वीटभट्टीत आयुष्य
भाजताना ........
धुमसणारी वीटभट्टी, रांगेत मजुरांची बांधलेली
विटांची बसकी घरे, एका बाजूला राख,कोळशाचेढिगारे, दुसरीकडे विटांसाठी आणलेल्या
मातीचा भला मोठा डोंगर, ट्रक्टर, विटा
वाहणारा गाडा, वेगवान सुरु असलेले मजुरांचे काम आणि या गर्दीतून वाट काढत फिरणारी
उघडी नागडी पोरे..विस्कटलेले केस आणि नाकं वाहणारी.
सकाळी खूपचलवकर वीटभट्टीवरपोहोचतोय असे वाटले
पणप्रत्यक्षात उशिरा आलो असे वाटावे इतका वेग वीटभट्टीच्या कामांनी पकडला होता.
प्रत्येक कामगार नवरा बायकोच्या किमान ४०० विटा पाडूनझाल्या होत्या.रोज एक हजार
विटा पाडायच्या असतात. त्यांना कधी सुरुवात केली विचारले तर म्हणाले पहाटे ५
वाजताच, बाजूला मळलेला चिखल..विटेच्यासाच्यात पाणी टाकून तळाचा चिखल काढणे, त्यात
चिखल टाकणे, तो टाकलेला चिखल दाबून बसविणे, त्यावरून हात फिरवून चिखल सपाट करणे, नंतर
जमिनीवर राख टाकणे आणि त्यावर साचा उलटा करणे आणि पुढे सरकून पुन्हा साचा धुणे. ही
सारी प्रक्रिया एका ते दीड मिनिटात पूर्ण होत होती. यावरून त्या वेगाचा अंदाज
यावा. एक वीट अडीचकिलोची. पण २ विटांच्या चिखलाचे वजन ५ किलोपेक्षा जास्तअसे
साच्यासहवजन.इतका जड चिखल भरायचा आणि उपडा करायचा. एक हजार विटा म्हणजे दोन हजार
वेळा हे करायचे. हे करताना मनगटांवर खूप ताण येतो व दुखतात. किमान ४ ते ५ तास
पतीपत्नी पायावर उपडे बसून काम करतात. पाठ आणि कंबरेत खूप रग लागते. निम्म्या विटा
झाल्यावर उठावे आणि थांबून घ्यावे असे वाटते पण वाढत जाणारे उन तसे करू देत नाही.
लवकर काम संपवायचे म्हणून कितीही रग लागली तरी काम ओढतच राहतात. उन्हाळ्यात तरघामाघूम
होत विटा पाडणे सुरु राहते.मुंबई परिसरातली भट्टी खूपच अवाढव्य असते. पण इतरत्र
एका भट्टीवर ४ ते ८कामगारांच्या जोड्या दिसतात.
१००० विटा पाडल्यावर मगमजुरांशी बोललो. कंबरदुखत
नाही का?हा प्रश्न घाम पुसणाऱ्या मजूर महिलेला विचारला. उत्तर म्हणून ती फक्त कसुनसं
हसली..त्या हसण्यात विषाद, करुणा, हताशा, अगतिकतासारं सारं होत.
मजूर कोठून आले ?
गावे का सोडत असतील ? विचारले तर लक्षात आले की बहुतांश मजूर हे भिल्ल जमातीचे
आहेत.. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातून जास्तमजूर येतात. तर कोकणात कातकरी व इतर
आदिवासी मजूर हे काम करतात. बहुतेक मजूर हे भूमीहीन आणिशेतमजुरीहेच उदरनिर्वाहाचे
साधन आहे. पावसाळ्यात शेतीत कामे करतात.त्यातही सलग काम मिळत नाही. अशा दिवसात वीटभट्टी
मालक त्यांना भेटतात आणि २५ ते ३० हजाराची रक्कम उचल म्हणून देतात. त्या रकमेत ते
उर्वरित दिवस काढतात,दिवाळी करतात आणि दिवाळीनंतरबिऱ्हाड उचलून वीटभट्टीवर येतात
आणि थेट मी महिन्यापर्यंत म्हणजे एकूण ६ महिने पती पत्नी वीटभट्टीवर राहतात.
विटा पाडून झाल्यावर पुरुष मजूर
झाडाखाली बसलेत .पण महिलांची मात्र कामातूनसुटका नाही.घाम पुसत त्या स्वयंपाक
करायला गेल्या. विटांनी बांधलेल्या कमी उंचीच्या घरावर पत्रा असल्याने पुन्हा
घामाच्या धारा लागल्यात. काहींनी चुली बाहेर उन्हात मांडल्यात. मी उत्सुकता म्हणून
काय स्वयंपाक करताहेत ते बघतोय. बहुतेक ठिकाणी भाकरी करताहेत. सोबत डाळी करताहेत. भाताने
झोप येते त्यामुळे भात करीत नाहीत. हिरवी भाजी का केली नाही ? विचारले तर
बाजाराच्या दिवशी भाजी आणतो आणि ती २ ते ३ दिवस पुरते.एकूणच आहारात हिरवी भाजी कमी
खाल्ली जात होती.बाजाराच्या दिवशीमटन आणतात. मुलांसाठीफळेआणणे ही तर चैन होती.आदल्या
दिवशी गुडीपाडवा सण होता.त्या प्रत्येक घरात सणाला काय गोड केले विचारले ? पाच
कुटुंबांनी भाजी भाकरीच केली होती. एकाने भजे तळले होते आणि एका कुटुंबात पुरी केली
होती. मला‘पाडव्याचासण उत्साहात साजरा’ या बातम्या आठवल्या आणि त्यांचा परीघ किती
मध्यमवर्गीय असतो ही जाणीव झाली.
बाजाराच्या दिवशी
मालक ५०० ते १००० रुपये खर्ची म्हणून देतात व ती रक्कम मजुरीतून कापून घेतात. त्यात
सगळ्यात मोठा खर्च हा धान्यावरहोतो.या लोकांचे रेशनकार्ड गावाकडे असते.हे ६ महिने
इकडे येतात. त्यामुळे तिथे नातेवाईक असले तर धान्य घेतात अन्यथा धान्य बुडते व
इकडे ही गरीब माणसे धान्य बाजारभावाने खरेदी करतात. त्यामुळेस्थलांतरित मजूर ज्या
ठिकाणी जातील तेथे गावाकडचे त्यांचे रेशनचे धान्य देण्याची तरतूद करायला हवी.
महाराष्ट्रात काही लाख मजूर स्थलांतरित होताना हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे.
मजुरांची जेवणे
झाली. पुरुष मंडळी झाडाखाली लवंडली. महिलांनी लगेच भांडी घासून थोडा आराम केला. दुपारी
४ वाजता महिलांनी डोक्यावर चुंबळ घेतली व वाळलेल्या विटा त्या भट्टीवर रचायलावाहायला
लागल्या. ती कसरत जीवघेणी होती. डोक्यावर दोन विटा ठेवल्या आणि त्यावर एकूण सहा थर
अशा १२ विटा रचल्या. शेवटचासहावाथर ठेवताना हात नीट पोहोचत नव्हता, अगोदरच्या १०
विटा पायावर पडण्याची भीती होती. पुन्हा खालच्या रांगेतून विटा उचलताना खूप हळूच
उठावे लागत होते. मी नंतर दुकानात नेवूनवजनकाट्यावर वीटेचे वजन केले तर एक वीट
अडीच किलो वजनाची असते म्हणजे१२ विटांचे वजन ३० किलो. इतकेवजन घेवून त्या महिला ५०
मीटर अंतरावरील भट्टीवर एकावेळी दोन चकरा मारीत होत्या.काही ठिकाणी हे अंतर खूप
दूर असते. सहज हिशोब केला की १००० विटा वाहण्यासाठी जवळपास ८३फेऱ्याम्हणजेजाऊन
येऊन १६६ फेऱ्या माराव्या लागतात. हे अंतर किलोमीटर मध्ये मोजले तर ते ८ किलोमीटर
पेक्षा जास्त होते. भर उन्हात इतके ओझे घेवून १६६ चकरा मारण्याची मजुरी आहे फक्त
१५० रुपये म्हणजे एका चकरेला९० पैसे फक्त.
विटा पाडण्याची मजुरीसुद्धा अशीच संतापजनक
आहे.१००० विटा पाडण्याची मजुरी आहे ५०० रुपये. अनेक ठिकाणी ती ४५० आहे. म्हणजे ५००
धरली तरी एका विटेची मजुरी आहे ५० पैसे आणि पती पत्नी मिळून ते करतात म्हणजे एका विटेची
मजुरी होते फक्त २५ पैसेकी इतकी रक्कम भिकारीसुद्धा घेत नाही आणि तीच वीट किमान ४
ते ५ रुपयाला विकली जाते इतके शोषण आहे. पुन्हा या शोषणाचा पुढचा टप्पा म्हणजे
मजुरांनी ११०० विटा द्यायच्या आणि मग त्या १००० मोजल्या जातील. म्हणजे १०० विटा
फुकट द्यायच्या. मालकांना विचारले तर ते म्हणाले की तुटफुटहोते म्हणून आम्ही १००
विटा जास्त घेतो. वास्तविक विटा ताब्यात घेतल्यावर फुटल्या तर ती मालकाची जबाबदारी
असते. याचा अर्थ एका सिझनला ५ लाख विटात ५०,००० विटा या मजुरांकडून फुकट पाडून
घेतलेल्या असतात पणप्रगतपुरोगामी महाराष्ट्रात हजार म्हणजे अकराशे हे गणित अजूनही
चूक ठरत नाही.
मालकांना भेटलो. तुम्ही
वीट ५ रुपयाला विकता आणि मजुरांना ५० पैसे मजुरी का देता ?विचारले. १००० ला ११०० या
फसवणूकीवर ते गप्प बसले.ती लुट मान्यच दिसलीपण भट्टीतून वीट निघेपर्यंतचे खर्च त्यांनीसांगितले.
मातीची royalty, वाहतुकीचा, भरण्याचा खर्च, दगडी कोळसा खरेदी, राख,भुसा,मळी,भट्टी
पेटविणाऱ्याची मजुरी, विटा जागेवर पोहोचवताना भरणे, ट्रक्टर ड्रायव्हर चा पगार असे
अनेक खर्च ते सांगत होते. राख एकलहरे औष्णिक केंद्रातून आणावी लागते. कोळसा GST
लागल्यावर एकदम ४००० रुपयाने वाढला. पाण्याची व्यवस्था करावी लागते. त्यात पुन्हा
एखादी भट्टीच पेटत नाही, विटा खराब निघतात. उचल दिलेले मजूर फसवतात, अवकाळी पावसात
नुकसान होते.बांधकामात मंदी असल्याने विटेचे भाव पडलेत.काहीजण कर्जबाजारी झालेत.यामुळे
जास्त मजुरी देणे परवडत नाही.GST ने गणित बिघडले हा निष्कर्ष होता त्यामुळेविटेची
किंमत वाढणे हेच उत्तर आहे. हा हिशोब शासनाने जरूर तपासून मजुरीचे दर ठरविले
पाहिजेत मात्र १०० विटा फुकट घेणे तर लगेच थांबायला हवे.
भट्टीवर आल्यावर मुले शाळेत फारसे जात
नाहीत पण हळूहळू गावाकडेच मुले ठेवण्याचे प्रमाण वाढते आहे असे मजूर सांगत होते. मालक
देतो त्या खोल्या आतून बघितल्या तर खुराड्यासारख्या त्या ४ते ५ फुट उंचीच्या
खोल्या. कशी राहत असतील कडाक्याच्या उन्हात...??
महिलाविटावाहत होत्या. आता उन्हात घामाने
जणू त्या न्हात होत्या. त्यांच्या त्या यांत्रिक फेऱ्या अस्वस्थ करीत होत्या. दुसरीकडे
संध्याकाळ होऊ लागताच आता पुरुष उठले. चिखल मळायला घेतला. भल्या मोठ्या मातीचे आळे
केले त्यात पाणी सोडले आणि मध्ये उतरून तो खोऱ्याने सारखा चिखल ओढत होता. त्याचा
घाम चिखलात पडत होता. एका भट्टीवर मात्र मळण्यासाठी ट्रक्टरची मदत घेवून मळत होते.
त्याच भट्टीवर विटा वाहायला गाडा व वर न्यायला लिफ्ट बसवली होती. हळूहळू कष्टातून
सुटका होण्याचे प्रयत्न होत आहेत पण मशीन आले की मजुरी कमी देतात आणि मजूर कमी लागतात.
त्यामुळेआम्हीकष्ट करतो पण काम राहिले पाहिजे अशा मानसिकतेत मजूरदिसले.
आतामहिला थोडा आराम करून चहा घेत
होत्या. संध्याकाळ होऊ लागली.करुण, उदास चेहऱ्याचेमजूरनारायणराव भेटले.वय ६०
झालेले. कष्टाने चेहरा रापलेला. किती वर्षे वीटभट्टीवर आहात ? विषण्ण हसले. म्हणाले“जन्मापासून“
मी थक्कच झालो.ते म्हणाले की वडील वीटभट्टीवर होते त्यामुळे जन्म तिथेच झाला. आम्हाला
गाव नव्हते त्यामुळे वर्षभर भट्टीवर राहायचो. माझे लग्न ही भट्टीवर आणि पोरांचे
जन्मही भट्टीवर झाले. त्यामुळे आम्हाला गाव नाही. भट्टी हेच आमचे गाव आता मुले
नाशिकला राहतात इतकेच...६० वर्षे भट्टीवर राहून त्याने काय कमावले होते ? फक्त
मुलींची लग्न तो करू शकला होता. ते कर्ज पुन्हा विटा पाडून फेडत होता. या
भट्टीवर त्याचे पुरे आयुष्य भाजून निघाले होते आणि इतके करून एका रुपयाचीही बचत तो
करू शकला नव्हता...६० वर्षाच्या कष्टाने त्याला काहीच दिले नव्हते. ५ वर्षे
आमदारकी केली तरी पेन्शन देणाऱ्या या व्यवस्थेने वृद्धपणी त्याला पेन्शन दिले नव्हते.
हात पाय चालेपर्यंत त्याला भट्टीवरच राहण्याशिवाय पर्याय नव्हता . बाहेरच्या जगाशी
त्याचे काहीच नाते नव्हते. डॉ.आंबेडकरांचे शब्द आठवले “ I have no motherland “मजुरांच्या रक्ताच्या शोषणानेच विटेचा रंग लाल
झाला असेल का .....???
हेरंब
कुलकर्णी
herambkulkarni1971@gmail.com

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा