गोष्टी हरवल्या आहेत.........
माझ्यासोबत तुम्ही पोलिस स्टेशनला याल का ?
मला एक तक्रार द्यायची आहे
लहानपणी ऐकलेल्या वाचलेल्या
गोष्टी
माझ्या शाळेतून ,माझ्या घरातून हरवल्या आहेत
कोणते पोलिस स्टेशन ही तक्रार ही
नोंदवून घेईन.... ?
ही तक्रार विक्षिप्त वाटेल पण खरच
सांगतो,आजच्या आत्मकेंद्री समाजव्यवस्थेचे विश्लेषण करताना समाजातील
गोष्टी संपल्या हे ही एक कारण आपल्याला नोंदवावे लागेल. लहान मूल का बदलली ?इतकी
कोरडीठाक का झालीत ?त्यांच्यातले भाबडेपण कुठ हरवलय ?त्यांच्या
डोळ्यात आज स्वप्नाळूपण का नाही दिसत ? या प्रश्नांची उत्तरे शोधताना गोष्टी संपल्या हे एक महत्वाचे कारण सांगावे
लागेल
शाळेवर लिहिताना मे महिन्याच्या स्तंभात
हेतुत: हा विषय निवडलाय. सुटी आहे तेव्हा
कुटुंबात शिक्षण होण्याचा हा महिना आहे. या महिन्यात घरातले आईवडील आजी आजोबा हेच
शिक्षक आहेत. आणि अंगण हा शाळेचा वर्ग आहे .पण सांगा ना हे सारं आज कुठून आणायच ?आजी
आजोबा एकतर नाहीत आणि असले तरी ते गोष्टी सांगत नाहीत.
कोणत्याही पन्नाशीच्या माणसांना आपल्या बालपणी
आपल्याला गोष्टी माहीत कशा झाल्या हे विचारा.... एकतर आपले आजी आजोबा आपल्याला
गोष्टी सांगत होते. दुसरीकडे शाळेत शिक्षक गोष्टी सांगत होते. तिसरीकडे चांदोबा
सारखी मासिके लहानपणी हमखास घरात असायची.पोथ्या,कहाणीचे पुस्तकाचे मोठयाने
होणारे वाचन हे ही एक मोठे संचित होते. मी लहानपणी चातुर्मासात पोथी ऐकायचो .आज
असे वाटते आपली वाढलेली शब्दसंपत्ती,विकसित झालेली कल्पनाशक्ती,भाऊकता
या सर्वात नक्कीच या ऐकलेल्या पोथ्यांचे योगदान नक्कीच आहे .त्यातला भाबडेपणा वय
वाढल्यावर गळून पडला पण त्या माणसांची सुख दु:खे अजूनही मनात रुतून बसलीत. रामायण
महाभारत हा तुमच्या माझ्या भावविश्वासाचा किती खोलवर भाग बनून गेलाय... त्या
चक्रव्यूहात गेलेल्या अभिमन्यु ल बाहेर येण्याचा रस्ता न सापडल्याने कासावीस
होणारे आपण, श्रावण बाळाला बाण लागल्यावर आई वडिलांचे काय होईल
या चिंतेने पिळवटून निघणारे आपण,राम वनवासाला जाताना ‘थांब
सुमंता थांबवी रे रथ ‘हे गीतरामायनात ऐकताना डोळ्यात पाणी येणारे आपण,कृष्णाच्या
बाललीलात स्वत: ला शोधणारे आपण .आपल्या मुलांच्या आयुष्यात हे सारे आता कुठून
आणायचे ? ५००० वर्षापूर्वी घडलेल्या किंवा न घडलेल्या या कथामधील नायक
आपल्या आयुष्याचे भाग बनून गेलेत.बोरे खाणारी शबरी,पट्टी बांधणारी गांधारी,बोबड्या
बोलाचा पेंदया, सुदामा हे सारे आयुष्यभर आपल्या भावविश्वात
वस्तीला आलेत..माझ्या मुलांच्या कोरड्याठाक भावविश्वात सांगा ना ,
हे मी सारं सारं कसं संक्रमित करू ?
जगजीतसिंग न म्हटलेल्या
‘मगर मुझको लौटा दो बचपन का सावन, वो कागज की कश्ती,वो बारीश का पाणी “हे
आपलं बालपण या मुलांना कसं द्यायच ?
दोनच अनुभव सांगतो. ५ वीच्या
मुलांना इंग्रजी नावे तयार करता यावीत म्हणून गृहपाठ रामायण महाभारतातील पात्रांची
नावे इंग्रजीत लिहून आणा असे सांगितले. रामायण महाभारतातील नावे ही काहीशी कठीण असल्याने
मराठी जोडाक्षर सरावाला व इंग्रजीत अभ्यास द्यायला उपयुक्त आहेत. तर अनेकांनी अभ्यास
केला नाही. मला कंटाळा हे कारण वाटले पण
खोलात गेल्यावर त्या गोष्टीच माहीत नसल्याने ती पात्र च माहीत नाहीत त्यामुळे
अनेकांनी लिहिले नव्हते. दूसरा अनुभव एकदा धडयात चर्च चा संदर्भ आला.आमच्या गावात
मोठे चर्च नाही.तेव्हा त्यांना काहीच समजेना.मग येशू ख्रिस्त माहीत आहे का ?विचारले
तर नाव माहीत आहे पण त्यांच्याविषयी माहीत नाही.हे धक्कादायक वाटेल पण आपल्या
पुढच्या पिढ्या अशा पुढे सरकाताहेत. ज्या येशूच्या नुसत्या नावाने जगातील सर्व
धर्मियांना मानवजातीला शतकानुशतके प्रेम करुणा शिकवली.त्याच्या क्रूस घेवून
टेकडीवर चढण्याच्या नुसत्या आठवणीने आपण आजही कासावीस होतो .तो महामानव येशू
मुलांना माहीत सुद्धा नसावा ?
तेव्हा मे महिन्यात घरातल्या
शाळेत तुम्हाला मला शिक्षक होवून गोष्टींचा हा आपल्या परंपरेचा चा ठेवा आपल्या
मुलांसमोर ठेवावा लागेल. इंग्रजी शाळेत जाणार्या मुलांसाठी तर हा प्रश्न अधिक
गंभीर होतो आहे.तेव्हा त्या पालकांना यासाठी दुप्पट प्रयत्न करावे लागतील. रामायण
महाभारत पंचतंत्र या गोष्टी केवळ गोष्टी नाहीत तर त्यातून भारतीय जीवनमूल्ये
प्रतिबिंबित झाली आहेत. तेव्हा मुलांच्या जीवनमूल्यांसाठी तरी हे करावे लागेल
अन्यथा निंजा,डोरीमोम सारखे कार्टून मधील महापुरुष(!!!) त्यांच्या
आयुष्याचे हीरो होतील
आज मुले मोबाइल,टीव्हीला
चिकटून बसली. सरासरी टीव्ही बघण्याचा कालावधी मी तपासाला तर सुटीत तो किमान ५ तास
भरतो. तक्रार करण्यापेक्षा गोष्टींचा पर्याय आपण ठेवणार आहोत का ?
मी स्वत: घरातला टीव्ही दोन वर्षे झाला बंद करून टाकला . नक्कीच सकारात्मक परिणाम
झालेत पण इतके शक्य नसेल तर टीव्ही मोबाइल कम्प्युटर गेम याचा किमान कालावधी ठरवून
देणे शक्य आहे ? फक्त दीड तास टीव्ही बघण्याचे वेळापत्रक आई
वडिलांनाही लागू असले पाहिजे. अन्यथा एकतर्फी बदल होत नसतो.जेव्हा आपल्या हातात व घरात
पुस्तके दिसतील तेव्हाच ती चाळली जातील. तेव्हा प्रथम आपण ही पुस्तके वाचायला हवीत
माझ्यासकट आपण एक कबुली देवू या की
आपल्याला गोष्टी माहीत नाहीत.रामायण महाभारत शिवाजी महाराज वगळता मला किती गोष्टी
माहीत आहेत ..२५ गोष्टी सुद्धा आठवत नाहीत .त्यात पुन्हा उपदेश करणार्या गोष्टी
वगळून हसवणार्या विनोदी कथा ,साहस कथा,भय कथा अशा गोष्टी किती आठवतात?
अशा स्थितीत आपली मुले जर computer
आणि मोबाइल ला चिकटली तर दोष
कुणाला द्यायचा ?
तेव्हा
बालसाहित्यातील पुस्तके सर्वात प्रथम आणायला हवीत. जगभर च्या बालसाहित्याचे मराठीत
अनुवादीत संचित खूप मोठे आहे. रेणु गावस्कर यांनी या जगातील गोष्टी व गोष्टीं
आपल्या भावविश्वावर कसा परिणाम करतात यावर ‘गोष्टी जन्मांतरीच्या’(शब्द
प्रकाशन) नावाचे खूप सुंदर पुस्तक लिहिले आहे.
पण केवळ पुस्तकांची खरेदी करून मुले
वाचणार नाहीत. सुरवातीला आपण गोष्टी वाचून त्यांना गोष्ट सांगणे ,नंतर
एखादी गोष्ट त्यांच्यासोबत वाचणे असे केले तरच मुले वाचायला लागतील.वर्ष जर ३६५
दिवसांचे असेल तर घरात लहान मूल असताना मला ३६५ गोष्टी माहीत पाहिजेत.मुलांना खाऊ
देणार्यापेक्षा गोष्टी सांगणारा जास्त आवडतो. पु.ल. देशपांडे यांनी हरीतात्या या लिहीलेल्या
अप्रतिम व्यक्तिचित्रात मुलांना गोष्टी सांगणार्या आणि मुलांना आवडणार्या
हरीतात्या त्यांच्या गोष्टी सांगण्याची शैली सांगून लिहिलय की ‘हरितात्यांनी
आम्हाला कधी खाऊ आणला नाही पण आमच्या मनगटात इतिहासाचा अभिमान भरला’
ते हरीतात्या आपल्या आयुष्यात का आले नाही याची हुरहूर लागून राहते.आपण आपल्या
मुलांचे हरीतात्या होऊ या
यात शाळांना करण्यासारखे खूप आहे.आज
शिक्षकांना ही फारशा गोष्टी माहीत नाहीत.त्यामुळे शाळेत काय पण बालवाडीत सुद्धा
गोष्टी सांगितल्या जात नाहीत. शाळेची
सुरुवात गाण्याने झाली पाहिजे आणि शाळेचा दिवस हा गोष्टीने संपला पाहिजे.नाहीतरी
शेवटच्या अर्ध्या तासात मुले काहीही शिकण्याच्या अवस्थेत नसतात.अशावेळी रोज शाळा
सुटताना गोष्टी सांगाव्यात. शाळा 220 दिवस भरते तर किमान 200 गोष्टी एकत्र करून
त्या टाइप करून प्रत्येक वर्गात एक संच असायला हवा.शिक्षकांनी जर ठरवले तर नक्कीच
या सुटीत ते २०० गोष्टी जमवू शकतात. मुलांना आपल्या आजी आजोबांकडुन गोष्टी ऐका आणि
त्या गोष्टी लिहून आणा असा एक छान प्रकल्प होऊ शकतो.आदिवासी भागात तर वृद्ध
व्यक्तींना खूप गोष्टी माहीत आहेत.
साने गुरुजी कथामाला हा एक खूप छान उपक्रम आहे
तो शाळेशाळेत पुन्हा सुरू व्हायला हवा.त्यातून गोष्टी पुन्हा पोहोचू शकतील..ज्येष्ठ
नागरिक संघाने अनाथाश्रम,अपंग शाळेत जाऊन गोष्टी सांगण्याचा उपक्रम करायला
हवा
माझे मित्र शांताराम गजे यांनी
एकदा श्यामची आई हा चित्रपट मुलांना दाखवला तर अनेक मुले निम्म्यावर उठून
गेली.इतकी कोरडीठाक मुले आज होताहेत.डिस्कवरीवर वाघ हरणावर झेप घालण्याच्या क्षणी
आपण चॅनल बदलतो कारण ते बघवत नाही.मुले मात्र ते मन लाऊन बघतात..अशी मुले उद्या
खून अत्याचार शोषण सुद्धा असेच थंडपणे बघतील... ते व्हायचे नसेल तर फक्त गोष्टी च
मुलांना कोमल ,तरल संवेदनशील बनवू शकतील . चला आजपासून मुलांना
गोष्टी सांगू या.....
हेरंब
कुलकर्णी
herambkulkarni1971@gmail.com

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा