हजार तासांची घरातली शाळा.. (हेरंब कुलकर्णी ) होय.आपली मुले वर्षाला टीव्ही आणि सोशल मीडिया एका वर्षात १००० तासापेक्षा जास्त वेळ बघतात. शाळाही १००० तास चालते. म्हणजे शाळेच्या वेळेतच या शाळेत ते असतात आणि तरीही त्या शाळेत ती काय शिकतात याकडे पालक,समाज ,शासन औपचारिक शाळेकडे काळजीने बघत नाहीत.


                                        हजार तासांची घरातली शाळा.. 
                          
                   शिक्षण कायदयाने प्राथमिक शाळा वर्षाला ८०० तास तर माध्यमिक शाळा  १००० तास चालते. इतका कमी काळ चालणार्‍या शाळेचे आपण समाज शासन पालक म्हणून किती बारकाईने मूल्यमापन करतो. त्यांच्याकडून खूप सार्‍या अपेक्षा करतो.ते करायला ही हरकत नाही.पण दुसरी एक १००० तास घरातच शाळा भरते पण त्या शाळेकडे पालक लक्ष देत नाही की त्या शाळेशी दर्जा सुधारा म्हणून भांडत नाहीत. त्या शाळेकडून अपेक्षा करीत नाहीत. कोणती आहे ती शाळा ?ती शाळा आहे दूरदर्शन आणि सोशल मिडियाची....!!!!
                     १००० तास ? होय.आपली मुले वर्षाला टीव्ही आणि सोशल मीडिया एका वर्षात १००० तासापेक्षा जास्त वेळ बघतात म्हणजे शाळेच्या वेळेतच या शाळेत ते असतात आणि तरीही त्या शाळेत ती काय शिकतात याकडे पालक,समाज ,शासन औपचारिक शाळेकडे  काळजीने बघत नाहीत.
                         याउलट टिव्हीविरोधी बोलणार्‍याना फॅडिस्ट समजले जाते.माझ्या घरातला टिव्ही गेली ३ वर्षे मी बंद ठेवला आहे. त्याचा लाभ मुलाचे वाचन,चित्र काढणे वाढले.गंभीरपणे एखादा विषय समजून घेणे वाढले. माझे स्वत:चे लेखन टिव्ही नसल्याने वाढले.मुलगा ज्या विषयात आवड आहे ती माहिती नेटवर बसतो. बातम्या दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रातून समजल्याने काही फरक पडत नाही. हे सारे सकारात्मक परिमाण मी अनुभवतो आहे॰ पण जेव्हा आमच्याकडे कुणी येते आणि घरात टिव्ही नाही तेव्हा एखाद्या हातपाय नसलेल्या व्यक्तीकडे दयेने बघावे तसे ते बघतात व जगाच्या ज्ञांनापासून मुलांना दूर ठेवू नका असा उपदेश करतात.  
                           तेव्हा या टिव्ही आणि सोशल मिडियच्या अनौपचारिक शाळा खरच जगाचे परिपूर्ण ज्ञान देते का ?मुलांना शाळा जशा विकासाच्या संधी देते तशा संधी देते का ?या गृहीतकाचीच उलटतपासणी करायला हवी. 
टिव्ही ने आणि सोशल मीडिया ने शारीरिक नुकसान मुलांचे होते त्यापेक्षा कितीतरी जे अधिक नुकसान हे मानसिक स्तरावरचे असते. वेगवान हालचाली हिंसकतेशी जोडल्या गेल्याने मुलांना मग हिंसकताही आवडू लागते. कार्टून सिरियल्स बघितल्यामुळे लहान मुलांमध्ये हिंसकता वाढते. टॉम व जेरीचे विनोद हे आवडतात. त्यांच्यातली हिंसक प्रवृत्ती व त्यांच्या हिंसक कारवायांभोवती गुंफलेले असतात. हॉरर चित्रपट  किंवा मालिकासुद्धा आवडायला लागतात. भीती  आणि हिंसा याबाबत त्यांची संवेदनशीलता कमी होत जाते आणि याचा त्यांच्या प्रत्यक्ष जीवनावरही परिणाम होतोच. माध्यमिक शाळेतली मुलांना एकटय़ाने किंवा समवयीन मुलांबरोबर टीव्ही बघायला आवडतं. स्वातंत्र्य, प्रणय हे विषय आवडतात . म्युझिक व्हिडीओज्, हॉरर मूव्हीज् आणि पोर्नोग्राफिक व्हिडीओज् बघायला आवडतात. मध्यंतरी मानसोपचार परिषदेत किशोर अवस्थेतील ५० टक्के मुले पोर्न बघतात असा निष्कर्ष अतिरेकी वाटला तरी मोबाइलच्या वापरामुळे  वास्तवाच्या जवळ जाणारा आहे.
                        आपली मुले टिव्ही आणि सोशल मिडियाच्या शाळेत शिकतात. यातून त्यांच्या भावनांकाची तोडफोड होते.हिंसाचार बघून संवेदना बोथट होतात.अपघात बघून थंडपणे पुढे जाणारी पिढी घडते.ओरडणे,शिवीगाळ,प्रसंगी मारहाण हे स्वभाव विशेष होतात. मध्यंतरी संगमनेर तालुक्यात लहान वर्गमित्रांनी आपल्याच मित्राचा केलेला खून हे बोलके उदाहरण ठरावे. प्रेमप्रकरणे अगदी ५ वीच्या वर्गापासून सुरू होतात. गेल्या ३ वर्षात मुंबईत १५ वर्षाखालील मुलींच्या गर्भपात करण्याच्या प्रयत्नात १४४ टक्क्याने वाढ झाली आहे तर १५ ते १९ वयोगटात गर्भपातात ४७ टक्के वाढ झाली आहे. या तपशीलाचा सहसंबंध या माध्यमांशी जोडायचा की नाही ?
                     ग्रामीण आणि आदिवासी भाग हाही याला अपवाद नाही. किंबहुना गरीब कुटुंबात ही एकमेव करमणूक व एकच खोली त्यामुळे तिथे मुले जास्त टिव्ही बघतात. मोबाइल बघतात.या आभासी जगातली मूल्यव्यवस्था आणि जाहिरातीतील जग त्यातील घर,तिथली सुंदर नटलेली आई ,गाडी आपल्या वाट्याला का नाही ? यातून एक वेगळाच न्यूनगंड मुलांमध्ये  
                   संशोधनात असे आढळून आले की, जास्त टीव्ही पाहणार्‍या मुलांमध्ये खेळाची आवड कमी होत जाते. ते लांबउडीदेखील मारू शकत नाहीत. माँट्रियल विद्यापीठ व जस्टिन मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल यांच्या संयुक्त  संशोधनातून मुलांनी अनेक तास टीव्ही पाहिल्याने त्यांच्यात स्थूलपणाच्या तक्रारी वाढतात. त्याच्या शरीरातील मांसपेशी कमजोर पडतात व त्यामुळे भविष्यात त्याच्या प्रकृतीला गंभीर धोका पोहोचू शकतो.
तासन्तास दूरचित्रवाणी बघितल्यास प्राणघातक पल्मनरी एम्बॉलिझम हा रोग होण्याची शक्यता असते.पल्मनरी एम्बॉलिझम म्हणजे हृदयाकडून फुफ्फुसाकडे रक्त वाहून नेणार्‍या रोहिणी या मुख्य रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होते 
            यावर उपाय काय? आमच्यासारखे टिव्ही बंद करावा आणि ते शक्य नसेल तर मुलांशीच चर्चा करून रोज १ तास टिव्ही बघण्याचे वेळापत्रक ठरवावे. कार्यक्रम एकत्र बघावेत.बघितल्यावर मुलांशी त्यावर चर्चा करावी. जाहिरातींचा पडणारा प्रभाव,खोटी जीवनमूल्ये यावर चर्चा करून वास्तवाची जाणीव करून द्यावी. त्याचबरोबर आपण सोशल मिडिया कमीत कमी वापरुन मुलांच्या हातात मोबाइल देवू नये. उलट सुटीच्या दिवशी जास्त वेळ व रोज मुलांशी बोलणे,खेळणे .त्याला चित्र काढणे,गोष्टीची पुस्तके वाचणे हे करायला हवे.पालकांची मुले अनुकरण करतात. तुमच्या हातात पुस्तके आली,घरात लहान मुलांसाठी ची पुस्तके असली तरच मुले ती वाचतील. तेव्हा पालक टिव्हीसमोर आणि whatsapp वर असतील तर मुले तेच करणार..तेव्हा टिव्ही सोशल मिडियाला सशक्त पर्याय पालकांनी दिले तरच घरातली १००० तासांची शाळा मुलांची सुटेल.
                               राजा हरिश्चंद्र हे नाटक बघून जर मोहनदास नावाचा बालक सत्य जगण्याचा संकल्प करून महात्मा गांधी होत असेल आणि या माध्यमात इतके सामर्थ्य असेल तर इतकी हिंसा,सेक्स आणि उथळ कार्यक्रम बघून आपली मुले काय होतील ? याची कल्पनाच करवत नाही
                     

                               टीव्ही बंद अभियान
जळगाव येथील कुतूहल फाउंडेशन चे महेश गोरडे केवळ टीव्ही व सोशल मीडिया या विषयावर जागरण करण्याचे काम गेली १० वर्षापासून करीत आहेत. या समस्येबद्दल  आतापर्यंत  महाराष्ट्रात ३ लाख माहिती पत्रकांचे वाटप केले.४०,००० हून अधिक मुलांचे सामुहिक समुपदेशन झाले आहे.शेकडो व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्रे, विविध स्पर्धा , पालक सभा , शिक्षक सभा, अशा विविध  माध्यमातून  या विषयावर नियमित प्रबोधन करीत आहेत. टीव्ही बंद नव्हे तर टीव्ही शिस्त अभियान ते सांगतात. टीव्ही,मोबाईल,इंटरनेट, व्हाटसअप फेसबुक या माध्यमांचा योग्य प्रमाणात वापर करून उपयोग करून घ्यावा. त्यांचा अतिवापर व चुकीचा वापर टाळावा असे सांगणारे ‘या टीव्हीच काय करायचं?’ हे पुस्तक लिहिले.त्याला महाराष्ट्रभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. टीव्ही शिस्त पुरस्कार  विद्यार्थी, पालक यांना  वितरीत करतात टीव्ही,मोबाईल, इंटरनेट व सोशल मिडियाच्या  आहारी गेलेल्यांसाठी टीव्ही ,मोबाईल,इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्रही सुरू केले. केवळ टीव्ही ला विरोध न करता सकारात्मक पर्यायही दिला. मुलांचे छंदवर्ग सुरू करण्यात आले.त्यात विज्ञान प्रकल्प,बौद्धिक खेळणी,सीडी,पुस्तके,सहली,यासह उपक्रम केंद्र सुरू केले आहे. हजारो विद्यार्थी व पालक या वर्गात सहभागी झाले. यातून पालकांना पर्याय मिळाला. आठवड्यातून एक दिवस टीव्ही बंद. टीव्ही किती वेळ बघायचा याचे वेळापत्रक मुले टीव्ही शेजारी लावतात.
महेश गोरडे ९४२०७८७१७३     


                     २० सोनेरी वर्ष
 महेश गोरडे सांगतात की रोज सरासरी ४ तास टीव्ही ,व्हाटस अप ,फेसबुक चा वापर याप्रमाणे एका वर्षाला १४६० तास ,तर ६० वर्षांच्या आपल्या आयुष्यात ८७६०० तास टीव्ही ,व्हाटस अप, फेसबुक साठी खर्च होतो . १२ तासांचा कामाचा दिवस धरला तर आपण आयुष्यतील २० सोनेरी वर्ष टीव्ही ,व्हाटस अप, फेसबुक वर अक्षरश: वाया घालवतो.




              देशात  मुले (चार ते १४ वर्षे) दिवसाला सुमारे १७० मिनिटे (सुमारे तीन तास) टीव्ही बघतात. शनिवार-रविवारी आणखी जास्त म्हणजे २०० मिनिटे (सुमारे साडेतीन तास).

वय वर्षे चार ते नऊ या वयोगटातील मुलांमध्ये हेच प्रमाण अनुक्रमे १३० आणि २०० मिनिटे आहे.
संपूर्ण देशभरातील तीन कोटींहून अधिक मुले (चार ते १४ वर्षे) रात्री दहानंतरही टीव्ही बघतात.

रात्री दहानंतर एफ टीव्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, चॅनल व्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, एम टीव्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, तर बिन्दास चॅनलच्या प्रेक्षकांपैकी तब्बल १७ टक्के प्रेक्षक हे १४ वर्षांखालील मुले आहेत.
.


व्हॉट्स ऑन इंडिया चे सर्वेक्षण

                                     हेरंब कुलकर्णी ८२०८५८९१९५



टिप्पण्या