'माझे विद्यार्थी' या पुस्तकाला हेरंब कुलकर्णी यांची प्रस्तावना


              


                          माझे विद्यार्थी पुस्तकाला हेरंब कुलकर्णी यांची प्रस्तावना                                                                                                                                                                                                                      ( एका शिक्षकाने अतिशय संवेदनशीलतेने रेखाटलेली आपल्या विद्यार्थ्यांची व्यक्तिचित्रे.  हे पुस्तक साधना प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे  )
                        


     






       साने गुरुजी यांच्या साधनाने काटेमुंढरीच्या मुनघाटे गुरुजींनंतर त्याचा परंपरेच्या मेटकरी गुरुजींना महाराष्ट्रापुढे आणले आहे. हे पुस्तक केवळ काही विद्यार्थ्यांच्या शिक्षकाने लिहीलेल्या आठवणी नाही तर त्यापेक्षा बरच काही आहे. शिक्षक विद्यार्थी नात्यापुरतेच मर्यादित नाही तर शिक्षक आणि समाजाचे नाते. शिक्षकाच्या कामाची कक्षा कुठपर्यंत जावी आणि सामाजिक प्रश्न आणि शाळांची भूमिका अशा अनेक अर्थांनी महत्वाचे आहे.
                  शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते हे व्यवस्थात्मकच बदलत गेले आहे. पूर्वी ऋषिकुल व्यवस्थेत विद्यार्थी १२ वर्षे विद्यार्थी शिक्षकाकडे च राहायचा तिथपासून तर आज ऑनलाइन कोर्सेस होमस्कूलिंग पर्यन्त शिक्षक केवळ ऑनलाइन इथपर्यंत भूमिका सीमित झाली आहे. तेव्हा शिक्षक विद्यार्थी नातं कोणत्या पातळीवर असावं याच उत्तर शोधताना हे पुस्तक एक दीपस्तंभ म्हणून महाराष्ट्राच्या शिक्षणविश्वात उभे आहे. पूर्वीच्या गाव व्यवस्थेत शिक्षक गावाचे शहाणपणा होता.(काटेमुंढरीच्या प्रस्तावनेत हा मुद्दा मी विस्ताराने मांडलाय.)  नव्या नागरीकरणाच्या बदलात शिक्षक खेड्यात न राहता अपडाउन संस्कृती आली आणि हळूहळू शिक्षक विद्यार्थी नातं हे शाळेपूरते सीमित होत गेलं. शहरी भागातल्या शाळेत ही शिक्षक असणं हा इतर नोकरीसारखा पेशा बनत गेला. त्याची कारणं अनेक असतील पण वाढत्या नागरीकरणात शाळेच्या कवेत गाव मावत नाही हे वास्तव पुढं आलं. पण हे होताना शाळेची भूमिका गाव शहराच्या निर्णय प्रक्रियेत मर्यादित होताना मुलांचे प्रश्न मात्र संपले नाहीत ते अधिक गंभीर झाले. एखादा जुना चित्रपट नव्याने काढताना त्याचे कथानक पुढे सरकत जावे तसे मेटकरी गुरुजींच्या बाळबोध गावातील मुलांच्या वाट्याला आलेल्या त्या प्रश्नांचा परीघ आज विलक्षण गुंतागुंतीचा झाला आहे. त्या अल्लड शबानावर आता नुसता अत्याचार होत नाही तर ती विकली जाते. तिच्या वस्तीत अनेक गजा वेदना लपवत आईच्या गिर्हाइका ची सरबराई करतात. अनेक शिल्पा चव्हाण,सुनेत्रा बालविवाहातून अनेक अर्थाने उधवस्त होताहेत.केवळ तमाशा बघणारा राजेश आज पोर्न बघताना कुठल्या कुठे फेकला जातोय. जितेंद्र म्हस्केचा, हरीश गिरीश चा निरागस खोडकरपणा चित्रपटाच्या प्रभावाने आज वर्गमित्रांचे जीव घेण्याइतपत पोहोचलाय..
                               शहरी भागात तर जीवनसंघर्ष तीव्र होताना त्याचे अपरिहार्य बळी मुले ठरत गेली. वाढत्या झोपडपट्ट्या, बालमजुरी, बालविवाह, देहव्यापारासाठी मुलांची विक्री, कुटुंबांचे स्थलांतर त्यातून होणारी गळती हे कनिष्ठ आर्थिक स्तरात तर मध्यमवर्गीय स्तरात कोलमडणार्‍या कुटुंब व्यवस्थेत मुलांच्या भावविश्वाची होणारी पडझड, उच्च मध्यमवर्गीय होण्याच्या नादात मूल्यव्यवस्थेला आलेले पराभूत स्वरूप,माध्यमक्रांतीने मुलांना येणारे प्रौढपण,पालकांच्या महत्वाकांक्षाचा येणारा मुलांवरचा तणाव हे सारं घडताना आज समाजाला हजार मेटकरी गुरुजी हवे आहेत पण व्यवस्थात्मक रचना आणि सारेच संदर्भ बदलत चाललेत म्हणून या पुस्तकाच आज औचित्य खूप महत्वाच वाटत
          या बदलत्या वास्तवात रघुनाथ मेटकरी या वेड्या ध्येयवादी शिक्षकाच काय करायचं हा मला पडलेला प्रश्न आहे. मेटकरी चा ही मुलांप्रतीची टोकाची संवेदनशीलतेचे आजच्या व्यवस्थेत नेमके औचित्य काय ? याचा मी विचार करतो आहे . मेटकरीना साने गुरुजींच्या धडपडणार्‍या मुलात समाविष्ट करून त्यांची आरती करणे सोपे आहे . मुख्य प्रश्न ही तीव्रतर संवेदना आज ढासळणार्‍या समाजव्यवस्थेत आणि त्यापेक्षा अधिक कोरडीठाक होत चाललेल्या शिक्षणव्यवस्थेत कशी संक्रमित करायची  ?
             रघुनाथ मेटकरी....
                           काय म्हणायचं या माणसाला. एक शिक्षक. पालक की सामाजिक कार्यकर्ता.
   एखादा समीक्षक म्हणेल की प्रत्येक शिक्षकाला आयुष्यभर मुलं भेटतच असतात. शाळेतली मुलं हा काय लेखनाचा विषय असू शकतो ? मी ही हिशोब मांडून पहिला.३५ वर्षाच्या जुन्या नोकरीत दरवर्षी ४० प्रमाणे विद्यार्थी धरले तर १४०० विद्यार्थी एका शिक्षकाच्या वर्गात असतात.यातली अगदीच वेगळी मुले फक्त लक्षात राहतात.मी हि आठवून बघतो पण इतक्या तपशीलानं नाही आठवत..पण मेटकरी गुरुजींना बिनचेहर्‍याची सगळी मुले त्यांच्या पूर्ण नावानिशी आठवतात.त्यातली बिनचेहर्‍याची,जीवनसंघर्षात हरलेली ही मुलं इतक्या वर्षांनंतर त्यांना जशीच्या तशी आठवतात.    
                           
                    . शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृतीच असते . ती समाजापासून वेगळी काढता येत नाही. समाजातले प्रश्न शाळेत येवून उभे राहतात आणि अनेकजण शाळा आणि त्या प्रश्नांना वेगळे करत सुटका करून घेतात.ते काहीसे स्वाभाविक ही आहे.. मेटकरी यांनी शाळेत घुसलेल्या या प्रश्नांना शाळेत उत्तरे शोधली आणि त्याचबरोबर प्रसंगी शाळेबाहेर जाऊन उत्तरे शोधली. या त्यांच्या धडपडीचे विश्लेषण करायला हवे. आज माझ्या सारखे लोक नोकरी वेगळी आणि करियर वेगळे अशा रीतीने जगतात. यातून त्या नोकरीतली मानसिक गुंतवणूक मर्यादित राहते. पण मेटकरी सारख्या शिक्षकांची नोकरी हेच साध्य आणि नोकरी हेच साधन असते. आयुष्याचा अर्थच ते नोकरी त शोधतात. यातून त्यातली प्रत्येक गोष्ट त्यांच्या अस्तित्वाशी जोडली जाते. या मुलांशी त्यांचे इतके घट्ट नाते आहे की बारीकसारीक तपशील हि जसेच्या तसे त्यांना आठवतात.राजेशच्या घरी गेल्यावर त्याच्या वडिलांचे सर्व पेंटिंगचे विषय आठवतात . सुनेत्रा लहानपणी काया काय बोलायची हे जसेच्या तसे आठवते हि त्या एकरुपतेची लक्षणे आहेत. हे वाचताना एकीकडे त्यांचे कौतुक वाटत राहते तर दुसरीकडे समाजातील क्रौर्य ,विषमता ,शोषण हे सारे जळत जळत निष्पाप मुलांच्या आयुष्यापर्यंत येते हि वेदना दुसरीकडे छळत राहते.
                 शाळेच्या बाहेर जाऊन तुरुंग आणि मुलांना स्थिरसावर करण्याच्या प्रयत्नाचे एक कारण  हे हि आहे की प्रत्येक प्रसंगाला स्वत: ला उत्तरदायी मानणे हा हि भाग आहे. या पिढीने राष्ट्रीय उत्तरे शोधण्याऐवजी मी काय करू शकतो हे उत्तर शोधल. अंधश्रद्धा देशपातळीवर दूर भले होईल नं होईल पण देवर्षि प्रकरणात ते त्या मुलाला अंधश्रद्धेतून बाहेर काढायला, बालविवाह थांबोत नं थांबोत पण सुनेत्रासाठी ते जिवाच रान करतात. वंचित विकास वगैरे शब्द हही  न वापरता ते वंचित समाजातल्या कितीतरी मुलांना शिक्षणातून माणसांचे वर्ग बदलतात याची अनुभूती मिळवुनं देतात..मी नाही केले तर कुणीच करणार नाही ही स्वत: ला उत्तरदायी बनविण्याची  तीव्रतर भावनाच मेटकरी गुरुजींना टोकाला जाऊन मुलांसाठी हलवून टाकते
        नीलची शाळा या पुस्तकात उपद्रवी विद्यार्थ्यांचे सुरेख विश्लेषण आहे. या मुलांच्या उपद्रवीपणाचे कारण कुठल्यातरी कौटुंबिक समस्येत असते. त्यामुळे तो उपद्रव संयमाने समजून घ्यायचा असतो. हे तत्वज्ञान माहीत असेल किंवा नसेल पण ज्या संयमाने ते उपद्रवी मुलांना समजून घेतात त्याची कमाल वाटते. त्यातूनच प्रश्न सोडविण्याची  समजून घेण्याची वाट सापडते.
             आज शिक्षण व्यवस्थेची कोंडी उमजून घेताना लक्षात येतं की इमारती,संसाधन,तंत्र्ज्ञान नजीकच्या काळात सर्वत्र पोहोचतील पण तरीही गळतीचा दर काही कमी होईना. पदवीपर्यन्त ८० मुलं अजूनही गळतात. ती गळती रोखायला व्यवस्थात्मक उपाय करावेच लागतील पण समाजव्यवस्थेचे कठोर धक्के या लेकरांना बसू नये म्हणून गाडीला असतात तसे शोक ओप्रेस्स गरजेचे असतील. मेटकरी नी  नेमके तेच काम केले. सोसाट्याच्या वार्‍यात पणतीभोवती पदर धरणार्‍या गृहिणी च काम केलं.काही पणत्या विझल्या पण पदर धरल्याच समाधान तरी गाठीशी राहीलं...  
                 पुस्तक संपल्यावर गुपचुप मी स्वत: ला प्रश्न विचारला की खरच इतक टोकाच प्रेम मी माझ्या विद्यार्थ्यांवर करतो आहे का ? ते उत्तर सांगण्याच धैर्य माझ्याजवळ नाही पण मित्रांनो ती प्रेमभावना संक्रमित करण्याचं काम मेटकरी गुरुजींनी माझ्यातल्या शिक्षकात केलं...आकडेवारी आणि आत्मकेंद्रिततेत हरवलेल्या शिक्षणव्यवस्थेला या पुस्तकाचा हाच सांगावा आहे          

                                                                हेरंब कुलकर्णी
   

टिप्पण्या

  1. खूप छान सर . समर्पित शिक्षकाची गोष्ट मुनघाटे गुरुजींनंतर अनेक दिवसांनी वाचायला मिळाली .

    उत्तर द्याहटवा
  2. साहेब, असे अनेक शिक्षक आजही मोठ्या संख्येने समाजात आहेत. नाही असे नाही. परंतु समाजमाध्यमातून नको त्यांना प्रसिद्दी मिळत राहते आणि या प्रसिद्धीच्या मार्‍यात मेटकरी गुरुजीसारखे आदर्श मागेच राहतात. कारण त्यांना प्रसिद्धीविषयी काहीच देणे घेणे नसते. त्यांना त्यांचे घेतलेले काम महत्वाचे वाटते. आणि पर्यायाने समाजात नको ते आदर्श स्वीकारले जातात. असे हजारो शिक्षक आजही आहेत, जे कल्पनातीत काम करतात परंतु त्यांच्या कार्याची कुठेही दखल घेतली जात नाही. उलट अशा शिक्षकांची दुखरी बाजू शोधून काढून त्यांना नामोहरम करण्याचाच उपद्व्याप सर्रास चालतो. तरीही ते न थकता आपल्या मार्गाने चालत राहतात, वाट संपेपर्यंत ....

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा