मी कार्यकर्ता कसा झालो


मी कार्यकर्ता कसा झालो  ?
माझ्यातील सामाजिक जाणिवा कशा विकसित झाल्या ? याचा मागे वळून घेतलेला हा धांडोळा



                         मी रूढ अर्थाने कार्यकर्ता नाही. प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होणे आणि खटकणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर सुचेल त्या पद्धतीने काम करणे अशा अर्थाने कार्यकर्त्याचे मन माझ्याकडे आहे.
              माझा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील धामणगावचा. धामणगाव हे गाव महाराष्ट्राला दया पवार यांच्यामुळे माहीत आहे. कुटुंब एकदम ब्राम्हणी. आई वडिलांचे शिक्षण फारसे नाही. बहिणी पाच. त्या माझ्या जन्माची वाट बघण्यामुळे जन्मलेल्या..५ बहिणी व अनेक नवस करून माझा जन्म झाल्याची श्रद्धा.पंढरपूर,गाणगापूर तुळजापूर येथे नवस केलेले...त्यामुळे लहानपणापासून खूप लाड झालेले. पुरुषप्रधानतेचे सर्व गैरफायदे मिळालेले. लहानपणी भाकरी आवडत नव्हती तर शेजाऱ्याकडून भाकरीऐवजी पोळ्या बदलून आणल्या जायच्या. कोणत्याही पदार्थात वाटा जास्त असणे ,फक्त माझाच वाढदिवस साजरा होणे यात तेव्हा मोठेपण वाटायचे पण आज या व्यवस्थेचा आपण लाभ घेतला त्याची लाज वाटते...

                      जास्त बहिणी किंवा मोठे कुटुंब असल्याचा एक फायदा असा होतो की आपण खूप जमिनीवर राहतो. प्रत्येक गोष्ट वाटून घ्यावी लागते त्यामुळे अहंकार सतत ठेचला जातो व आपण अनेकांपैकी एक आहोत हे भान येते. समुहात राहताना करावयाच्या तडजोडी करायला नकळत आपण सरावतो....आज एकच मुल असलेल्या घरातली मुले नंतर ज्याप्रकारे आत्मकेंद्रित होतात ते पाहता मागची पिढी ही सामाजिक असण्याचे हे एक मोठे कारण मला वाटते. ब्राम्हणी कुटुंबात असल्याने धार्मिक आणि त्यातही कर्मकांडी असणे स्वाभाविक असते. त्यामुळे प्रमाणापेक्षा मी जास्त कर्मकांडी असायचो. शनिवारी मारुतीला रुईच्या पानाची माळ नेवून घालणे, पारायणे करणे,मंदिरात आरत्या करणे, घरात स्वत:चा स्वतंत्र्य गणपती बसवणे, मंदिरात पोथी ऐकायला जाणे हे वयाला न शोभणारे मी करायचो. माझ्या वयाची मुले मंदिराबाहेर खेळत असायची आणि मी मंदिरात.. पण पुढे जरी त्यातून बाहेर पडलो पण त्यातून आपले भावविश्व फुलायला मदत होते.भाषा, भाषेचा विविधांगी वापर कळतो . पोथी पुराणातील साहित्य अतिरंजित असेल पण मनाच्या आत काहीतरी ते करते की ज्यातून आपण ओले राहतो, कोरडेठाक होत नाही. त्यातील अवैज्ञानिकता आपोआप गळून जाते. खरे तर श्यामच्या आई त ही जडणघडण खूप छान चित्रित झाली आहे.

         आपण कार्यकर्ते होण्यात आंपण राहतो त्या परिसराचाही परिणाम असतोच..मी ज्या गावात राहायचो ते गाव तालुक्याचे पण खूप छोटे.आदिवासी तालुका म्हणून ओळखले जाणारे.एकेकाळी डाव्या चळवळीचा आणि समाजवादी पक्षाचे काम आणि आमदार असलेला तालुका. अमृतभाई मेहता दया पवार, रावसाहेब कसबे ,दशरथ सावंत यांच्या नावाने ओळखला जाणारा हा तालुका .अतिशय आक्रमक.आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखला जाणारा राघोजी भांगरे हा सेनानी याच तालुक्यातला.  नवलेवाडी नावाच्या एका छोट्या गावातील २७ जण १९४२ सालच्या आंदोलनात तुरुंगात गेलेले.तालुक्यात जनतेवर अत्याचार करणाऱ्या एका मामलेदाराला तालुक्यातील लोकांनी त्याच्या घराला वेढा घालून घर पेटवून मारलेले... त्या काळातील मामलेदारची भीती,दरारा आणि निरक्षर गरीब आदिवासी हे अंतर पाहता यातील धाडस लक्षात येईल. त्यामुळे डाव्या समाजवादी परंपरेची अभ्यासू परंपरा आणि दुसरीकडे ही आक्रमकता यातून जडणघडण होत होती. शेतकरी नेते दशरथ सावंत आमच्या तालुक्याचे हिरो असायचे..धरणाच्या पाण्यावर हक्क सांगणारे आंदोलन, धरणग्रस्त आंदोलन, वीज मंडळावर हल्लाबोल अशी ही आंदोलने शाळकरी वयात बघितलेली...या चळवळीच्या निमित्ताने राज्यस्तरावरील अनेक नेते तालुक्यात येऊन जात. शरद जोशींची शेतकरी चळवळ बहरली तेव्हा आमच्या तालुक्यांत ती खूप आक्रमक होती. सतत चक्का जाम आणि मोर्चे सुरु होते..यातून नकळत आपल्यात हे सार झिरपत जाते..या अर्थाने आपण जे काही करतो ते म्हणजे आपण या मागच्या पिढीच्या खांद्यावर आपण उभे असतो..

                         पण ही डावी पार्श्वभूमी असून ही शाळकरी वयात मात्र मी संघाशी जोडला गेलो. आमच्या गल्लीत तेव्हा संघाची शाखा भरायची..सगळी लहान मुले खेळायला तिथे जायची. मी ही जाऊ लागलो. प्रत्येक ब्राह्मण कुटुंब हा संघाचा  नैसर्गिक मतदारसंघ असतो त्यामुळे तिथे जाण्यात काही गैरही वाटेना. मी त्या कामात रस घ्यायचो. त्या प्रचारकांची मानवीय वागणूक खूप लक्षात राहते..आजारी असलो की संध्याकाळी घरी. जिथे घरची माणसेही विचारत नाहीत तिथे इतकी आस्था..  वाचनाची आवड असल्याने त्यांचे साहित्य वाचायचो. एका क्षणी तर आपण ईशान्य भारतात जाऊन देश(नव्हे राष्ट्र !!) सेवा करावी इतपत भावना तीव्र होत्या पण त्या काळात युक्रांदमध्ये काम केलेले विजय दर्प नावाचे एक शिक्षक शाखेच्या मैदानाशेजारी राहायचे..त्यांच्याकडे मी शाखा सुटल्यावर जायचो..ते मला तिथे जाऊ नको म्हणून अडवायचे नाहीत पण विचार कर म्हणत राहायचे.त्यांनी रावसाहेब कसबेंचे संघाचे मूल्यमापन करणारे ‘झोत’ हे गाजलेले पुस्तक मला दिले..त्यातून मला प्रश्न पडायला सुरुवात झाली.

“शाखेत मुस्लीम मुले का येत नाहीत ?” असे मी आमच्या प्रचारकांना विचारले.
 ते म्हणाले “त्यांनी जरूर यावे “
मी म्हणालो “ पण तुम्ही जसे आमच्या घरी आम्हाला शाखेत न्यायला येता, तसे त्यांच्या घरी का जात नाही ?”

                                 या प्रश्नावरील त्यांचे समाधानकारक उत्तर न मिळणे मला संघापासून नकळत दूर घेऊन गेले...त्यानंतर दर्प सरांनी मला नरहर कुरुंदकर यांची पुस्तके दिली. कुरुंदकर आपल्या आत असे काहीतरी करतात की जे अजिबात सांगता येत नाही पण तो परिणाम तुम्ही तार्किक बनण्यात होऊन जातो..आमच्या गावाच्या ग्रंथालयातून लोहीयांवरची पुस्तके वाचली.. यातून एक वेगळेच जग उलगडत गेले....सामाजिक प्रश्न हे केवळ देशभक्ती किंवा हिंदुत्व याने सुटणार नाही तर त्यासाठी वेगवेगळी उत्तरे आहेत हे उमजत गेले व  संघ कधी सुटला ते कळले नाही.. पण संघात गेल्याचा एक फायदा हा झाला की संघाविषयी पुरोगामी वर्तुळात जे टोकाची मते असतात,संघाला आहे त्यापेक्षा खूप मोठ्ठ करून रंगविले जाते,भयगंड निर्माण केला जातो तसा झाला नाही...संघ मर्म आणि मर्यादा जवळून पाहिल्याने उगाच भयगंड येत नाही..

             आपण सामाजिक कामात का आलो ? याचा खूप मागे जाऊन विचार करताना मला माझ्या विचाराचा केंद्रबिंदू गरीब माणसे आहेत असेच वाटले....जे काही थोडेबहुत लिहितो किंवा काम करतो त्याच्यामागची प्रेरणा ही पाहिलेली गरीब माणसेच आहेत..  गो नी दांडेकराचे पुस्तक स्मरणगाथा ११ वीत असताना वाचत होतो . त्यांनी मध्यप्रदेश मधील आदिवासींच्या दैन्याचे केलेले वर्णन वाचले होते..ते आदिवासी खूप भुकेले असतात. अन्न मिळत नाही तेव्हा भूक लागू नये म्हणून ते पोटावर झोपतात..मी हे वाचलेले मला आजही इतके स्पष्टपणे आठवते की मी ते वाचताना कसा बसलो होतो व वेळ रात्रीची किती वाजताची होती व माझी अस्वस्थता अगदी फोटो काढल्यासारखी अजूनही मनात लख्ख आहे..तो क्षण कायमचा अपराधीपण मनात देवून गेला.. त्यानंतर एसटी तून जाताना रस्त्याच्या कडेला राहणारी गरीब माणसे अनेकदा पाहिली..ती माणसे जेव्हा जेव्हा दिसायची तेव्हा तेव्हा मला मनात पुरून टाकलेले ते मध्यप्रदेशाच्या आदिवासींची कहाणी आठवायची.....नंतर महाविद्यालयात गेलो .तिथे विविध विचारप्रणाली वाचल्या..त्यातून अधिक स्पष्टता येत गेली.. 
 
           शिक्षक व्हायचे ठरविले होते त्यामुळे ठरवून बीएड केले व अहमदनगरला सीताराम सारडा विद्यालयात १९९४ ला शिक्षक म्हणून लागलो .ही शाळा जर मिळाली नसती तर कदाचित आज कार्यकर्ता झाला नसतो.. या शहरी शाळेत सारा ‘नाही रे’ वर्ग होता..नगरला पद्मसाळी कामगार मोठ्या संख्येने आहेत .विडी वळणे व इतर कष्टाची कामे हे लोक करतात. त्यांची बहुसंख्य मुले यां शाळेत शिकत होती..शाळेजवळ रामवाडी नावाची झोपडपट्टी होती. या झोपडपट्टीत सारी कष्टकरी माणसे राहायची आणि मुस्लीम मुले मोठ्या संख्येने होती.. माझे लग्न झालेले नव्हते. मुले अभ्यास करायची नाहीत .मोठ्या वर्गातील मुलांच्या वाचन लेखनाच्या समस्या होत्या. त्यात सुधारणा करावी तर मुले खूप गैरहजर राहायची.. दुपारी पळून जायची .आईवडील दोघेही कामाला जायची त्यामुळे त्यांना वाटायचे मुले शाळेत जाताहेत. यावर मार्ग पालकांना भेटणे हाच होता ..वेळ ही माझी समस्या नव्हती .मी शाळा सुटली की गैरहजर मुले व अभ्यास न करणारी मुले यांच्याकडे जायचो...त्या परिसरातील मुलांना घर दाखवायला सोबत न्यायचो..मुले खूप उत्साहाने यायची.. माझी सायकल आणि सोबत मुलांची गर्दी असा सीन ..पहिल्यांदा रामवाडी त असाच गेलो .ज्या घरी आम्ही गेलो तिथले शेजारी पाजारी ही बघायला जमले कोण आलंय ? कुणीतरी आपल्या पोरांच्या अभ्यासाची तक्रार घेवून आले आहे हा प्रकारच त्यांना गमतीदार वाटला....पण ज्याक्षणी ती झोपडपट्टी पाहिली तो क्षण माझ्यातील मध्यमवर्गीयविश्व कोलमडण्याचा होता..प्रायव्हसी आणि व्यक्तीस्वातंत्र्य या कल्पना कुरवाळणारा मी एकाच खुराड्यात ५ ते ६ व्यक्ती एकत्र राहताना बघत होतो..स्वतंत्र्य  बाथरूम ही चैन त्यांना परवडत नव्हती...झोपडीला लागून वाहणाऱ्या गटारीवर पोते बाथरूम केले होते..की जाता येता कोणीही डोकावून बघू शकत होते...डास आणि माशा सगळीकडे घोंगावत होत्या..मी हे जग पहिल्यांदाच बघत होतो...माझ्या मध्यमवर्गीय जगाशी या जगाशी काहीच नाते नव्हते...हे अभावाचे,वंचिततेचे जग होते...पलीकडे सोरट असा स्वस्त जुगाराचा अड्डा होता...जमलेल्या गर्दीत दारूचा वास येत होता..याचा अर्थ दारू आणि जुगार सहज उपलब्घ होता..मी मुलांच्या अभ्यासाची तक्रार घेऊन गेलो होतो पण आता मी त्या मुलांना समजून घेण्याच्या मनस्थितीत आलो..मलाच या मुलांचे पालक व्हावे लागेल असे लक्षात आले

                              एकदा एक मुलगी शाळेत आली नाही.   वस्तीत गेलो.दिवस पावसाळ्याचे.मी काहीसा वैतागून तिच्या घरी गेलो..गेल्यावर सुन्न झालो. तिचे डोळे लाल झालेले. मी विचारायच्या आधी तिची आई म्हणाली “ सर,अहो कसली शाळा घेवून बसले ? रात्रभर पाउस सुरु होता. आमची घरे गटारीवर बांधलेली. त्या गटारी तुंबल्या की पाणी मागे येते आणि घरात उफाळते...रात्रभर आम्ही सगळे पातेल्याने जमिनीतून वर येणारे पाणी उपसून उपसून बाहेर टाकत बसलो होतो “ हे सार कल्पनेपलीकडचे जग होते..एकीकडे बाहेर पाउस पडताना कॉफी घेत त्यातील romantic विश्व बघणारे आपण आणि घराच्या जमिनीतूनच गटार घरात येणार ..कसली झोप आणि कसली शाळा ..हे सारे प्रसंग परिणाम करत होते...एकदा त्याच झोपडपट्टीतला इम्रान नावाचा माझा विद्यार्थी भेटला. साल होते १९९८. मी त्याच्या घरची चौकशी केली. घरात तो आई आणि लहान भाऊ होता.वडील वारलेले. तो शाळा करून थोडेफार काम करायचा आणि अवघ्या ४०० रुपयात ३ माणसांचे घर तो चालवत होता.. मला ते अविश्वसनीय होते.. मी त्याला पुन्हापुन्हा तपशील विचारले. किराणा केवढयाचा होतो ? भाजी केवढयाची होते ? रॉकेल किती रुपयाचे आणतो ? तो थंडपणे आणि सहजपणे त्याचे बजेट सांगत होता..मी साखर किती रुपयाची आणतो विचारले की तो म्हणायचा “आम्ही चहाच पीत नाही” .मी दवाखान्याचा विषय काढला की तो म्हणायचा “मेडिकलमधून गोळ्या आणतो...” पुढे बोलण्यासारखे काही नव्हतेच...एवढेसे ते १५ वर्षाचे पोर सारे कुटुंब पेलत होते...या इम्रान ने मला मुळापासून हलवले ..आज २० वर्षे झाली पण आम्ही रस्त्यावर कुठे उभे राहून बोलत होतो ती जागा,वेळ आणि इम्रान चे हावभाव अजूनही माझ्या डोळ्यासमोर तितकेच लख्ख आहे...मी पाचव्या वेतन आयोगाच्या वेतनवाढ घेण्यास विरोध केला,ते प्रकरण महाराष्ट्रात गाजले पण तो निर्णय मी या इम्रान ने दिलेल्या अपराधीभावनेतून आला होता ..एका विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकाला जगण्याचे वास्तव शिकवले होते..त्याचवेळी खासदारांनी आणि राष्ट्रपतीनी त्यांचे वेतन वाढविल्याने सर्वत्र टीका होत होती व पाचव्या वेतन आयोगाची वेतनवाढ द्या म्हणून आंदोलने सुरु झाली होती.... माझ्या डोळ्यापुढचा इम्रान ह्लेनाच..मी अवघा २७ वर्षांचा होतो. नोकरी ३ वर्षे झालेली. मला वाटायला लागलं की राष्ट्रपती आणि खासदार काही हजारात मानधन वाढवतील आणि आपले त्यापेक्षा खूप कमी असेल पण आपणही त्याच रांगेत उभे आहोत ना .....ज्यांना सगळे मिळते ते नाराज आणि इकडे ही आपली गरीब माणसे त्याना तर काहीच मिळत नाही ..मला इम्रान ने अस्वस्थ केल .मला अर्थशास्त्र समजत नव्हते मला फक्त आपण या मागणाऱ्या रांगेतून बाजूला व्हायचे एवढेच समजत होते...त्यामुळे मी एक दिवस कचेरीत गेलो .प्रतिज्ञापत्र लिहिले आणि ते मुख्यमंत्री,राष्ट्र्पतीना पाठवून दिले.मला पाचव्या वेतन आयोगाची वेतनवाढ देऊ नये अशी मी मागणी केली .मला ते करताना काहीच वाटले नाही .मी माझ्याबद्दल म्हणतो आहे इतरांनी घ्यायचे तर घ्यावे असे मला वाटायचे पण ज्यावेळी ती बातमी आली तेव्हा प्रचंड टीका सुरु झाली ...शिव्या दिल्या जाऊ लागल्या...काहीच अनुभव नसताना मी मोहोळ उठवून अंगावर घेतले होते.. ४०० पेक्षा जास्त पत्र मला त्यावेळी आली आणि सर्वत्र टीका.त्याचे रुपांतर बदनामी ,बहिष्कार यात झाले...त्याकाळात माझे लग्न करायचे होते .त्या मुद्द्यावर ‘अव्यवहारी’ मुलाला काहींनी मुलगी देण्याला नकार दिला...एका अघोषित बहिष्काराचा सामना करावा लागला...शिव्यांनी भरलेली निनावी पत्र वाचवत नसायची..पण दुसरीकडे पाठींबा ही मिळाला. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी मला भेटायला आंनी सत्कार करायला माझ्या गावात आले..पुढे पाठपुरावा करूनही शासनाने प्रतिज्ञापत्र नाकारून सक्तीने वेतनवाढ दिली.अर्थमंत्र्यांनी पत्र पाठवले पण या प्रकरणातून मी नकळत राज्यातील नाही रे वर्गासाठी असलेल्या चळवळींशी जोडला गेलो....

            आमच्या संस्थेचे अहमदनगरमध्ये एक वसतिगृह आहे. त्याला १०० वर्षे झाली इतके ते जुने आहे. त्यात बहुतेक अनाथ मुले राहतात..यातील काही मुले ही न्यायालयाने सोपवलेली बाल गुन्हेगार मुले किंवा आरोपी तुरुंगात गेल्याने अनाथ झालेली मुले असायची. या वसतिगृहातील सर्व मुले आमच्या शाळेत यायची. शहरी वातावरणात ही मुले बावरून जायची. घरच्या एकाकीपणाने आणि शहरी गर्दीत ती अधिकच एकटी वाटायची.या मुलांविषयी नकळत वेगळीच माया वाटायची. अनेक संध्याकाळी मी या मुलांसोबत घालवलेल्या आहेत. आम्ही या मुलांना शाळेत रागवायचो मारायचो पण आम्ही वसतिगृहावर गेलो की त्या मुलांना खूप आनंद व्हायचा..मुलांची ही निरागसता बघून खूप लाज वाटायची. या मुलांच्या घरच्या कहाण्या ऐकताना हेलावून जायचो. या लेकरांना मायेची ऊब देणे गरजेचे आहे असे खूप वाटायचे..या मुलामधील सामाजिक भावना खूप तीव्र होती .एका अनुभवाने मला कार्यकर्ता बनवून टाकले. एकदा मराठीच्या पुस्तकात बाबा आमटेंचा उल्लेख होता. मी त्यानिमित्ताने बाबा आमटेनी गटारीत पडलेला कुष्टरोगी पाहिला, ते तिथून निघाले आणि त्याचक्षणी आपण त्या जागी असतो तर असे त्यांच्या मनात आले आणि बाबा आमटे घडले. हा प्रसंग मी किर्तनकाराच्या रसाळतेने रंगवून सांगितला आणि विसरून गेलो.. एक दिवस त्या वसतिगृहाची ४ मुले माझ्याकडे आली आणी म्हणाली सर वसतिगृहाकडे जाताना सिव्हिल हॉस्पिटल लागते. त्या हॉस्पिटलबाहेर एक पेशंट पडला आले .त्याच्या पायात अळ्या वळवळ करताहेत.. तुम्ही चला ना सर, आम्हाला बघवत नाही.. आता माझ्यातल्या शिक्षकाची परीक्षा होती .जर मी गेलो नसतो तर बाबा आमटे सांगणारा शिक्षक त्यांच्या मनातून उतरला असता...मी त्यांच्यासोबत गेलो. तो पेशंट त्या दवाखान्यात adamit होता...पण खूप दिवस बरा होईना व त्याच्या घरचे लोक येईना म्हणून त्याला बाहेर आणून टाकले होते..मी सिव्हिल सर्जनला भेटलो. आम्ही पेशंट बाहेर टाकला या आरोपाने ते चिडले होते पण शेवटी पुन्हा दाखल करायला तयार झाले. तिथल्या तिथे रिक्षा केली.मलाही त्या जखमाना हात लावण्याचे धाडस होईना. वसतिगृहाच्या मुलांनी त्याला उचलले आणि रिक्षात टाकले आणि पुन्हा उचलून खोलीत नेले. उपचार सुरू झाले.मी मुलांना विचारले “हे तुम्हाला का करावेसे वाटले ?” ती मुले म्हणाली “सर, तुम्ही ती बाबा आमटेंची गोष्ट सांगितली होती ना. आम्ही या माणसाजवळून जाताना तेच आठवायचे आणि म्हणून तुमच्याशी बोललो “ माझे मन भरून आळव .मला शिक्षक म्हणून माझा तो सन्मान वाटला. आपल्या बोलण्याचा मुलांवर कसा परिणाम होतो याने एक वेगळाच आत्मविश्वास वाढला ,माझ्यातील कार्यकर्तेपण फुलविणारी ही घटना मला पुढे साने गुरुजींच्या अभ्यासापर्यंत घेवून गेली... त्यानंतर किमान 2 महीने तो पेशंट अॅडमिट होता आणि ही मुले रोज त्याला डबा घेवून जायची

         आज मी कार्यकर्ता आहे म्हणजे काय  ? असा प्रश्न मी विचारतो तेव्हा लक्षात येते की आपण रत्यावर थेट परिवर्तन लढाई लढणारे कार्यकर्ते नाहीत. आपण असे कार्यकर्ते आहोत की आपण प्रत्यक्ष चळवळीला पूरक असेल अशी भूमिका मांडतो ,प्रसंगी काही काम उभे करतो ,लेखनातून चळवळीला पूरक भूमिका मांडतो..वाचकाचे पत्र लिहिण्यापासून ,लेख ,पुस्तके ,कविता ,सोशल मिडीया ते प्रत्यक्षात काम आपण का करतो ?याचे उत्तर मीच माझ्यासाठी शोधतो.. तेव्हा चूक वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होण्याची गरज वाटते..बाकीचे काय करतील किंवा नाही पण मी मात्र या चुकीला माझ्या कुवतीप्रमाणे विरोध करणार..अशी एक मनोभूमिका बनली आहे ..त्यातून सतत कविता आणि वृत्तपत्रीय लेखन होत राहते...

      पण मोठ्या स्तरावर आपण लिहित राहायचे आणि आपण जिथे राहतो तिथे डोळेझाक करायची असेही वागणे शक्य होत नाही .त्यातून गावात ही छोटी छोटी कामे करत राहतो. राज्यस्तरावर दारूबंदी विषयावर सतत लिहितो पण तालुक्यातील गावावागावात आंदोलने उभी करतो .अगदी दारू दुकाने सकाळी १० पूर्वी उघडली तरी त्यावर लक्ष ठेवून नोटीसा काढायला लावतो .बालमजुरीवर लिहितो पण आमच्या गावातील बालकामगार प्रथा थांबवायला आम्ही पोलिसांच्या मदतीने सर्व दुकान हॉटेलवाल्यांना बालकामगार ठेवणार नाही म्हणून शपथ देतो आणि सतत एका एका दुकानावर लक्ष ठेवतो.मुलींच्या शिक्षणावर लिहिताना बालविवाह प्रथा अडथळा आहे हे पटते त्यावर मी पुस्तिका लिहिली पण स्थानिक लग्न थांबविण्यासाठी रेणुकादास या पत्रकार मित्राच्या मदतीने चळवळ उभारली व आजपर्यंत २२५ पेक्षा जास्त बालविवाह एका तालुक्यात आम्ही थांबविले.. निनावी फोन येत राहतात आणि आंम्ही सतत पाठपुरावा करून लग्न थांबवत राहतो..उसतोड कामगारांची मुले शाळेत जात नाहीत यावर लेख लिहिले पण स्थानिक पातळीवर कारखान्यावर जाऊन त्यांना रोज ती मुले शाळेत दाखल करायला लावण्यासाठी एक कर्मचारी नियुक्त करायला लावला...शिक्षणातील चुकीच्या धोरणांना विरोध करीत राहतो .शालाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सरकाराने नीट करावे म्हणून राज्यातील स्वयंसेवी संस्थांचे नेटवर्क उभे केले आणि आम्ही सरकारला पुन्हा एकदा सर्वेक्षण करायला भाग पाडले...या कामामध्ये एखाद्या प्रकरणात शेवटपर्यंत जाता येते न्याय देता येतो तेव्हा समाधान वाटते..एका लहान मुलीला तिच्या आजीने नवस म्हणून मुरळी केले. तिला शाळेत घालण्यासाठी सतत पाठपुरावा केला,जवळपास ५ वेगवेगळ्या शाळेत तिला दाखल केले..वीटभट्टीवर तिचे पालक स्थलांतर करीत असतांना जिथे जातील तिथे जायचो.त्यांनी हिला शिकवावे म्हणून त्यांना जातीचे दाखले काढून दिले, रेशन कार्ड काढून दिले ,वाघाने शेली खाल्ली की मदत मिळवून दिली..शेवटी ती जागरण गोंधळाच्या कार्यक्रमांना जायला लागली..त्यातून तिच्यावर अत्याचार झाले आणि ती १२ व्या वर्षी गरोदर राहिली.. तेव्हा तिचे बाळंतपण होईपर्यंत तिच्यावर लक्ष ठेवले व मुल झाल्यावर पोलीसामार्फत नातेवाइकांना अटक करून केस चालवली..आज ती महिला आश्रमात तिच्या मुलीसह राहते..एका मुलीला आपण वेश्या होण्यापासून वाचविले हे समाधान खूप मोठे आहे..   

यात माझे काम सांगण्यापेक्षा आपली नोकरी आणि कुटुंब सांभाळून आपल्या क्षतेने आपण खूप काम करू शकतो. मध्यमवर्गाने असे कार्यकर्तेपण निभावले तरी चळवळी बहरायला मदत होईल...

                                     -हेरंब कुलकर्णी
                                                           (ऋतुरंग दिवाळी अंकातून )

टिप्पण्या