बैलपोळ्याला मला ही गोष्ट दरवर्षी आठवते (हेरंब कुलकर्णी )


                                                    बैलपोळ्याला मला ही गोष्ट दरवर्षी आठवते 






मी काही शेतकरी कुटुंबातला नाही पण शेतकऱ्याच्या भावना किती गहिऱ्या असतात याबाबत  मला  दर बैल पोळ्याला मला लहानपणी पाठय पुस्तकात असलेली द.ता. भोसले यांची गोष्ट आठवते। दौलत नावाच्या शेतकऱ्याची ती गोष्ट होती. बैलपोळा सण असतो. त्या सणाला  शेतकरी बैल सजवतात. दौलत नावाच्या शेतकऱ्याच्या घरात पावसाचे पाणी शिरलेले असते.  तेव्हा गावचा सावकार त्याला राहायला त्याच्या एका जुन्या घरातील खोलीत  तात्पुरती राहायला जागा देतो. त्या घरासमोर तो बैल सजवत असतो. बैल  पोळ्याच्या दिवशी सावकाराच्या मुलींना तालुक्याच्या गावी पिक्चर बघायला जाण्याची हुक्की येते.पोळ्याला दिवशी कोणताच शेतकरी गाडी जुंपत नाही तेव्हा सावकार राहायला जागा दिलेल्या दौलतला गाडी मागतो.आपण दौलतला राहायला जागा दिली आहे त्यामुळे तो आपले ऐकेल याची सावकाराला खात्री असते. इतके उपकाराचे ओझे असूनही तो पोळ्याला गाडी जुंपायला नकार देतो.सावकार तो राग मनात ठेवतो.


                             पण त्याच दुपारी दुसऱ्या बळी नावाच्या शेतकऱ्याच्या त्याचा बैल पोटात शिंग खुपसतो. खूप रक्त जात असल्याने त्याला तालुक्याला दवाखान्यात नेणे गरजेचे असते. पण दवाखान्यात न्यायला , पोळा असल्याने बैल गाडीला जुंपत नाही. इकडे बळीची तब्येत खालावत चालते. दौलत ला ते दु:ख बघवत नाही. तो त्यांची बैलपोळ्याची श्रद्धा बाजूला ठेवतो आणि  दौलत गाडी जुंपतो आणि बळीला दवाखान्यात नेतो.वेळेत पोहोचल्याने बळी चा प्राण वाचतो. दौलत सणाचा आनंद सोडून देतो आणि मध्यरात्री गावाकडे परत येतो. 

                             दुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच सावकार तो राग डोक्यात ठेवून दौलत च्या घरी येतो. त्याला जागा खाली करायला सांगतो. तू माझ्या मुलीना बैलपोळ्याचे कारण सांगितले आणि एवढया तत्वांचा होता तर मग गाडी का जुंपली ? असे विचारतो.  दौलत त्याला सिनेमाला जाणे आणि जखमी होण्यातला फरक सांगतो. सावकार ऐकत नाही . जागा खाली करायला सांगतो आणि आपल्या जुन्या घरात अजूनही चिखल आहे हे माहीत असूनही तो दौलत सावकारापुढे हात पसरत नाही . स्वाभिमानाने त्याला जागा  खाली करतो असे सांगतो. सावकारासमोरच सामान खाली करायला सुरवात करतो. सावकाराला खूप लाज वाटते आणि तो दौलत ला थांबवतो.  असा तो धडा होता. आजही त्या धड्यातील काढलेली चित्रे डोळ्यासमोर आहेत माझ्या. बळी ला उचलून बैलगाडीत ठेवताना चे चित्र आणि रागावलेला सावकार आणि सामान बैलगाडीत टाकणारा दौलत अजूनही चित्रात दिसतो. 
                 ते वाचताना एकाचवेळी प्राणिप्रेम, माण साचे प्रेम. गरिबीतला स्वाभिमान ही सारी मूल्ये नकळत रुजत होती. भावनांक विकसित होत होता.आजही पोळ्याच्या दिवशी मला ती कथा आठवते आणि मी हलून जातो. आज पाठयपुस्तकात असे पाठ कविता कमी झाल्यात .  समाज कोरडा होण्याचे हे ही एक कारण आहे असे मला असे धडे आणि कविता आठवल्या की नेहमी वाटते. समाजातील समवेदनशीलता वाढायला असे धडे कविता अभ्यासक्रमात यायला हवेत 

-------------------------------------------
 हेरंब कुलकर्णी

टिप्पण्या