उसतोड कामगारांसोबत एक दिवस


                              उसतोड कामगारांसोबत एक दिवस



असंघटीत कष्टकरी वर्गाची वेदना, अमानुष कष्ट हे आपल्याला ढोबळपणे माहीत असतात. पण त्यांच्या जगण्याचे सारेच  ताणेबाणे आणि जोखमीचे आयुष्य तपशिलात माहीत नसते. आपण इतके सुखासीन, सुरक्षित जगताना या माणसांचा जीवनसंघर्ष किती तीव्र असतो ? अमानुष कष्टाच्या मानाने मिळणारा अल्प मोबदला आणि किमान मानवी जगणेही वाट्याला न येणारी ही बिन चेहऱ्याची माणसे. अशा कष्टकरी माणसांसोबत त्यांच्या कामाच्या ठिकाणी एक दिवस राहून त्यांच्या जीवन संघर्षाची परवड सांगणारे हे सदर. दर महिन्याला वेगवेगळ्या कष्टकरी समुहाचा परिचय यात हेरंब कुलकर्णी करून देतील .
----------------------------------------------------------------------------------------    उसतोड कामगारांसोबत एक दिवस

साखर कारखान्यावरची पहाटे ३ ची वेळ. थंडीने अक्षरश: उच्छाद मांडलाय. तिला उठावं लागतय. काटक्यातुटक्या गोळा करून चहा केलाय. चूल पेटवून अंधारात विझणारी चूल पेटवत भाजी केलीय. पोळ्या रात्रीच करून ठेवल्यात .थंडीने बोट वाकडी होताहेत. धड भाजीही चिरता येईना . नवरा गाडी सज्ज करतोय.बैलही गारठलेत. शरीराची मुटकुळ करून झोपलेली  लेकर उठायला मागत नाहीत. कुरकाराताहेत. आता शेजारच्या बैलगाड्या निघाल्यात.त्यामुळे तिची तगमग वाढलीय .नवरा चिडलाय.त्यामुळे धपाटा टाकून लेकराला उठवलय आणि गाडीत टाकलंय. आता गाड्या निघाल्यात. बैलगाडीच्या किणकिणीटापलीकडे रस्त्यावर कसलाच आवाज नाहीये. सारी घरे चिडीचूप.सन्नाटा..बैलगाडीत बाईच्या मांडीवर तिचं लहानग पेंगुळलय.त्याची धड झोपेतही नाही आणि जागेही नाही आणि थंडीत झोपही येत नाहीये.अंगात स्वेटर नाही की कानटोपी नाही.निर्मनुष्य रस्त्यावरून गावातून जाताना पहाटे कडेच्या बंद घरातून सुखात झोपलेल्या मुलांशी तुलना ती नकळत आपल्या लेकरांशी करतेय.ही तुलना करून बेचैन व्हायलाही तिला वेळ मात्र नाही.
आता  अंधारातच गाड्या उसाच्या थलात पोहोचल्या. ते शेत रस्त्याला लागून नाही. रस्त्याच्या खाली दोन तीन शेत ओलांडून आहे. ओबडधोबड रस्त्याने  गाड्या वळवून खड्ड्यातून कशाबशा गाड्या आत घातल्यात. एका पाठोपाठ ६ गाड्या तिथे पोहोचताच उसाच्या सऱ्या वाटून घेतल्या. हाकेच्या अंतरावर  नदी आहे.त्यामुळे  थंडी खूपच बोचते आहे. उसाचे पाचट पेटवून दिले.त्याने उब आणि कामासाठी उजेड दोन्हीही दिलाय. हळूहळू कोयते सुरु झालेत. पहिली ताकद लावून पुरुष आणि बाई दोघेही वेगाने उस तोडताहेत. उभे उस पटापट खाली पडताहेत . एकएक उस तोडताना  वाकायचे आहे. तो तुटला की त्याचे वाढे       ( हिरवा शेंडा व पाने) वेगळे करायचे आणि वाळलेली पाने कापून बाजूला फेकायची असे एका उसाला तीन वेळा कोयता लावला जातोय. पाचटाला दूर सारत सारत पुढे पुढे जात आहेत. त्या अंधारात अनेकदा अनेक कामगारांना साप चावतात.मागील वर्षी तर वाघाने एक मुल उचलून नेले. पाचट अंगाला घासून अंगातून रक्त येतंय पण त्याचे कौतुक करायला सवड नाही.तोडून मोठ्ठा खच पडल्यावर आता बांधायला सुरुवात करायची. ते काम महिला करताहेत. २५उसाची मोळी बांधताहेत आणि पुरुष ते गाडीत नेऊन ठेवताहेत.अशा १२५ मोळ्या होतील तेव्हा गाडी भरेल.गाडीत झोपलेलं लेकरू आता तोडलेल्या पाचटावर आणून टाकले आहे. सगळीकडे पाचट, उस आणि मध्ये ते पोरग. कडाक्याच्या थंडीत ते बिनपांघरुणाचे   झोपले आहे. मोळ्या बांधणे आणि गाडीत नेऊन टाकणे तसेच सुरु आहे.
आता सकाळचे ८ वाजलेत.दरम्यान गाडीचे बैल सोडून त्यांना उसाचे वाढे खायला टाकलेत..बराच वेळ झाल्यावर भाकरी सोडल्यात.सगळीकडे पसरलेल्या पाचटावर भाकरी खाताहेत. सगळे एकाच गावाचे आणि नातेवाईक असल्याने तो एकोपा त्यांच्या सगळ्या हालचालीत जाणवतोय. एकमेकाची चेष्टा करत तेवढाच विरंगुळा सुरु आहे. भाकरी संपली की पुन्हा काम सुरु.
आता त्या शेताचा मालक घिरट्या घालतोय. ‘ अरे खालपासून तोडा’ असे सारखे सारखे म्हणतोय. हे लोक वाकून तोडत नाहीत अशी त्याची तक्रार करतोय.
 थोडा कामाचा ताण कमी झाल्यावर आता मी एकेकाला बोलते करतोय.माझ्या लक्षात येतय की  एक एक कुटुंब म्हणजे स्वतंत्र कहाणी आहे. एक तरुण मुलगा एकटाच गाडी भरतोय. त्याला विचारले तर तो महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाला शिकतोय . बारावीला ६८ टक्के मार्क . आई वडील कोठे आहेत ? विचारले. तर वयाच्या तिसऱ्या वर्षीच आईवडील वारलेले. आजी आजोबांनी सांभाळले. आता आजोबा वारले. त्यामुळे तीन वर्षापासून तो उस तोडायला येतोय.. त्याने मांडवाचा धंदा टाकायला ४ लाखाचे कर्ज काढले ते फेडायला उस तोडतोय.. शिक्षणाचा उपयोग करून तो या अमानुष कष्टातून बाहेर पडतोय..पलीकडच्या गाडीवर अजून एक तरुण शिकलेला. तो ही महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाला शिकतोय. त्याला बारावीला ७० टक्के मार्क . त्याने बहिणीचे लग्न केले. मोठे कर्ज डोक्यावर आहे. ते फेडायला उस तोडायला आलाय. उसतोडीवरून गेलो की ट्रक चालवतो म्हणाला..दोघेही शिकत होते हे विशेष. ‘ इतके शिकून अशा कामाची लाज वाटत नाही का?’ असे विचारले तेव्हा एकजण म्हणाला की लाज वाटून कर्ज थोडेच फिटणार आहे ? आणि कंपनीत गेलो तर खूप कमी पगार मिळतो, राहण्याचा खर्च वेगळाच त्यापेक्षा हे बरे “ त्यांचा अभिमान वाटावा तर समोरून डोक्यावर मोळी घेतलेल्या मुलाला किती शिकला विचारले तर म्हणाला शाळेतच गेलो नाही. आईवडील कुठे तर ते दुसऱ्या गावात उस तोडत होते. आणि हा एका मजुराने पट्ट्याने आणला होता .म्हणजे भाड्याने आणला होता .त्याच्या आईवडिलांना ६ महिन्याचे १५००० रुपये दिले होते व त्या बदल्यात हा मुलगा या अमानुष कामाला जुंपला होता. अडीच हजार रुपये महिना म्हणजे ८३ रुपये रोजाने रोज १२ तासाच्या कामाला...इतक्या अमानुष शोषणाच्या उतरंडी या कामात सुरु आहेत आणि आपण मुलांचे हक्क यावर power point presentation करतोय.
            एका गाडीवर वडील आणि मुलगा दोघेच होते. ती कहाणी खूप करुण होती. ३ वर्षापूर्वी त्याची बायको गाडीवरून रस्त्यावर पडली आणि चाक अंगावरून गेले. मणके मोडले. तिचा दवाखान्यात मृत्यू झाला. गाडीवर नवरा आणि मुलाशी बोलता बोलता ती क्षणात होत्याची नव्हती झाली... मग मुलाने शाळा सोडली आणि आता वडिलांसोबत आलाय.बायकोची क्षणाक्षणाला या कामात येणारी आठवण त्याची सोबत करीत होती. तो म्हणाला जेव्हा आम्ही घरी पोहोचू तेव्हाच काहीतरी  खरे नाहीतर जगण्याचा काही भरवसा नाही. पलीकडे उभ्या कामगाराच्या मागच्या आठवड्यात बैलाचा पाय मोडला त्यामुळे त्याचे काम बंद पडले. त्याने ३६००० चा तो बैल १८००० त विकून टाकला आता दुसऱ्याची गाडी घेवून आला.. अशी एका पेक्षा एक कहाणी ऐकत होतो. सकाळी ५ ला सुरु झालेले काम ११.३० च्या दरम्यान संपले गाड्या भरतांना सारखे शेतमालकाला गाड्या बाहेर ओढून काढायला ट्रक्टर आणायला सांगत होते.तो फारसी घाई करीत नव्हता .यांना कारखान्यावर पोहोचयाची घाई झाली होती.. अर्धा तासाने ट्रक्टर आला, कशातरी गाड्या रस्त्याला लागल्या. एका एका गाडीवर अडीच टनाचे ओझे घेवून बैल बळजबरी ओढत होते. तीव्र उताराच्या रस्त्यावर गाडी चालविणे कसब होते. दोनएक तासात  कशीतरी गाडी अगस्ती कारखान्यावर पोहोचली. दुपारचा एक वाजलाय ...गाडी रांगेत उभी. तोडतानाचा उत्साह आता मावळला आणि नंबर लागण्याची चिंता चेहऱ्यावर दिसू लागली.. . कारखान्यानी ट्रक, ट्रक्टर लावलेले असतात. त्यामुळे मशिनरी मर्यादित आणि ट्रक ,ट्रक्टर आणि बैलगाडी सतत येत राहतात.त्यामुळे २४ तास चालवूनही नंबर लवकर लागत नाही.  मी विचारले “काल, कधी नंबर लागला होता ?” उत्तर ऐकून गलबलून आले. ते म्हणाले की काल दुपारी एक वाजता गाडी भरून आणली नंबर १२ तासाने रात्री १ वाजता लागला. खोपीवर आलो, एक दोन तास झोपलो आणि लगेच गाडी जुंपून तोडीला निघालो. मला हा तपशील खरा असूनही खरा वाटेना. माणसे २२ तास सलग कामात राहतात आणि हे एक दोन दिवस नाहीतर ६ महीने.. मी विचारले “ १२ तास रांगेत गाडी लावताना झोप मिळते का ?” ते म्हणाले “इथेच गाडीवर किंवा गाडीजवळ झोपतो पणनीट झोप होत नाही “. सहा तासाचे काम आणि १२ तासाचे वाट बघणे यातील कष्ट आणि सहनशीलता हे समजण्यापलीकडचे होते . त्या रांगेत शेकोटी करून काहीजण बसले होते. झोपायला गेले नाही का ? विचारले तेव्हा चिडून म्हणाले “हे मढे सांभाळत बसलोय “ या वाट बघण्यावर  काहीजणांनी मार्ग काढलाय. गटातील एक जण आलटून पालटून थांबतो  बाकीचे झोपायला जातात..  अतिरिक्त उस झाल्यामुळे एका एका गटाला आठवड्यातून एक सुटी घ्यायला लावतात त्यामुळे कामगार  तळतळत होते  . काही दोष नसताना हजार रुपयाची नुकसान होत होती.ते कामाला तयार आहेत तरी सक्तीने सुटी घ्यावी लागते. मात्र महाराष्ट्रातील सर्वच कारखाने हे वाट पाहण्याचे तास कमी करण्याबाबत अजिबात संवेदनशील नाहीत.
        तिथून आता उसतोडीच्या कोप्यात आलो. अंधार पडला होता.काही बायका स्वयंपाक करीत होत्या.कारखान्याच्या नळावर  काहीजणी धुणे धूत होत्या. थंडीत भिजून गेल्या होत्या. काही मुली आणि महिला पाणी वाहत होत्या. नळ ते खोपी खूप अंतर होते. बैलांना खूप पाणी लागते. किमान १० ते १५ खेपा कराव्या लागतात असे त्या मुली हंडा डोक्यावर उचलताना सांगत होत्या. बांबू आणि बारदान लाऊन केलेल्या कोप्या. अवघ्या १० फुटाच्या.त्या जागेचेही त्यांना १००० रुपये भाडे द्यावे लागते .बैलगाडीला रोज २५ रुपये भाडे मोजावे लागते . बैलाच्या पायाला  पत्री ठोकणाऱ्याला ६ महिन्याचे अडीच हजार रुपये असे अनेक खर्च त्यांना सोसावे लागतात .
काही  कोप्यात जाऊन बसलो.त्यात चूल आणि गावाकडून आणलेले धान्याचे पोते. त्यात दोरी बांधून सामान कपडे टांगलेले. दारात बाज टाकलेली. एका बाजूला पोते बांधून महिलांचे बाथरूम केलेले. जाणारे येणारे बघू शकतात असे. लाज, privacy हे शब्द गरिबांना परवडत नाहीत..मी काय स्वयंपाक करता ?असे  विचारले  बहुतेक घरात पोळी भाकरी आणि डाळ करतात. हिरवी भाजी करण्याचे प्रमाण कमीच दिसले. मांसाहार आठवड्यातून दोन तीन वेळा काहीजण करीत होते. भाताने झोप येते त्यामुळे जास्त भात करीत नाहीत.
      थंडीने लहान मुले आजारी पडत होते. एका कोपीत गेलो. कन्नड तालुक्यातील किसन राठोड भेटले. तरुण मुलाला बैलाने शिंग पोटात मारले होते. त्या जखमेला औषध लावीत होता. राठोड म्हणाले की घरी जमीन नाही. उस तोडण्याचे हे माझे ३५ वे वर्ष आहे. पण पावसाळ्यात उचल घ्यायची आणि दिवाळीनंतर उस तोडून फेड करायची. ग्रच्युएटी,फंडाची काही लाखाची रक्कम देणारी आणि पेन्शन देणारी सरकारी व्यवस्था आठवली. “३५ वर्ष उस तोडून याच्या हातात काहीच उरले नाही.. फक्त दोन मुलींचे लग्न करू शकलो “
 त्याची बायको म्हणाली “माझी बाळंतपण कारखान्यावर झाली. उस तोडून आले आणि रात्री बाळंत झाले. १५ व्या दिवशी लेकरू घेवून उस तोडायला गेले आणि बैलगाडीला झोळी बांधली..” ती सहज सांगत होती. एकीकडे सरकारी नोकरीत ६ महिन्याची बाळंत रजा आणि दुसरीकडे बाळंत होण्याच्या दिवशीही उसतोड. भारत विरुद्ध इंडिया
बाहेर आता अंधार गडद झालाय. थंडी वाढली होती.. कारखान्यावर रांगा तशाच होत्या...मी अंधारातून गुपचूप माझी सुटका करून घेतली आणि माझ्या सुरक्षित बिळाकडे परतलो. ते मात्र उद्या पहाटे कोयते घेवून पुन्हा निघणार होते ...जगण्यासाठी.
-------------------------------------------------------------------------------------------
हेरंब कुलकर्णी  .
herambkulkarni1971@gmail.com





टिप्पण्या