आमच्याही पाऊसाची नोंद घ्या . (आदिवासी भागातील जीवघेण्या पावसाचे वर्णन करणारा लेख (हेरंब कुलकर्णी)
(हा लेख रविवार दि. ११ ऑगस्ट २०१९ रोजी लोकमतच्या मंथन पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे)
सध्या मुंबईतील रौद्र
पावसाच्या बातम्या सुरु आहेत, २६ जुलै च्या पावसाच्या वेळी फार कॅमेरे नव्हते आता
या पावसाला कॅमेरे आणि सोशल मिडिया असल्याने हा पाउस राज्यभर पोहोचतोय. बंद पडलेली
मुंबई आणि थांबलेली रेल्वेची चाके हे सारे दाखवताना त्याला जबाबदार कोण हे दडपणही
मिडिया निर्माण करू शकते. बातम्यांची सततची झड प्रशासनाला हुडहुडी भरायला लावू
शकते पण हे भाग्य आमच्या दुर्गम भागातील पावसाला नाही.या पावसाचे तपशील पोहोचत
नाही. आमच्या म्हणजे आदिवासी भागातील
पावसाची भीषणता अजून पोहोचत नाही समाजापर्यंत. त्यामुळे त्या वेदनेला पैलतीर उगवत
नाही. .
आदिवासी भागातला पाउस हा भात खाचरे लावण्यापुरताच
परिचित असतो कारण पाउस सुरु झाला की हमखास त्याचे फोटो यायला लागतात. ते चित्र
मोठे सुंदर असल्याने ते सुखद असते. पण झड लागलेला पाउस काय हाहाकार उडवत असतो ते
पावसाच्या पाण्याबरोबरच जाते. कोणत्याही आदिवासी पट्ट्यात सलग ८ किंवा १५ दिवस
पाउस सुरु राहतो. हवामान बदलानंतर तर हे प्रमाण जास्तच वाढले आहे. एक एक धरण भरेल
इतका प्रचंड पाउस आदिवासी भागात होत राहतो. अहमदनगर जिल्ह्यातील भडारदरा धरणात
केवळ एक महिन्याच्या पावसात ११ टीएमसी पाणी जमा होते यावरून त्या कोसळणाऱ्या
पावसाची तीव्रता लक्षात यावी. मुंबईसारख्या ठिकाणी रुळावर पाणी येणे यासारख्या
लक्षणांनी ती तीव्रता मोजता येते. पण आदिवासी भागात ते कसे मोजणार ? ती तीव्रता
कुपोषण आणि बालमृत्यूनीच मोजली जाते. एकदा पावसाची झड सुरु झाली की सगळे जनजीवन ठप्प
होऊन जाते. अघोषित संचारबंदी लागू होते. अशा पावसात भात लावणी करावी लागते. त्यानंतर
सगळ्यात वाईट उपासमार सुरु होते. ज्यांची जरा बरी स्थिती आहे त्यांच्याकडे धान्य
साठवलेले असते. ते तग काढतात पण हातावर पोट असणाऱ्यांची दैना होते. लहान मुले
बारीक तोंड करून बसलेले असतात. पावसाळ्यात नदीतल्या किवा शेतातल्या रानभाज्या खाऊन
दिवस काढावे लागतात. अनेक दिवस वादळामुळे लाईट नसल्याने धान्य दळून मिळत नाही की
खरेदीला जास्त दूर जाता येत नाही.. आणि खरेदीला रोख चलन ही फार नसते. ‘दारिद्र्याची
शोधयात्रा’ या अहवालाच्या निमित्ताने फिरताना आदिवासी भागात पावसाळ्यात खाण्याचे
हाल होतात हे सगळीकडेच सांगितले. अनेक घरात रानभाज्या वाळवून ठेवलेल्या दाखविल्या.
पुन्हा घरात चलन यायला काम मिळायला हवे. भातलावणी झाली की पुढे अनेक दिवस काम निघत
नाही शेतात. इतक्या पावसात काम मिळत नाही त्यामुळे पैसा नाही. ऐन पावसाळ्यात
कामासाठी दूर जिल्ह्यात स्थलांतर करणारे मजूर ही बघितलेत. महिनाभरात फारतर १० दिवस
काम मिळाल्याचे लोक सांगायचे. गढूळ पाण्यात नदीत मासे वाहत येतात ते पकडून दिवस
काढणारे आदिवासी भेटले.
सतत पाउस सुरु झाला की तापमान खाली
जाते. हुडहुडी भरते. घराजवळ साठवून ठेवलेल्या लाकडांनी चूल दिवसरात्र सुरु ठेवली
जाते पण संपूर्ण घराला उब फार मिळत नाही. पोटभर अन्न नसल्याने थंडी जास्तच वाजते, माणसांच्या
भुकेची आपण बात करतो पण खरी उपासमार होते ती जनावरांची. साठवलेला चारा संपला तरी जोरदार पावसात
जनावरांना डोंगरावर नेणे मुश्कील असते. त्यामुळे जनावरे उपाशीच राहतात. घराच्या
आजूबाजूला उगवलेले खुरटे गवत खावून काही दिवस काढतात. थंडीने ते ही कुडकुडत
राहतात. थंडीने ते मरू नयेत म्हणून गोठा नसलेले आदिवासी त्या जनावरांना राहत्या
घरात घेतात. तिथेच त्यांचे मल मुत्र विसर्जन आणि सगळे काही. या दिवसात ही माणसे
आणि जनावरे जिवंत राहतात कशी हाच प्रश्न पडतो. या काळात आजारी पडले तरी पावसाचा
गैरफायदा घेवून काही ठिकाणी दवाखाने बंद. मेळघाटात बालमृत्यू याच दिवसात होतात ,तो
प्रश्न किमान पोहोचल्याने सरकार आणि मैत्री सारखे प्रकल्प सजग झाल्याने जीव वाचतात. रेल्वे रुळावर किंवा
पुणे मुंबई रस्त्याची कोंडीला किमान बातमी होण्याचे तरी भाग्य लाभते पण आदिवासी
गावातील रस्ते वाहून जातात आणि चिखलातून पुढे कितीतरी दिवस जा ये करावी लागते. आजही
अनेक ठिकाणी पेशंटला डोली करून मुख्य रस्त्याला आणावे लागते. रस्ते मंजूर होतात
आणि ठेकेदार इकडे कोण येणार बघायला म्हणून निकृष्ट बांधकाम करून चेक घेतात ,नेते
कमिशन घेतात आणि पावसाळ्यात हे रस्ते वाहून जातात. पण मुंबईतील प्रश्सानाला जाब विचारणारी
मिडिया आणि सोशल मिडिया इकडे नसते.
आश्रमशाळा याच परिसरात असतात. त्यांचे
हाल तर विचारू नका. लाईट अनेक दिवस जाते. अंधारात राहावे लागते ,अनेक ठिकाणी
जनरेटर असले तरी पण धड चालत नाहीत. लाईट
नसल्याने दळण मिळत नाही .अनेकवेळा भात खावा लागतो. वादळी पावसात पत्रे वाजत
राहतात. (आता slab इमारती वाढताहेत) कपडे वाळत नाही. खिडकीतून पाणी
आत येवून ओल असते. अशा स्थितीत झोपावे लागते. हे ४ महिने शिक्षण भिजून जाते. आदिवासी
इतक्या पावसाचा अत्याचार सहन करतांना त्याच
पाण्यावर धरणे भरतात. पाणलोट क्षेत्र या एका शब्दात त्यांची ओळख पुसून टाकली जाते.
धरण भरायला लागले की पर्यटक गर्दी करतात ,ज्या गावाना या पाण्याचा लाभ मिळणार आहे
ते लाभ क्षेत्रातील लोक क्रिकेटचा स्कोर मोजावा तसे आज किती पाणी वाढले ते मोजत
राहतात ,स्थानिक मिडीया ती उत्सुकता पुरवत राहते. जसजसे आकडे फुगत जातात तसतसे लाभक्षेत्राच्या
आनंदाला उधाण येते, धरणाच्या भिंतीजवळ बिअर फेसाळू लागते पण इतके प्रचंड पाणी
जिथून येते त्या माणसांचे जनावारांचे काय होत असेल ? एकाच दिवशी एक TMC पाणी धरणात येताना त्या पाचट घातलेल्या घरांचे
काय होत असेल ? ती माणसे कशी शान करत असतील हा प्रश्न सुद्धा कुणाला पडत नाही.
आणि क्रूर विनोद हा
की सगळे पाणी वाहून गेल्यावर या आदिवासी गावांना उन्हाळ्यात हंडे घेवून tanker मागे फिरावे लागते. दया पवारांच्या धरण कवितेची
आठवण यावी असेच ते दृश्य असते. दया पवार
लिहितात ‘घोटभर पाण्यासाठी सारे रान धुंडाळीते,बाई मी धरण
बांधते’ तशी स्थिती असते. धरणाखाली साखर कारखाने आणि शेतात उस उभा राहतो
आणि ज्यांनी तो पाउस अंगावर झेलला आणि ज्यांच्या मागच्या पिढ्यांनी धरणासाठी जमिनी
दिल्या ते मात्र पावसाळ्यात भिजलेले आणि उन्हाळ्यात तहानलेले असे आदिवासींचे भागधेय
आहे.
आदिवासी भागात रस्ते वाहून गेल्यावर पुलावर
पाणी असल्यावर अनेकदा कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागते.चंद्रपूर जिल्ह्यात
सावली तालुक्यात एका गावाची ग्रामपंचायत शेजारच्या गवात पण पाऊसाने पाणी भरले कि
अतिदूर प्रवास करून जावे लागते. काही गावांना धरणातील बोटीने त्यांच्या गवात जावे
लागते पण पाउस वाढला कि बोट बंद होते आणि कित्येक किलोमीटर चालत जावे लागते..केवळ
पावसामुळे दरड कोसळून रस्ता बंद झाला तरी लोक अस्वस्थ होतात..पण हे लोक शांतपणे चालू
लागतात. काही वर्षापूर्वी आमच्या तालुक्यात एका गावातून एक आदिवासी आपल्या मुलाला
आश्रमशाळेत सोडायला निघाला. पुलावर पाणी होते. नदीला पूर. त्यामुळे पलीकडे जाण्यासाठी
पाणी किती खोल म्हणून बघायला तो पाण्यांत
उतरला आणि लाट आली जोरात आणि वाहून गेला. ते लाहान पोरग वडिलांना हाक मारते आहे
आणि बाप दिसेनासा झाला पाण्यात.. त्या मुलाची मनस्थिती मला कवी असूनही रेखाटता येत
नाहीये. तो मुलगा कित्येक वर्षे ते विसरू शकला नसेल.
मुंबईच्या आणि शहरी भागातल्या पावसात
फुटपाथवर राहणारे कसे जगत असतील ? झोपडपट्टीत लोक कसे जगत असतील ? याची कल्पना हातात
चहाचा कप घेवून टीव्हीवर पावसाच्या बातम्या बघताना येत नाही. आमचे भटके विमुक्त
पालावर राहताना या पावसाला कसे झेलत असतील ? पालात पाणी घुसत असेल ? तेव्हा लहान
लेकरांना घेवून कुठे झोपत असतील ? या ओल्या वातावरणात चुली कशा पेटत असतील ? काय
खात असतील ? या दिवसात पैसे कसे मिळवत असतील ? एक एक प्रश्न पावसाच्या पाण्यासारखा
मनात ओघळत राहतो.
वाटते कि कोणताही ऋतू
झेलणे हे शेवटी आर्थिक कुवतीवर अवलंबून असते. ज्याची ऐपत आहे तोच या ऋतूंचे आनंद
घेवू शकतो अन्यथा गरिबांसाठी हे तीव्र ऋतू जीवघेणे ठरतात. उन्हाळा गरिबांना उष्माघाताने
मारतो.हिवाळ्यात फुटपाथवर कुडकुडत मारतो आणि पावसाळ्यात बालमृत्यू ते घरे कोसळून
मारतो. उन्हाळा तोच झेलू शकतो स्थिती ,कि जो पंखा आणि एसी लावू शकतो. हिवाळा तोच
झेलू शकतो कि जो घरात शेगडी लाऊ शकतो.जो गरम कपडे आणि पक्के घर बांधू शकतो
त्याचप्रमाणे हा पावसाळा तोच झेलू शकतो की पावसात मजुरी न मिळताही पोटभर खावू शकतो
आणि बंद पक्क्या घरात राहू शकतो. ऋतू आणि आर्थिक परिस्थिती यांचे हे वेगळेच नाते
आहे. कोसळत्या पावसात कॉफी घेत गझल ऐकायला एक उन्नत आर्थिक स्थिती हि पूर्व अट
असते. बाकी गरिबांना निसर्गाच्या प्रत्येक ऋतूत होणाऱ्या या हल्ल्याला तोंड द्यावे
लागते. त्यांना उन्हाळ्यात आग ओकणाऱ्या सूर्याला घाम गाळीत , हाडात घुसणाऱ्या
थंडीला कुडकुडत आणि कोसळणाऱ्या पावसाला ओलेचिंब होत तोंड द्यावे लागते.
सामाजिक वर्ग आणि ऋतू यांचे हे नाते
किती विचित्र आहे नाही ? मी एकदा पावसाळ्यात
भंडारदरा धरणाकडे गेलो होतो. धरण भरले त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने होते .
पाउस थांबला होता व पुन्हा येण्याची शक्यता होती . मुंबईच्या काही महिला एका छोट्या वाहणाऱ्या धबधब्यात पाय
सोडून वर आकाशात पाऊस कधी येईल वाट बघत होत्या आणि त्याचवेळी पाऊस थांबला म्हणून
एक आदिवासी महिला आजूबाजूला पडलेली लाकडे गोळा करीत होती. तिला मात्र लवकर पाउस
येवू नये असे वाटत होते म्हणजे जास्त लाकूडफाटा गोळा करायचा होता.. तिचे कुठेच
लक्ष नव्हते. माझ्या मनात विचार आला कि या दोन महिला .. यांचे आर्थिक वर्ग वेगळे..
त्यामुळे एक पावसाची वाट बघणारी आणि दुसरी पावसाला येवू नको विनवणारी..एकच पाउस पण
दोघींच्या भावविश्वात किती वेगळे संदर्भ .....
हेरंब कुलकर्णी
फोन ८२०८५८९१९५
herambkulkarni1971@gmail.com

कुणाच्या खांद्यावरी कुणाचे ओझै !!!!
उत्तर द्याहटवाशेी काम नसलेल्यस काळातअसदिवाींशी कसंी ती शल्पकसीन व्यवशयवहवसआहे.
उत्तर द्याहटवा