शाळा रोज किती तास असावी ? (हेरंब कुलकर्णी )

           
                 
                
शाळा रोज किती तास असावी ? 
                                
                                             हेरंब कुलकर्णी 

शाळा आणि तुरुंग या जगातील दोनच जागा अशा आहेत की जिथे कुणीच स्वत: होऊन जात नाही तिथे दाखल करावे लागते ---- जे.कृष्णमुर्ती                         
                          शाळा किती तास भरावी? ६ तास की ८ तास यावर नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुदयाच्या निमित्ताने वादळी चर्चा झाली...तूर्तास हा मुद्दा बाजूला पडला आहे .खरे म्हणजे हा शासनाचा प्रस्ताव नव्हताच. शासनाने नवीन शैक्षणिक धोरणासाठी ठिकठिकाणी आलेल्या सूचनांमधून आलेली ती एक सूचना होती. या सूचनांवर शासनाने जनतेकडून सूचना मागविल्या होत्या.त्या सूचनाच्या आधारे शासन अंतिम मसुदा भारत सरकारला पाठविणार आहे. भारत सरकार देशातील सर्व राज्याकडून आलेल्या सूचनातून समान किमान अशा सूचना निवडून मग देशाचे धोरण जाहीर करणार अशी ही दीर्घ प्रक्रिया आहे ..यात ही ६ तास ८ तास ही शिफारस कितपत टिकेल आणि जरी टिकली तरी पुन्हा अमलात येणे किती दूरचे आहे हे यातून लक्षात येईल.. पण ४४ पानांच्या मसुदयात पाहिल्याच पानावरच्या या शिफारसीला माध्यमांनी वारेमाप प्रसिद्धी दिली आणि संघटना, आमच्यासारखे कार्यकर्ते या सर्वांनी हा विषय इतका टोकाला नेला की उद्या आपले मूल शाळेत गेले की शाळा त्याला ८ तास पाठविणारच नाही की काय पालकांना अशी भीती बसली ...!!! पण यानिमित्ताने शिक्षण क्षेत्रात संस्थाचालक ,पालक आणि शिक्षक यांना चिंतन करण्यासाठी एक नवा विषय मिळाला आहे. तेव्हा केंद्रसरकार,राज्यसरकार याचा निर्णय करील किंवा करणार नाही पण शाळेच्या वेळेबाबत यानिमित्ताने चर्चा करायला हवी.
                  पूर्वी महाराष्ट्रात ग्रामीण भागात सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात शाळा भरायच्या.सकाळी ८ ते ५ अशा शाळा व मध्ये २ ते ३ तासांची सूटी असायची.सुटी असली तरी शिक्षक मात्र दिवसभर बांधलेले असायचे.त्या मधल्या सुटीत इतर परीक्षांचे तास व्हायचे.. तेव्हा नकळत शिक्षकांचे ७ ते ८ तास काम व्हायचे. आजही निवासी शाळा त शाळांची वेळ ही ८ ते ३ व नंतर खेळ अभ्यासिका असे संध्याकाळपर्यन्त काम चालते. भारतातल्या जे.कृष्णमुर्ती यांच्या सर्व शाळा मी बघून आलो. . या शाळा सकाळी ७.३० पासून सुरू होतात आणि संध्याकाळी मुले सूर्यास्त बघतात .तो ही शाळेच्या वेळापत्रकाचा भाग असतो.संध्याकाळी पर्यवेक्षित स्वाध्याय असतो. तेव्हा हे काम किमान १० तासापेक्षा जास्त होते. परदेशात काय स्थिती आहे हे बघितले तेव्हा तर काही देशांचे शाळेचे तास ७ ते ८ आहेत. हे सारे बघितल्यावर ८ तास शाळा ही काही जगावेगळी गोष्ट आहे असे वाटत नाही
            विरोधी बाजू हिरीरीने मांडणारे काही मुदे मांडतात ते ही समजून घ्यावेत असेच आहेत. मुले इतका वेळ शाळेत बसू शकतील का ?मुले थकून जातात असा मुद्दा आहे. पुन्हा पालकांनी मुलांना अनेक क्लास लावलेले आहेत.त्यामुळे ती शाळा तर मुलांना करावीच लागते .पुन्हा आपला मुलगा एकाचवेळी विजय तेंडुलकर आणि सचिन तेंडुलकर व्हायला हवा आणि जगातले सर्वकाही माझ्या मुलाला आले  पाहिजे असा अट्टाहास असल्यामुळे ते क्लास  असतात. शहरी भागात येताना होणारा प्रवास व क्लास हे किमान ३ तास धरले तर आज ८ तासांची शाळा अनेक मुलांची होते आहे असा मुद्दा मांडला जातो. तर मूल केवळ शाळेतच शिकत नाही तर ते कुटुंबात आणि पालकांसोबत ,परिसरात सुद्धा शिकते अशी तात्विक मांडणी करतात. दुबार भरणार्‍या शाळांची वेळ कशी वाढवता येईल असा व्यावहारिक मुद्दा ही पुढे आला. तेव्हा या दोन्ही बाजूंच्या युक्तिवादातून वेळेपालिकडे शाळेचे नेमके प्रयोजन काय असावे याचीही नकळत चर्चा होऊन गेली.
          शिक्षण हक्क कायद्याचे संदर्भ दोन्ही बाजूंनी दिले .. एकतर शिक्षण हक्क कायदा प्राथमिक शाळा ८०० तास तर माध्यमिक शाळा १००० तास भरवा असे म्हणतो .ते तास जर पूर्ण होत असतील तर मग वेळ का वाढवायची असा वकिली प्रश्न उपस्थित झाला.पण ते किमान आहे  कमाल आपण ठरवू शकतो .  १५ एप्रिल ते १५ मे या काळात अनेक शाळेत परीक्षेनंतर अनधिकृत  सुटी देवून केवळ दिवस भरविले जातात.सकाळच्या शाळा झाल्या की कामकाजाची वेळ कमी होते ..पुन्हा आठवड्याला ४५ तासिका कामकाज व .त्यात ३० तास प्रत्यक्ष अध्यापन आणि १५ तास चिंतनाचे तास ठरविले आहेत.या चिंतनात रोज सव्वा दोन तास अध्यापनेतर प्रत्यक्ष काम व्हावे असे अपेक्षित आहे.टाचण ,वाचन ,वह्या तपासणे अशी कामे या वेळेत होत असली तरी हे सव्वा दोन तासाचे काम मोजण्याची एक वस्तुनिष्ठ प्रणाली निर्माण  सध्या नाही.त्या दोन तासांचा हिशोब लावण्याचाही मुदा पुढे आला
                        .शाळा जास्त तास भरविण्यातील अडचणी आहेत. पण दिवस वाढविण्यात तर काहीच अडचणी नसाव्यात.आज शाळा २२० दिवस भरतात आणि १४५ दिवस बंद राहतात. शांतपणे विचार केल्यावर खरच ५ महीने सूटी गरजेची आहे का यावर एक देश म्हणून आपण आत्मचिंतन करण्याची गरज आहे. ५२ रविवार ,महत्वाचे सण आणि तीव्र कडक उन्हाळ्यातील काही दिवस वगळता २८० दिवसांपेक्षा शाळा कॉलेज चालवायला हवेत. जयंती पुण्यतिथि ला सुट्या देण्यापेक्षा त्या महापुरुषांच्या विचारांवर शाळा कॉलेज मध्ये चर्चा कार्यक्रम व्हायला हवेत. मुले शाळेबाहेर ही शिकतात असे म्हटले जाते पण आज टीव्ही बघण्याचा मुलांचा सुटीतला सरासरी कालावधी ५ तास आहे.वर्षात मुले १००० तास सरासरी टीव्ही बघतात हा कालावधी वर्षातील एकूण शाळेच्या कालावधीपेक्षा जास्त आहे .तेव्हा सुटीचा उपयोग मुलांच्या विकासासाठी होत नाही ही वस्तुस्थिती मान्य करून शाळा हेच छंद वर्ग म्हणून विकसित करण्याचा व त्यासाठी वेळ वाढवण्याचा मुद्दा विचारात घ्यायला हवा
                      मला स्वत:ला ही चर्चा कायदेशीर करण्यापेक्षा वेगळ्या उंचीवर न्यावीशी वाटते.शाळा किती वेळ चालावी तर ती मुलांना कंटाळा येणार नाही इथपर्यंत चालावी हे त्याचे उत्तर आहे.पु.ल .देशपांडे म्हणायचे की मला कुणी संगीताच्या मैफलीला येताना विचारले की मैफल किती वाजता संपणार आहे? तर मी म्हणतो की तुम्ही कृपया येवू नका कारण ती कधीतरी तंबोर्‍याच्या तारा लागल्यानंतर सुरू होईल आणि रंग भरत पहाटे कधीतरी संपेल .तिचा घड्याळाशी काही संबंध नाही. मला हा दृष्टीकोण शाळेशी जोडावासा वाटतो.आम्ही एक व्यवस्था म्हणून शाळा ही तांत्रिक करून टाकली. कृष्णकुमार नावाचे शिक्षणतज्ञ म्हणतात की घंटा वाजल्यावर वर्गात जायचे आणि घंटा झाल्यावर बाहेर यायचे यातून शिक्षक ,विद्यार्थी आणि शाळा हे सारेच यंत्रवत होतात.या सर्व प्रक्रियेत आपण उत्स्फूर्तता गमावतो आहोत. त्यातून शाळेत आनंद मिळण्यापेक्षा तांत्रिकता महत्वाची ठरते आहे.  मुले थकणारच असतील तर ती एक तासात ही थकतील आणि आनदी आणि आवडीच्या कामात असतील तर ८ तासही थकणार नाहीत. शिक्षणतज्ञ लीलाताई पाटील एका पुस्तकात म्हणतात की उन्हाळ्यात मुले दिवस दिवस पाण्यात डुंबतात सुटीत दिवस दिवस सायकल चालवतात पण ती थकत नाहीत आणि आमच्या शाळेत एक दोन तासात थकून जातात...लीलाताईंच्या या वाक्याच्या प्रकाशात हा विषय समजून घ्यायला हवा.
             तेव्हा शाळा ज्या प्रमाणात आनंदी होत जाईल त्या प्रमाणात शाळेची वेळ ही आपोआप पुढे पुढे सरकत राहील .त्याला शासनाच्या आदेशाची ही गरज उरणार नाही. पुणे जिल्ह्यातील कर्डेलवाडीची शाळा वर्षात ३६५ दिवस सुरू राहते. ऐन दिवाळीच्या दिवशीही शाळा सुरू होती.. मुले आणि शिक्षक तिथे कंटाळत का नसतील? रोज पाय शाळेकडे वळण्याचे वळण लागले तर ते कायदे नियमाला ओलांडून जाते. यवतमाळ जिल्हयातील ओंकार हराळ या वस्तीशाळेच्या शिक्षकाचा प्रसंग तर अविश्वसनीय वाटतो.शिक्षण मंत्री पुरके त्या पारधी बेड्यावरच्या शाळेत जातात.दोन मुलांचे चेहरे रडवेले झालेले..गुरुजी या मुलांना मारले का?’ शिक्षक सांगतो की मुलांचे वडील काल वारले सकाळी मौत झाली आणि दुपारी मुले शाळेत येऊन बसलीत.. सुटीच्या दिवशीही शाळेत रेंगाळणारी ओंकार हराळ ची मुले अशा  शेकडो  शिक्षकांनी निर्माण केलेली पायवाट शाळेची वेळ किती तास असावी याचे उत्तर देईल ..पु.ल.च्या भाषेत मैफल रंगण्यावर वेळ अवलंबून आहे
              आज ८ तास शाळेला विरोध होण्याचा एक मुद्दा हा ही आहे की २ तास जे इतर उपक्रम घ्यावेत असे सुचविले जाते पण ते घेण्यासाठी सुविधा व साधने कुठे आहेत?अनेक शाळांना मैदाने नाहीत लॅब नाहीत . कृष्णमुर्ती शाळांचा मी उल्लेख केला त्या शाळेत संगीतातील प्रत्येक वाद्य शिकवायला स्वतंत्र्य शिक्षक आहे आणि प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र मैदान आहे.. आपल्याकडे एक शिक्षक दोन वर्ग सांभाळतो अशा दयनीय स्थितीत आपण छंद विकसित करण्यासाठी अपेक्षित असणारी मोठी आर्थिक तरतूद करणार आहोत का ? शाळांना संगणक पुरविलेत .तंत्रज्ञानातून शिकवावे अपेक्षा आहे पण लाईटबिल शाळांना व्यावसायिक दराने आकारले जाते. ते भरण्याची क्षमता नसल्याने अनेक शाळांची वीज तोडली आहे. तेव्हा शाळांचे छंद वर्गात रूपांतर करताना आपल्याला खाजगी शाळांना निवासी शाळांना व्यक्तिमत्व विकाससाठी जे जे उपलब्ध आहे ते देण्याचा अगोदर विचार करायला हवा .
                 मग एकीकडे साधने नाहीत ,पालक मुलांना घरी विकसित करण्याइतके सक्षम नाहीत तर यातून मार्ग कसा काढायचा? ६ तास ८ तास यावादापलीकडे मधला मार्ग हा दिसतो की हळूहळू टप्प्याटप्याने आपल्या शाळांचे रूपांतर छंद वर्गात करायला हवे. आज १५ एप्रिल ते १५ मे या काळात परीक्षा झाल्यावर मुलांना अंनधिकृत सुटी दिली जाते. या काळात छंद वर्गाची दुकानदारी सुरू होते. शाळांना जर याबाबत प्रशिक्षण दिले काही साहित्य दिले  तर शाळेतच छंद वर्ग सुरू होऊ शकतात. पालक बाहेर कितीही पैसा मोजतील पण शाळेने पैसा मागितला की कायदा दाखवतात. पालक संघ व शाळा यांनी एकत्रित असे वर्ग आयोजित करावेत.बाहेरचे कौशल्य असणारे कलावंत निमंत्रित करावेत. ग्रामीण भागात भजनी मंडळ पासून अनेक लोककलावंत असतात.यांना मानधन देवून निमंत्रित केले तर हळूहळू शिक्षक पालक छंद वर्ग घेण्यात प्रशिक्षित होतील. एकदा हा आत्मविश्वास आला की आठवड्यात जेव्हा सकाळची शाळा असते त्या दिवशी छंद वर्ग घेता येतील व नंतर रोजचे शाळेचे वेळापत्रक वाढवत शाळेची वेळ ६ तासावरून ८ तास झाली तर ती शिक्षक विद्यार्थ्यांना वैताग वाटणार नाही. पण त्यासाठी नक्की कार्यक्रम असला पाहिजे आणि संसाधने देण्याची शासनाची आणि पालकांची तयारी असली पाहिजे.
           आज माध्यमिक स्तरावर आजच्या वेळापत्रकात खरेच वेळ अपुरा पडतो. ३० मिनिटांच्या तासिकात अभ्यासक्रम पूर्ण करताना दमछाक होते तिथे व्यक्तिमत्व विकास वगैरे साठी वेळ मिळत नाही. शिक्षक शाळांना हे जाणवते आहे, वेळ वाढवायला हवा याच्याशी सहमति आहे  फक्त त्यातून मार्ग काढताना तो आदेश दिल्यासारखा न येता शिक्षक पालक यांना विश्वासात घेऊन नियोजन व्हावे. आजही अनेक शाळा उत्स्फूर्तपणे जादा तास घेतात.शाळेच्या स्नेह समेलनाच्या दिवशी किंवा त्याची तयारी करताना कुणीच घड्याळाकडे बघत नाही. ती आनंद घेणारी अनुभती आणि उत्स्फूर्तता शिक्षक पालकांना मुलांना शाळेत येण्याचे वातावरण शाळेत शासनाने निर्माण करण्याची प्रेरणा निर्माण केली तर शाळेची वेळ आपोआप वाढत जाईल पण त्यासाठी शाळा ही मुलांना खेळण्याइतकी आनंदाची जागा वाटायला हवी
                        कृष्णमुर्ती ना एक लहान मूल प्रश्न विचारते की आम्हाला खेळण्यात जितका आनंद मिळतो तितका आनंद शाळेत का मिळत नाही ? कृष्ण जी उत्तर देतात की बाळा तुझ्या शिक्षकांना जेव्हा शाळेत  आनंद मिळायला लागेल तेव्हा तुलाही आनंद मिळेल. ते उदाहरण देतात की एखादी गायिका एखाद्या बैठकीवर बसण्यापूर्वी हजारो तास रियाज करते .गाणे तिचे श्वास होते तेव्हा तिने म्हटलेले गाणे लोक कित्येक वर्षे गुणगुणत राहतात तसे तुझे शिक्षक कामावर गाण्याइतके प्रेम करतील तेव्हा तुझे शिकणे खेळण्याइतके आनंदी बनेल .. कृष्णमुर्ती ना अपेक्षित शिक्षणाची मैफल आपण जमवू या

                                               हेरंब कुलकर्णी     
                                 herambkulkarni1971@gmail.com      
            
                

टिप्पण्या