चिपळूणकर सर अधिकारी की समाजशिक्षक ? +(प्रथम स्मृतीदिन)


                 चिपळूणकर सर अधिकारी की समाजशिक्षक ?  
     

  माजी पंतप्रधान नरसिंहराव आणि राज्यातील अनेक माजी मुख्यमंत्री ज्यांना आदर देत होते असा एक शिक्षक या महाराष्ट्रात होता. शिक्षक ह्रदयाचा अधिकारी.   महाराष्ट्रातील आज गती घेतलेल्या शिक्षणाला ज्यांनी वळण दिले त्यातील प्रमुख नाव सरांचे आहे. अनेकांना संचालक म्हणजे चिपळूणकर असेच आजही वाटते. त्या काळात आजच्यासारखे प्रत्येक विभागाला संचालक नव्हते, सचिवमहात्म्य इतके वाढले नव्हते.त्यामुळे शिक्षणमंत्र्यांखालोखाल शिक्षण संचालकच सर्व निर्णय घेत. आज अधिकारी सामान्य शिक्षक विद्यार्थ्यांना माहित नाहीत कारण भेटी खूप कमी होतात. सर त्याकाळात दुर्गम असलेल्या महाराष्ट्रात गावोगाव फिरले.अनेक खेड्यात रात्री मुक्काम केला. रात्री पारावर पालकसभा घेवून शिक्षणाचे महत्व निरक्षर पालकांना समजावून सांगितले.ही तळमळ होती. डहाणू तालुक्यातील ग्राममंगल संस्थेने काढलेल्या बालवाड्या बघायला डोक्यावर टॉवेल गुंडाळून ते पानसे सरांसोबत पायी डोंगरात फिरले. हा माणूस अधिकारी होता की समाजसेवक असा प्रश्न पडतो.
         दहा वर्षाच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय दूरगामी परिणाम करणारे ठरले.ग्रामीण भागातील गुणवत्ता शोधणारी विद्यानिकेतन त्यांनी व मधुकरराव चौधरीसोबत स्थापन केली. त्यातील बुद्धिमान मुले ही त्या घरातली शिकणारी पहिली पिढी होती.त्यातून शिकलेली मुले पुढे जीवनाच्या किती क्षेत्रात पुढे आली हा खरेच सर्वेक्षण करण्याचा कौतुकाचा विषय आहे.विद्यानिकेतनच्या धर्तीवर  जवाहर नवोदय योजना ही नंतर खूप  वर्षांनी आली हे या योजनेचे द्रष्टेपण होते.
              ‘वंचितांचे शिक्षण’ हा त्यांच्या आस्थेचा विषय होता. जे. पी. नाईक यांनी शालाबाह्य मुलांसाठी अनौपचारिक शिक्षणाची कल्पना मांडली. त्या कल्पनेची प्रभावी अंमलबजावणी सरांनी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रभावीपणे केली. त्यातून हजारो मुले मुख्य प्रवाहात आली. मुलींच्या शिक्षणाला गती देण्यासाठी सावित्रीबाई फुले याच प्रेरणादायी असू शकतात हे ओळखून त्यांनी नायगावला सावित्रीबाई जन्मदिन कार्यक्रम तर सुरु केलाच पण गरीब कुटुंबातील मुलीना आर्थिक मदत देणारी सावित्रीबाई फुले दत्तक योजना सुरु केली.ज्यातून हजारो मुली शिकल्या. रात्रशाळा बंद करण्याचा प्रयत्न होताच ते आक्रमक झाले,यात बालकामगारांची काळजी होती. १ली २री ला नापास करू नका या आदेशामागे डोळ्यासमोर खेड्यात शिकणारी बहुजनाची पहिली पिढी होती.    वंचितांच्या शिक्षणाबाबत ही त्यांची कणव होती.
सरांच्या व्यक्तीमत्वाची विशेषता प्रेरक असण्यात होती. ते इतके तळमळीने बोलायचे की ती तळमळ थेट अधिकाऱ्यात शिक्षणात संक्रमित होत असे. कार्यसंस्कृती ही वरून खाली वाहते असे म्हणतात तशी ती प्रेरणा झिरपत झिरपत थेट वाडीवरच्या शिक्षकापर्यंत जात असे. सरांनी कारवाया करण्यापेक्षा या तळमळीने प्रशासन गतिमान केले.
     शिक्षकांना प्रेरणा देणे हा त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू होता. शिक्षक संघटनाच्या अधिवेशनात ते जात, उपक्रमशील शिक्षकांना व्यासपीठ देण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी ‘ धडपड मंच’ स्थापन केले.हे त्यांनी ४० वर्षापूर्वी केले. आज असे शिक्षक एकत्र येऊन whatsapp गट स्थापन करतात. या सर्वांचे मुळपुरुष चिपळूणकर सर होते. कागदी कामात अधिकारी म्हणून हरवून न जाता हा माणूस महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात फिरून अधिकारी ,शिक्षक आणि गावकरी या जिवंत माणसांशी बोलत फिरला. फोन किंवा वीज चांगले रस्ते नसताना खेड्यापाड्यात बहुजनांना शिक्षण मिळावे यासाठी तळतळ करणाऱ्या महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील,जे पी नाईक यांचे स्वप्न साकार करीत होता आणि अंतकरणात साने गुरुजींची प्रेमाची भाषा होती.
        आज स्पर्धा परीक्षेतून आलेले तरुण अधिकारी झाले आहेत, त्यांना तंत्रज्ञान समजते . अतिशय वेगाने ते माहितीची जुळवाजुळव करतात. पण चिपळूणकर सरांची तळमळ आणि कणव त्यांच्यात संक्रमित करायचा कोणत्या वेबसाईटवरून डाउनलोड करायची हा प्रश्न आहे, आणि सरांची तळमळ अधिकारी आणि शिक्षकात संक्रमित करणे हेच आजच्या शैक्षणिक प्रश्नाला उत्तर आहे
                                              हेरंब कुलकर्णी
 
हा लेख लोकमत मध्ये प्रसिद्ध झाला आहे 

टिप्पण्या

  1. चिपळूणकर सरांचे कार्य महान आहे पण त्यांची तळमळ डाऊनलोड करायची वेबसाईट मात्र हॅक झाली .

    उत्तर द्याहटवा
  2. कार्यसंस्कृती ही वरुन खाली वाहतै याचे उत्तम उदाहरण म्हणजे चिपळूणकर साहेब हौय .

    उत्तर द्याहटवा
  3. आजकालचे शिक्षक अधिकाऱ्यासारखे वागतात....

    उत्तर द्याहटवा
  4. माझ्या 'प्रेरणादायी उपक्रमांची प्रयोगशाळा' या शैक्षणिक लेखसंग्रहांचे संपादन केलेल्या पुस्तकाला प्रस्तावना घेण्यासाठी औरंगाबादला त्यांचे घरी दिड ते दोन तास सुसंवाद साधण्याचे सद्भाग्य मिळाले.थरथरत्या हातांनी स्वतःच्या हस्ताक्षरातच माझ्या पुस्तकाला शुभेच्छा देण्याची त्यांची धडपड पाहून माझा अश्रुंचा बांध फुटला होता. राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील एक तेजस्वी ध्रुवतारा म्हणजे आदरणीय श्री वि.वि.चिपळूणकर सर होय.त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त भावपूर्ण श्रद्धांजली.🌷🌷

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा