दीपावली दिवाळी अंकात शिक्षणक्षेत्रातील अस्वस्थता या विषयावर हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेला लेख
अस्वस्थतेच्या कृष्णविवरातील शिक्षण
अस्वस्थता हे जिवंतपणाचे लक्षण मानले जाते पण अस्वस्थता या दोन प्रकारच्या
असतात. एक अस्वस्थता सध्याच्या जगण्यात आनंद मिळत नसल्याने, सृजनशीलता जगण्यात
नसल्याने एक अस्वस्थता असते. ही अस्वस्थता अधिक उन्नत पातळीवर नेते. दुसऱ्या
प्रकारची अस्वस्थता ही अगतिकतेने येते.आपण आजूबाजूचे वास्तव बदलू शकत नाही व
वास्तव सहन करावे लागते. आजच्या काळातील अस्वस्थता ही या दुसऱ्या प्रकारची आहे..
इतर क्षेत्रातील अस्वस्थता ही शिक्षणक्षेत्राशी
जोडलेली आहे. भारतातील आर्थिक मंदीपासून राजकारणाचा घसरता स्तर,कार्यसंस्कृतीचा
देशातील दर्जा आणि सामाजिक नितीमत्ता यापासून शिक्षण वेगळे काढता येत नाही. त्यासर्वाचे
अपरिहार्य प्रतिबिंब शिक्षणात पडते आहे.
शिक्षण क्षेत्रातील अस्वस्थता नोंदवताना शिक्षणात घडणाऱ्या काही सकारात्मक
नोंदीही करायला हव्यात. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा संपूर्ण देशातील ३५ टक्केच्या
लोकसंख्येत (म्हणजे आजच्या केवळ एक चतुर्थांश लोकसंख्येत) साक्षरता केवळ १६ टक्के आणि त्यातही महिला
साक्षरता फक्त ७ टक्के होती. त्यापासून आज आपण केलेली प्रगती नाकारणे ही आत्मवंचना
ठरेल. आज महाराष्ट्रासारख्या राज्यात प्रत्येक एक किलोमीटरवर शाळा आणि वाढलेले
महिला शिक्षण.उच्च शिक्षणाच्या निर्माण झालेल्या सुविधा हे सारे बघता खूप मोठा
टप्पा आपण गाठला आहे. दलित आदिवासी भटके मुस्लीम या वंचित समुहात आज शिक्षणाने
मध्यमवर्ग निर्माण केला आहे. झाडाखाली भरणारी शाळा हे दृश्य बदलले असून गावागावातशाळेची
इमारत, प्रशिक्षित शिक्षक दिसतो आहे. उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढते आहे. आयआयटी
व विविध तंत्रशिक्षणाच्या संधी वाढत आहेत हे सारे दिलासा देणारे आहे.
पण इतके सारे असूनही शिक्षणविषयक
अस्वस्थता बघायला मिळते
सर्वात मोठी
अस्वस्थता ही आहे की शिक्षणाने आम्हाला समाजपरिवर्तनाची जी आशा दाखवली होती. माणसाच्या
अंतर्बाह्य परिवर्तनाची जी आशा दाखवली होती त्याचे काय झाले ? उलट जितका माणूस
शिकलेला तितका तो अधिक बनेल आणि आत्मकेंद्रित झालेला दिसतो याउलट निरक्षर माणसे
अधिक प्रेमळ आणि साधी सरळ असतात. आदिवासी भागात कमी शिकलेले लोक राहतात बलात्कार आणि
भृणहत्या होत नाही आणि दुसरीकडे जास्त शिकलेल्या महानगरात महिला सुरक्षित नाहीत.
भृन्ह्त्येचे प्रमाण शहरी भागात मोठे आहे. निरक्षर पाकीटमार फारतर ५०० रुपयाचे
पाकीट मारील आणि शिकलेला एक अधिकारी एका सहीने लाखो रुपयाच्या रकमा हडप करू शकतो. त्यामुळे
शिकलेले माणसे अधिक समाज बिघडवतात असे म्हणायचे का ? ओशो रजनीश एकदा म्हणाले होते
की सर्व समाज शिकला की समाज एका विशिष्ट उंचीवर जाईल अशी आशा आम्हाला सगळे
विचारवंत दाखवत होते .त्यांना कबरीतून उठवून ते दाखवत असलेली आशा किती फोल आहे हे
एकदा फिरून दाखवायला हवे. खरेच शिक्षणाने समाज बदलेले म्हणून शिक्षणाच्या
प्रसारासाठी आयुष्य वेचलेली माणसे बघितली की खरेच तो भाबडेपणा होता की काय ? असा
प्रश्न पडतो. पुन्हा शिक्षणातून माणसे अधिक आत्मकेंद्रित झाली आहेत. समाज सोडाच पण
गरीब कुटुंबातून जे शिकले ते समस्त गरीब सोडाच पण आपल्या घरातील भाऊबंद आणि नातेवाईक
यांच्याकडेही लक्ष देत नाहीत उलट मध्यमवर्गीय आकांक्षेने पछाडले जातात. दलित आदिवासी
भटके यांच्यात जो मध्यमवर्ग निर्माण झाला त्याच्याकडून बाबासाहेब आंबेडकर यांनी
जसे दलित समाजाचे नेतृत्व केले तो वारसा पुढे न्यावा अशी अपेक्षा होती पण
दुर्दैवाने ते झाले नाही उलट बहुजनातील मध्यमवर्ग अधिक आत्मकेंद्रित झाला व आपल्या
सामुहापासून तुटला. त्यांचे हितसंबंध बदलले त्यामुळे वंचित समूहाला नेतृत्व मिळाले
नाही व त्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. आजच्या शिक्षणाने निर्माण केलेली ही
समाजाभिमुख नसलेली व वंचिताकडे पाठ फिरवलेली आत्मकेंद्रितता मला अधिक अस्वस्थ
करते.
हे सारे प्रश्न सोडवायला वेगवेगळी
उत्तरे नक्कीच आहेत त्याची स्वतंत्र्य चर्चा करता येईल. शिक्षणावर सरकारी अंकुश
ठेवताना खुल्या व्यवस्थेच्या नजरेने शिक्षणाची रचना करावी का ? याचाही विचार
करायला हवा. मानवी चेहरा व वंचितांची काळजी घेणारी खुली व्यवस्था शिक्षणात कशी
आणता येईल याचा विचार करावा व ही उत्तरे शोधताना महाराष्ट्रातील साने गुरुजी ,जे
पी नाईक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शिक्षणविषयीचा ध्येयवाद आणि फुले शाहू आंबेडकर
यांनी दिलेला मुलभूत विचार याच्या आधारावर शिक्षकांची वैचारिक बांधणी करावी लागेल.
शिक्षक हाच घटक आपण कृतीप्रवण केला तरच ही सर्व कोंडी फुटू शकते. शिक्षक समुदायाने
व्यासंगी होऊन समाजाचे नेतृत्व केले तरच शिक्षणाचा चेहरा मोहरा बदलू शकेल अन्यथा
या अस्वस्थतेच्या कृष्णविवरातून आपली सुटका नाही
.राज्यकर्त्या वर्गाची अस्वस्थता ही आहे की शिक्षणावर इतका
खर्च करूनही जागतिक प्रतवारीत शिक्षणाची प्रगती दिसत नाही. जगातील पहिल्या २००
विद्यापीठांचे जे सर्वेक्षण दरवर्षी येते त्यात आपण किती मागे आहोत इतकेच फक्त
अधोरेखित होत राहते.. जागतिक पातळीवर कोणत्याही देशात उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण
किती ? यावरही एखाद्या देशाचे मूल्यमापन होते. भारतातउच्च शिक्षणावर लक्ष केंद्रित
करूनही ती संख्या ३०चा अंक गाठायला आणखी काही वर्षे लागतील. उच्च शिक्षणाचे प्रमाण
न वाढण्याचे महत्वाचे कारण प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर मोठ्या प्रमाणात होणारी
गळती आहे आणि त्या गळतीचे महत्वाचे कारण हे प्राथमिक माध्यमिक शिक्षणात किमान वाचन
लेखन गणन कौशल्ये प्राप्त न झालेली मुले हे आहे. असे विद्यार्थी अभ्यासक्रम कठीण
होताना तो विद्यार्थी पेलू शकत नाहीत पण तज्ञ केवळ गरीबीमुळे गळती होते असे म्हणत
राहतात. इंजिनिअरिंग आणि
इतर कोर्सेस मोठ्या संख्येने निघाले. त्याचा दर्जा राखला गेला नाही. त्यामुळे
पदव्या मोठ्या संख्येने निघूनही पात्र असलेले तरुण मिळत नाहीत. सर्वेक्षणानुसार भारतात
जितके इंजिनिअर बनतात किंवा वास्तुविशारद बनतात त्यापैकी खूप कमी टक्के त्या
अपेक्षित दर्जाचे आहे. शेतीच्या भाषेत बोलायचे तर कणसे सगळीकडे लागले आहेत पण
त्यात दाणे मात्र नाहीत. कौशल्याधारित नोकरीत निवड करताना त्या युवकाची
कल्पनाशक्ती ,निर्णयशक्ती किती विकसित झाली आहे हे तपासले जाते पण दुर्दैवाने ते
विकसित व्हावे अशी आपली शिक्षणपद्धतीच नाही. सरकारच्या धोरणाबाबत आणखी एक अस्वस्थता आहे. खुल्या
व्यवस्थेच्या स्वीकाराने सार्वजनिक सेवांवरील खर्च कमी होतो आहे. त्याचा परिणाम या
सेवांच्या गुणवत्तेवर होतो आहे. त्यामुळे डाव्या चळवळीतील कार्यकर्ते शिक्षणावरील
कमी होणाऱ्या खर्चाबाबत अस्वस्थ आहेत.
भारतातील सुशिक्षित पालकात आणि
शिक्षणाचा अभ्यास करणाऱ्या घटकांत अस्वस्थता ही शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत आहे.
शिक्षणावर जास्त खर्च करण्याची तयारी सुशिक्षित पालकांची आहे आणि एक किंवा दोनच
मुले असल्याने शिक्षण विषयक आकांक्षा वाढल्या आहेत पण त्या गुणवत्तेबाबत पूर्ण होत
नाहीत अशी नाराजी आहे. पुन्हा ज्या खाजगी शाळात ही मुले जातात त्या शाळा पालकांचे
फार ऐकून घेत नाहीत. पालक हातात असलेल्या पैशातून मुलात फक्त गुंतवणूक करीत राहतात.
त्याच्यात असलेली कौशल्ये आणि नसलेली कौशल्ये विकसित करायला विविध क्लासेस लावतात.
पण एकूणच सरकारी आणि खाजगी शाळेचा दर्जा फारशा समाधानकारक नाही. अनेक मुलांना
किमान वाचन - लेखन क्षमताही प्राप्त होत नाहीत.प्रथमपासून अनेक संस्थांनी केलेल्या
पाहणीत शाळांतील वाचन लेखनाची स्थिती समाधानकारक नाही. मुलांना साधी साधी वाक्ये
वाचता येत नाही. संकल्पनात्मक स्पष्टता नाही असेही काही पाहण्यात आढळून आले आहे. भाषा
गणिताची किमान कौशल्येही प्राप्त नसलेली ही मुले फारशी विकसित होत नाहीत. अभ्यासाचे सोडा पण
मुलांना इतर सामान्य ज्ञान तरी असावे ना? पण त्याबाबत ही फारशी समाधानकारक स्थिती
नाही. साने गुरुजींच्या कार्यक्षेत्रात अंमळनेर परिसरात साने गुरुजी विषयी मुलांना
माहीत नाही आणि मराठवडा मुक्तीदिनाच्या दिवशी महाविद्यालयीन तरुणांना हा संग्राम
कोण लढले ही नावे माहीत नाही अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
वंचित
समूहातील अस्वस्थता ही दोन प्रकारची आहे. एक तर ७० वर्षे स्वातंत्र्याला होऊनही
वंचित समूहात पुर्णपणे शिक्षण पोहोचले नाही. वेगवेगळ्या अहवालात शालाबाह्य मुलांची
संख्या देशपातळीवर किमान दीड कोटी आहे आणि महाराष्ट्रात किमान ५ लाख मुले
शालाबाह्य आहेत. या मुलांचे वर्ग बघितले तर ही सर्व मुले दलित आदिवासी भटके
विमुक्त व मुस्लिम यांची मुले आहेत. याचा अर्थ जे समाजघटक इथल्या व्यवस्थेने
शतकानुशतके शिक्षणापासून दूर ठेवले त्याच समाजघटकाना आपण पुन्हा दूर ठेवले आहे.
त्यामुळे नकळत या गरीब समूहात अस्वस्थता आहे. इतर समाजघटक शिक्षणातून वेगाने
प्रगती करीत असताना वंचित समूहातील घटकांना आपल्याला नाकारले जात आहोत अशी भावना
आहे. पुन्हा हे शिक्षण न मिळणे हे दारिद्रयाशी आणि त्यातून येणार्या स्थलांतराने
कठीण होते आहे. भारतात दरवर्षी सुमारे ८ कोटी लोक पोटासाठी राज्यात आणि
राज्याबाहेर स्थलांतर करतात. तेव्हा या वंचित वर्गाच्या अस्वस्थतेचा विचार करायला
हवा. याव्यतिरिक्त ज्या वंचित वर्गाला शिक्षण मिळाले आहे त्या वंचित समुहाच्या
अस्वस्थता वेगळ्या आहेत. ज्या गरीब कुटुंबातील मुले मुली शिकले त्यांना सुरवातीला
नोकर्या मिळाल्या त्यामुळे त्यांचे आर्थिक वर्ग बदलत गेले त्यातून गरीब दलित
आदिवासी समूहात एक मध्यमवर्ग निर्माण झाला. त्यातून इतर गरीब कुटुंबात आपण ही
शिक्षण घेतले पाहिजे कारण शिक्षणातून वर्ग बदलतात अशी प्रेरणा निर्माण झाली.
त्यातून शिक्षण घेणार्यांची संख्या वाढत गेली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचीही
प्रेरणा त्यात महत्वाची होती. पण पुढे शिक्षण घेवून नोकर्या मिळत नाहीत अशी
स्थिती निर्माण झाली. नोकर्या लागण्यासाठी पैसे घेतले जाऊ लागले. खाजगी शिक्षण
संस्थेत सरसकट लाखोंच्या रकमा घेवून भरती सुरू झाली. याचा परिणाम गरीब कुटुंबात
गुणवत्ता असूनही केवळ धंनवत्ता नाही म्हणून लाखो तरुण नोकरीपासून दूर राहत आहेत.
शासनाने नोकरभरती न करणे, मंदीमुळे नोकर कपात व नोकरभरती न
होणे या सर्वामुळे दलित आदिवासी भटके संवर्गातील सुशिक्षित तरुण की जे पोटाला
चिमटा देवून शिकले त्यांना मात्र केवळ पैसे नाहीत नोकरी लागत नाही त्यातून अतिशय
विषण्ण मानसिकता आहे. अस्वस्थता आहे आणि याचा परिणाम शिक्षणावरील श्रद्धा कमी
होण्यात होतो आहे. शिकून जर नोकरी लागत नसेल तर कशाला आपली मुले शिकवायची अशी
प्रतिक्रिया गरीब पालकांशी बोलताना ऐकू येते. त्यापेक्षा मुलांना कामाला लावा अशी
भूमिका तयार होते आहे. ही अस्वस्थता अतिशय वेदनादायक आहे.
उच्च
शिक्षण घेण्याचे प्रमाण समाधानकारक नसले तरी वाढते मात्र आहे ही बाब समाधानकारक
असली तरी तंत्र्शिक्षण व्यवसाय शिक्षणाच्या संधी ग्रामीण भागात अजिबात विकसित
झाल्या नाहीत यामुळेही तीव्र अस्वस्थता आहे..
ग्रामीण महाराष्ट्रात उच्च शिक्षण म्हणजे फारतर कला वाणिज्य महाविद्यालय
असते आणि ते नसेल तर आयटीआय असते. त्यामुळे प्रश्न असा पडतो की शहरातील उच्चभ्रू
मुलांना आयआयटी त जाण्याची संधि आणि खेड्यापाड्यात मात्र फक्त आयटीआय आहे. तेव्हा
आयआयटी विरूढ आय टी आय हीच आजच्या शिक्षणाची ओळख बनली आहे. मी यवतमाळ जिल्ह्यात
पांढरकवडा येथे चौकशी केली तेव्हा एका तालुक्यात १२२ वायरमन होते. याचे कारण १० वी
पास झाल्यावर आयटीआय सोडून दुसरी संधीच नाही. तेव्हा ही संधीची विषमता हा एक
मुद्दा आहे त्यातून ग्रामीण तरूणात अस्वस्थता आहे. त्यांच्या परिसरात उच्च
शिक्षणाच्या विविधांगी संधि नाहीत आणि जिथे कुठे त्या संधी आहेत त्या खाजगी शिक्षण
सम्राटांच्या आहेत.ती फी गरीबांना परवडत नाहीत. एक तरुण सिलीकॉन valley त असताना मेळघाट valley तला
तरुण अजून पाखरे मारतोय. शहरातला तरुण laptop वर काम करताना आदिवासी तरुणाच्या
हातात अजून पेन नाही, शहरी तरुण फास्टफूड खाताना खेड्यातील आश्रमशाळेत धड जेवण
मिळत नाही. उच्च शिक्षणाच्या वेगवेगळ्या संधी शहरी तरुण घेताना ग्रामीण तरुण गावात
जितके शिक्षण मिळेल तितके घेतो या अंतरामुळे ग्रामीण तरुणात अस्वस्थता आहे. आणखी एक अस्वस्थता पालकांमध्ये
आहे ती म्हणजे उच्च शिक्षणाचा खर्च पेलत नाही म्हणून गरीब कुटुंबच काय पण
त्याचबरोबर कनिष्ट मध्यमवर्ग आणि मध्यमवर्गसुदधा अस्वस्थ आहे. आज उच्च शिक्षणात जर
सरकारी मेरीटच्या कोट्यातून number लागला तरच ते उच्च शिक्षण गरिबांसाठी आणि
मध्यमवर्गासाठी सुसह्य असते. ही आर्थिक क्षमता नसल्याने क्षमता असूनही अनेक मुले
आवडता अभ्यासक्रम घेऊ शकत नाहीत. इतकी लाखो रुपये फी भरता येत नाही हे दूरच पण महाराष्ट्रात
अलीकडच्या काळात काही विद्यार्थ्यांनी फी भरायला पैसे नाहीत म्हणून विद्यार्थ्यांनी
आत्महत्या केल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात मागील महिन्यात एका १२ वीच्या
विद्यार्थिनीने फी भरता येत नाही म्हणून आत्महत्या केली. त्याचप्रमाणे वाशीम व
अहमदनगर जिल्ह्यात ही विद्यार्थी आत्महत्या झाल्यात इतकी उच्च शिक्षणाची विदारक स्थिती आहे.
रोहित वेमुला प्रकरणी जो जातीयवादी वास्तव पुढे
आले व मुंबईत पायल तडवी या शिकाऊ डॉक्टर ने आत्महत्या केली त्यातून उच्च
शिक्षणातील जातीयवादी वेगळीच अस्वस्थता पुढे
आली आहे. वंचित समुहातील मुले मुली शिकू लागले तर उच्च शिक्षणात त्यांच्या जाती
लक्षात घेवून त्रास दिला गेला. विश्वास बसणार नाही इतके हे कटू वास्तव आहे.वेमुला
प्रकरणी देशभर चर्चा झाली त्यामुळे वंचित समूहाच्या मुलांचे विद्यापीठ स्तरावर असणारे
एकटेपण अधिक गडद झाले. ते वास्तव अधिक सुन्न करणारे आहे. माणसे शिकली तरी
त्यांच्या मनातील जात वर्चस्ववादी मानसिकता जात नाही हेच या प्रकरणाने पुन्हा
सिद्ध केले. प्राथमिक माध्यमिक स्तरावर ही मुले शाळा का सोडतात ? याचा जो अभ्यास
झाला त्यात एक कारण शिक्षक किंवा इतर विद्यार्थी जाती किंवा वडिलांच्या
व्यवसायावरून टाकून बोलतात हे कारण सांगितले जाते आहे.
उच्च शिक्षणाचा विस्तार होताना त्यात शिरलेल्या अपप्रवृत्ती आणि गुणवत्तेचा
सतत जाणारा बळी हे वास्तव या क्षेत्रातील तज्ञांना अस्वस्थ करणारे आहे. गुणवत्तेसाठी
आणलेला प्रत्येक नियम पातळ करायचा अशीच भूमिका काही प्राध्यापक संघटना घेतात. नेट
सेट आले की त्याला विरोध केला. नेट सेट मिळत नाही म्हणून ती पदवी नसणारे नोकारीत
भरले. त्यांना संरक्षण द्या. नेट सेट होता येत नाही तर मग त्यांना पीएचडी समकक्ष
माना. पण किमान ती पीएचडी तरी दर्जेदार असावी ना ? ती कशी मिळते आणि कशी विकली
जाते ? तिचा दर्जा काय ? हे सारे आपण वाचतोच आहोत सतत. प्राध्यापकांनी
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियतकालिकात लेखन करावे म्हणून नियम आणला तर आपला दर्जा
आंतरराष्ट्रीय करण्यापेक्षा ती आंतरराष्ट्रीय दर्जाची मासिके आम्ही गावाच्या
पातळीवर आणली आणि विविध परिषदातून दर्जा उंचवावा म्हणून नियम आणले तर त्या परिषदा
केवळ पर्यटनाच्या संधी करून टाकल्या.या प्राध्यापक वर्गाने सामाजिक चळवळींचे
नेतृत्व करावे आणि समाजात watch dog ची भूमिका करावी अशी अपेक्षा करावी तर अपवाद
वगळता आत्मकेंद्रित वर्ग निर्माण झालाय. समाजात चिंतन करणारे विचारवंत या
प्राध्यापक वर्गाच्या वर्तनाने आणि उच्च शिक्षणात या सुमारपर्वाने आणि गुणवत्त्ताविहीन
वास्तवाने अस्वस्थ आहे.
विद्यार्थी वर्गाची
अस्वस्थता तर राजकीय पटलावर येवून धडकली इतकी ती तीव्र आहे.. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात
जे घडले ते योग्य अयोग्य याबाबत वेगवेगळी मते असतील पण त्यातून विद्यार्थ्यांची जी
अस्वस्थता पुढे आली ती हिमनगाचे टोक आहे असेच म्हणावे लागेल.एकूणच महाविद्यालयीन
तरुणाई अस्वस्थ आहे.त्यात कमी होत जाणाऱ्या रोजगाराने भविष्याची चिंता अंधारलेली आहे.सध्याच्या
आर्थिक मंदीने ही चिंता अधिक गडद होत जाते आहे.
विद्यापीठ व महाविद्यालयात तरुणांच्या हिंसक झुंडी कार्यरत आहेत. महाविद्यालयात व एकूणच शिक्षणात विद्यार्थ्यांना
विचार करायला शिकवणे, चांगली वाचनाची आवड विकसित करणे, विविध कलांची आवड निर्माण
करणे, संवेदनशीलता विकसित करणे आणि निसर्गाविषयी प्रेम वाढविणे, जात धर्म यापासून
माणुसकीकडे प्रवास सुरु होणे हे सारे शिक्षणातून व्हायला हवे पण ते होत नाही. त्यामुळे
तरुण पिढी अधिक उथळ आणि आक्रमक होते आहे.जाती धर्माच्या संघटनाकडे ओढली जाते आहे.याचा
परिणाम सामाजिक असंतोष वाढतो आहे. तरुणांकडून विविध प्रकारची हिंसा घडताना या सामाजिक
अस्वस्थततेला शिक्षणातून अपेक्षित तरुण घडला नाही हे वास्तव जबाबदार आहे हे लक्षात
घ्यायला हवे.
शिक्षणात काम करणारा महत्वाचा घटक शिक्षक हा सुद्धा अस्वस्थ आहे. एकतर विना
अनुदानित धोरण घेतल्याने आज एकाच शाळेत किंवा महाविद्यालयात एक पूर्ण पगार घेणारा
आणि दुसरा अर्ध पगारी शिक्षक आहे. विना अनुदानित शाळेच्या शिक्षकांनी महाराष्ट्रात
१५६ आंदोलने केली. एका शिक्षकाने स्वातंत्र्यदिनी आत्महत्या केली. तरीही शासन हे
विना अनुदानित धोरण संपवत नाही. शिक्षण क्षेत्रातील आज ही सर्वात मोठी अस्वस्थता
आहे. शाळा कॉलेजला सुविधांना अनुदान मिळत नाही.शिक्षक भरतीत लाखो रुपये घेतले
जातात त्यामुळे गुणवत्तेच्या तरुणांना नोकरी मिळत नाही व राजकीय संस्थाचालक
शिक्षकांचा सन्मान न राखता त्यांचा निवडणुकीत कार्यकर्ते म्हणून वापर करतात. या
राजकीयकरणाने शिक्षक अस्वस्थ आहे व या क्षेत्रातील आर्थिक भ्रष्टाचार खूप वाढला
आहे त्यातून शिक्षकाचे शोषण वाढले आहे. ही अस्वस्थता शिक्षणात प्रतिबिंबित होते आहे.
हेरंब कुलकर्णी
फोन ८२०८५८९१९५
सर अस्वस्थतेच्या मुळापर्यंत शिरून अगदी चौफेर व विस्तृतपणे मांडणी केलात महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षित व्यक्तीने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे राज्यातील विनाअनुदानितचा मुद्दा ही आपण घेतलात सार काही विचारशील माणसांच्या हृदयातील आहे त्या हृदयापासून परिवर्तन व्हायला पाहिजे एवढीच अपेक्षा.
उत्तर द्याहटवा