काही वर्षापूर्वी विदर्भात आकोट तालुक्यात दीपाली कोल्हे या १०वीत शिकणार्या मुलीने शेतकरी बापाचे दु:ख बघवत नाही म्हणून आत्महत्या केली होती. विशेष म्हणजे या मुलीला शेतकरी आत्महत्या या विषयावर वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस मिळाले होते. या मुलीला हेरंब कुलकर्णी यांनी‘लोकसत्ता’त लिहिलेले हे अनावृत्त पत्र...... हे पत्र अक्षरश: पिळवटून टाकते आणि शेतकर्याची अथांग वेदना या पत्रातून काळजाला भिडते
प्रिय दिपाली कोल्हे ,
तुझ्या मरणाने डोळे पाणावले बघ. कर्जबाजारी बापाची आत्महत्या बघण्यापूर्वी स्वत:च आत्महत्या करून तू मोकळी झालीस.कारण तुला हे माहीत होतं की आपण जर आज संपलो नाही तर काही दिवसात आपल्याला बापाची आत्महत्या बघावी लागणार आहे.
तुझी मरणापूर्वीची तगमग डोळ्यासमोर येते दिपाली. कोणत्या मानसिकतेतून तू गेली असशील. कर्जाच्या फासात रोज अडकत चालणारा बाप. घरावर पडलेली दारिद्रयाची काळी गडद छाया. तुझ्यापेक्षा मोठ्या ३ बहीणींचे थांबलेले शिक्षण...आजूबाजूला रोज लग्नाचे मांडव सजताना काळवंडलेले बहीणींचे चेहरे. ..हे सारं सारं तू बघत होतीस.. कसलीच रुपेरी किनार नसलेले हे दु;ख बघून तू खचून गेली असशील पोरी...
जागतिक बँक,संसद ,विधिमंडळ,मीडियात शेतकरी प्रश्नावर चाललेली सारी चर्चा तुझ्या आकलनापलीकडे होती. तुला फक्त इतकच कळत होतं की आमचे शेत पाणी मागते आहे आणि माझ्या बापाचे रक्त शोषते आहे. कितीही घाम गाळला तरी कर्जाच्या मुद्दलालाही धक्का लागत नाही. मिडियात नट नटयांच्या लग्नाची चर्चा रंगताना माझ्या ३ बहीणींच्या अंगाला हळद लागत नाही ..बेटा तू फक्त इतकच सरळ वास्तव समजून घेतलस आणि स्वत: पुरते उत्तर शोधले.
मागील वर्षी शेतकरी आत्महत्या या विषयावर भाषण करताना तुला बक्षीस मिळालं, काळा विनोद यालाच म्हणतात का ?किती क्रूर विसंगती आहे ही दिपाली ?जो विषय तुला बक्षीस मिळवून देतो तीच कहाणी आपल्यापर्यंत एक वर्षात येवून थांबेल अशी तू कल्पना तरी केली असशील का ?शेतकर्यांचे जगणेच असे आहे की त्यांच्यावर भाषणे करणारे विचारवंत होतात,त्यांच्यावर कविता करणारे आमदार होतात,शेतीवर चर्चा करणारे शेतीतज्ञ होतात पण शेतकरी मात्र काहीच होत नाही .तो आहे तिथेच राहतो ..तो मातीत राबतो राबतो आणि असह्य झाले की त्याच मातीत औषध घेवून मातीमोल होतो ..त्याच्या मरणावर पुन्हा कविता पुन्हा भाषणे पुन्हा राजकारण होत राहते....अनेकांची करियर घडून जाते
तुझ्या आत्महत्येने तरी आता आत्महत्येची टिंगल करणार्यांचे डोळे उघडतील का ? दारू पिऊन मेला तरी आत्म
हत्या.. अपघात झाला तरी आत्महत्या अशी बदनामी करणार्यांनी तुझा आकांत आता बघायला हवा. शेतकर्यांचे कुटुंब किती तणावात जगते आहे ?शेतकरी किती भीषण जीवन संघर्ष करतो आहे. त्याचे सारे कुटुंबच आज मृत्युच्या टोकावर उभे आहे. वरवर शांत दिसणार्या चेहर्याखाली किती खोल वेदनेचा सागर हिंदकळतो आहे ... हिमनगाच्या टोकसारखी एक झलक फक्त तुझ्या मरणाने तू दाखवलीस.....
शहरात लग्नाचे बार उडताना कोट्यवधी खर्च होताना इथं थाटामाटात सोडाच पण नारळ देवून मुलगी उजविणेही कठीण झालय...या मुलींवर आजीवन कुमारिकापण लादले जाते आहे.. शैक्षणिक गळतीची चर्चा होताना तुझ्या बहीणींच्या थांबलेल्या शिक्षणाला कोणत्या पट्टीने मोजायचे ?स्त्री सबलीकरणाचे ढोल वाजताना तुझ्या तीन बहीणींच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ नेमकं कोणत्या सुत्राने काढायचे ?
तुझ्या वयाच्या 10 वीच्या मुली शहरात किती आनंदात जगताहेत. भव्य एज्युकेशन मॉल्स मध्ये शिकताहेत. चकचकीत गाड्यातून क्लासला जाताना तितकीच चकचकीत स्वप्न बघताहेत.. वाढदिवस आणि नववर्ष पार्टी करून साजरे करताहेत. इ स्केवर च्या बेटावर जगाला विसराताहेत ..अशा पार्श्वभूमीवर तू कशी जगत होतीस ते सांग दिपाली ........
.घरात रोज बापाचा तणावग्रस्त चेहरा बघून तू कसा अभ्यास करीत असशील ? दहावीचे इतके महत्वाचे वर्ष असता
ना कुठल्याच सुविधा नसताना तथाकथित स्पर्धेच्या युगाचे हे सारं ओझं दारिद्रयाचे अपंगत्व घेवून तू पळत राहिलीस आणि ज्या क्षणी असह्य झालं तिथ तू पडून घेतलंस .. इतक्या दोन टोकाच्या दुनियेत जगणार्या मुलांना आम्ही एकच बोर्डाची परीक्षा ठेवून त्यांची स्पर्धा लावतो....
दिपाली तू गेलीस पण एकच काळजी वाटते ..तुझा मृत्यू हा शेतकर्याची आत्महत्या म्हणून घेतली जाईल का ?‘दोन लाख मिळतात म्हणून शेतकरी आत्महत्या करतो ‘असे ज्या देशात निर्लज्जपणे बोलले जाते तिथं तुझी आत्महत्या कशी चर्चिली जाईल ? कदाचित तुझ्या चारित्र्याच्या पंचनाम्यानेच सुरुवात केली जाईल ..गरिबाला का कुठे इज्जत असते ?त्यात पुन्हा तू कर्जबाजारी बापाची लेक.
तुझ्या मरणाने व्यवस्थेवर ओरखडाही उठणार नाही..पुढे होणार्या आणखी आत्महत्या तुझ्या आत्महत्येची न्यूजvalue कमी करून टाकतील.पण खर सांगू दिपाली, नव्या वर्षाचे स्वागत करताना माला फक्त तूच आठवत होतीस पोरी. नव्या वर्षाच्या उगवलेल्या पहाटेचा रक्तलालिमा मला फक्त तुझ्याच रक्ताने रंगलेला वाटला...तुझ्यासारखी असंख्य मरणे थांबवता न येणारे आम्ही बेशरमपणे जगतो आहे... दिपाली ,तुझ्या मरणाच्या खताने तरी आता तुझं ते नापीक शेत आता बहरेल का गं ....???
हेरंब कुलकर्णी
खुपच वास्तव चित्र डोळ्यासमोर उभे राहते. याचा अंत लवकर व्हावी ही ईच्छा.
उत्तर द्याहटवाParisthiti khup vidarak aahe!!!! He vachlyavar me svtaha kiti bhagyvan aahe yachi mala janiv zali
उत्तर द्याहटवा