डॉक्टर दाभोलकरांना आठवताना (हेरंब कुलकर्णी)


      नरेंद्र दाभोलकर यांच्या आठवणी जागवणारा हेरंब कुलकर्णी यांचा लेख 
          
  ६ वर्षे उलटून गेली डॉक्टर. एखाद्याशिवाय आपण जगूच शकणार नाही असे तीव्रतेने मृत्युच्या दिवशी वाटते पण तरीही बेशरमपणे आपण जगतच राहतो.. पण काही व्यक्तींबाबत ते दू;ख केवळ व्यक्तिगत राहत नाही तर सामाजिक वेदना बनून राहते.काही लोकांचे मोठेपण कळायला त्यांना मरावे लागते त्यातले तुम्ही एक. तुमच्यासोबत अनेक शासकीय अधिकार्‍यांना भेटलेलो तेव्हा तुम्हाला मिळणारा आदर बघितलेला पण देशपातळीवरील मीडिया आणि मान्यवर यांनी आणि अमेरिकन वृत्तपत्रांनी तुम्हाला जी आदरांजली वाहिली तेव्हा आम्हाला तुमचे मोठेपण लक्षात आले. महाराष्ट्र ओलांडून तुम्ही केव्हाच वैश्विक झाला होतात..
             तुमचे जाणे डॉक्टर माझ्यासाठी व्यक्तिगत हानी तर आहेच पण त्यापेक्षा आज तुम्ही हवे होते असे अधिक वाटायला लावणारे जास्त आहे. व्यक्तिगत पातळीवर काही मनात आले की पटकन तुम्हाला सांगावेसे वाटायचे. तुम्हीही बोला ग्रेट हेरंब असे चेष्टेने हसत म्हणत ऐकायचे ती जागा अजूनही रिकामीच राहिली डॉक्टर. पण त्यापेक्षा या ६ वर्षात तुम्ही हवे होतात असे महाराष्ट्रातील कितीतरी पेचप्रसंग येवून जाताना तुम्ही आठवत राहता. तुम्ही गेल्यावर इथली सरकारे बदलली.महाराष्ट्राचा उदारमतवादी चेहरा भेसूर होत गेला.असहिष्णुता वाढत गेली.इथले जातीपातीचे एकजिनशी वस्त्र उलगडत गेले. सामाजिक कार्यकर्तेही आपआपल्या जातीच्या मांडवाखाली जाऊन जातीचे नेते मिरवू लागले. एखादा काय बोलतो हे समजून हे जातीचा चष्मा लावून बघितले जाऊ लागले.सुशिक्षित माणसे मध्यमवर्गीय अधिकच बनचुकी आणि भेकड होत गेली आणि बुवा बाबांच्या आसर्‍याला जाऊन बसली..या महाराष्ट्राच्या पडझडीच्या काळात तुम्ही हवे होतात डॉक्टर. प्रत्येकवेळी आज तुम्ही काय केले असते ? असा प्रश्न कुरतडत राहतो. कोणत्याही अस्वस्थततेला तुम्ही उतरांची जोड देत असायचे. केवळ वांझ अरण्यरुदन करण्यात तुम्हाला रस नव्हता. तुम्ही असताना सोशल मीडिया बाल्यावस्थेत होता. आज आम्ही सारे त्यावर व्यक्त होऊन कृतीशीलता मारत आहोत तुम्ही मात्र प्रत्येक अस्वस्थ करणार्‍या विषयाचे कृतीत रूपांतर करीत राहिला. ही तुमची उणीव आज तीव्रतेने जाणवते डॉक्टर.
     सामाजिक भूमिका घेताना जे धाडस असावे लागते ते ही आज कमी झाले आहे. तुम्ही परिणामांचा विचार न करता किती टोकाच्या भूमिका घेतल्या. सत्य साईबाबा गेल्यावर दुसर्‍या दिवशी तुम्ही लिहिलेला लेख वाचून भीती वाटली की आता काय होईल. आज असे अनेक क्षण येऊनही सर्व क्षेत्रातील हिशोबी नेतृत्व बघून तुम्ही आठवत राहता.
  तुमचे दुसरे वैशिष्ट हे जाणवते की भावनेच्या लाटेला तुम्ही नेमकेपणाचा किनारा देत असायचे. अनेकदा तुमची भावना खरी आहे ना ? मग कसेही विस्कळीत वागले तरी चालेल असाच चळवळींचा व्यवहार असतो. पण मी तुम्हाला नेहमी म्हणायचो की तुम्ही सामाजिक चळवळींचे सीईओ आहात. एखादा CEO कंपनी ज्या गांभीर्याने चालविल त्यापेक्षा अधिक कार्यक्षमतेने तुम्ही आंदोलने चालवली.भाबडेपणा तुमच्या विचारात व कृतीत अजिबात नसायचा.साधनेचे संपादक झाल्यावर स्वत: पहिली वर्गणी भरून व्यवहार शिकवला.त्यामुळे कुणाची मोफत अंक मागायची हिंमत झाली नाही.
तुम्हाला संयमी स्वभावाचे वरदान होते. त्यामुळे रागावणे हे स्वभावातच नव्हते.मी तुम्हाला खूप प्रश्न विचारायचो. एकदा विचारले “ तुमच्या मनासारखे झाले नाहीतर तुम्ही वैतागत नाही का ? एखाद्या गावात एखाद्या कार्यकर्त्याला तुम्ही बैठक ठेवायला सांगितली आणि त्याने नीट बैठक आयोजित केली नाही आणि तुम्ही गेले तर मनस्ताप होत नाही का ?तरीही तुम्ही चिडणार नाही का ? तुम्ही हसायचे आणि म्हणायचे की मी रागावत नाही पण त्याक्षणी मी विचार करू लागतो की हा कार्यकर्ता हे काम करू शकत नाही तेव्हा इथे आणखी वेगळ्या कार्यकर्त्यांकडे ही जबाबदारी द्यावी लागेल असा मी विचार करतो” एकदा विधानसभेचे असेच अधिवेशन संपले होते. दुसर्‍या दिवशी साधंनेच्या कार्यालयात आपण भेटलो. नेहमीप्रमाणे सरकारने विधेयकाबाबत फसवले होते. तुम्ही दरवर्षीप्रमाणे पूर्ण शक्ति लावली होती आणि रोज उद्या विधेयक घेऊ म्हणत शेवटचा दिवस उजाडला होता. तुम्ही शांत होता. त्या दुपारी साधंनेच्या ऑफिसमध्ये मी तुम्हाला म्हणालो “ अगदी खरे सांगा आपण दोघेच आहोत अधिवेशन संपल्यावर निराशा येत नाही का ?” तुम्ही हसले म्हणाले की अरे मी कब्बडी खेळाडू आहे त्यामुळे मरायचे आणि पुन्हा जिवंत व्हायचे याची मला सवय आहे. पुढच्या अधिवेशनात पुन्हा नव्याने “ हे सारे तुमच्यात कुठून आले होते.डॉक्टर ?  राग आणि निराशा यावर मात कशी करावी ? या पायावर धार्मिक दुकाने सजली आहेत. शेकडो सत्संग सुरू आहेत. पण तुम्ही हे किती सहजसाध्य मिळवले होते ..  तुमची यासाठीची साधना तरी कोणती असेल ? हा अतार्किक प्रश्न मला पडतो.
      प्रत्येक मुद्द्यावर तुम्हाला वेगळेच काहीतरी सुचायचे. असाच मी एकदा सातार्‍याला आलो होतो. देवदत्त दाभोळकर यांनी शिक्षणात प्रेरणा कशी निर्माण करता येईल असे एक चर्चासत्र ठेवले होते. तुम्ही मलाही बोलावले. सगळे पारंपारिक मांडणी करीत होते. जेवणाच्या सुटीत तुम्ही मला गांधींचा वेगळाच पैलू सांगितला. तुम्ही म्हणालात की कोणता नेता जास्त प्रभावी ठरतो ? तर मला जे स्वप्न पडते त्या स्वप्नाचा भागीदार मी किती लोकांना बनवू शकतो ? ते स्वप्न  जणू त्यांचेच आहे अशी भावना त्यांची व्हावी असे वाटायला लावणे यात नेत्याचे यश असते. गांधींनी ते केले. त्यांची स्वप्न सगळ्या भारताची आहेत असे इतके सहज इतरांना वाटायला लावले की महान आंदोलन उभे राहिले. मी ते चर्चासत्र विसरलो पण तुमचा हा गांधी मात्र पक्का लक्षात राहिला. आता जेव्हा केव्हा कामात निराशा येते तेव्हा स्व्प्नांचे भागीदार आपण कमी बनवतो आहोत असे लक्षात येते व कामाला लागतो.
        राजकारणावर तुम्ही कमी बोलायचे पण तिरकस भाष्य अप्रतिम असायचे. महाराष्ट्रातील सत्ताधारी व विरोधक यांच्यातील मिलिभगत यावर एकदा तुम्ही हसून मला म्हणाला होता की तामिळनाडूत जयललितावर टीका केली की ती त्यांनाच लागते, द्रमुकवर टीका केली की ती द्रमुकलाच लागेल पण महाराष्ट्रात सत्ताधारी नेत्यावर टीका करावी तर तो विरोधी नेत्याला खेटलेला आणि विरोधी नेत्यावर टीका करावी तर तो सत्ताधारी खिशात त्यामुळे अंदाजच येत नाही.
दारूबंदी आणि ग्रामशिक्षण समित्या हा तुमच्या आस्थेचा विषय होता. आजही दारूबंदी हा विषय घेतला की व्यक्तिस्वातंत्र्याची ढाल पुढे करून अनेकजण नाके मुरडतात पण श्रीमंताची दारू आणि गरीबांना उध्वस्त करणारी देशी दारू हे दोन वेगळे विषय आहेत हे तुमच्यासारखी खेड्यापाड्यात फिरणारी व्यक्तीच समजू शकत होती.त्यामुळे अण्णा हजारेंसोबत तुम्ही धोरणात्मक पाठपुरावा करीत राहिलात. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तुम्ही अनेक नियम करायला लावले व सतत कार्यकर्त्याना अवैध दारू पकडायला अधिकार दिले पाहिजेत हे मांडत राहिलात. आज अवैध दारू विरोधात गावोगावी ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्याचा निर्णय जो झाला त्याच्यामागे तुमची प्रेरणी आहे हे कसे विसरता येईल ? प्राथमिक शिक्षण सुधारायचे असेल तर गावोगावी असलेल्या ग्रामशिक्षण समित्या सक्षम असायला हव्यात ही तुमची दृष्टी. देशात शिक्षणहक्क कायदा येण्याअगोदर ही नजर तुमची होती डॉक्टर. तुमची मुलगी मुक्ता आणि माझ्यावर तुम्ही ही जबाबदारी टाकली. राज्यातील या क्षेत्रातील संस्था एकत्र करून तुम्ही आमचे प्रशिक्षण आयोजित केले आणि सतत पाठपुरावा केला. पुस्तिका प्रसिद्ध केली. हा विषय पुढे नेला. त्यानंतर शासनाच्या धोरणाचा तो भाग बनला. त्यावेळी तुमची मोट बांधण्याची क्षमता मी अनुभवली.शासकीय संस्था,शिक्षणातल्या संस्था,प्रशिक्षण देणार्‍या संस्था या सर्वांना तुम्ही अगदी सहजपणे सहभागी करून घेतले..अनिसच्या अधिवेशनात आंदोलनात तुम्ही ज्याप्रकारे समाजातील मान्यवर सहभागी करीत होता ती क्षमता मला थक्क करणारी होती.
तुम्ही साधनाचे संपादक झाल्यावर तुमची वेगळीच क्षमता लक्षात आली.तुमची साहित्याची जाण,वैचारिक ऊंची आणि साहित्य,सांस्कृतिक क्षेत्रातील संपर्क यातून साधना अधिकच बहरत गेली.तुमचे वाचन आणि उच्च अभिरुचि यानिमित्ताने अनुभवता आली. तुम्ही संपादक झाल्यावर अनेकांना वाटले की साधना आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र होणार पण तुम्ही अंदाज चुकवला. त्या चळवळीचे काहीच साधनेत नव्हते आणि अनिस वार्तापत्रात साधना नव्हती.जणू दोन स्वतंत्र दाभोळकर नावाची माणसे काम करीत होती.हे तुमच्यातील professional कौशल्य वादातीत होते. संपादक म्हणून माणसे हेरणे मी जवळून बघितले आहे.मी एकदा आदिवासी मुलांवर सकाळ च्या रविवार पुरवणीत लेख लिहिला. दुसर्‍या दिवशी सकाळीच तुमचा फोन. मला वाटले लेख आवडला इतकेच बोलतील पण तुम्ही साधनाच्या वंचितांच्या शिक्षण या विशेषांकाचे संपादन करायला सांगितले आणि त्या अंकापासून मी नकळत वंचित आणि शिक्षण या दोघांशीही कायमचा जोडला गेलो...आज मागे बघताना जाणवते की तो अंक ही माझी या दोन्ही क्षेत्राशी जोडण्याची सुरुवात आहे अन्यथा मी काहीबाही लिहून दिवस काढले असते व तळातल्या वास्तवाची जाणीव त्या अंकापासून झाली.संपादक म्हणून तुम्ही किती जागे असायचे हे एकदा अनुभवले.एकदा साधनाच्या हॉल मध्ये कोणता तरी साहित्यिक कार्यक्रम होता.मी आणि तुम्ही आत ऑफिसमध्ये बसलेलो.नाटककार गो.पु. देशपांडे त्या कार्यक्रमाला आले होते व सहज इथे आत कोण बसलेय म्हणून ते डोकावले. तुम्हाला बघताच ते आत आले व उभेच राहून बोलत होते. त्या 3 मिनिटात तुम्ही भारतीय रंगभूमी आणि आणखी एक दोन विषयावर स्तंभ लिहाल का ? असे गप्पा मारता मारता विचारले.तेव्हा गो.पु.ना नाहीही म्हणता येईना..ते हसत हसत म्हणाले “तुम्ही खूपच पक्के संपादक दिसता....” आणि सुटका करून घेतली.. असे संपादक होते तुम्ही .
       काही काही तुमच्या सवयी अनुकरणीय अशाच होत्या. प्रत्येक पत्राला तुम्ही  उत्तर देत असत. आम्ही साध्या मेसेजला ही कधी उत्तर देत नाही धड.. पण इतक्या व्यस्त गर्दीच्या दिनक्रमात तुम्ही पत्र लिहीत. एकदा मी तुम्हाला पत्र लिहिले व अतिउत्साहाने फोन ही केला.तुम्ही सविस्तर बोलले आणि शेवटी म्हणाले “ तरीही माझ्या पद्धतीप्रमाणे तुला पत्राचे उत्तरही येईल “ आणि आले. अहमदनगरला भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुसूदन मुळे यांनी त्यांचे पुस्तक तुम्हाला  भेट दिले.तुम्ही गेल्यावर मुळे सर प्रत्येकाला पुस्तक वाचून तुमचे आलेले पत्र दाखवत होते. विचाराने पूर्ण विरोधी असलेल्या कार्यकर्त्याला  ही माणूस म्हणून जोडण्याची तुमची ऊंची थक्क करणारी होती.
        विनोदबुद्धी चे एक वेगळेच वरदान तुम्हाला होते. मी एकदा लोकसत्ता त Harry potter ला नोबेल मिळाल्यावर ती लेखिका भारतात येते व मराठी प्रकाशकांकडे येते आणि पुस्तक काढण्याचे बोलते पण आपले प्रत्येक प्रकाशक कसे आपले स्वभाव सोडत नाही अशी खिल्ली उडविणारा लेख लिहिला त्यात साधना प्रकाशन ही घेतले व  श्यामच्या आई पेक्षा आम्ही इतर बाल साहित्य मोजत नाही असे काहीतरी ते तिला उत्तर देतात असे लिहिले. तेव्हा मी साधनाच्या संपादक मंडळावर होतो. त्यामुळे तुम्हाला खूप फोन गेले. ते सांगताना ते तुम्ही खूप हसून सांगत होते व माझ्या चेष्टेला दाद देत होते. अशी जाहीर टिंगल करूनही त्याला दाद देण्याचा उमदेपणा तुमच्याकडे होता.
      आज तुम्हाला आठवताना तुमचे आणखी एक वेगळे वैशिष्ट्य लक्षात येते ते हे की आपल्या आयुष्यात आई सोबत आणखी काही व्यक्ति असतात की आपण कितीही चुका केल्या तरी आपल्याला माफच केले जाईल याची खात्री असते ते स्थान आयुष्यात तुमचे होते. हा माणूस आपल्यावर कधीच चिडणार नाही, आपण कितीही चूक केली तरी हा आपल्याला तोडणार नाही, प्रेमाने समजून सांगेन असे तुम्ही माझ्या आयुष्यात होता डॉक्टर. आज मी थोडाफार लेखक म्हणून माहीत झाल्याने सामाजिक वैचारिक आणि राजकीय क्षेत्रात अनेकजण परिचित आहेत पण भावनेच्या पातळीवर मनातले सगळे सांगावे , आपण जी काही धडपड सांगितल्यावर सहानुभूतीने आपले ऐकेल प्रोत्साहन देईल आणि चुकलो तरी पोटात घेईल अशी खूप थोडी ठिकाणे आहेत त्यात तुम्ही खूप महत्वाचे होतात. लहान मुलासारखे मी सगळे सांगत राहायचो आणि तुम्ही शांतपणे ऐकत राहायचे.. पुण्याहून  सातार्याला तुम्ही गाडीतून जाताना आपण फोनवर अनेकदा मारलेल्या गप्पा आठवून हे लिहिताना आज ६ वर्षानी गदगदून येते डॉक्टर...अनाथ होणे पोरके होणे काय असते हे डॉक्टर मी अनुभवले ..डोक्यावरचे छत्र हरपणे काय असते ? हे सारे सारे शब्द अर्थासह उमगले डॉक्टर .... एखाद्या गरीब  घरातील पोराने आई वडील वारल्यावर खूप मोठे व्हावे घर बांधावे आणि ते बघायला आई वडील नसावेत त्याची ती वेदना अशी माझ्यासकट अनेकांची भावना आहे ..एखादे पुस्तक आल्यावर एखादा पुरस्कार मिळाल्यावर तुम्ही आठवता ..आज तुम्ही असता तर ... दारिद्रयाची शोधयात्रा अहवालासाठी फिरताना अनेक ठिकाणी वेगळे काही दिसले की तुम्ही आठवायचे..मागे गडचिरोली त फिरताना शाळांची भयानक स्थिति बघून मी तुम्हाला तिथून फोन करीत होतो.... ते सारे आठवते.हा अहवाल आल्यावर तुम्ही किती बारकाईने मला प्रश्न विचारले असते आणि उपाययोजनेसाठी काय काय करायचे तुम्हाला सुचले असते किती कौतुक केले असते .....कल्पनाच करवत नाही.
         काळं हे औषध असते...माणसे मेली तरी विचार मरत नाही ही ठोकळेबाज विधाने खरी असतात की सांत्वनासाठी वापरली जातात मला माहीत नाही पण डॉक्टर माझ्यासाठी हे खोट आहे , तुमच्याविषयीच्या माझ्या दु :खावर कोणतीही काळाची माती लोटली जात नाही ..ते दू:ख तसेच कोरे करकरीत आहे स्मशनातून बाहेर येताना असते तसे .. अजूनही साधनात जिना चढताना मन आठवणीने भरून येते आणि पुणे सोडताना एसटी त एक विचित्र एकटेपणा दाटून येतो डॉक्टर.. तुम्ही गेल्यावर चळवळ दुबळी करण्याचा हेतु फसला... कार्यकर्त्यानी तितक्याच ताकदीने चळवळ पुढे नेली ...पण हे समाधान असताना तुम्ही नसण्याला अजूनही मन स्वीकारत नाही डॉक्टर.. मी काय करू ? अनेकांच्या मरणाने सरावलेले आमचे हिशोबी मन जगायला सरावण्याइतके कोडगे झाले आहे....पण मनाच्या खोल तळाशी जन्मभर व्यापून उरेल इतकी बेचैनी आहे ...ती भळभळती जखम माझ्यासोबत कायमच असणार आहे  ....शब्दात फक्त इतकेच सांगणे शक्य आहे .....डॉक्टर

                                                       हेरंब कुलकर्णी
                                            मुपोता अकोले जि अहमदनगर 422601
                                                     फोन ८२०८५८९१९५                     
 वरील लेख अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या दाभोलकर स्मृती विशेषांकात ऑगस्ट २०१९ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. या अंकाचे जरूर वर्गणीदार व्हा. अंकासंबंधित व वर्गणीबाबत राहुल थोरात यांना संपर्क करावा  ९४२२४११८६२                       

टिप्पण्या

  1. सर या लेखाने मन हेलावून टाकले तुम्ही . तुम्हांला दाभोलकर सरांचा विवेकाचा सहवास आणि आशीर्वाद लाभला . सरांच्या जाण्याने विवेकाचा बुलंद आवाज हरपला आहे . सरांचे वर्णन तुकारामांच्या शब्दांत करायचे झाल्यास ,

    विवेकासहित वैराग्याचे बळ | धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा ||

    उत्तर द्याहटवा
  2. सर, मी सुद्धा दाभोळकर सरांचा आजन्म चाहता आहे, आज तुमचा लेख वाचून अगदी भरभरून आले ,त्यांच्या आठवणी, तुम्हाला लाभलेला त्यांचा सहवास ,अगदी आनंदाची पर्वणी दिली सर आमच्या सारख्या पामराला. ..

    उत्तर द्याहटवा
  3. सर, लेख अतिशय सुंदर आहे, जणू डॉक्टर हे सगळं ऐकत आहेत असं वाटतं. डॉक्टरांवर सुरेश भट यांची एक गझल डकार ही तंतोतंत बसते. भटांच्या ओळीं मला आठवल्या
    करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची,
    रणात आहे झुंजणारे अजून काही।
    विझून माझी चिता युगे लोटली तरी ही,
    विझायचे राहिले निखारे अजून काही।

    उत्तर द्याहटवा
  4. काही जखमा कधीच बऱ्या होत नाहीत. जशी तुमची तशीच माझी

    उत्तर द्याहटवा
  5. सरांच्या बाबतीत एकच म्हणावेसे वाटते.
    "मी पाहिलेला संत".

    उत्तर द्याहटवा
  6. आदरणीय डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या सहृदय आठवणी, वैचारिक उंचीचे त्यांचे व्यक्तिमत्त्व साक्षात डोळ्यासमोर ऊभे राहिले.तसेच त्यांचा साधेपणा व महात्मा गांधींजींच्या विचारांचे पाईक बनून राहण्याची अतीव तळमळ ,तत्वांसाठी तडजोड न करणे इ.अनेक गोष्टी अधोरेखित झाल्या.खूप-खूप धन्यवाद सर.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा