कोकणातील मिठागारात
काम करणाऱ्या मजुरांच्या वेदना आणि विदर्भातील मिरच्या खुडणाऱ्या महिला यांचे कष्ट
रेखाटणारा प्रत्यक्ष भेट घेऊन लिहिलेला लेख सकाळ च्या सप्तरंग पुरवणीत प्रसिद्ध
झाला आहे.
मीठ --- मिरची
मीठ मिरची हा शब्द गरिबांच्या जगण्याशी जोडलेला
आहे. गरीब काही नसेल तेव्हा मीठ मिरची खातात किंवा मीठ मिरची घरात असतेच असे
गृहीतक असते. पण हे गरिबांचे मीठ आणि गरिबांची मिरची कशी बनते हे बघायला गेलो.
तेव्हा गरिबांची मीठ मिरची बनवणारे लोक ही गरीबच राहतात हे लक्षात आले.
मीठ बनवणारी मिठागरे
फोटोत खूप आकर्षक दिसतात. कधी रेल्वेतून जाताना बघितलेली मिठागरे मनात रुतून
राहिलेली. प्रत्यक्षात ती बघावी म्हणून मुंबईच्या विरार भाईंदर परिसरात गेलो.
भाईंदर रेल्वे स्टेशनपासूनच मिठागरे सुरु होतात. ती बघत बघत थेट उत्तनपर्यंत गेलो.
मीठ निर्मितीची प्रक्रिया सगळीकडे सारखीच. पण आता समुद्राचे पाणी आणि त्यातून मीठ
तयार होते हा गैरसमज दूर झाला. समुद्राचे पाणी किनाऱ्याजवळ खूपच प्रदूषित व अशुद्ध
असल्याने मीठ नीट बनत नाही. त्यामुळे जमिनीत बोअर घेवून त्याचे पाणी वापरावे
लागते. विजेचे बिल खूप येते पुन्हा मीठ बनवण्यासाठीचा कर द्यावा लागतो.
मिठागर मालकांशी बोलल्यावर लक्षात येते की
मिठाला खाद्य म्हणून मागणी असते एवढेच आपल्याला माहीत असते. पण प्रत्यक्षात उद्योग
व्यवसायात त्याला विशेष मागणी असते. चमडा उद्योग, बर्फ उद्योग, सोडा कागद उद्योग
यात मीठ वापरले जाते. महाराष्ट्रापेक्षा गुजराथमध्ये हा व्यवसाय खूप मोठा आहे. खरे
तर तामिळनाडू व गुजराथ सरकार सबसिडी देते आहे.
पावसाळा संपला की मिठाची खाचरे करण्याचे काम
सुरु होते. पेरणीसाठी वाफे करावेत तसे वाफे करून त्यातून पाणी फिरेल असे आळे केले
जातात. विजेची मोटार लाऊन पाणी वाफ्यात सोडले जाते. ते पाणी सूर्याच्या किरणाने
मीठ बनवायला लागते पण त्यासाठी सतत त्या वाफ्यात काठीने पाणी हलवावे लागते. जिथे
मीठ लवकर बनते ते काढून घेणे व जिथे हळूहळू बनते तिथे पाणी हलवणे व मीठ निघेल तिथे
पुन्हा पाणी सोडणे अशी कामे सुरु असतात. उन्हात मिठावर सूर्याची किरणे पडून अधिक
चटका बसतो. डोळे चमकून डोळ्याला इजा होऊ शकते त्यामुळे हे काम उन्हे वाढली की बंद
करावे लागते त्यामुळे पहाटे लवकर उठून ही
कामे केली जातात व दुपारी उन्हे उतरली की करावी लागतात. त्यामुळे पहाटे उठून मीठ काढणे
आणि गोणीत भरणे आणि ते वाहून सुरक्षित ठिकाणी साठवणे अशी कामे करावी लागतात. ही
कामे करताना कातडीला सतत मीठ लागून ती हुळहुळी होते. कातडीचे साल निघतात. नजर कमी
होते.
एका मिठागारात दुपारी कामे सुरु झाली
तेव्हा प्रत्यक्ष भरताना व वाहताना बघितले. जाड प्लास्टिकच्या टबमध्ये मीठ
लाकडाच्या पट्टीने भरले जाते आणि एका मजुराच्या डोक्यावर तो टब ठेवून तो पळत पळत
दूर असलेल्या ढिगाऱ्याकडे ते घेवून धावत जात होता. काही अंतरावर दुसरा मजूर होता
तो ते ओझे आपल्या डोक्यावर घेत होता आणि पुढे नेवून ओतत होता. मी तो भरलेला टब
उचलून बघितला तेव्हा तो माझ्याच्याने हलत सुद्धा नव्ह्ता. एका टबात किती मीठ असते
असे विचारले तेव्हा उत्तर मिळाले “ ४० किलो” ती ४० किलोची टोकरी घेवून ते मजूर पळत
होते पुन्हा मिठाचा ढिगारा आता उंच उंच जात होता त्यामुळे त्याला फळी लावून उंच
चढून जावे लागत होते. त्यामुळे ४० किलोचे ओझे घेवून चढताना दमछाक होत होती. इतक्या
साऱ्या कष्टाचे पैसे मिळत होते फक्त ७००० रुपये महिना म्हणजे २३० रुपये रोज. इतक्या
कष्टाची मजुरी खूपच अल्प आहे. ४० किलो ओझे घेवून किती चकरा होतात हे ते मजूर मोजत
नाहीत फक्त मीठ तयार झाले की ते सगळे संपेपर्यत ओझे वाहत राहायचे इतकेच सुरु असते.
घाम वाहत असतो. घामाची खारट चव या मिठागारातील कष्टानेच झाली असेल का ? असा प्रश्न
पडतो. मालकाला भेटलो. मजुरी का वाढवत नाही ? तो त्याच्या अडचणी सांगत होता. शहराला
लागून असलेल्या या जमिनी आहेत त्यातील २० एकर जमीन मिठागारा ऐवजी आम्ही बिल्डिगसाठी
वापरली तर करोडो रुपये मिळतील पण पूर्वज करीत होते म्हणून आम्ही हा व्यवसाय करतो
असे उत्तर देवून आपण उपकार कसे करतो आहेत हे सांगितले. फारतर ५००० टन मीठ बनते व
त्याचाही भाव १८०० पासून १००० पर्यंत खालीवर होत राहतो त्यामुळे हा व्यवसाय आता
परवडत नाही. तरीही आम्ही १०० रुपये overtime देतो असे सांगितले. पुन्हा मीठ एकदा
गोळा केले की ते गोण्यात भरून ठेवावे लागते.त्याचे एक गोनी भरण्याचे ४ रुपये
मिळतात. पैशाच्या आशेने मजूर कितीही थकले तरीही गोण्या भरत राहतात.
या मिठाच्या
संदर्भात केंद्र सरकारचा विभाग आहे. त्यांच्या कार्यालयात गेलो. सेस जमा करणे आणि
बनवलेले मीठ प्रयोगशाळेत पाठवणे अशा प्रकारचे काम केले जाते. त्या अधिकाऱ्याला
कामगारांना सुविधा मिळाल्या पाहिजेत किमान मजुरी मिळाली पाहिजे त्यांना उन्हात काम
करावे लागते असे बोललो तेव्हा निर्लज्जपणे तो मला तत्वज्ञान ऐकवत होता. सुख हे
मानण्यावर असते,सुख ही मानसिक स्थिती आहे म्हणाला. मी सहज वर बघितले तर दोन
कर्मचारी असलेल्या त्या कार्यालयात डोक्यावर ६ fan फिरत होते आणि ते उन्हात काम
करणाऱ्या मजुरांना तत्वज्ञान सांगत होता .मालकांच्या दबावाखाली हे कार्यालय काम
करते हे लगेच लक्षात आले. मजूर जिथे राहतात त्या झोपड्यात गेलो. पहाटेच्या श्रमाने
थकून दुपारी ते विश्रांती घेत होते. सगळे मजूर गुजरातवरून आलेले. मी महिन्याच्या
कडक उन्हात पत्राच्या खोल्यात भाजून निघत होते. भात आणि भाजी स्वयंपाक केलेला
होता.या कामातील कष्टाबद्दल तक्रार नव्हती उलट सलग काम मिळते म्हणून समाधानी होते....त्यांच्या
त्या समाधानाने मला अधिकच असमाधानी केलं
-------------------------------------------------------------------------------------
मिठाच्या या कहाणीसारखीच तिखट कहाणी मिरच्यांची
आहे. गरीबाच्या जेवणात असलेली लाल मिरची बाजारात येताना गरिबालाच रडवते. विदर्भात
नागपूर जिल्ह्यात व भंडारा जिल्ह्यात फिरताना अनेक ठिकाणी लाल मिरची खुडण्याचे काम
सुरु दिसले. आंध्र प्रदेशातले ठेकेदार आंध्र आणि विदर्भातील लाल मोठी मिरची शेतकऱ्याकडून
खरेदी करतात आणि त्याचे देठ काढून व्यापाऱ्याला विकतात. व्यापारी ती मिरची
चांगल्या प्रतीची परदेशात विकतात व इतर मिरची देशात विकतात. शेतात घेतलेली किंमत
पुढे वाढत वाढत जाते.अशा मिरचीचे देठ खुडण्याचे काम ठिकठीकाणी दिले जाते. पूर्वी
नागपूर जिल्ह्यात अशी कामे बघितली होती.यावेळी भंडारा जिल्ह्यात ही कामे बघायचे होते.
एका वस्तीत पोत्याचा
निवारा केलेला आणि त्याखाली ५० महिला पुरुष बसलेले, समोर मिरचीचे ढीग केलेले. जवळ
जाऊन त्या मजुरांशी बोललो. आमच्याशी बोलण्यातही ते फार वेळ दवडत नव्हते. प्रत्येक
मिरची हातात घेवून त्याचा देठ वेगळा करत होते. एक किलो मिरची खुडल्यावर त्यांना ६
रुपये मिळत होते. एक किलो मिरची म्हणजे ४०० नग. म्हणजे एक मिरची खुडण्याची मजुरी
फक्त ६ पैसे. धक्का बसला. आणि ते सारे मजूर रोजची मजुरी किमान १०० रुपयांच्या पुढे
जावी म्हणून या महिला पुरुष किमान २० किलो मिरची खुडतात म्हणजे कशीबशी मजुरी १२०
रुपये मिळते. मी हिशोब केला की ८००० मिरच्यांचे देठ तुम्ही वेगळे कराल तेव्हा
तुम्हाला १२० रुपये मिळतील. इतक्या मिरच्या खुडायला किमान १० तास लागतात. सकाळी लवकर
या महिला पुरुष येतात आणि काम सुरु करतात. सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंत १२ तास
हे काम सुरु असते. सणाचे अगदी महत्वाचे दिवस सोडले तर वर्षभर महिला येतात. काम
सुरु असताना चहा प्यायला पाणी प्यायला सुद्धा लवकर कोणी उठत नाही कारण त्यांना
तितके तास काम पूर्ण करायचे असत. पुन्हा हे काम वेगाने व्हावे म्हणून दोन पायावर
बसून काहीजण काम करतात त्यातून पाठीला रग लागते. आम्ही फिरलो तो काळ कडक
उन्हाळ्याचा होता. पंखा नसलेल्या त्या खुराड्यात ठसका उठला होता.मिरची नरम व्हावी
म्हणून त्यावर सारखे पाणी मारले जाते. त्यामुळे खुडायला सोपे जाते. हाताला सारखा
घाम येत होता.एक महिला म्हणाली की हाताच्या आलेल्या घामात तिखटाचे ते कण जातात व
दिवस रात्र हाताची लाही लाही होते. घरी जाऊन आंघोळ केली तरीसुद्धा अंगाचा तिखटपणा
जात नाही. आग आंग होत राहते. काही महिला आग होऊ नये म्हणून हाताला माती लावतात.महिलांचे
हात बघितले तेव्हा त्यांचे तळहात राठ
झालेले होते आणि काळपट पडलेले होते. भंडारा जिल्ह्यांत हे काम करताना अनेक
म्हातारी माणसे दिसली तेव्हा विदारक वास्तव कळाले. घरात म्हातारी माणसे रिकामी बसण्यापेक्षा
त्यांना मुलगे सुना त्यांना इथे पाठवतात तेवढेच कुटुंबाला रोजचे १०० रुपये मिळतात.
रडत खडत बिचारी म्हातारी माणसे मिरच्या खुडत होती. सरस्वतीबाई नावाची एक ८०
वर्षाची महिला एकटीच कोपऱ्यात बसून मिरची खुडत होती. मुलगा सून यापासून ती वेगळी
राहत होती. तिला नात्यातले कोणी विचारत नव्हते. ती जसे जमेल तसे एकटीच मिरची खुडत
होती. तिला नीट दिसत नव्हते की कामही होत नव्हते.एका मांडवात पती पत्नी होते. ते
एकत्र काम करीत होते. काहींनी हाताला प्लास्टिक कागद बांधले होते. हे सारे बघितल्यावर आपण तक्रार करू असे मजुरांना
आम्ही म्हणालो. तेव्हा ते मजुर तक्रार करू नका अशी गयावया करू लागले. त्या मजुरांचा
खूप राग आला. मी संतापून म्हणालो “तुम्ही तक्रार केली नाही तर मग तुम्ही हे सहन
करण्याच्याच योग्यतेचे आहात “तक्रार केली तर मालक हे काम आमच्या गावातून काढून नेईल
आणि दुसर्या गावात काम जाईल असे ते म्हणत होते. शेतात उन्हात राबण्यापेक्षा
त्यांना सावलीतली ही वेदना सुसह्य वाटत होती आणि हे काम रोज मिळते हे जास्त
महत्वाचे वाटत होते. मी त्या मजुरांना ही मिरची पुढे कुठे जाते ? आणि मालक त्याचे
किती पैसे मिळवतो हे सांगू लागलो तेव्हा त्यांना त्यातले काहीच माहीत नव्हते की
त्याविषयीची उत्सुकता ही नव्हती. काहीठिकाणी आता मजुरी ८ रुपये झाली आहे. पण ती १०
रुपये जरी झाली तरीसुद्धा ४०० मिरच्या खुडायच्या तुलनेत अत्यल्प आहे पण हातातले
काम जाईल म्हणून कामगार गप्प राहतात.
अंगाला मीठ लागून
लागून पायाचे हाताचे सालपट निघणारे मुंबई जवळचे मिठागारातील मजूर असतील नाहीतर विदर्भातील
मिरच्या खुडून हाताची तिखटाने लाही लाही होणारे मजूर असतील...वेदना सहन करत
राहतात. हातचे काम जाईल म्हणून संघर्ष करीत नाहीत. किमान वेतन व मानवी सुविधाही
त्यामुळे मिळत नाहीत. दूरवर पसरलेल्या या असंघटीत वर्गाला कामाच्या ठिकाणी किमान
मानवी जगणे कसे मिळवून द्यायचे हाच खरा प्रश्न आहे. गरीब माणसाच्या घरात येणारी
मीठ मिरची ही दुसऱ्या गरिबांच्या शोषणातूनच येते. मीठ आणि मिरची
पुढे उद्योगांना विकताना खूप महाग होत जाते पण त्यात काम करणाऱ्या स्वस्त मजुरांना
गरीब ठेवूनच
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
हेरंब कुलकर्णी herambkulkarni1971@gmail.com फोन ८२०८५८९१९५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा