ही तुझी भाषा
धम्माशी नातं सांगणारी  




रवी तुला कार्यकर्ता म्हणून लक्षात ठेवू की
विपश्यनेचा आचार्य म्हणून लक्षात ठेवू ?
कार्यकर्त्याना गरज असते अध्यात्माची  --- विसरायला अहंकार
आणि धर्मिकांना हवे असते समाजभान ---- आत्मकेंदितेच्या गुहेबाहेर येण्यासाठी
पण चळवळ आणि अध्यात्म  असतात विरूद्धअर्थी शब्द कायमचे
तू करत राहिला विपश्यना आणि आंदोलन एकाच समतेने
अण्णा हजारे शरद जोशीपासून हजारोंना करायला लावली विपश्यना
उभारले विपश्यनेचे केंद्र ही
आणि दूर झालास तिथूनही शांतपणे हितसंबधियांनी घेरल्यावर
हा साक्षीभाव दिला तुला तुझ्या विपश्यनेने
तुझ्यासोबत घालवलेल्या अनेक संध्याकाळ आता आठवताहेत रवी
माझ्या भाबड्या प्रश्नांना बुद्धाच्या वचनाच्या आधारे दिलेली उत्तरे ......
पाली भाषेतून किती सुंदर धम्मपदे म्हणायचास
बुद्धाच्या जीवनातील अनामिक प्रसंग सांगताना,
करुणेने भरलेले तुझे डोळे अजून पाठ सोडत नाहीत
बुद्ध आणि विपश्यना सांगावीस तूच.............




तू लक्षात राहशील प्रेमासाठी फक्त
इतक प्रेमाने बोलता येत
इतक निरपेक्ष प्रेम करता येत
हे तुझ्या जगण्यान शिकवलं माझ्यासारख्या उद्धट माणसांना
साने गुरुजींच्या भूमीत त्यांचा प्रेमाचा वारसदार तू
तुझे करुणामयी डोळे आणि मायेचे शब्द सतत खुणावत राहतील
      


 तुझ्या घराला खांदेशात जाण्याचा टोल नाका म्हणायचो गमतीने
 आज रस्ताच निघून गेला..... आता कुणाला भेटू ?
अनेक मृत्यू पचवून कमावलेल्या कोडगेपणाने मी
 माती लोटत जाईन हळूहळू तुझ्या आठवणींवर
पण आज तरी तुझ्याशिवाय जगणं एक शिक्षा वाटते रवी
वाट पाहत आहे मन तुझ्या फोनची आणि
तो करूणामयी आवाज ऐकण्याची......
भवतु सब्ब मंगलम  म्हणण्याची -------


---------------------------------------------------------                                                                           हेरंब कुलकर्णी (८२०८५८९१९५) 

टिप्पण्या