तुझ्या इवल्याशा राज्यातल्या
इवल्याशा मतदारसंघातील
इवल्याश्या मिळालेल्या तुझ्या मतांनंतर
तुझ्या अश्रुंत वाहून गेले
सर्वात मोठ्या राज्यातील
सर्वात मोठ्या विजयाचे कवित्व
************************************************
तुझ्या पराजयाची इतकी त्सुनामी चर्चा बघून वाटत
EVM मशीनपेक्षा निवडणूक व्हायला हवी होती
फेसबुक whatsapp आणि ट्वीटरवर
जिंकली असतीस देशभरातून विक्रमी मतांनी शर्मिला तू
********************************************************
सोड ती लढाई आणि सोड ते मणीपुर
करून टाक तुझे ते प्रलंबित लग्न
आणि करपुन टाकलेल्या आयुष्याला आता तरी हिरवाई दे
हे जग तुझ्यासारख्या इतक्या टोकाच्या
अ -मानवी माणसांसाठी नसते शर्मिला
हे जग असते लाक्षणिक उपोषणांचे आणि रोज नवा प्रश्न घेऊन धावण्यार्यांचे
१६ वर्ष एकाच जागी बसणार्यांचे नाही तर
रोज नव्या देशात मानवी हक्कांच्या प्रेझेंटेशन करत फिरणार्यांचे
तू आहेस outsider आहेस या आमच्या इंटेलेक्चुयल जगात
*****************************************
आता फास्ट फूड खाता खाता ---
चघळतो आहोत तुझे उपोषण
तुझ्या चुका --- तुझी सत्ताकांक्षा
तुझे स्वभावदोष ----
आणि खिल्ली उडवतो आहोत तुझ्या ९० मतांची ---
आणि उद्धार करतो आहोत
पराभूत झालेल्या आंबेडकरापासून --- मेधा पाटकरांपर्यंत
पण अक्षरही उच्चारत नाही आम्ही
तुरुंगातून निवडून आलेल्या त्या आमदाराबद्दल --आणि राष्ट्रीय पक्षांनी ओतलेल्या पैशाच्या समुद्राबद्दल
तू सोडच आता मणीपुर शर्मिला
तुझी उडवली जाणारी खिल्ली नाही सहन होत आता
तुझ्यासारख्या माणसांसाठी हे जग उरल नाही शर्मिला
आयुष्यातली वाया गेलेली ती वर्षे
दुस्वप्नासारखी विसरून जा
आणि सोड हे आमचे जग
तथाकथित हुशार नेत्यांसाठी आणि त्यांच्या लाथा खाणार्या
सुज्ञ मतदारांसाठी
तुझ्या अश्रुंनी आणि काळीज कापत जाणार्या नजरेने मला आणखी लज्जित करू नकोस शर्मिला
हेरंब कुलकर्णी
फोन 9270947971
केवळ अप्रतिम सुंदर आहे ही कविता आणि हा विषयही....
उत्तर द्याहटवाअत्यंत हृदयस्पर्शी आणि अत्यंत मार्मिक शब्दांमध्ये व्यक्त केली आहे मनातली घुसमट....!!!