सर्वेक्षण अहवाल निष्कर्ष
शेतकर्यांच्या
मुलांच्या रखडलेल्या लग्नांचा प्रश्न गंभीर
हेरंब कुलकर्णी आणि विठ्ठलराव शेवाळे यांनी ४५ गावात ३०६८ लग्न न झालेल्या तरुणांचा केलेला सर्व्हे
शेतकरी आंदोलन,शेतकरी कर्जमाफी यावर चर्चा सुरू असताना शेतीची दुरावस्था
झाल्याने शेतकरी कुटुंबात किती गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत याचे एक भयावह
वास्तव एका सर्वेक्षणात पुढे आले आहे. हेरंब कुलकर्णी व विठ्ठलराव शेवाळे यांनी
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले व संगमनेर तालुक्यात ४५ गावात लग्न रखडलेल्या शेतकर्यांच्या
मुलांचे सर्वेक्षण केले तेव्हा ४५ गावात लग्न रखडलेली ३०६८ तरुण मुले आढळली.त्यात ७७४ तरुण मुलांची वये ३० ते
४० च्या दरम्यान आहेत. शेतीमालाला भाव नसल्याने व शेतीव्यवसाय उध्वस्त होण्याचा
परिणाम शेतकर्याची कुटुंबसंस्थाच उध्वस्त होण्याच्या दिशेने जात असल्याचे वास्तव या
सर्वेक्षणाने पुढे आले आहे. विशेष म्हणजे यात सर्व जातीचे शेतकरी आहेत. या
सर्वेक्षणाला पूरक म्हणून शेवगाव(पुणे) पुणे व सोलापूर जिल्ह्यातील १० गावांची
पाहणी केली असता तिथेही तेच चित्र दिसले.याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रात कमी अधिक
संखेने हेच वास्तव असल्याचे पुढे आले आहे.
शेतकरी आंदोलन मागील महिन्यात सुरू झाल्यावर
शेतकरी कार्यकर्ते रोहिदास धुमाळ यांनी हेरंब कुलकर्णी यांना हा प्रश्न लक्षात
आणून देवून काही गावात नेवून हा प्रश्न दाखविला. सुरवातीला यावर विश्वास बसला नाही
तेव्हा अकोले व संगमनेर तालुक्यात . हेरंब कुलकर्णी व विठ्ठलराव शेवाळे यांनी ४५ गावात सर्वेक्षण केले . तेव्हा २५ ते ३० वयोगटातील २२९४ तरुण मुले व ३१ ते ४० वयोगटातील ७७४ तरुण
मुले आढळली. यातील बहुसंख्य मुले
अल्पभूधारक असून शिक्षणही चांगले आहे. अनेकजण पदवीधरक आहेत. ४ मुले एम.बी.ए.
झालेली असून बेकार असल्याने व शेती करीत असल्याने लग्न रखडले आहे. ३० वयोगट
उलटलेल्यांनी तर आता लग्नाची आशा सोडून दिली आहे. दोन
मोठ्या गावात तर ३०० व २५० मुले सापडली तर
१०० पेक्षा जास्त मुले आढळलेलीही १२ गावे आहेत. ५० पेक्षा जास्त मुले असलेली ८
गावे आहेत. केवळ अल्पभूधारक च नव्हे तर अगदी १० एकर जमीन असलेल्या कुटुंबात
ही लग्न होत नसल्याचे दिसून आले. एका
कुटुंबात तर ६० गुंठे जमीन असल्याने ३ मुलांची लग्न रखडल्याचे भीषण वास्तव
दिसल्याचे हेरंब कुलकर्णी व विठ्ठल शेवाळे यांनी सांगितले.
गावकर्यांशी बोलल्यावर हे वास्तव
गेल्या ४ वर्षात अधिक गडद झाल्याचे त्यांनी सांगितले.सर्व जातीतील मुले यात
असल्याने आता शेतकरी हीच एक जात असल्याचे लक्षात आले.लग्न रखडण्याची अनेक कारणे या
सर्वेक्षणातून पुढे आली. त्यात २०१२ च्या दुष्काळ व त्यानंतर सतत भाव पडण्याची
प्रक्रिया,वाढलेला उत्पादन खर्च यातून शेतीवर जगणे अधिक कठीण
झाले.परिणामी शेतकरी बाप आपल्या मुलीला अजिबात शेतकरी कुटुंबात द्यायचे नाही या
निष्कर्षावर आले आहेत. मुलीही माहेरी बघितलेले शेतीचे हे भयावह वास्तव व त्यात
करावे लागणारे जनावारासारखे कष्ट यामुळे लग्न करून शेतकरी कुटुंबात जायला उत्सुक
नाहीत. पूर्वी मुली वडिलांच्या पुढे निर्णयात जात नसत पण एकूणच मुलींची संख्या कमी
झाल्याने मुलींना मागणी वाढली.त्यात ८ वीपर्यंत नापासी नाही व बोर्डाच्या सोप्या
परीक्षा गेल्या १० वर्षात गावोगावी झालेले ज्युनिअर कॉलेज, बालविवाह थांबविण्याची झालेली चळवळ व जागृती यामुळे मुली सहज
आज १२ वी पर्यन्त शिकू लागल्या. त्यातून अधिक चांगल्या जीवनाची तयार झालेली
आकांक्षा,शहरी महिलांशी होणारी तुलना, यातून व्यक्तिमत्व विकासाची व चांगल्या जीवनशैलीची आस तयार
झाली त्यामुळे शिकलेल्या मुली नोकरदार व शहर याला प्राधान्य देवू लागल्या व
त्यातून हे वास्तव तयार झाले.
एक शेतकरी म्हणाला की आज खेड्यात १० एकर
असण्यापेक्षा तालुक्याला १० बाय १० चे दुकान असले तर लवकर लग्न होते. त्यातून अनेक
गावात लग्नाच्या मुलांना सहकारी संस्थात लग्न होईपर्यंत नोकरीला ठेवा अशी गळ घालणारे
कार्यकर्ते आहेत तर अनेक तरुण सिन्नर,चाकण येथील कारखान्यात लग्न जमेपर्यंत नोकरी
मिळवायची धडपड करीत आहेत. एका कुटुंबात नोकरी करणार्या धाकट्या मुलाचे लग्न झाले
व मोठ्या मुलाचे लग्न राहिले अशी विषण्ण स्थिति बघण्यात आली. यावर्षी झालेल्या
लग्नात शेतकरी मुलांची किती लग्न झाली ? असा
नेमका प्रश्न विचारला तेव्हा ती संख्या जवळपास नाही अशीच आढळली. एका गावात एकूण २७
लग्न यावर्षी झाली त्यात फक्त २ लग्न झाली व तीही नात्यातील होती. पिंपळगाव देपा येथील
ज्ञानेश्वर उंडे यांनी सांगितले की मी दरवर्षी १०० लग्ने कित्येक वर्षे जमवली आहेत
पण गेल्या ३ वर्षात एकही लग्न मी जमवू शकलो नाही. या तीन वर्षात एकाही मुलीचा बाप
माझ्याकडे आला नाही पण मुलाचे बाप मात्र विचारात आहेत.
महाराष्ट्रात इतरत्र चित्र कसे आहे ?हे बघण्यासाठी काही मित्रांना विनंती केली तेव्हा
सोलापूरजिल्ह्यातील सतीश करंडे (४ गावे )पुणे जिल्ह्यातील विठ्ठल पांडे(४गावे) व
शेवगावचे उमेश घेवरीकर (२ गावे) यांनी पाहणी केली.तेव्हा या १० गावात ३१९ मुलांची
लग्न रखडल्याचे आढळले. महाराष्ट्राच्या जिल्हया जिल्ह्यात पाहणी केल्यास हेच
वास्तव असल्याचे आढळले.
या
शेतकरी अगतिकतेतून अनेक विधायक व विघातक गोष्टी घडत आहेत. विधायक बाबीत मुलीच्या
बापाचे लग्नातील शोषण कमी होत आहे.हुंडा प्रथा कमी होते आहे .अनेक ठिकाणी
मुलाकडच्यांनी लग्न करून मुली लग्न करून आणल्या आहेत.विधवा व परित्यक्ता,अनाथ आश्रमातील मुली यांच्याशी लग्न करण्याचे प्रमाण वाढते आहे.
नाशिक,यवतमाळ ,ठाणे
या भागातील आदिवासी भागातील मुलींशी आंतरजातीय विवाह करण्याचेही अल्प पण लक्षणीय
उदाहरणे आढळली हे सकारात्मक पैलू आहेत तर अडलेल्या शेतकर्यांचा गैरफायदा घेणारे एजंटही
निर्माण झाले आहेत. अगदी मुली दाखविण्याचे ५००० रुपये घेणे,इतर जिल्ह्यातील मुलीशी लग्न लावून देणे असे उद्योग ते
करतात.यातून अनेकांची फसवणूक ही झाली आहे.शेतकर्याच्या वेदनेचा असा बाजार मांडला
जातो आहे.
जिरायती गावात तर हा प्रश्न खूप गंभीर
होतो आहे.त्यातून गावाबाहेर व शेतीबाहेर पडण्याची मानसिकता तयार होते आहे. सारोळा
पठार या दुष्काळी गावातील ३०० कुटुंबातील ४१२ मुले गावाबाहेर नोकरी किंवा
व्यवसायाला गेले असल्याचे प्रा.दिलीप पोखरकर यांनी लक्षात आणून दिले. वाढते
नागरीकरण हे उध्वस्त होणार्या शेती धंद्यातून तयार झाल्याचे हे वास्तव अधोरेखित
करते.बागायती गावात हा प्रश्न नसेल असा समज होता पण अनेक बागायती व प्रतिष्ठित
असलेल्या गावातही हा प्रश्न गंभीर असल्याचे लक्षात आले.
यावर दीर्घकालीन उपाययोजना म्हणजे
शेतीमालाला भाव देवून शेती करण्यातली प्रतिष्ठा उंचावणे हाच आहे. नोकरीत व्यवसायात
जसे शाश्वत उत्पन्न मिळते तसे शेतीत जेव्हा मिळेल व शेतीतील अमानुष कष्ट यांत्रिक
वापराने कमी होतील तेव्हाच शिकलेल्या मुली आनंदाने शेतकरी जोडीदार निवडतील. पण
तात्कालिक उपाय म्हणून शेतकरी कार्यकर्ते,
गावातील प्रतिष्ठित यांनी अशा गावनिहाय याद्या करून जिल्ह्यात व जिल्हयाबाहेर अनेक
गावांशी संपर्क करून अशा गरजू कुटुंबांचा शोध घ्यावा असे अनेकांनी सुचविले.
प्रगतीशील उपसरपंच बाळासाहेब मालुंजकर यांनी परभणी जिल्ह्यातील एक गाव व त्यांचे
गाव अशी गाव ते गाव सोयरीक करण्याचा प्रयत्न केला होता. असेही प्रयत्न व्हायला
हवेत . निराश होत असलेल्या या मुलांचे समुपदेशन करणे ही आवश्यक आहे. या कुटुंबाशी
संवादी राहण्याची गरज आहे.या मुलांचे पालक सतत चिंतेत असल्याचे आढळले.नैराश्यातून
अल्प संख्येने काही मुले व्यसनाकडे ही वळत आहेत.
ही समस्या अशीच दुर्लक्षित राहिली तर १०
वर्षानी खेड्यात वेगळेच गंभीर प्रश्न निर्माण होतील. या मुलांची नैराश्यातून शेतीतील कार्यक्षमता ही कमी
होईल.
शेतीच्या
प्रश्नांची चर्चा करताना इथून पुढे या गंभीर पैलूची चर्चा करायला हवी. ज्येष्ठ
शेतकरी नेते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत म्हणाले की “ या नव्या आर्थिक चातुर्वर्ण्य
व्यवस्थेत शेतकरी आता नवशूद्र ठरतो आहे
हेच विदारक वास्तव हे सर्वेक्षण पुढे आणते आहे.सुखासिन इंडिया निर्माण होताना
अमानुष कष्ट असलेल्या या भारतात शेतकरी अधिक केविलवाणा झाला आहे . “
या सर्वेक्षणासाठी रोहिदास धुमाळ, शांताराम गजे, निलेश तळेकर, दिलीप
पोखरकर,विनोद हांडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
१०० पेक्षा जास्त रखडलेली लग्न असलेली गावे =
|
५० ते १०० रखडलेली लग्न असलेली गावे =
|
१२
|
८
|
एकूण गावे
|
२५ ते ३० वयोगटातील रखडलेली लग्ने
|
३१ ते ४० वयोगटातील रखडलेली लग्ने
|
४५
|
२२९४
|
७७४
|
सर्वेक्षण केलेले
हेरंब
कुलकर्णी (९२७०९४७९७१) विठ्ठलराव शेवाळे (९३७२०१२२२१)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा