रस्त्यावर राहणारी माणसे (हेरंब कुलकर्णी )


                   रस्त्यावर राहणारी माणसे..(हेरंब कुलकर्णी)  



    (हा लेख १ सप्टेंबर २०१९ ला सकाळ च्या सप्तरंग पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे)                     
              नुकत्याच पुण्यात आलेल्या पुरात डेक्कनच्या पुलाखाली राहणाऱ्या वस्तीत पाणी शिरले आणि त्या बिचाऱ्या माणसांचे संसार वाहून गेले. आधीच सर्वहारा असलेली ही माणसे दीनवाणी झाली. नुकतेच मे महिन्यात या लोकांना भेटलो होतो.. मोठे उड्डाणपूल हे विकासाचे प्रतिक आणि त्याखाली राहणारे हे सर्वांत उपेक्षित लोक.एकीकडे शहरात करोडपती आणि हे रोडपती एकाचवेळी वाढत आहेत.सुशोभित आणि सुरचित असलेल्या शहरांच्या रचनेत ही माणसे शहरांचे सौंदर्य घालवतात असेही मानणारे लोक आहेत. त्यामुळे शहरांना ओझे वाटणारे हे लोक कोण आहेत ? हे एकदा जवळून बघावेसे वाटत होते. त्यासाठी पुण्यात गेल्यावर आवर्जून डेक्कनच्या पुलाखाली नदीकाठी राहणारे लोक बघायला गेलो. सोबत फुटपाथवासी परिषदेचा कार्यकर्ता सुरेश पवार होता. एकुलता एक हापसा खडखडत होता.पाणी भरायला गर्दी उसळली होती. मुली हांडे भरून नेत होत्या. प्रत्येक झोपडीच्या समोर उघड्यावर पुरुष आंघोळ करीत होते आणि त्या त्यांच्या इवल्याशा जगासमोरून शहराची वाहतूक वेगाने सुरु होती. या संथ जगाचे आणि त्या वेगवान जगाचे काहीच नाते नव्हते.खालची जागा ओबडधोबड असल्याने सर्व झोपड्या खालीवर होत्या. त्यात एका उखडलेल्या झोपडीची जागा ही त्या वस्तीची चावडी होती. हळहळू सगळे आजूबाजूला जमले. तितक्यात त्यांच्यात भांडणे सुरु झाली. कानडीत चाललेली भांडणे समजेनाच. पुन्हा साधे बोलणेसुद्धा ओरडून. त्यात मारामारीही सुरु झाली. हताशपणे ते बघणे एवढेच हातात होते. ता वस्तीत छोटू हा समजूतदार तरुण होता. त्याला भेटलो. शांत बसला होता. तो अंध होता. फुग्यात gas चा स्फोट झाला आणि त्याचे डोळे गेले. जमिनी विकून ५ लाख रुपये घातले पण दृष्टी आली नाही. ज्या फुग्यांनी जन्माचे अपंगत्व दिले तेच फुगे विकावे लागतात.

         यातील अनेक कुटुंबे कर्नाटकातून आलेली. गावाकडे बहुतेक भूमिहीन. तिकडे शेतीत फार काम मिळत नाही म्हणून पुण्यात आलेली. इथल्या पुलाखाली राहू लागली. हे इथे राहिल्यावर सुरुवातीला परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या त्यातून रेशन आणि इतर मानवी सुविधा मिळायला खूप अडचणी आल्या. मध्यमवर्गीय मानसिकतेचे हे विदारक दर्शन..         
         एका कुटुंबात रडारड सुरु होती म्हणून जवळ गेलो. त्या कुटुंबातील दीड वर्षाचे लहान मुल आदल्या दिवशी मध्यरात्री कुणीतरी आईजवळ झोपलेल्या स्थितीत उचलून नेले होते.धक्काच बसला. सगळ्या वस्तीत तणाव निर्माण झाला होता. डेक्कनसारख्या गजबजलेल्या भागातून एक लहान मुल आईजवळून उचलून नेले जाते. त्यामुळे सगळ्यांच्याच चेहऱ्यावर वेदना आणि आपल्या लेकरांविषयी अपार भीती होती. मी सुरेशला पोलीस स्टेशनला जायला सांगितले. तक्रार नोंदवली होती. दोन दिवसाने मी स्वत: बालगंधर्व पोलीस चौकीत गेलो. पोलीस अधिकारी यांनी सीसीटीव्ही त सायकलवर ४ माणसे जात आहेत मुलाला  घेवून असे सांगितले. त्यांच्यातील भांडणे आहेत का ? मुले विकणारी टोळी आहे का ? या शक्यता तपासतोय म्हणाले. मी जणू लक्ष घातल्याने आता मुल सापडणार हे सांगायला पुन्हा मी वस्तीत गेलो तर त्या हरवलेल्या मुलाचे आई वडील फुगे विकायला निघून गेलेले. मुल हरवल्याचे दु: ख विसरून बिचारे पुन्हा कामाला जुंपले होते. तिथे मला पुलाच्या जवळ भानुराम काळे नावाचा माणूस भेटला. मी त्याला उत्साहाने पोलीस स्टेशनाला जाऊन आल्याचे सांगितले. तो खिन्न हसला आणि खिशातून पाकीट काढत त्याच्या मुलाचा फोटो काढून दाखवला. तो म्हणाला “ हा माझा मुलगा गिरी. ९ वर्षापासून असाच हरवला की पळवून नेला माहीत नाही. सगळे पोलीस स्टेशन बघितले अगदी मंत्रालयात पण जाऊन आलो पण नाही सापडले माझे पोरगे आज ९ वर्षे झाले...ते नाही सापडले तर हे दीड वर्षाचे पोरगे कुठे सापडणार ? “ गरिबाला कोणी नसते बाबा असे म्हणत त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. तो म्हणाला “ पोरगे मेले असते तर किमान मनाला समजून सांगता येते की आता नाहीये पण रोज वाट बघतो कधीतरी भेटेन म्हणून “ मला त्याची ती मनाची वेडी आशा समजत होती आणि आपण गरीब असल्याने कोणीच मदत करणार नाही ही हताशा ही पोहोचत होती... पुढे काहीच बोललो नाही..
    बहुतेक सगळ्यांचा व्यवसाय हा फुगे आणणे ते फुगवणे आणि संध्याकाळी सिग्नलजवळ विकणे हाच होता. जिथे कुठे लग्न असेल तिथे जाउन काहीजण फुगे विकत होते. १२० रुपयाच्या bag मध्ये ७० फुगे असतात,२३०० रुपयाचे gas सिलिंडर असते. खर्च जाऊन ३०० रुपये सरासरी उरतात कधी कमी होतात असे एकाने सांगितले. काही महिला फुले आणून गजरे विकत होत्या. काहीजण रेडीमेड वस्तू खेळण्या आणून मंदिराबाहेर विकत होत्या. गणपती, नवरात्रात stall लावतात. मुले ही वस्तू विकणे भिक मागतात.    दुपारी फक्त पुलाखाली स्वयंपाक करीत होते. एकदा ४ वाजले की सगळ्यांची जाण्याची घाई. रात्री १० पर्यंत सगळे सिग्नल आणि मंदिरात. त्यामुळे रात्री स्वयंपाक नाही मिळेल ते खायचे व येवून झोपायचे असा दिनक्रम. मी हे सारे बघायला संध्याकाळी सिग्नल जवळ जाऊन थांबलो. त्या वेगवान वाहतुकीशी त्यांची लहान मुलेही सरावलेली होती. सकाळी भरभरून बोलणारी मोठी माणसे माझी नजर आता टाळत होती तर सकाळी जी लहान मुले बोलायला बिचकत होती त्यांच्यात आता वेगळेच धैर्य संचारले होते. ते वस्तू विकत होते ,सराईतपणे भीक मागत होते.     
                   दुसऱ्या दिवशी डेक्कन पुलाच्या नदीकाठी पुन्हा गेलो तर काही नवीन कुटुंबे आलेली दिसली.. कुठून आले विचारले तर थेट ओरिसातून आलेले होते. शेजारून वाहणारे गटारीसारखे पाणी, त्यात उगवलेले गवत घाण आणि तिथेच चुली टाकून स्वयंपाक सुरु होता. फक्त भाताचे हंडे शिजत होते. पुरुष माणसे कामाला गेले होते . रस्त्यावरून जाणाऱ्या  वेगवान  वाहतुकीला या आलेल्या आगंतुक पाहुण्यांचे काही सोयरेसुतक नव्हते. जवळ जाऊन चौकशी केली. भाषेची अडचण होती. थोडे फार बोलल्या. तिथे उभे असताना नदीकाठचे मोठे डास चावायला लागले. मनात आले या लहान मुलांना घेवून रात्री या डासांच्या हल्ल्यात ही माणसे कसे झोपतील ? कल्पनाच करवेना.



*******************************   
                 मुंबईच्या फुटपाथवर राहणारी माणसे बघायला मुंबईत गेलो.मुंबईत निराधार नागरीकांसाठी ब्रिजेश आर्य हा कार्यकर्ता पहेचान नावाची संस्था चालवतो. फुटपाथवर राहणाऱ्या लोकांना महापालिका आणि पोलीस यांच्यापासून त्रास होतो त्यापासून गरीबांना बचाव करणे, या लोकांना हक्काचे घर मिळवून देण्याचा प्रयत्न करणे, या लोकांना शासकीय कागदपत्रे मिळवून देणे अशी अनेक कामे पहेचान चे कार्यकर्ते करतात. वरळी सी फेज जवळच्या फुटपाथवर राहणारे लोक बघायचे होते त्यासाठी त्यांची कार्यकर्ती सोबत आली. एकीकडे उंच वरळीचे tower उभे आणि दुसरीकडे नव्याने सुरु झालेला समुद्रावरचा तो डौलदार पूल. आणि त्या सुंदर दृश्याला छेद देणारे फुटपाथवर राहणारी ही गरीब माणसे. त्या सुंदरतेचा रसभंग करीत होती. मी गमतीने तसे म्हणालो तेव्हा सोबतची कार्यकर्ती म्हणाली “ अहो सर, खरेच या tower च्या लोकांनी अशी तक्रार केली होती महापालिका व पोलिसात. आम्हाला tower मधून समुद्राकडे बघताना हे फुटपाथवरचे लोक दिसतात व कसेतरी वाटते आणि ही तक्रार केल्यावर ward अधिकारी यांना हाकलायला आले होते “ मला धक्काच बसला. केवळ डोळ्याला बघताना त्रास होतो म्हणून समोर गरीब नको ही श्रीमंत मानसिकता मला समजेनाच या असंवेदनशीलतेला काय म्हणावे ? “

                तिथल्या काही कुटुंबांशी बोललो. फुटपाथवर राहणारे लोक हे नुकतेच कोणत्यातरी राज्यातून आलेले असतात व तात्पुरते राहत असतात असा माझा गैरसमज होता पण फुटपाथ बदलत बदलत ४० वर्षे याच मुंबईत राहणारी ही माणसे होती हा धक्का होता. मंदा जोशी ही ब्राह्मण जातीची स्त्री (काहीसे आश्चर्य वाटले) ही कुटुंबासह ४० वर्षे तिथे राहत होती. मूळ कोकणातील कुटुंब, नवरा वारला. काहीकाळ झोपडपट्टीत राहिली. ते घर तोडले गेले आणि मुलांसह हे कुटुंब या फुटपाथवर आले.सुनंदा कांबळे ही दलित महिला.नवरा पोटाच्या विकाराने वारला. झोपडपट्टीत घरासाठी वर्षाला ३६००० रु मागितले. ते परवडत नाही म्हणून फुटपाथवर. तिथेच एक निराधार वृद्ध राजाराम रणदिवे भेटले.बायको वारली.मुले कामाला गेली. आयुष्यभर रेडीओ ऐकून शेकडो हिंदी गाणी पाठ होती. समोर उंच वरळीचे श्रीमंत tower आणि फुटपाथवर हा romantic गाणी म्हणून दाखवत होता.त्याच्या आवाजात एक विलक्षण कातरता होती.८० व्या वर्षी ही त्याचे इतक्या दु :खात हे कलेचे प्रेम हलवून गेले. शेजारच्या झोपडीत गुजराथची महिला. नुकतेच बाळंतपण झालेले. ते १५ दिवसाचे लेकरू रस्त्याच्या कडेला पाळणा बांधून उभ्या असलेल्या truck च्या सावलीत निवांत झोपलेले. आपल्या वाट्याला आयुष्य किती उजाड आहे याची कोणतीही चिंता त्याच्या चेहऱ्यावर नव्हती. बाळंत आई सध्या काय पोषक पदार्थ खाते हे जेवणाचे पातेले उघडून बघितले तर जरमनच्या पातेल्यात तळाला गेलेली बटाट्याची भाजी होती मला डिंकाचे लाडू आणि शासकीय महिला कर्मचारी यांना मिळणारी बाळंत रजा आठवली. रस्त्यावरच जन्म मृत्यू आणि संसार... नुकताच झालेला मुंबईतला पाउस आठवला. या जीवघेण्या पावसात हे लेकरू कसे राहिले असेल ? पावसात कशी राहत असतील ही माणसे ?

        हे लोक भिकारी नाहीत तर दिवसभर मजुरीची कामे उद्योग करीत असतात.ही माणसे ४० वर्षापासून या शहरात राहतात, शहराची सेवा करतात.या माणसांना किमान डोक्यावर छत्र शासन म्हणून आपण द्यायला हवे. 

                                 बेघरांसाठी काम


·         मुंबईत ब्रिजेश आर्यची पहेचान ही संस्था बेघर लोकांसाठी काम करते. प्रत्येक एक लाख वस्तीसाठी एक निवारागृह उभारावे या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी संस्था लढते आहे व प्रत्यक्ष  ५००० बेघर कुटुंबांचे प्रश्न सोडवत आहे. त्यापैकी ३९५० लोकांना कागदपत्रे मिळवून दिले. ३०० महिलांना प्रशिक्षण देवून रोजगार मिळवून दिला. या कुटुंबातील ८०० मुलांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन वर्ग चालविले जातात. बेघरांसाठी हेल्पलाईन चालवली जाते.आरोग्यविषयक मदत मिळवून दिली जाते. महाराष्ट्रात शहरी लोकसंखेच्या प्रमाणात किमान ६०० निवारागृह उभारण्याची गरज असताना केवळ ७० निवारागृह बनले आहेत. मुंबईत महापालिका नकारात्मक भूमिका घेत असल्याने केवळ ७ निवारागृह बनली आहेत. ब्रिजेश यांना महाराष्ट्र सरकारच्या समितीवर सदस्य म्हणून घेण्यात आले आहे.

------------------------------------------------------------------------

·         पुण्यात संतुलन संस्थेचे बस्तु रेगे हे २००८ पासून फुटपाथवासी परिषद या नावाचे संघटन ३५० कुटुंबासोबत काम करते आहे. रेशनकार्ड, आधारकार्ड, बँक खाते, मतदारयादीत नाव, कर्ज असे मिळवून दिले.मुलांना शाळेत घातले. या कुटुंबाना स्वस्त रेशनधान्य मिळते आहे.   त्यांना घरे मिळावीत म्हणून मंत्रालयावर दोन वेळा आंदोलने केली. आरोपी सापडत नसले की  पोलीस कोणत्याही गुन्ह्यात यांना अडकविते तेव्हा सतत लक्ष घालावे लागते. महापालिका त्यांचे सामान उचलून नेते ते सोडवावे लागते. या लोकांना सतत आधार द्यावा लागतो.पंतप्रधान घरकुल योजनेत या कुटुंबाना घरे कर्जाऊ रकमेत न देता मोफत मिळावीत म्हणून ही परिषद प्रयत्न करीत आहे. रस्त्यावर राहणारी ही माणसे ते कर्ज फेडूच शकणार नाहीत. गेली १० वर्षे घरे मिळावीत म्हणून संघर्ष सुरु आहे.       


२०११ च्या जनगणनेत मुंबईत ५७ हजार बेघर नागरिक आहेत.   
आंदोलनाच्या मागण्या
फुटपाथवर होणारे अपघात, मृत्यू यांची चौकशी व्हावी
प्रत्येक शहरात निवारागृह उभारण्यात यावेत
फुटपाथ वर विक्री करणाऱ्यासाठी लायसन देण्यात यावेत
सर्व शासकीय कागदपत्रे यांना देण्यात यावीत व योजनेच्या अंमलबजावणीत प्राधान्यक्रम द्यावा
फुटपाथवर राहणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात यावी 


                      

                                                                                हेरंब कुलकर्णी (८२०८५८९१९५) 
                                                   herambkulkarni1971@gmail.com

                        

टिप्पण्या

  1. पेट बडा बाका यारोँ| इसने सबको दिया धोका ||

    उत्तर द्याहटवा
  2. सर बहुत बहुत धन्यवाद बहुत कम ही पत्रकार बेघर या वंचित लोगों के प्रश्न पर लिखते है .

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा