हवाई फवारणी करण्यापेक्षा ठिबक सिंचन महत्वाचे ...!!! स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यासमोर झालेले भाषण



               हवाई फवारणी करण्यापेक्षा ठिबक सिंचन महत्वाचे ...!!! 


स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यासमोर झालेले भाषण 
     स्पर्धा परीक्षेची बहुतेक केंद्र शहरी भागात असताना इतक्या लहान गावात १७ वर्षे हे केंद्र सुरू आहे व ३०० अधिकारी झाले आहेत हे अविश्वसनीय वाटावे इतके लखलखीत यश आहे.आजसुद्धा समोर बसलेल्या २०० विद्यार्थ्यात निमम्या मुली आहेत.ग्रामीण मुलींना स्पर्धा परीक्षेत करियर करावेसे वाटते हे सुद्धा खूप सुखद आहे
                                  खरे तर शिक्षणात काम करणार्‍या माझ्यासारख्या माणसाला या स्पर्धा परीक्षेला बसणार्‍या मुला मुलींना शुभकामना देण्यासाठी का बोलावले असेल असा प्रश्न मला पडला.पण महाविद्यालयात असताना जसे प्रत्येक जण एकतर्फी किंवा दुतर्फी प्रेमात पडलेला च असतो तसेच त्या दिवसात एकदा तरी कोणती तरी स्पर्धा परिक्षाही दिलेली असते. स्टाफ फिक्सेशन ची अशी एक परीक्षा मी ही दिली होती आणि आपण नेमके या उत्तरावर का खुणा करतो आहोत हे शेवटपर्यंत समजले नाही.आपल्याला खूप माहिती आहे या अहंकाराचा फुगा फोडून मी बाहेर आलो .परत त्या वाटेला गेलो नाही.तेव्हा स्पर्धा परिक्षाकडून प्रेमभंग झालेल्यांचा प्रतींनिधी म्हणून बहुधा मला इथे बोलावले असावे...!!!
                               स्पर्धा परीक्षा ज्यांना जमत नाहीत ते कोल्हयाला द्राक्षे आंबट या थाटात या परीक्षांविषयी नकारार्थी बोलत राहतात.मला आठवते की महाविद्यालयात असताना मी ही माझ्या एका मित्राला पत्र लिहिले होते व मला नोकरीतल्या अधिकाराचे पैशाचे आकर्षण नाही असे लिहिले होते .ती एक वैराग्याची झिंग असते पण आज शिक्षक झालो त्यात नक्कीच ध्येयवाद असला तरीसुद्धा एक मर्यादाही जाणवते की आपल्यासारखी माणसे लिहू शकतात .अगदी शिक्षण मंत्र्यांना काही सांगू शकतात पण शेजारच्या वर्गातील शिक्षकाला ही काही सांगू शकण्याचे अधिकार आपल्याला नाहीत अशावेळी प्रबोधंनाच्या या मर्यादाही जाणवतात .अशावेळी किमान अधिकारी होऊन एका जिल्ह्याला तरी दिशा देवू शकलो असतो असेही मला आज वाटून जाते. आज आम्ही गावोगावी व्याख्याने देत फिरतो.दिसेल त्या विषयावर लिहितो पण एका क्षणी लक्षात येते की इतके करून हातात काही उरत नाही .आपण ही हवाई फवारणी करण्यापेक्षा एकाच ठिकाणी ठिबक सिंचन करायला हवे होते असे वाटून जाते.अधिकारी होण्यात हे ठिबक सिंचन करण्याची खूप मोठी संधि आहे.जगातल्या खूप मोठ्या प्रश्नांना हात घालण्यापेक्षा समोरच्या दिसणार्‍या प्रश्नांना भिडण्याची व ते सोडविण्याची संधी व त्यातून मिळणारे समाधान खूप मोठे आहे .हातात अधिकार नसताना केलेल्या प्रबोधनाला ही खूप मर्यादा असतात तेव्हा एका मर्यादित क्षेत्रात केलेले अमर्याद काम करण्याची ही संधी मला खूप महत्वाची वाटते
                   तेव्हा लेखक कवि पत्रकार होण्याचे त्याला जास्त ग्लॅमर असल्याने ते करियर करावे की अधिकारी व्हावे असे द्वंद्व मनात अनेकांच्या येईल पण समाजमान्यता लेखक कवीला जास्त असेल पण म्हणून अधिकारी होण्याला कमी समजण्याचे कारण नाही. एक अधिकारी होऊन काही प्रश्न सोडविण्यात सुद्धा एक निर्मिती असते.समाधान असते. एखाद्या आयुष्याला आपल्या धोरणातून न्याय देणे हे एखाद्या कवितेपेक्षा नक्कीच कमी नसते
                अधिकारी वर्गाशी बोलताना मला आणखी एक न्युंनगंड जाणवतो की त्यांना सामाजिक कार्यकर्त्यांचे खूप आकर्षण असते व सामाजिक संस्थांचे सरकारपेक्षा जास्त कौतुक असते.त्या न्युंनगंडातून ते सामाजिक संस्थांना जास्त झुकते माप देतात आणि कधीकधी स्वत: राजीनामा देऊन सामाजिक संस्था सुरू करतात पण याबाबत ही अधिकारी होताना एक स्पष्टता आवश्यक आहे म्हणजे न्युंनगंड येणार नाही.शासकीय यंत्रणेविषयी माझे अर्थातच वाईट मत आहे .मी तर थेट ग्राहकांच्या हातात व्हाउचर द्यावेत या मताचा पुरस्कार करणारा आहे पण तरी हे मोकळेपणाने मान्य केले पाहिजे की या देशात सरकार नावाच्या सामाजिक संस्थेने जितके प्रचंड काम केले तितके काम कोणतीच सामाजिक संस्था करू शकली नाही . मी शालाबाह्य मुलांविषयी अभ्यास करतो पण शाळा शिक्षक यांच्यावर कितीही टिकात्मक बोलताना माझ्या पुस्तकात व लेखनात मी अनेकदा मांडतो की शाळांनी जितकी मुले दाखल केली तितकी मुले कोणतीच एनजीओ दाखल करू शकली नाही . शालाबाह्य मुले दाखल केल्यावर त्याच्यासाठी एक ब्रिज कोर्स असतो .गडचिरोली जिल्ह्यात अशा ३२ शाळातून २००६ साली ७०० मुले मी बघितली होती . यवतमाळ जिल्ह्यात तर एक वेठबिगार म्हणून बापाने मालकाकडे ठेवलेला मुलगा शिक्षकांनी सोडवून आणलेला  मी या  शाळेत बघितला तेव्हा शहारलो होतो. सरकारी यंत्रणेतून हे खूप शांतपणे होते पण त्याचे कुठेही कौतुक होत नाही पण एका एनजीओ ने जर असा मुलगा सोडविला असता तर केवढा गाजावाजा झाला असता. तीच गोष्ट आरोग्याची आहे देवीचा रोगी किंवा पोलिओ मोहीम या देशव्यापी मोहिमा केवळ सरकार नावाची एक अजत्स्त्र यंत्रणा च घडवू शकली .एनजीओ चा रोल केवळ फोटो पुरताच पूरक राहिला. पण आपली माध्यमे आपले मंत्री एनजीओ च्या सामाजिक कामाचे जितके कौतुक करतात तितके सरकारी यंत्रणेचे कधीही करत नाहीत .त्यातून तरुण वयात अधिकारी होण्यापेक्षा आपण सामाजिक कार्यकर्ते व्हावे असेच वाटायला लागते पण ही स्पष्टता  असेल तर हा भ्रम होणार नाही व अधिकारी होण्याकडे च कल राहील .शेवटी जीवनसत्वे ही जेवणातूनच मिळाली पाहिजे आणि जर ती मिळाली नाही तर ती औषधातून द्यावी लागतात.त्याचप्रमाणे सरकारी यंत्रणा हाच प्रश्न सोडवायचा मुख्य प्रवाह आहे .तो जिथे प्रभावी काम करत नाही त्या स्पेसमध्ये एनजीओ काम करतात.तेव्हा मुख्य प्रवाहात काम करण्याची जास्त गरज आहे. एनजीओ हा सरकारला पर्याय होऊ शकत नाही.आणि आपल्या एनजीओ सुद्धा सरकारी यंत्रणा सुधारण्यापेक्षा सरकारला पर्याय बनण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात .एखाद्या जिल्ह्यातील सरकारी दवाखाने चांगले चालावेत यासाठी दबावगट निर्माण करण्यापेक्षा स्वत :चे रुग्णालय काढणे त्यांना महत्वाचे वाटते.
                  अधिकारी झाल्यावर सामाजिक बांधिलकी जपता येईल का? हा आजचा विषय आहे.माझी चिंता ही आहे की मागच्या पिढीत जी गरिबांविषयी जी कणव अनेकात असायची ती आज वेगाने कमी होते आहे.मागच्या पिढ्यांपूर्वी अनेकांनी उपाशी राहण्याचा अनुभव घेतला होता .गावातील सर्वांचे एकूण उत्पन्न जवळपास सारखेच असायचे. त्यामुळे गरीब नसणार्‍यांनाही गरिबांचे भावविश्व परिचित असायचे. माझ्या पिढीत नागरीकरण खूप वेगाने वाढले.एकाच गावात भारत आणि इंडिया स्पष्टपणे जाणवायला लागले आणि ऐपतीप्रमाणे शाळा ही वेगळ्या झाल्या.त्यापेक्षा ही शहरी भागात तर मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय जीवनशैलीत तर ही गरीबी ही  अनुभवणे दूरच दिसायलाही तयार नाही .पुन्हा जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात प्रत्यक्षात गरीबी हटली नसेल पण ती माध्यमातून मंनोरंजनातून नक्कीच हातळी आहे . पूर्वी चित्रपटाचा नाईक हा झोपडपट्टीत ला असायचा .अमिताभ ते राजकपूर या नाहीरे वर्गाला आपला प्रतींनिधी वाटायचा.ते सारे आज बावळटपणा या सदरात वाटावे इतक्या वेगाने हे सारे बदलले .मुलांचे भावविश्व एक करायला कॉमन स्कूल करावेत की व्हाउचर पद्धती आणावी यावर वाद होऊ शकतील पण ते नसण्याचा एक परिणाम हा होतो आहे की नवी पिढी भावनिक दृष्ट्या कुपोषित होते आहे. त्यांच्या कल्पनेकडील एक जग त्यांच्या भावविश्वात येतच नाही.भगवान बुद्धाच्या वडिलांनी जसे कोणतेच दु:ख आपल्या मुलाच्या दृष्टीस पडू नये असा प्रयत्न केला तोच प्रयत्न आज सगळे पालक करत आहेत.हे वंचितांचे जग आपल्या मुलांना माहीत व्हावे असा जाणीवपूर्वक प्रयत्न ही ते करत नाहीत. हे मी अशासाठी सांगतो आहे की हीच मुले नंतर सरकारी अधिकारी होतात आणि त्यांच्या विकासाच्या कल्पना त्याच उच्च मध्यमवर्गीय जगातल्या असतात .गुळगुळीत रस्ते बनविणे म्हणजे विकास.शहरातील घाणेरड्या झोपड्या हटवा.फेरीवाल्यांना हाकला.रहदारीचा प्रश्न जीवनमरणाचा मानणे हे सारे अजेंडा हे अधिकारी रेटत राहतात.अंनधिकृत झोपडपट्टीतील अगतिकता आदिवासींचे अतिक्रमण या बेकायदेशीरतेमागची  नैतिकता ते समजू शकत नाहीत.तेव्हा या अधिकारीवर्गाच्या भावविश्वात ही कणव कशी संक्रमित करता येईल ही मला सर्वात मोठी समस्या वाटते.
तेव्हा अधिकारी वर्गाला सामाजिक विषयांवर संवेदनशील कसे बनवायचे हीच मोठी समस्या वाटते.बालकामगार हा विषय घेऊन जेव्हा जेव्हा पोलिस अधिकार्‍यांकडे मी जातो तेव्हा ते पारंपारिक पद्धतीने प्रतिवाद करतात .एक अधिकारी म्हणाला की तुम्ही मुलांना कामावरून काढाल तर ते चोर होतील..त्याचे पालक उपाशी राहतील. हे सारे ते प्रश्न च मुळातून माहीत नसल्याने होते
             म्हणून अधिकारी होणार्‍या माझ्या या तरुण मित्रांना मला हे सांगायचे आहे की स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाचण्याइतकेच महत्वाचे ही मनोभूमिका तयार करणे हे ही तितकेच महत्वाचे आहे. मान्य आहे की हे जगणे तुमच्या माझ्या वाट्याला आले नाही पण अशा प्रकारच्या जगण्याचे वर्णन असलेल्या पुस्तकांच्या वाचनाने आपण या जगाशी जोडले जाऊ शकतो.सुदैवाने मराठीत अशाप्रकारचे खूप साहित्य उपलब्ध आहे. अनिल अवचट यांनी मराठी मध्यमवर्गाच्या सुखासिन जगण्याला या भयावह वास्तवाची दाहकता लक्षात आणून दिली हे त्यांचे खूप मोठे योगदान आहे.त्याचप्रमाणे सर्व दलित आदिवासी व भटके विमुक्त लेखकांची आत्मकथन ही मुळातून वाचली तरीसुद्धा त्या विश्वाशी आपला परिचय होतो. शालाबाह्य मुलांचे भावविश्व रेखाटणारी महिलांची वेदना रेखाटणारी पुस्तके  वाचायला हवी.. पी साईनाथ यांच्या दुष्काळ आवडे सर्वांनाया पुस्तकाने माझ्यासारख्या लाखो लोकांच्या जाणिवा तीव्र केल्या.जगण्यात एक कायमचा अपराधीपणा निर्माण केला..आपल्या सुखासिन जगण्याच्या कल्पना या माणसांच्या शोषित जगण्याच्या पार्श्वभूमीवर आपण तपासून घ्यायला लागलो ,या पुस्तकात इतकी दाहक वर्णने आहेत की या माणसांविषयी आपण काहीच करू शकत नाही एवढ्या एकाच जाणिवेने आपण खचून जातो .नारळाच्या झाडावर हजारो फुटांची चढ उतार करणारे नारळ काढणारे लोक ,सायकलवर दगडी कोळसा विकणारे बिहारमधील मजूर ,लाकडी मोळ्या विकण्यासाठी कित्येक किलोमीटरच्या पायपीट करणार्‍या मध्यप्रदेशाच्या बायका हे सारं आपण आपल्या सुखासीन जीवनाशी ताडून बघताना लाज वाटू लागते. अशा जाणिवा विकसित झालेला अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात या संवेदनेतून काम करू शकतो
           स्पर्धा परीक्षेत भाग घेणार्‍या विद्यार्थ्यांना आता केवळ पोपटपंची करून चालत नाही तर लेखी पेपर आणि मुलाखतीत आकलन तपासले जाते. तुम्ही ज्या परिसरात राहता त्या परिसरावर प्रश्न विचारले जातात.अशावेळी  आपल्या परिसरात जावून गरीबी प्रत्यक्ष वाचायला हवी. गरीबी पुस्तकात वाचण्यापेक्षा आपण ती गरिबाच्या नजरेत वाचली पाहिजे .आपल्या परिसरात येणारे ऊसतोडणी कामगार वीट भट्टी मजूर हे कसे जगतात हे प्रत्यक्ष जावून बघायला हवे. गरिबांच्या वस्तीला भेट देणे आणि एखाद्या धबधब्याला भेट देणे हे सारखेच असते. धबधब्याखाली जसे ओले होण्यापासून तुमचा बचाव करू शकत नाही  तसे या वस्तीला भेट दिल्यावर तुमच्या मध्यमवर्गीय जाणिवांचा तुम्ही बचाव नाही करू शकत .भावविश्वावर खोलवर परिणाम होतात आणि तुमच्या सर्व कृतीतून ते पाझरतात. गांधी जेव्हा असं म्हणतात की कोणताही निर्णय घेताना तुम्ही आजपर्यंत बघितलेल्या सर्वात दीन माणसाचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि माझ्या या निर्णयाचा यांना काही लाभ होणार आहे का ?या निकषावर काम करणे यात गांधींना हेच अभिप्रेत आहे
         अधिकारी झाल्यावर साधेपणाने राहणे हेसुद्धा पुन्हा या वंचित वर्गाच्या बांधिलकीशीच जोडलेले मूल्य आहे गांधींचा एकदा रुमाल हरवल्यावर ते दूसरा रुमाल घ्यायला तयार नव्हते .याचे कारण तो पैसा गरीब जनतेचा आहे .त्याचा कसाही वापर मी नाही करू शकत नाही ही त्यांची भावना होती. साधेपणा हे मूल्य केवळ उपदेशातून येत नाही तर हा नाही रे चा परीघ त्याला असावा लागतो.मला दिल्लीत परदेशी पाहुणे आल्यावर किंवा सर्वच समारंभात जी उधळपट्टी चालते ती बघितल्यावर त्या खर्चापेक्षा त्या अधिकार्‍यात आपण हे सारे कोणत्या माणसांचे प्रतींनिधी म्हणून करतो आहोत ही जाणीव त्यात नसते हे जास्त अस्वस्थ करते. मुशर्रफ भारतात आले तेव्हा जेवणासाठी केलेल्या ११० पदार्थांची वर्णने मला अजूनही आठवतात.हे सारे तुम्ही भुकेकंगाल देशात करता याची कोणतीही अपराधीभावना नसते.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रांच्या शपथविधीचा खर्च ९९ लाख असतो .त्यावर रेष सुद्धा उमटत नाही हे मला जास्त अस्वस्थ करते
             सरकारी अधिकारी आणि राजकीय दडपण यावर ही एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला आहे. मला वाटते की आपला आत्मसन्मान जपणे हे सर्वात महत्वाचे आहे.सिकंदराने पुरू राजाला युद्धात हरवल्यावर त्याला बांधून सिकंदरापुढे आणले.तेव्हा सिकंदर त्याला विचारतो की मी तुला कसे वागवू सांग ?तेव्हा तो म्हणतो की एक राजा दुसर्‍या राजाला जसे वागविल तसेच मला वागव. हा आत्मसन्मान आपण जपायला हवा .तुम्ही एकदा झुकायला सुरुवात केली की मग त्या झुकण्याला शेवटचं राहत नाही.
          राजकीय दडपणात काम करावे लागते हे मान्यच आहे पण दडपण सुरू होण्याच्या मर्यादेपर्यंत तरी काम करायला काय हरकत आहे ?गायीच्या गळ्यात ५० फुट दोरी बांधून तिला चरायला सोडले आहे.ती ५१ फुटापर्यंत चरायला गेली की तिच्या गळ्याला हिसका बसणार पण मग ४९ फुट चालायला काय हरकत आहे ?त्या मर्यादेत ही  करण्यासारखे खूप असते पण ५० फुटावर हिसका बसेल म्हणून १ फुट ही न चालणारे च अधिकारी जास्त आहेत .उलट जास्त आत्मसन्मान ठेवणार्‍यांवर राजकीय दडपण येत नाही असेच अनुभव जास्त आहे
          नेताजी च्या नावाने चालणार्‍या या अकादमीत आमच्यासारख्या अनेकांची व्याख्याने स्पर्धा परीक्षेतील मुलासाठी ठेवली जातात .या सर्वाचा शेवटी हेतु काय ?मला माझे शिक्षक दो आखे बारह हाथ या जुन्या चित्रपटातील एक गोष्ट सांगायचे .एक जेलर ६ कैद्यांना सुधारतो.ते कैदी सुधारतात.हिंसा सोडून शेती करतात.दरम्यान तो जेलर मरून जातो.कैदी बाजारात भाजी विकायला बसतात.गावकरी त्यांना चोर समजून मारायला लागतात .ते खूप मार खातात.शांत राहतात .पण एकाक्षणी ते बिथरतात.ते प्रतिकार करणार तितक्यात त्यांना आकाशात आपल्या त्या जेलरचे त्यांच्याकडे बघत असलेले डोळे दिसतात आणि ते थबकतात.माझे शिक्षक विचारायचे की समजा त्या कैद्यांना ते दोन डोळे दिसले नसते तर सगळा बाजार त्या कैद्यांनी रक्ताने माखला असता.. थोडे थांबून माझे शिक्षक म्हणायचे की असे आपल्या आयुष्यात कोणते तरी दोन डोळे असले पाहिजेत की मोहाच्या क्षणी आपल्यावर रोखले जातील .... या अकादमीत अशी वेगवेगळी होणारी व्याख्याने तुम्ही अधिकारी झाल्यावर मोहाच्या क्षणी तुमच्यासाठी “बाबाजी की दो आखे म्हणून काम करो हीच सदिच्छा देवून थांबतो         
                                                                     
                                                                       हेरंब कुलकर्णी
                                        महालक्ष्मी मंदिराजवळ मुपो ता अकोले जि अहमदनगर ४२२६०१
                                                                     फोन ९२७०९४७९७१
                                                     ईमेल herambkulkarni1971@gmail.com
        


----------------------------------------------------------------------------------------------------------------------

  सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील ग्रामीण भागात नेताजी स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीत नव्याने स्पर्धा परीक्षा देणार्‍या बॅच चा शुभारंभ हेरंब कुलकर्णी यांच्या हस्ते झाला. तेव्हा नोकरीत राहून सामाजिक बांधिलकी जपता येईल का ?’या विषयावर व्याख्यान झाले.त्याचा हा सारांश.प्रा अनिल फाळके यांच्या या ग्रामीण केंद्रात आजपर्यंत ३०० पेक्षा जास्त विद्यार्थी प्रथम व द्वितीय दर्जाच्या अधिकारी  झाले आहेत .या व्याख्यानाला प्रसिद्ध कथालेखक बाबासाहेब परीट उपस्थित होते
                                                                               

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा