शिक्षक दिनाला जे.पी.नाईक यांचे स्मरण व्हावे (हेरंब कुलकर्णी)

                                                  शिक्षक दिनाला जे.पी.नाईक यांचे स्मरण व्हावे  



५ सप्टेंबर हा जे .पी. नाईक यांचा जन्मदिवस असतो. पण राधाकृष्णन यांचे स्मरण होताना जे पी नाईक यांची कोणीसुद्धा आठवण काढत नाही. युनेस्को'ने गेल्या २५०० वर्षांतील जगातल्या शंभर शिक्षणतज्ज्ञांची यादी प्रसिद्ध केली, त्या यादीत भारतातील केवळ तीन शिक्षणतज्ज्ञांची नावे आहेत. त्यांपैकी एक महात्मा गांधी, दुसरे रवींद्रनाथ टागोर आणि तिसरे नाव जे. पी. नाईक यांचे आहे! या कीर्तीचीदेखील फारशी माहिती महाराष्ट्रला नसते. युनेस्कोने त्यांना आशिया खंडातील प्राथमिक शिक्षण-प्रसाराची योजना तयार करण्याची विनंती केली, कराची येथे आशियायी राष्ट्रांच्या परिषदेत त्यांनी सार्वत्रिकीकरणाची विविधांगी योजना मांडली, 'कोठारी आयोगा'सारखा गाजलेला अहवाल नाईकांनी लिहिला हे फार थोडय़ांना माहीत आहे? आजची 'अंगणवाडी योजना' ही नाईकांच्या अहवालामुळे सार्वत्रिक झाली.

भारतात प्राथमिक शिक्षणाच्या सांख्यिकी नियोजनाचा आणि त्याच्याशी जुळणाऱ्या प्रशासकीय व अर्थसाहाय्याच्या योजना तयार करण्याचा पाया नाईकांनी घातला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयात त्यांनी केलेले काम अतुलनीय आहे. समाजविज्ञान संशोधन परिषदेला गती देऊन त्यांनी शिक्षण, आरोग्य व शेती या भारतीय पुनर्निर्माणासाठी कळीच्या कार्यक्षेत्रांना प्राधान्य दिले.

असे अकांचन आणि साधेपणाने काम करणे ही काय नाईकांची चूक होती की काय म्हणून या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मराठी माणसाला महाराष्ट्र आज विसरला? किमान या वर्षीच्या पाच सप्टेंबरला शिक्षक दिनाला तरी त्यांचा जन्मदिवस असतो हे लक्षात घेऊन प्रत्येक शाळा व शासकीय स्तरावर तरी नाईकांनाही अभिवादन केले जावे. आज मोठय़ा प्रमाणात झालेले शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण या माणसाच्या खांद्यावर उभे आहे हे आपण विसरता कामा नये


 (हेरंब कुलकर्णी)

टिप्पण्या

  1. नाईक साहेबांचे स्मरण तर व्हायलाच हवे. परंतु लेखातील एका संदर्भात सुधारणा व्हायला हवी. UNESCO घ्या यादीत आणखी तीन भारतीय चिंतक आहेत श्री अरविंद​, जे.कृष्णमुर्ती आणि स्वामी विवेकानंद. http://www.ibe.unesco.org/en/document/thinkers-education या लिंकवर सर्व सूची व लेख पाहता येतील. अर्थात अशा सूचीला अनेक मर्यादा असतात....या सूची पलिकडे अनेक शिक्षक , चिंतक असणारच... त्यांच्या पुढे ही विनयशील होण्यात आत्महित पाहायला काय हरकत आहे ? (UNESCO ची ही नसेल !)

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा