मुलांच्या मनातील हिंसेचे काय करायचे ?


                     मुलांच्या मनातील हिंसेचे काय करायचे ??
     परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे एका लहान मुलाने दुसऱ्या लहान मुलाचा दगडाने ठेचून खून केला. एका मुलाने लग्नात पैशाचे पाकीट उचलले ते दुसऱ्या मुलाने त्या पाकीटमालकाला  सांगितले तो राग मनात ठेवून खूप काळाने त्याने त्या मुलाचा खून केला. विशेष म्हणजे ही दोन्हीही मुले शिक्षकांची म्हणजे सुशिक्षित पालकांची आहेत. काळजी घेऊन वाढवलेली आहेत त्यामुळे तर हे समजायला अधिक कठीण होते. संगमनेरमध्ये प्रेमप्रकरणातून १२ वीच्या मुलाने नुकतीच मित्राची केलेली हत्या व ३ वर्षापूर्वी शाळकरी मुलांनी केलेला मित्राचा केलेला खून, औरंगाबादला गर्लफ्रेंडशी का बोलला ? म्हणून गाडी अंगावर घालून केलेला मित्राचा खून, मुंबईत सिद्धांत गणोरेने आपल्या आईचाच केलेला खून व तिच्या रक्ताने प्रेताशेजारी लिहिलेली वाक्ये..
 या सर्व घटना एक दिवसाच्या ब्रेकिंग न्यूज होतात आणि विसरल्या जातात. पण या सर्व घटनातून पुन्हा पुन्हा एकच समान मुद्दा येतोय की मुलांच्या मनातील वाढत्या हिंसाचाराचे काय करायचे ? मुलांच्या भावाविश्वाकडे आपल्या सर्वांचे दुर्लक्ष हे त्याचे महत्वाचे कारण आहे.अशा घटना घडल्या की त्या झाकण्याकडे आपला कल असतो आणि सगळी लक्षणे गंभीर आजाराकडे लक्ष वेधतात पण आमची मुले ही अशी नाहीतच असे म्हणून आत्मवंचना करण्याकडे आपला सगळ्यांचा कल असतो.पूर्वी एकत्र कुटुंबात मुलांकडे व्यक्तिगत लक्ष पुरविणे शक्य नव्हते तरीही हे प्रश्न नव्हते आणि आता एक किंवा दोन मुले आणि आई वडील सुशिक्षित तरीही हे प्रश्न गंभीर का झाले आहेत ? याचे कारण वेगवान जगण्याने निर्माण केलेली स्पर्धा आणि त्यातून होणाऱ्या स्पर्धेतून आणि जगण्याच्या तणावातून हिंसेबाबत सर्वांच्याच मनात बोथटपणा आला आहे.त्यात पूर्वीच्या मुलांना हिंसा फार बघायला मिळत नसल्याने हिंसा उद्दीपक म्हणून काम करीत नव्हती पण आज टीव्ही,मोबाईल,व्हिडीओ गेम हे हिंसा उद्दीपक म्हणून काम करतात. बातम्या जगभरातील युद्ध आणि हिंसा कोवळ्या मनांच्या अंगणात रोज आणून टाकतात.    
                मोबाईल गेम मधील प्रत्येक गेम ही हिंसक आहे. कशाने तरी काहीतरी संपवायचे अशी ती थीम असते. त्यातून आपल्याला नको असलेल्या गोष्टी संपवून टाका हा संदेश मुलांना मिळतो. जास्तकाळ हिंसक व्हिडिओ गेम्स खेळल्याने बालकांच्या निर्णय क्षमतेच्या विकासावर परिणाम होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.
लहान मुलांनी जास्तवेळ हिंसक वृत्तीचे व्हिडिओ गेम्स खेळल्याने त्यांच्या  वागण्यावर आणि मानसिक वृत्तीवर परिणाम होतो. कॅनडातील मीरजाना बाजोवीक ब्रोक विद्यापीठाने मुले खेळत असलेल्या व्हिडिओ गेम्स आणि त्याचे प्रकार तसेच याचा त्यांच्या वागण्यावर होणारा परिणा याच्यावर संशोधन केले. यात त्यांनी तेरा ते चौदा वर्षांच्या मुलांचा गट निवडला असता हिंसक वृत्तीचे व्हिडिओ गेम्स खेळणाऱया बालकांमध्ये निर्णय क्षमतेचा अभाव असल्याचे किंवा निर्णय घेण्याबाबतीत अशी मुले संभ्रमीत वागत असल्याचे दिसून आले. टीव्हीवर दिसणाऱ्या प्रत्येक चित्रपटात खून किंवा तत्सम हिंसा नाही असा चित्रपट अपवादाने दिसतो. तेथील संवेदना बोथट करणारे कर्कश्य संगीत, प्रचंड वेग यातून मुले अधिक बोथट होतात.
           हिंसेवर विवेकी मन मात करते पण आपले राजकारण ,समाजकारण, शाळेत आणि घरात ही विचार करायला शिकवले जात नाही की त्याप्रकारच्या चर्चा केल्या जात नाहीत. राजकारणात शाब्दिक आणि प्रत्यक्ष हिंसा सुरूच असते. हिंसक विचार मांडणारे नेते आज लोकप्रिय आहेत. त्यांची हिंसक मांडणी हिंसेलाच प्रतिष्ठा देते. याचा परिणाम मुलांवर होतो. समाजातही हिंसा केलेल्यांना शासन होताना फार दिसत नाही.शाळेतून विचार करायला भाग पाडेल असे शिक्षण दिले जात नाही. कृष्णमुर्ती म्हणायचे की आजचे शिक्षण ‘what to think’ शिकवते पण ते ‘How to think’ शिकवत नाही.     त्यातून विचारशक्ती प्रबळ होऊन भावनेवर नियंत्रण येत नाही. वाचन विचारप्रवृत्त करते पण मुलांनी वाचन करावे म्हणून घरात आणि शाळेत फारसे प्रयत्न होत नाहीत.
         निसर्गात गेले तर वृत्ती शांत होते पण मुलांना निसर्गात कोणी नेत नाही की शांत होणारे ध्यान शिकविले जात नाही. एखादा छंद विकसित केला  तर उर्जा बाहेर पडते ते ही होत नाही. संगीत वृत्ती शांत करते पण मुलांना संगीत शिक्षण हा प्रकार निवडक कुटुंबात दिसतो.मैदानी खेळातून हिंसेचे विरेचन होते पण मुलांचे खेळणे शहरी भागात कमी झाले आहे.
              ज्या पालकांचे शिक्षकांचे अनुकरण मुले सहजपणे करतात ते आपण ही शांत नाहीत, वसकत असतो,चिडत असतो,मारत असतो यातून मनासारखे झाले नाही की असेच करायचे असते हा नकळत मुलांवर संस्कार होतो.माझा एक मित्र लहान मुलाला कांही ऐकले नाही की ‘चटका देवू का’ ? धमकी द्यायचा. एक दिवस हा मित्र सकाळी लवकर उठत नव्हता, बायको हाका मारीत होती तेव्हा त्या लहान मुलाने चमचा सुरु असलेल्या gas शेगडीवर धरून गरम केला व वडिलांना चटका दिला. एवढी एक घटना पुरेशी आहे ...लहान मुलांना पालक शिक्षक आणि समाज म्हणून आपण हिंसा शिकवली आहे. असोचॅम’च्या या सर्वेक्षणातून शिस्त लावण्यासाठी आई-वडील मुलांना मारतात आणि इतकेच नव्हे तर प्रसंगी वस्तू फेकून मारतात किंवा चटकेही देतात.. अशाप्रकारची मारहाण ही मुलांवर प्रतिकूल परिणाम करणारी ठरत असून, त्यामुळे मुले हिंसक होतात, असा निष्कर्ष एका पाहणीत निघाला.

            कोसळणारे हे बाल्य बघितले की मला नेहमी वाटते की सतत मोठ्यांसाठी लिहून आपले विचारवंत होणे थांबवायला हवे आणि काहीवर्षे फक्त मुलांसाठी काम करायला हवे.मुलांना गोष्टी सांगत शाळेशाळेत जायला हवे.पालक प्रशिक्षण हा सगळ्यात दुर्लक्षित विषय आहे.मुलांना संगीत,निसर्ग,कला,खेळ,वाचन याचे अनुभव देण्यासाठी पालकामध्ये हे सारे रुजायला हवे.
          साने गुरुजींचे द्रष्टेपण अशावेळी जाणवते.त्यांनी मुलांना संवेदनशील होण्यासाठी लेखनातून,गोष्टी सांगण्यातून प्रयत्न केले. तेव्हा या हिंसेच्या ‘ब्रेकिंग न्यूज’ ची उत्तरे दीर्घकालीन आहेत आणि त्यावर काम करायची माझ्यासकट आपली तयारी नाही त्यामुळे आपण सारे एका सुप्त ज्वालामुखीवर बसलो आहोत.  

१८ व्या वयापर्यंत अमेरिकन तरुण सर्व प्रकारच्या  हिंसेच्या २ लाख घटना बघतो (American Psychiatric Association)
अतिप्रमाणात व्हिडिओ गेम खेळण्यामुळे मुले लठ्ठ,  रागीट आणि हिंसक बनण्याचा मोठा धोका असल्याचे ‘असोचॅम’ने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. आलेल्या किशोरवयीन मुलांपैकी ८२ टक्के मुले आठवड्यातून १४ ते १६ तास संगणक किंवा वेबपोर्टलवर व्हिडिओ गेम खेळतात, तर ७ टक्के मुले आठवड्यातून २० पेक्षा अधिक तास व्हिडिओ गेम खेळतात.अशी मुले तुसडेपणाने वागू लागतात. ती रागीट स्वभावाची व चिडचिडी बनतात आणि हिंसक वर्तन करतात.
व्हिडिओ गेममध्ये हिंसा पाहून संवेदना बोथट होतात. प्रश्न सोडविण्यासाठी हिंसा हा एकमेव मार्ग अशी धारणा बनते.


एका पालकाने मुंबईत कुठले पर्यटन स्थळ पाहायचे, असे विचारल्यावर पाच वर्षांच्या मुलाने ‘सीएसटीवर कसाबने मारलेल्या गोळ्या आणि ताज हॉटेल,’ असे उत्तर दिले



हिंसे                                                  या  बाबत  पालकांना काही सूचना
1)                          तुमच्या मुलांना सतत प्रेम आणि जिव्हाळा द्या
2)   मुलां                         मुलांवर तुमचे सतत लक्ष असले  पाहिजे
3)   तुम                         घरातील वर्तनातून घरात हिंसा व्यक्त होता कामा नये
4)   जे नि                       तुम्ही मुलांसाठी ठरवाल त्याबाबत ठाम राहा
5)   मु                     मु ला नी टीव्ही किती वेळ बघायचा याची वेळ त्यांच्याशी बोलून नक्की करा
6)   ते टी        मुलावर काय बघतात याकडे लक्ष ठेवा. पडद्यावर दिसणाऱ्या हिंसेबाबत त्यांच्याशी चर्चा करा. हिंसे                    रोजच्या जीवनात होणारे परिणाम याची मुलांना जाणीव करून द्या


·          
American Academy of Pediatrics च्या अभ्यासानुसार ३ ते ४ रोज टीव्ही बघत असेल तर प्राथमिक शाळा पूर्ण होईपर्यंत टीव्ही पाहणारे मूल ८००० खुनाच्या घटना बघते. 
·          

  • National crime record ब्युरो  crime in india 2016
                     अल्पवयीन मुलांनी केलेले गुन्हे

भारत
महाराष्ट्र
खून
८९२
१३०
खुनाचा प्रयत्न
९३३
२११
बलात्कार
१९०३
२५८
अपहरण
१५३८
१७३

२०१६ मध्ये महाराष्ट्रातील ७७१२ अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली त्यात शिकलेल्या पालकांच्या मुलांची संख्या लक्षणीय आहे. महानगरातील अल्पवयीन मुलांनी केलेल्या गुन्ह्यांच्या अभ्यासात मुंबईचा देशात दुसरा क्रमांक लागतो. २०१६ मध्ये ९४६ अल्पवयीन मुलांना अटक झाली.

                                                                    हेरंब कुलकर्णी       
                                                              herambkulkarni1971@gmail.com
                                     
                     हा लेख लोकमतच्या पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे                                                                 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा