अण्णा हजारे समजून घेताना .......


   अण्णा हजारेंची खिल्ली उडविणे हा सोशल मीडियातील रिकामटेकड्या मंडळींना छंद जडला आहे.अण्णांचे अहिंसक समर्थक काही अंगावर येणार नाही याची या विकृत मंडळींना खात्री असते त्यामुळेच ते असे धाडस करतात

 अण्णा स्वत: होऊन बोलत नाहीत. पत्रकार त्यांच्याकडे जातात, समकालीन प्रश्नावर विचारतात अण्णा बोलतात.उद्धव ठाकरे सरकारच्या खातेवाटपावर पत्रकारांनी विचारले अण्णा बोलले. लगेच सोशल मिडियावर अण्णा जागे झाले वगैरे विकृत पोस्ट सुरु झाल्या.हे नेहमी घडते कारण अण्णा हे सॉफ्ट टार्गेट आहे.  .पण हे करताना एक जेवणही न सोडणारे आपण आणि अण्णा हजारेंनी ....केवळ लाक्षणिक नाही तर अण्णांनी एकूण १४५ दिवस उपोषण केले आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. 


                    यानिमित्ताने अण्णा हजारे हे प्रकरण नीट समजून घेतले पाहिजे. अण्णांचे १६ वे उपोषण मागील वर्षी संपले.त्यांच्या घटलेल्या वजनापेक्षाही जास्त विश्वासार्हता घटविण्यात आम्ही उपोषण करण्यापूर्वीही आणि उपोषणा नंतरही मग्न आहोत. ८१ वर्षाचा एक वृद्धाने  दिल्लीच्या जीवघेण्या काहिलीत स्वत:ला पणाला लावले .पण त्याविषयी समाज म्हणून कृतज्ञता सोडाच पण त्याची टवाळी करण्यात, त्यांच्यावर संशय घेण्यात आणि त्यांच्यावर आरोप करण्यात आंम्ही आमची प्रतिभा लावली . मान्य आहे की अण्णा च्या कार्यपद्धतीत स्वभावात अनेक दोष आहेत. संघटना चालविण्यात लोकशाही नाही.व्यासंग व आकलनाच्या मर्यादा असल्याने भूमिकेत बाळबोधपणाही येतात पण हे मान्य करूनही त्यांच्या सामाजिक प्रश्नासाठी सतत ३७ वर्षे स्वत:ला पणाला लावण्याचे मूल्य कमी कसे काय होते ? १६ उपोषण त्यातून मिळालेले अनेक कायदे हे सारे टवाळी करावे असे आहे का ? सोशल मिडीयात कोणत्याच व्यासंगाची पूर्वअट नाही म्हणून एका ऋषितुल्य व्यक्तीची काहीही संभावना करावी ??. टीव्ही च्या चर्चेत राष्ट्रवादी चे प्रवक्ते अण्णांना एकेरी संबोधत होते. अण्णा केवळ soft टार्गेट आहे म्हणूनच हे घडते आहे.
   साधा गल्लीतला नगरसेवक काही दिवसांत घर आणि गाडी बदलतो. राज्यातले लोकप्रतिनिधी निवडणुकीत कोटींची प्रतिज्ञापत्र दरवेळी सादर करतात.५ वर्षांत त्यात कोटींची भर पडते. हे सर्व तपशील उपलब्ध असून त्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत आमच्यात नसते, उन्हाळासहन होत नसल्याने आता बहुतेक नेते परदेशात जातील त्याची आम्ही चौकशी करणार नाही पण अण्णा विमानाने दिल्लीला गेले तर ते विमानात बसलेल्या सीटसह फोटो व्हायरल होतात. ही काय विकृती आहे.?ताकदवान आणि उपद्रवमूल्य असलेल्यांना शरण जायचे,स्तुती करायची आणिअण्णासारख्या वृद्ध व्यक्तीच्या विमानप्रवासाचीही चर्चा करायची. आम्ही इतके दांभिक का झालो आहोत ?आम्हाला सज्जनाविषयीचा इतका तिटकारा का असतो ? राजकीय नेत्यांच्या रसिकतेवर त्यांच्या मुत्सद्दीपणावर भरभरून लिहिणारी आमची लेखणी अन्नावर मात्र तुटून पडते.
   मोदी सरकार आल्यावर अण्णा वाट बघत राहिले, पत्र लिहीत राहिले तर सोशल मिडीयात मिलियन dollar प्रश्न होता की अण्णा आता गप्प का ? अण्णा या सरकारचे दलाल आहेत इथपर्यंत मुक्ताफळे उधळली. वास्तविक भूमी अभिलेख च्यां अध्यादेशाविरुद्ध अण्णांनी तोंड फोडले होते हे विसरले गेले आणि आता उपोषण केले तर अण्णा आत्ताच का उपोषण करता ?अण्णा संघाचे आहेत आणि हे आंदोलन संघाने करायला लावले हा आरोप इतक्या मोठ्या आवाजात केला जातो की पुरावा देण्याची गरजच पडत नाही. मुळात अण्णा संघाचे असतील तर आपल्याच सरकारला ते कशाला अडचणीत आणतील...? आणि समजा शेतकरी नेत्यांचीअडचण दूर करायला अण्णा ना जर श्रेय द्यायचे असे ठरले असेल तर मग इतके कमकुवत आंदोलन संघाने नक्कीच केले नसते...मांडव रिकामा पडावा इतकीकमी ताकद संघाची नक्कीच नाही. आणि अण्णानीयुती सरकारविरुद्ध आंदोलने केल्याचे गोपीनाथ मुंढेचे गंभीर प्रकरण उघड केल्याचे सोयीस्कर विसरले जाते. प्रत्येक सत्ताधाऱ्याविरुद्ध अण्णा आक्रमक असतात हे लक्षात घेतले पाहिजे. ज्यांनी भाजपासोबत सरकारे बनवली आणि मतमोजणीअगोदर च महाराष्ट्रातल्या भाजपा सरकारला न मागता पाठींबा जाहीर केला त्या पुरोगामी राष्ट्रवादी चे प्रवक्ते अण्णांना मात्र संघाचे म्हणतात. आणि समजा अण्णा ना कोणीतरी वापरते असे मान्य केले तरी त्याबदल्यात ते अण्णा आज ज्या उंचीवर आहेत त्यापेक्षा जास्त काय देणार आहेत ? कारण विकत घ्यायला त्या व्यक्तीची काहीतरी गरज असावी लागते ना? पद्मभूषण आणि आंतरराष्ट्रीय वलय मिळाल्यावर एखादे सरकार किंवां संघ त्याना यापेक्षा अधिककाय देणार आहे ? यांचे उत्तर आरोप करणारे देत नाहीत.
              या आंदोलनात अण्णांनी काहीशी माघार घेतली, मागण्या ताणल्या नाहीत हे बरोबर आहे पण ते ताणून धरायला जो जनरेटा निर्माण व्हायला हवा तो झाला नाही व तब्येत ही पूर्वीच्या आंदोलनापेक्षा लवकर ढासळली. त्यामुळे थांबण्यात व्यावहारिकता योग्य होती. अटक करून दवाखान्यात नेले असते तर हे हीमिळाले नसते.
         अण्णांच्या मागील 3 उपोषणात गर्दी का जमली नाही ? यावर जास्त चर्चा होते. यात दोष अण्णांचा की जनतेचा ? यात दोन्हीही मुद्दे आहेत. एकतर२०११ च्या आंदोलनाच्या वेळी भ्रष्टाचार हा राष्ट्रीय मुद्दा बनला होता .विदेशातील काळा पैसा आणि कोळसा व स्पेक्ट्रम घोटाळा याने विलक्षण चीड निर्माण झाली होती. त्या पार्शवभूमीवर व केजरीवाल यांचे दिल्लीतील संघटन यामुळे गर्दी जमली. त्या प्रश्नांना जनलोकपाल हे उत्तर वाटत होते व त्या रागातून सरकार बदल झाल्याने त्या रागाचे विरेचन झाले आहे. दुसरा भाग हा की अण्णांनी यावेळी घेतलेला शेतकरी मुद्दा हा भ्रष्टाचारविरोधाइतकात्यंच्या व्यक्तिमत्वाशी जोडलेला नाही. अण्णा जसे भ्रष्टाचारविरोधाचा चेहरा वाटतात तसे ते शेतकरी प्रश्नाशी जोडलेले नाहीत. त्यामुळेमागण्या शेतीच्या असूनही शेतकरी आले नाहीत. तामिळनाडूतील शेतकरी आंदोलन, महाराष्ट्रातील शेतकरी संप, देशपातळीवरील पदयात्रा यात अण्णा सहभागी झाले असते किंवा सतत बोलत राहिले असते तर शेतकरी संघटना उतरल्या असत्या...महाराष्ट्रातीलभ्रष्टाचार विरोधी समित्या बरखास्त केल्यापासून संघटना अशी नाही त्यामुळे महाराष्ट्र मधून जास्त लोक गेले नाहीत. आणखी एक मुद्दा नाविन्याचा असतो. १६ वेळा उपोषणे झाल्याने काहीशी समाजाची उत्सुकता ही कमी होते हां ही एक मुद्द्दा आहे.
             पण प्रश्न हा उरतो की गर्दी ही अण्णाच्या मूल्यमापनाची फुटपट्टी मानायची का ? एक दोन  उपोषण अपयशी मानले हा अण्णाचा पराभव मानायचा का ? मुळात अण्णाचा काही राजकीय पक्ष नाही की गर्दी हे त्याची फुटपट्टी होऊ शकेल. अण्णा नी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना ज्यांचा फायदा होता लोकांनी पाठींबा दिला नाही यात नुकसान समाजाची आहे.अण्णाना गमावण्यासारखे काय आहे ? एका अपयशाने त्यांच्या १५ उपोषणाचे यश झाकाळत नाही. माध्यमे किंवा काही पंडितांनी त्यांना कितीही वेड्यात काढले तरी आजही अण्णा  समाजाच्या सद्सद्विवेकबुद्धी चे काम करतात. समाजाच्या नैतिकतेची फुटपट्टी म्हणून ते आहेत.त्यांच्या साधेपणात ग्रामीण शहाणपण आहे.ग्रामीण भारताला म्हणूनच ते आपले वाटले .त्यांची खिल्ली उडविणाऱ्यात अनेकदा ग्रामीण माणसांना कमी लेखणारा दुस्वास दडलेला असतो.
    अण्णांना मर्यादा आहेत पण ते बेईमान नाहीत
अण्णाचे अत्यंत आक्रमक समर्थन आंम्ही करतो याचा अर्थ अण्णांमध्ये काही दोष नाहीत का ? नक्कीच आहेत. उलट तुम्ही जितके दोष मर्यादा दाखवाल त्यापेक्षा एक दोष मी जास्त दाखवू शकेल कारण गेली २० वर्षे आम्ही जिल्ह्यातील कार्यकर्ते त्यांना जवळून ओळखतो. त्यांच्या मर्यादांची चर्चा होऊ शकते पण हेतूबाबत चर्चा होऊ शकत नाही. जे शंका घेतील ते विकृत आहेत.आणि संशय असणारे पुरावे देत नाहीत.  मुळात एक समजून घेतले पाहिजे की अण्णा सैन्यातून निवृत्त होऊन थेट गावात सक्रीय झालेली व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांनी मार्क्सवाद ते जागतिकीकरण हे काहीही अभ्यासले नाही. व्यवस्थेतील ताणेबाणे त्यामुळेच ते खूप समजू शकत नाहीत. ते कोणत्याही चळवळीत न गेल्याने त्याप्रकारची जडणघडण झाली नाही. एक गावपातळीचा कार्यकर्ता तीव्र सामाजिक जाणीवेने काम करताना ज्या अडचणी येत गेल्या तिच्याविरुद्ध संघर्ष करताना प्रशासकीय सुधारणा यावर लक्ष केंद्रित करतो. विकासातील अडथळा हा भ्रष्टाचार आहे त्यातून अण्णा पुढे जात राहिले .भ्रष्टाचार संपवायला माहिती अधिकार ,लोकपाल ही उत्तरे त्यांच्यापुरती त्यांनी शोधली. ती उत्तरे पूर्ण की अपूर्ण त्यावर चर्चा होऊ शकते. अण्णांना या समस्येचे आकलन किती ? यावरही त्यांची समज तपासली जाऊ शकते पण त्यांच्या हेतूवर शंका घेतली जाऊ शकत नाही.
               थोडक्यात गावपातळीवर विकासाचे कामकरताना येणारे भ्रष्टाचाराचे अडथळे आणि त्याला व्यवस्थात्मक प्रशासकीय सुधारणाचे उत्तर शोधण्याचे काम हा अण्णाच्या कामाचा परीघ आहे. गावातल्या दारू प्रश्नावर लढावे लागल्याने मग दारूच्या प्रश्नावर अनेक कायदे करण्यासाठीही अण्णा लढलेत...त्यात मग सतत लोक भेटून आमच्या या प्रश्नात लक्ष घाला असे म्हणत राहीले. त्यातून इतर प्रश्न जोडले गेले.आजच्या शेतकरी आंदोलनाबाबत ही असेच म्हणता येईल.
            कोणत्याही चळवळीचा, संघटनेचा अनुभव नसल्याने अण्णाची स्वत:ची एक शैली विकसित झाली ती स्वत:ला पणाला लावण्याची असल्याने स्वाभाविकच व्यक्तिकेंद्रित झाली.त्यात संघटना फार विकसित झाली नाही व स्वत;लाच पणाला लावायचे असल्याने मग संघटना ही गरज बनली नाही व व्यक्तिमहात्म्य वाढत गेल्याने नकळत लोकशाही वृत्ती फार विकसित झाली नाही व त्या प्रकारची संघटना बांधली गेली नाही. जी काही सर्व जिल्ह्यात भ्रष्टाचारविरोधी चळवळ उभी राहिली त्यात काही अपप्रवृत्ती शिरल्या त्यामुळे बदनामीच्या भीतीने अण्णांनी ती संघटनाकार्यकारिणीविसर्जित केली. याचा परिणाम म्हणून राज्यातले हे आंदोलन मोडले. भ्रष्टाचारविरोधी उभे राहणारे गावागावातले व्यासपीठ मोडले. वास्तविक या आंदोलनाने प्रत्येक जिल्ह्यात खूप प्रभावी काम केले होते पण बदनामीच्या भीतीने अण्णा त्यापासून दूर गेले.
      त्यामुळे अण्णा चळवळ ही ‘एकला चलो’ रे आहे. तिचे मूल्यमापन तसेच करायला हवे. उगाच एखाद्या जनआंदोलनाचे निकष लावणे चूक ठरेल.
                 त्यामुळे अण्णा त्यांच्या गतीने व समजेनुसार पुढे जात राहतात. त्यात चुका होतात. त्यांना लोक सरकार फसवतात. अहंकार सुखावून मोठेपणा देऊन आंदोलनाचा वेग कमी करतात. यात अण्णांना फसविण्याचा,आश्वस्त करण्याचा भाग असेल पण अण्णांना manage केले हा शब्दप्रयोग जो केला जातो तो अत्यंत विकृत व त्यांच्या प्रांजळपणावर अन्याय करणारा आहे. hamlet नाटकांत एक वाक्य आहे की ‘ There is a system in his madness’ त्याप्रमाणे अण्णांच्या विसंगतीत एक प्रांजळपणाची सुसंगती आहे. 

                  वास्तविक त्यांनी हे संघर्ष अंगावर घेतले नसते व उपदेश करीत  समाजगुरु राहिले  असते तर महात्मेपण अनेक सरकारांनी दिले असते व बदनामी झेलावी लागली नसती. पण याच उपोषणानीदेशाला महाराष्ट्राला अनेक कायदे दिले... माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई, दारूबंदीचे कायदे ,बदलीचा कायदा ,ग्रामसभा सक्षमीकरण असे अनेक कायदे त्यांनी दिले आहेत.त्याचबरोबर भ्रष्टाचार हा निवडणुकीचा सार्वजनिक चारीत्र्याचां मुद्दा त्यांनी बनवून दाखविला. 
                 त्यामुळे अण्णां या टीका टिप्पणीला ओलांडून इतिहासाच्या पानावर कायमस्वरूपी असणार आहेत. ते मौन झाले की सरकारांना बोलावेच लागते हीच त्यांची शक्ती आहे. अण्णामध्ये दोष असतील पण त्यांची ही नैतिक जागा घेईल असे आज तरी आजूबाजूला कोणी दिसत नाही.त्यामुळे अण्णांना जपले पाहिजे आणि म्हणून अण्णा आजही समाजाला हवे आहेत..  
            संसद विधिमंडळ माध्यमे आणि जान्तेची आंदोलने याकडे बहुमताच्या जोरावर उद्दामपणेसरकारे दुर्लक्ष करताना एका खेड्यातील मंदिरात बसलेल्यां एकाकी अण्णाची सलग ३० वर्षे वेगवेगळ्या सरकारांना झुकावे लागले यातच अण्णाचे सामर्थ्य आहे
             अण्णा हे  असे आहेत ? ते आपल्याला काही मागत नाहीत.त्यांना जसे सुचेल तसे मुद्दे घेतात. एकट्याला पणाला लावतात. तेव्हा आपण उगाचच त्यांच्यावर आपल्या अपेक्षा लादण्यात काय अर्थ आहे ? त्यापेक्षा आंपण आपल्या पद्धतीने आपल्याला पसंत नसेल तर लढले पाहिजे. अण्णानीच हे करायला पाहिजे हे म्हणण्यात आम्ही काही करणार नाही ही कबुली आहे. त्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदार शिव्या म्हणूनच वांझ आहेत. अण्णा जर एक ढोंग असेल तर ते संपविण्याचा मार्ग त्यापेक्षा मोठे आंदोलन करून त्यांना अप्रस्तुत करणे हाच आहे,सोशल मिडीयात त्यांच्यावर घसरणे हा नाही. त्यातून लाईक मिळतील पण प्रश्न पुढे जाणार नाही.
हेरंब कुलकर्णी, महालक्ष्मी मंदिराजवळ मुपोता अकोले जि अहमदनगर ४२२६०१ फोन ८२०८५८९१९५  herambkulkarni1971@gmail.com

टिप्पण्या

  1. अण्णांनी केलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात भाजप विरोधी सारकरांचाच नव्हे तर ब्राम्हणेतर नेत्यांचा सुद्धा बळी गेला. उदाहरणार्थ 95 मधल्या भाजप शिवसेना सरकारच्या काळात शशिकांत सुतार(SS) आणि महादेवराव शिवणकर(BJP) यांच्याकडे कॅबिनेट मंत्री होते. यांच्याकडे अनुक्रमे सिंचन व कृषी खाते होते. तसेच या मंत्रिमंडळात शोभाताई फडणवीस सुद्धा अन्न व नागरिक पुरवठा मंत्री होत्या. पण शोभाताईंवर घोटाळ्याचे आरोप होऊ लागताच अण्णांनी सुतार आणि शिवणकर यांच्यावर घोटाळ्याचे आरोप लावून उपोषण केले. त्यांच्यावर कारवाई झाली. त्यांचे राजकीय करियर बुडाले. मात्र या सर्व गदारोळाचा फायदा घेऊन शोभाताईंना तारण्यात आले. मुख्यमंत्री मनोहर जोशी होते, हे सांगणे न लागे.
    संघाने त्यांच्या विरोधात जाणाऱ्यांचा काटा काढण्यासाठी नेहमीच बहुजनांचा वापर केला आहे. अण्णा त्याला अपवाद नाही. तेही बिचारे कोणत्याही संघाच्या शाखेत जाणाऱ्या 'मनक्रांती' झालेल्या स्वयंसेवकासारखे, गोळवलकर गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे, "कबड्डी खेळ म्हटलं तर कबड्डी खेळायची. प्रश्न विचारायचा नाही", तत्वाने वागत असतील, असा संशय घ्यायला जागा आहे. असे हजारो 'मंद' पण प्रामाणिक स्वयंसेवक संघाच्या फौजेत आहेत.

    उत्तर द्याहटवा
  2. संघ संघाधी सांगते ,संघाची संगत तर्क संगत।

    उत्तर द्याहटवा
  3. अण्णा हजारे यांच्या कार्याला सलाम.. देश कधीही विसरणार नाही... अण्णा हजारे नी नवीन पिढीला एक आदर्श घालून दिला आहे...

    उत्तर द्याहटवा
  4. एक मोठी समस्या अशी आहे कि अण्णा नी सेंकड लाईन तैयार नाही केली...

    उत्तर द्याहटवा
  5. हेरंब छान लिहलं. मतभिन्नता कायम ठेवूनही मूल्यमापन कसे करावे याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे हा लेख होय. असो, माझे काही मतभेद आहेत. पण मला माजी प्राचार्य विद्याधर औटी यांचे " ही आण्णा हजारे यांची भ्रष्टाचार विरोधी चळवळ आहे, " हे वाक्य कायम आठवनित आहे. असो. समाजवादी पद्धतीने मुद्देसूद विश्लेषण केले आहे. भेटीअंती बोलूया

    उत्तर द्याहटवा
  6. थोर समाजसेवक पद्मभूषण मा.आण्णासाहेब हजारे यांचा आज जन्मदिवस..!

    आण्णांनी "देशात माहीती अधिकार कायदा, पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना सर्वप्रथम आपल्या राळेगणसिद्धी गावात राबवून राज्याला व देशाला जलसंधारणाचे महत्व पटवून देत भष्ट्राचाराच्या विरोधात आयुष्यभर संघर्ष केला व देशातील तरुणाईला ग्रामीण भागाच्या विकासाची नवी दिशा दिली.

    माझ्या विद्यार्थी दशेपासूनच मला आण्णांचा सहवास मिळाला हे मी माझे परमभाग्यच मानतो. त्यांनी दाखवलेल्या पाऊलवाटेवर ग्रामपंचायत सदस्य व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा अध्यक्ष म्हणून काम करताना ग्रामस्थांसमवेत मला अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याची संधी मिळाली.

    आण्णांच्या प्रेरणेतून ग्रामविकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आम्ही सामूहिकपणे राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांमुळे व ग्रामस्थांच्या एकीमुळे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात माझे पिंपळगाव तर्फे महाळुंगे गाव पश्चिम महाराष्ट्रात प्रथम व राज्यात द्वितीय आले. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातील राज्याचा सर्वोच्च मानण्यात येणारा स्व.वसंतराव नाईक पुरस्कार गावाला मिळाला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना, महात्मा फुले भूमी जलसंधारण अभियानाच्या माध्यमातून गाव संपूर्ण देशाला परिचित झाले.

    पद्मविभूषण मा.आण्णासाहेब हजारे यांचे कार्य देशाला दिशा देणारे आहे. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी प्रत्येक भारतीयांची मनापासून इच्छा आहे.

    आण्णांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा..!

    : सचिन बांगर - विस्तारक, युवासेना महाराष्ट्र

    #HappyBirthday #PadmbhushanAnnasahebHajare

    उत्तर द्याहटवा
  7. सुंदर , परिपूर्ण मुद्दे ,आक्षेप, स्पष्टीकरण योग्य मांडणी

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा