राजकीय पुढारी रोज किमान ८ लग्नांना रोज उपस्थित राहतात...सकाळपासून लग्नांना भेटी देत देत फिरत राहतात..वधुपिते आणि वरपिते हे मान्यवर लग्नांना यावेत म्हणून कासावीस होतात..लोकांची मानसिकता अशी झाली आहे की एकवेळ तुम्ही आमच्या गावाचा रस्ता केला नाही तरी चालेल,पिण्याचे पाणी दिले नाही तरी चालेल ,गावातील तरुण मुलांना नोकरी दिली नाही तरी चालेल फक्त आमच्या लग्नांना तुम्ही आले पाहिजे,
अतुल
कुलकर्णीच्या पुस्तक प्रकाशनात मुख्यमंत्र्यांनी एका कार्यकर्त्याचा किस्सा
सांगितला. वडीलांच्या मृत्यू झाल्यावर प्रेत घरात असताना अंत्यविधीला तुम्ही आलेच
पाहिजे असा हट्ट धरला.. हे ऐकताना काहीसे धक्कादायक वाटले पण लग्न आणि मृत्यू या
कौटुंबिक असणाऱ्या बाबी आज राजकीय होत आहेत. या बाबी आज प्रतिष्ठा मोजण्याच्या
फुटपट्टी ठरत आहेत..सामाजिक प्रतिष्ठा त्यावर मोजली जात असल्याने सर्वसामान्य
लोकांची त्यात फरफट होत आहे .एकीकडे होणारे राजकीयीकरण आणि दुसरीकडे संपत्तीचे
प्रदर्शन यात हे कौटुंबिक समारंभ सापडल्याने त्यातील भावनाचा बाजार सुरु झाला आहे.
शहरी भागात लग्न ही इव्हेंट होऊन आता बरीच वर्षे लोटली पण ग्रामीण भागात या
समारंभाचे खाजगी आणि कौटुंबिक स्वरूप अजून टिकून होते.ज्या गावात ते लग्न होणार
असायचे त्या गावातील लोक ते लग्न आपले मानायचे.अनेकदा तर शेतात घर असेल तर शेतात
घरासमोर मांडव टाकून ते लग्न होत होते.. उन आत येत असलेला साधा मांडव ,तिथेच खड्डे
खंदून केलेल्या चुली आणि साधा स्वयंपाक, गावातील च मिरवणुकीपुरती आणलेली ताशा आणि
पिपाणी. आणि टॉवेल टोपी चे आहेर इतके साधे लग्न असायचे..
पण गेल्या पाच वर्षात ग्रामीण
भागातील लग्न हा राजकीय इव्हेंट सुरु झाला.. विशेषत: नोकरी करणारे नवरदेव वाढल्यापासून
चांगले लग्न करून देण्याच्या मागण्या होऊ लागल्या. त्यामुळे तालुक्याच्या गावी
मंगल कार्यालयात ही लग्न होऊ लागली. शहरासारखी हिरवळ असलेली कारंजे असलेली मंगल
कार्यालये ही तालुक्याच्या गावाबाहेर रांगेने झालीत. तिथे लग्न केली तरच तुमचे
गावातील स्थान दखलपात्र अशी स्थिती असल्याने कर्ज काढून खेड्यातील लोक आज
तालुक्याच्या गावी येवून लग्न करू लागलेत..तिथे एकदा आले की त्या खेळाचे सगळे नियम
पाळावे लागतात.त्यातील अनेक सुविधा कार्यालयच पैसे घेवून पुरवते..नवरीचा मेक अप
करणारी ब्युटीशियन, शुटींग व फोटोसाठी ड्रोन कॅमेरा, इथपासून संगीत मंगलअष्टके
म्हणायला खास नाशिक ,पुणे अशा ठिकाणाहून आलेला और्केष्ट्रा हे सारे मुलीच्या
बापाला परवडण्याचा प्रश्नच नाही...अपरिहार्य आहे. शहरातून लग्न पाहून आलेले मुलगा
मुलगी विविध मागण्या करतात .लग्नापूर्वी चे प्री वेडिंग फोटोसेशन आता सुरु
झाले.त्यासाठी खूप खर्च केला जातो. शहरातील पाहुण्यांना,मुलाच्या कार्यालयात आपली
पत्रिका कशी चालेल मग इंग्रजीतून किंवा
महागडी पत्रिका छापली जाते..
यावर एक
प्रश्न हमखास विचारला जातो. आम्हाला एकच मुलगी आहे .आमची आर्थिक स्थिती चांगली
आहे. मग आम्ही आम्हाला पाहिजे तसे लग्न केले तर तुमचे काय बिघडते ? प्रश्न वरवर
योग्य वाटतो पण यातून त्या जातीतील,त्या
गावातील गरीब कुटुंबावर जो तणाव निर्माण होतो त्यातून ते अधिक कर्जबाजारी होतात
हां परिणाम जास्त भीषण असतो. शेतकरी आत्महत्येच्या अभ्यासातून लग्न खर्चामुळे होणारे
कर्ज आणि त्यातून आत्महत्या होतात..हा ही एक निष्कर्ष आहे. काही ठिकाणी तर
वडिलांना लग्नाचा खर्च झेपणार नाही म्हणून उपवर मुलींनी आत्महत्या केल्याची
उदाहरणे आहेत....समाजातील किंवा आपल्या जातीतील प्रतिष्टीत लोक जसे वागतात त्याचे
अनुकरण त्या जातीतील गरीब माणसे करत असतात. महागडी लग्न सुरु झाल्यावर गरिबांना
परवडेल किंवा नाही याचा विचार न करता शेतात मांडव टाकून लग्न करणे एकदम गरीब
असल्याचे लक्षण ठरले व कर्ज काढून मोठ्या लग्नाच्या वाटेवर गरीब ही येऊ लागले .मग
वाजंत्री डीजे येतो,भारीतल्या लग्नपत्रिका आणि सगळेच करावे लागते .तेव्हां या
मोठ्या लग्नांचा हा सगळ्यात भीषण परिणाम आहे की तो अनुकरणाच्या सक्तीतून तुम्हाला
नाईलाजाने पुन्हा पुन्हा गरिबीत ढकलतो.. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मी
मध्यंतरी फिरलो. विविध आदिवासी गरीब गावातील लोकही या लग्नखर्चासाठीचे बळी आहेत. विवेक पंडित
यांनी जो सालगडी चा प्रश्न पुढे आणला त्यातले अनेक सालगडी हे लग्नातील कर्जामुळे
सालगडी झालेले होते...त्यमुळे त्यांना
लग्नगडी म्हटले जात होते.. अजूनही ही प्रथा सुरु आहे..परंपरेविरुद्ध बंड करण्याचे
धाडस सर्वामध्ये नसते त्यामुळे गरीब माणसे परवडत नसले तरी कर्ज काढून अनुकरण करत
राहतात...त्यांची यातून सुटका करण्यासाठी समाजातील श्रीमंतानी खर्च कमी करावा .हा
त्यातील सामाजिक मुद्दा आहे..लग्न खर्च कमी झाले तर मुलींच्या जन्माचे स्वागत
करण्याचे प्रमाण वाढेल
या लग्न आणि मृत्युचे राजकीयीकरण
होणे फार गंभीर आहे. राजकीय पुढारी रोज किमान ८ लग्नांना रोज उपस्थित राहतात...सकाळपासून
लग्नांना भेटी देत देत फिरत राहतात..वधुपिते आणि वरपिते हे मान्यवर लग्नांना यावेत
म्हणून कासावीस होतात..लोकांची मानसिकता अशी झाली आहे की एकवेळ तुम्ही आमच्या
गावाचा रस्ता केला नाही तरी चालेल,पिण्याचे पाणी दिले नाही तरी चालेल ,गावातील
तरुण मुलांना नोकरी दिली नाही तरी चालेल फक्त आमच्या लग्नांना तुम्ही आले पाहिजे, आमच्या
कुटुंबातील अंत्यविधी, दहावा याला आले पाहिजे मग आम्ही तुम्हाला आम्ही तुमचे नेते
मानू ..त्यामुळे सर्वपक्षीय राजकारणी हे शिकले की कामे करण्याची आता गरज नाही फक्त
लग्न आणि दहावे आपण करत राहिलो तरी सहज निवडून येऊ आणि त्यामुळे लग्नांना
नेत्यांची गर्दी होऊ लागली.लोकही असे की कोणाच्या लग्नाला किती नेते आले यावरून
त्याची सामाजिक,राजकीय प्रतिष्ठा जोखू लागले..आजच्या वेगवान जगण्यात प्रत्येकजण
आपली प्रतिमा शोधतो आहे ,ओळख शोधतो आहे,ती ओळख प्रतिष्ठा त्याला या नेत्यांच्या
गर्दीतून मिळते.तेव्हा लग्नांना गर्दी जमवायची आणि नेते आणून आपली प्रतिष्ठा
वाढवायची हा खेळ सुरु झाला आहे.यातून भान विसरले जाते .घरात प्रेत असताना स्वत; च
अंत्ययात्रेच्या पोस्ट टाकतात ,फोन करतात....दहाव्याला गर्दी जमावी म्हणून लग्नपत्रिकेसारख्या
गावोगाव फिरून पत्रिका वाटल्या जातात .श्रद्धांजली वाहायला कोण नेते आले यावरून
त्या दु:खाची प्रतिष्ठा वाढते....!!! लग्नात तर पत्रिकेत सर्वपक्षीय नावे टाकली
जातात.मी एकदा एका पत्रिकेत २८१ नावे मोजली होती आता ते उच्चांक मोडले
जातात..काहीजण तर वेगवेगळ्या नावांच्या वेगवेगळ्या पत्रिका काढून नेत्यांना
चकवतात...सर्वात कहर असतो तो सत्कार आणि भाषणांचा.वरपिता वधूपिता लग्नाची निमंत्रण
द्यायला आपल्या घरी येतात तेव्हा असे भावनिक होतात की आपण जर त्या लग्नाला गेलो
नाहीतर जणू ते लग्नच होणार नाही...म्हणून आपण जातो पण तिथे गेल्यावर लक्षात येते
की आपण फक्त गर्दी वाढवायला हवे आहोत..ते भलत्याच मान्यवरांची वाट बघत असतात..काहींना
आपल्या शेजारून उठवून फेटे बांधले जातात .माईकवरून विशिष्ट लोक आल्यावर स्वागत
केले जाते..अशावेळी इतरांना काय वाटेल याचा विचार केला जात नाही..नेत्यांना फेटे
बांधले जातात आणि त्यांचे आशीर्वादरुपी भाषणे होतात..जणू बाकीचे शाप द्यायला आले
आहेत ...!!! कधी कधी तर मध्येच नेते आले तर मंगलाष्टके थांबवून भाषणे
होतात...यातून विकासाचे राजकारण न होता केवळ लोकानुरंजन सुरु झाले..महाराष्ट्रात
एक काळ असा होता की व्यक्तिगत कामे घेवून लोक गेले की नेते चिडायचे आणि गावाचे काम
घेवून या म्हणायचे. शंकरराव चव्हाण,बी जे खताळ यांची यामुळे लोकांना भीती वाटायची..आता
दुसरे टोक गाठले आहे ..आमच्या गावाचे काम करू नका पण आमच्या व्यक्तिगत
कार्यक्रमांना या म्हणजे आम्ही तुम्हाला मते देवू असा काळ बदलला आहे .समाजातील
व्यक्तिवाद वाढला आहे याचा हा परिणाम आहे. याचा फटका विकासाला बसतो
आहे..विकासासाठी प्रयत्न करा हे दडपण नकळत कमी होते आहे. प्रत्येक गावातील विशिष्ट
प्रतिष्टीत सांभाळले की झाले अशी नेत्यांची मानसिकता झाली आहे..
तेव्हा लग्न आणि मृत्यू हे
सार्वजनिक कार्यक्रम न होता केवळ जवळचे नातेवाईक व स्नेही यांच्यापुरताच राहायला
हवा. त्यासाठी लग्नातील,दहाव्यातील राजकीय नेत्यांचे महात्म्य कमी करायला हवे
.सत्कार आणि आशिर्वाद थांबवायला हवेत.. हे थांबले की पुढारी तिकडे फिरकणे आपोआप
बंद होतील..
गरिबांची लग्नातील कर्जातून सुटका
करायची असेल आणि राजकीयीकरण करायचे असेल तर सामुदायिक विवाह चळवळ रुजायला हवी.. या
विवाहांना प्रतिष्ठा देण्यासाठी ऐपत असलेल्या वर्गाने आणि राजकीय व्यक्तींनी
आपल्या कुटुंबातील मुला मुलींची लग्न ही सामुदायिक लग्नातच करायला हवीत तरच सामुदायिक लग्न चळवळ महाराष्ट्रात रुजेल
हेरंब
कुलकर्णी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा