भारत विरुद्ध इंडिया


                                                                           भारत विरुद्ध इंडिया 


( शेतकरी नेते शरद जोशी यांचे ‘भारता’साठी या पुस्तकातील  देशातील  विषमतेचे वर्णन  वाचताना थरारून गेलो म्हणून आवर्जून तुम्हाला वाचायला इथे टाकतोय . --- हेरंब कुलकर्णी )

माझ्या शेतावर काम करणारांसाठी मी रात्रीचा साक्षरता वर्ग चालवीत असे त्यात नव्याने आलेली एक मुलगी मांडीवर पाटी घेवून अत्यंत गंभीरतेने मी फळ्यावर काढलेली अक्षरे काढण्याचा प्रयत्न करीत असलेली पाहिली. त्याच्या दुसऱ्याचदिवशी पुण्याला माझ्या मुली शिकत असलेल्या शाळेच्या समारंभाला हजर राहावे लागले. तिथलं सारच वातावरण मौजमजेचे होत. फुगे ,झिरमळ्या,खेळ, stalls, खाद्यपदार्थ, फटाके आणि काय काय होते ! तेथील उत्साहाला सीमा नव्हती.लहान लहान मुलेमुली रुपयाच्या नोटा रद्दी कागदाच्या कपटयाप्रमाणे उधळीत होती.
संभ्रमित अवस्थेत मी माझ्याच मनाला विचारू लागलो की “स्वित्झर्लंडहून मी कोणत्या हिंदुस्थानात परत आलो आहे ? जेथे एक लहानशी मुलगी अपुऱ्या प्रकाशात शेती सामानाने भरलेल्या अस्वच्छ खोलीमध्ये बसून आयुष्यात प्रथमच पाटीवर काही अक्षरे उमटवण्याचा प्रयत्न करते आहे त्या आंबेठाणसारख्या गावांच्या हिंदुस्थानात का इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट स्कूलने आयोजित केलेल्या समारंभाच्या हिंदुस्थानात ? “
त्याच क्षणी माझ्या डोक्यात विचार चमकून गेला की एका बाजूला आंबेठाण आणि त्यासारखी खेडी आणि दुसऱ्या बाजूला पिंपरी चिंचवड तसेच पुणे यासारखे भाग ही दोन वेगळीच जगे आहेत. त्यांच्यात कुठेच साधर्म्य नाही. शहरातील शाळेच्या समारंभात पैशाची जी नाहक उधळपट्टी होते त्याच्या अल्पाशानेही रक्कम खेड्यातल्या शाळेमध्ये फळा बसवण्यासाठी उपलब्ध होत नाही. माझ्या मनाची मोठी तगमग होऊ लागली. 
माझ्या मनाची तगमग मी माझ्या पत्नीला समजावून सांगण्याचा अडखळता प्रयत्न केला. माझ्या त्या अडखळत्या अभिव्यक्तीने प्रभावित होऊन तिने मोठ्या अपूर्वाईने आणि अधिरतेने सामाजिक कार्यकर्ती म्हणून नावाजलेल्या आपल्या बहिणीला ही गोष्ट सांगितली. तिच्या बहिणीचा प्रतिसाद सुन्न करणारा होता. ती माझ्या पत्नीला म्हणाली, “ तुला कल्पना नाही ताई शेतकऱ्यांना अशा अवस्थेत राहण्याचे काही वाईट नाही वाटत. तुला ठाऊक आहे ? अग, त्यांना असं जगण्याची सवय झाली आहे “ तिच्या या प्रतिक्रियेने मला धक्काच बसला आणि मग मला साक्षात्कार झाला की ‘इंडिया’ आणि ‘भारत’ यांच्यामध्ये भयानक आर्थिक दरी आहे एवढेच नव्हे तर त्यांच्यामध्ये भावशून्यता, उदासीनता,आणि संवेदनहीनता यांची भिंतही उभी आहे. भक्षक आपल्या भक्ष्याच्या दुर्दशेबाबत पाषाणहृदयी बनले आहेत ! संवेदनशीलतेच्या या अभावामुळे मी या निष्कर्षाप्रत पोहोचलो की दोघांचा ध्वज एकच असला तरी आणि राष्ट्रगीतही एकच असले तरी ‘इंडिया’ आणि ‘भारत’ दोन वेगळे देश आहेत 
( ‘भारता’ साठी या शरद जोशी यांच्या पुस्तकातून पान क्रमांक २५१ –२५१ जनशक्ती वाचक चळवळ (९४२२८७८५७५)

टिप्पण्या