शिक्षणाची इयत्ता कंची


              शिक्षणाची इयत्ता कंची ?

दारिद्रयाची शोधयात्रा या अहवालात
महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यात शिक्षण
मला कसे दिसले ?शिक्षणात दिसलेले
सकारात्मक बदल

                     २००५ ते २०११ या काळात महाराष्ट्रातील जवळपास २० जिल्ह्यात फिरून मी शाळा बघितल्या होत्या. ७ वर्षांनी ग्रामीण दुर्गम महाराष्ट्रातील शाळा पुन्हा एकदा बघत होतो.त्यामुळे काय बदलले आहे हे तुलनात्मक रितीने बघत होतो. ‘शाळा आहे शिक्षण नाही’ या पुस्तकात मी माझी पूर्वीची निरीक्षणे नोंदवली आहेत.१० वर्षापूर्वी गावात १० वी १२ वी पास मुलगा मिळत नाही अशी अनेक गावे पूर्वी बघायला मिळायची. सध्या फिरताना जाणवले की अशी गावे आता खूप कमी झाली आहेत. मेळघाटात २००३ साली दहावीला ३६ टक्के मार्क मिळालेल्या मुलाची मिरवणूक काढली होती कारण गावाततो पहिल्यांदा १० वी पास झाला होता. त्या मेळघाटातील त्याचगावात जाऊन माहिती घेतली तर त्या गावात आज १० मुले किमान १२ वी पास आहेत. ग्रामीण महाराष्ट्रात ज्युनियर कॉलेज मोठ्या संख्येने सुरु झाली.परीक्षा सोप्या झाल्या. नापासी थांबली याचा परिणाम मुले मुली किमान १२ वी पर्यंत आता शिकू लागली. मुली शिकू लागल्याने बालविवाह कमी होत आहेत.
              तरुण पिढीच्या शिक्षकातही काही सकारात्मक बदल जाणवले.या दौऱ्यात फिरताना ठिकठीकाणी उत्स्फुर्तपणे शिक्षक भेटायला येत होते. त्यांच्यात वाचनाची जाणीव वाढत आहे व तंत्रज्ञानाची पकड आहे आणि एकूणच सजगता आकलन व्यक्त होणे यात गेल्या १० वर्षापेक्षा खूपच कौतुकास्पद बदल दिसला.
प्राथमिक स्तरावर शिक्षणाचे प्रमाण खूप वाढले आहे.आपला अंदाज चुकेल अशा वस्तीतही मुले शाळेत जातात. भटक्यांत हे प्रमाण अजूनही कमी दिसले तरी एकुणात प्राथमिक स्तरावरील शालाबाह्य मुलांची संख्या खूप कमी झाली आहे.आश्रमशाळेच्या चकचकीत इमारती आदिवासी भागात खूप डौलदार रीतीने उभ्या आहेत.खाजगी इंग्रजी शाळा मात्र खूप वाढल्या आहेत. अगदी छोट्या गावातही वाडी पाड्यावर इंग्रजी शाळांच्या गाड्या फिरताना दिसल्या.आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे ही जागृती निरक्षर,कष्टकरी वर्गात दिसते आहे मात्र आर्थिक ताकदीअभावी उच्च शिक्षणात मुले जाऊ शकत नाहीत. जिथे शेती खूप तोट्यात असते.दुष्काळ असतो तिथे मुले शिक्षण हेच उत्तर व एकमेव आधार असल्याने शिक्षणावर लक्ष केन्द्रित करतात. सातारा जिल्ह्यात मान तालुक्यात वळई गावात ४५० कुटुंबे आहेत.या छोट्या गावात आज वेगवेगळ्या सरकारी नोकरीत ३० जण आहेत आणि शेजारच्या अशाच स्थिती असलेल्या पळशी गावात ११ प्रथम वर्ग अधिकारी आहेत.दुष्काळात असलेल्या मान तालुक्यात सरकारी अधिकारी खूप मोठ्या संख्येने आहेत.


निराशाजनक गुणवत्ता
                     शिक्षणात जरी हे समाधानाचे पैलू असले तरीही गुणवत्तेत फार बदल जाणवत नाही. शाळांत मुलांची वाचन लेखनात अजूनही प्रगती समाधानकारक नाही.
                    बुलढाणा जिल्ह्यात निहालवस्ती या वस्तीत सकाळी १०.४५ वाजून गेले तरी मुले खेळत होती.शिक्षक आल्यावर मुले शाळेत जातात असे सांगितले.आम्ही ठिकठिकाणी मुलांना शाळेत का गेला नाही ? म्हणून रागावत होतो म्हणून पालक त्यांना बोलले. १५ मिनिटे उशिरा शिक्षक आले मग मुले शाळेत गेली. शाळा वस्तीला लागूनच आहे.शाळेत गेलो तर त्यादिवशी १२ विद्यार्थी गैरहजर होते. शिक्षक म्हणाले तुम्ही रागावलात म्हणून आज एवढे पटकन मुले शाळेत आलेत. मला आम्ही नसताना नेमके किती मुले रोज येत नसतील याचा अंदाजच करता येईना. वस्तीतूनच शाळेचा रस्ता असून सुद्धा शिक्षक गैरहजर विद्यार्थ्यांच्या घरीही जात नसावेत. मुलांची चाचणी घेतली तेव्हा मुले साधे सोपे शब्द ही लिहू शकली नाहीत. .
                    अकोला जिल्ह्यात बल्लाळी गावात गावकरी व शिक्षक यांच्यात खूप तणाव आहे.शिक्षक त्यादिवशी सकाळची शाळा असून १ तास उशिरा येवून अर्धा तास लवकर निघून गेलेले होते. मुलांना लिहिता वाचता येत नसल्याची ते तक्रार करीत होते. मुलांना गणिते सोडवायला दिली तेव्हा मुले अजिबात सोडवू शकली नाहीत.विशेष म्हणजे हे गाव गरीब भटक्या वस्तीचे होते. त्यामुळे प्रत्येक पालक आपली मुले घेवून येत होता व मुलांना कसे येत नाही ते सांगत होता.शिक्षक आणि गावकरी यांचे टोकाचे वाद होते. शिक्षक शाळेच्या वेळेत बाहेर येवून गावकर्‍यांशी गप्पा मारत उभे राहतात. विचारणार्‍या पालकांना आम्ही काही तुमच्या बा चा पगार खातो का ?’ असे बोलतात असे गावकरी म्हणत होते.
अकोला जिल्ह्यात सकणी या पूर्ण बौद्धवस्ती असलेल्या गावात शाळेविषयी लोकांनी तक्रारी केल्या. शिक्षण चांगले नाही त्यामुळे पालक मुलांना बाहेर शिकायला बाहेर पाठवतात.त्यातून गावातील शाळेत केवळ ५ मुले उरली आहेत.शाळेत गेलो की सरकारी कामात अडथळा आणण्याची केस करण्याची धमकी देतात.यवतमाळ जिल्ह्यात सुंदरनगर पोड हा करंजी या मोठ्या गावाला लागून आहे तरीही ११० कुटुंबात एकही पदवीधर नाही.७ मुले आता कुठे १२ वी झाली आहेत. फक्त ३ जणांना नोकरी लागली त्यात १ कामाठी व १ शिक्षक आहे.
नंदुरबार जिल्ह्यात धडगाव तालुक्यात कुमरी गावात शाळेला इमारत नाही. शाळा शिक्षकाच्या घरातच भरते.अशा अनेक शाळा आहेत असे समजले. घरातील शाळेत पट २६ होता पण केवळ ३ विद्यार्थी उपस्थित होते. एक शिक्षक गैरहजर होता.ते शिक्षक नांदेडला गेले असे सांगितले. तीन मुले अनुक्रमे ३ री, ४ थी व ५ वी वर्गात होते.या मुलांना वाचन दिले असता त्यांना साधी अक्षरेही वाचता आली नाहीत. फळ्यावर बाराखडी लिहिलेली होती.इतकी वाईट स्थिती शाळेची होती.याच तालुक्यात खडकी गावातील शाळेत १२६ पैकी ३० विद्यार्थी उपस्थित होते.येथेही मुलांची चाचणी घेतली तेव्हा मुलांना शब्दातील अक्षरे फक्त वाचता आली.१०१ ही संख्या ३ रीच्या मुलाला वाचता आली नाही. नंदुरबार हा शब्द शाळेतल्या ४ थी पर्यंत कोणत्याही मुलाला लिहिता आला नाही.खडकी शाळेने एकूण ७६ शालाबाह्य मुले शाळेत दाखल केली आहेत ही बाब कौतुकास्पद वाटली. शिक्षकांनी यासाठी घेतलेले कष्ट जाणवत होते. पालकसंपर्क खूप चांगला होता.
शिक्षणाचा दर्जा आणि बेकारी याबाबत दलित वस्तीतील मधुकर वानखेडे म्हणाले की पोलिस भरतीत जायचे म्हणून आमची मुले १२ वी होतात पण लेखी परीक्षेत टिकत नाहीत. लहानपणापासून शाळा बुडवून आईबापाबरोबर मजुरीला जातात त्यामुळे अभ्यास कच्चा राहतो. १२ वी नापास संख्याही वस्तीत निम्म्याला निम्मी आहे. वस्तीत १० पोरांनी आयआयटी केले आहे पण त्यांना रोजगार मिळत नाही “
पालघर जिल्ह्यात जव्हार तालुक्यात तुळशीराम मुकणेच्या १० वीत शिकणार्‍या मुलाची शैक्षणिक प्रगती कशी आहे हे बघण्यासाठी या विद्यार्थ्याला त्याचे नाव इंग्रजीत लिहायला सांगितले ते तो लिहू शकला नाही. एक हजार पन्नास ही संख्या त्याने १०००५० अशी लिहिली तर ५११ ही संख्या ५०११ अशी लिहिली.हा विद्यार्थी ९ वी पर्यन्त पास होत गेलेला आहे हे विशेष.
भटक्यांचे शिक्षणाचे प्रमाण अजूनही कमीच आहे. त्यातही मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण कमीच आहे . उस्मनाबाद जळकोट मधील भटक्यावस्तीत १५० घरांच्या वस्तीत फक्त २२ मुले शाळेत शिकत आहे.सर्वात जास्त शिकलेली मुलगी त्या वस्तीत ५ वीत शिकत आहेआणि संपूर्ण वस्तीत फक्त ३ मुली शिकतात.
   मेळघाटात खडीमल येथील शाळेत २७ पैकी १९ मुले हजर होते. ९ विद्यार्थी स्थलांतरीत होत आहे. एकशिक्षक गैरहजर होते. विद्यार्थ्याकडे कोणतेच साहित्य नव्हते. पाटीही अनेकाकडे नव्हती पुस्तके तर कोणाकडेच नव्हते.शिक्षक म्हणाले मुलांना साहित्य दिले आहे पण मुले ते आणत नाहीत.मुले काहीच बोलत नव्हती. मला दप्तराच्या ओझ्यावरील निरर्थक चर्चा आठवली. एकही मुलाला वाचता येईना. त्या शाळेत दुसऱ्या गावातील शाळेचा एक मुलगा बसला होता त्याला फक्त वाचता आले..!!!
चुनखडीच्या शाळेत मुलांना डिजिटल क्लास मध्ये चित्रपट लावून दिला होता व शिक्षिका गावातच कुठेतरी समोर गेली होती आम्ही गेल्यावर शिक्षिका आली.आम्ही मुलांना फलकावरील दिनविशेष शब्द वाचायला सांगितला. मुले वाचू शकली नाहीत. ४ थीच्या मुलाला ८२ संख्या वाचता आली नाही आणि शाळा डिजिटल होती.
          परभणी जिल्ह्यात जिंतुर तालुक्यात दोन शिक्षक असलेल्या छोट्या ठिकाणी शिक्षक आलटून पालटून उपस्थित राहत असावेत अशी एका एका शिक्षकाची उपस्थिती होती. दोन  शाळेत सकाळच्या शाळा एक तास अगोदर सोडून दिलेल्या होत्या आणि गावकरी शाळा सुटण्याची वेळही सांगू शकत नव्हते. तेव्हा एकूणच प्रशासन failure जाणवले. 
जात पडताळणीचा गंभीर प्रश्न
आदिवासी मुलांना जात पडताळणी प्रमाणपत्र न मिळणे ही एक अडथळा असणारी समस्या लक्षात आली.उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब तालुक्यात आउसपवार हा पारधी जमातीचा तरुण १२ वी पास झालेला व ७५ टक्क्के गुण मिळालेला मुलगा त्याचा व्हेटरनरीला नंबर लागला पण पडताळणी न झाल्याने तो प्रवेश घेऊ शकला नाही. जातीचे दाखले नसल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. एकतर वंचित वर्गातील विद्यार्थी शिकत नाहीत आणि जे शिकतात त्यांना जातीचे दाखले मिळायला अडचणी येतात.एका आदिवासी गावातील मुलगी सायना म्हणाली १९६० च्या आधीचे पुरावे नसल्याने वडील म्हणतात शिक्षण सोडून दे. बुलढाणा जिल्ह्याच्या मध्यप्रदेशच्या सीमेवरच्या तालुक्यातील बसंती सोलंकी या मुलीने मध्यप्रदेशात जाऊन तिथे महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तिथून जातीचा दाखला मिळवला.जातीचे दाखले मिळविणे हे इतके जिकरीचे झाले आहे.
नागपूर जिल्ह्यातील मौंदा येथील धीवरवस्तीत ३०० कुटुंबे आहेत.या वस्तीत १२ वी पास झालेल्या मुला मुलींची संख्या खूपच कमी आहे. संगीता मारबती या मुलीने जातीचा दाखला नाही म्हणून महाविद्यालयाने ५००० रुपये मागितले त्यामुळे ती अतिशय तणावात होती .त्या अगोदरच्या वर्षी तिची बहीण माधुरी हिने जातीचा दाखला निघत नाही व त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण परवडत नाही म्हणून शिक्षण सोडले व ती आता आईसोबत मजुरीला जाते. वडील मासे पकडतात. घर अतिशय साधे आहे .दोघी बहिणी सुटीच्या काळात केटरर्स कडे भांडी घासतात.वडिलांचा जन्म त्यांच्या आजोळी भंडारा येथे १९४५ साली झाला .त्या गावात ते जाऊन आले पण तिथे आता त्यांना ओळखणारे कोणीही राहिले नाही.जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांना त्या काळातील नोंदी वाचता येत नाहीत असे लेखी उत्तर दिले.जातीचे दाखले हे वंचितांच्या उच्च शिक्षणात कशी धोंड आहे हे लक्षात येते..
 आईच्या शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी एक मुलगा शाळा सोडून सालगडी झालेला बघितला.चंद्रपूर जिल्ह्यातील जिवतीत बंजारा जमातीच्या महिलेला दारू विकत नसताना केवळ विकण्याच्या संशयावरून पोलिसांनी बेदम पोटावर मारले त्यामुळे त्या महिलेचे पांढरे पाणी जाणे सुरु झाले व पोटाचा विकार सुरु झाला. ही महिला आता मजुरीला जाऊ शकत नाही.ही महिला व तिची मुलेच राहतात.पती वेगळा राहतो.,त्यामुळे नाईलाजानेतिने दोन्ही मुलांना शाळेतून काढून घेतले. ती मुले आता शेळ्या चारायला जातात. शस्त्रक्रिया करायला ही मोठा खर्च आता होणार आहे. त्यामुळे ही मुले शेळ्या वळायला जातात.शेळ्या वळताना त्यांना मोठ्या मुलाला १५० रु व लहान मुलाला १०० रुपये मिळतात. शस्त्रक्रियाला खूप खर्च होणार आहे. त्यामुळे ती आता मोठ्या मुलाला सालगडी करणार आहे...त्यातून पैसे जमवून ती शस्त्रक्रिया करणार आहे..एकीकडे सक्तीच्या शिक्षणाची बकबक आपण करताना केवळ आईच्या आजारासाठी ही दोन मुले सालगडी होत आहेत.


अडचणी शिक्षण घेतानाच्या...
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील रेल्वेस्टेशनजवळ राहणाऱ्या वस्तीत उघड्यावर राहत असलेल्या व  शाळा सोडलेल्या मुलांना शाळेत का जात नाही ?? असे विचारले तेव्हा त्यातला एकजण पटकन म्हणाला की मुले मारायची. शिक्षकांना सांगूनही काही उपयोग झाला नाही. उलट शिक्षक मलाच मारायचे असे त्या लहान मुलाने सांगितले. काही आश्रमशाळाना जेव्हा गरज होती तेव्हा या वस्तीतील मुलांना नेले आणि गणवेश शिवून दिले.रोज रिक्षा पाठवायचे पण त्यांची गरज संपली आणि आता ते रिक्षा पाठवत नाहीत.
 मुले किती असुरक्षित प्रवास करतात ? हे बीड जिल्ह्यातील मालकाची वाडी येथे बघायला मिळाले. गावाची लोकसंख्या २००० असूनही गावात एसटी येत नाही. ५ वी पासून मुलांना दूरच्या गावात शाळेला जावे लागते. या गावापासून तीन गावांना शाळा आहे.ती गावे अनुक्रमे ८ किमी १० किमी व १२ किमी दूर आहेत.रिक्षा महिन्याला ६०० रुपये घेतात.शेतकरी कुटुंबासाठी ही रक्कम खूप मोठी आहे. जवळच्या १० किलोमीटर च्या हायस्कूल ला एका मोठ्या टेम्पोत बसून ही मुले शाळेला जातात आणि त्या टेम्पो त ८० मुले बसवली जातात. आणि हा संपूर्ण रस्ता घाटाचा आहे. काही मुले टेम्पोच्या टपावरही बसतात. टेम्पो या घाटाच्या रस्त्याने जातो. कधीही अपघात किंवा दुर्घटना होऊ शकते इतकी वाईट परिस्थिती आहे . मी त्या तालुक्याच्या गटशिक्षणाधीकारी यांना हा प्रकार सांगितला. त्या गावात २०० पेक्षा जास्त शिकणारी मुले असूनही एसटी का येत नाही ..? शहरातील स्कूल बसच्या सुरक्षेची चिंता वाहिली जाते त्यावर लेख लिहिले जातात पण एका टेम्पो त ८० मुले कोंबून घाटाच्या रस्त्याने ही मुले रोज प्रवास करीत आहेत.त्यातही एक गोष्ट कळाली की त्या हायस्कूलला विद्यार्थी कमी आहेत म्हणून या गावाची मुले ते आणतात व शिक्षक वर्गणी करून या टेम्पोचे भाडे देतात पण जास्त भाडे द्यायला नको म्हणून शिक्षक एकाच टेम्पोचे भाडे देतात. हे पैसे बचत करताना या मुलांचे रोजचे मरण आहे. अशीच स्थिती जव्हार तालुक्यात तुळशीराम मुकणेच. तो १०वीत आश्रमशाळेत शिकतो. आश्रमशाळेच्या खोल्या गळतात म्हणून या खोल्यात जास्त मुलांना राहता येत नाही त्यामुळे याला शाळेतून जाऊन येवून करावे लागते. रोज तो शाळेला ७ किलोमीटर जातो आणि येतो. जीपने गेले तर एका बाजूचे भाडे २५ रुपये पडते म्हणजे दिवसाला ५० रुपये भाडे पडते. एवढे पैसे रोज देणे शक्य नाही त्यामुळे तो पायी जातो.सायकल आहे पण ती दुरुस्त करायला ५०० रुपये खर्च आहे ती एकरकमी नसल्याने तो पायी शाळेत जातो.रोज १५ किलोमीटर पायी चालून हा विद्यार्थी अभ्यास तरी कसे करणार ?
 शिक्षणावर परिणाम करणारे इतर घटकही अस्वस्थ करतात..पेण तालुक्यात उद्धर येथे एक ९ वीत शिकणारा कातकरी विद्यार्थी भेटला.तो शाळेत निघाला होता.रात्रीचा भात फोडणी करून त्याने खाल्ला होता.ते खाऊन तो ४ किलोमीटर शाळेत चालला होता आणि संध्याकाळी पुन्हा ४ किलोमीटर घरी चालत जाणार होता. शाळा शालेय पोषण आहार फक्त ८ वी पर्यंत च देतात.त्यामुळे दिवसभर तेवढ्या भातावर तो शिकून एकूण ८ किलोमीटर चालणार होता. त्याचे अभ्यासात कसे लक्ष लागावे ?आणि इतकी भूक लागल्यावर तो काय करीत असेल? आज मुलांना पोटभर जेवण वर डबा देवून वर पॉकेटमनी देणारे आम्ही पालक आणि इकडे हा मुलगा अर्धपोटी शाळेत जाणारा आणि ८ किलोमीटर चालत जाणारा.... शिक्षणाची काय चर्चा करायची....?


यशोगाथा
             
२ रीच्या माडिया मुलगा फाडफाड इंग्रजी वाचतो  !!!!!

भामरागडच्या हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पातील नेलगुंडा येथील साधना विद्यालयात बघता आले. आम्ही दुसरीच्या वर्गात गेलो तर मुले सहजपणे इंग्रजीचे पुस्तक वाचत होती. दुर्गम भागातील जंगलात कोणतीच शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेली ही माडिया मुले सहज इंग्रजी वाचतात. थोडक्यात कष्ट घेतले,योग्य अध्यापन पद्धती वापरल्या तर दुर्गम भागातील मुले ही इंग्रजी वाचू शकतात.तिथून येताना एका मराठी शाळेत ७ वीचा मुलगा ' भामरागड' शब्द ही वाचू शकला नाही. हे कसे समजून घ्यायचे ? प्रकाश आमटेच्या लोकबिरादरी संस्थेने भामरागड पासून आतल्या दूर जंगलात 29 किलोमीटरवर ही शाळा सुरू केली आहे। या १ ली ते ५ वी च्या शाळेत मुले ६ किलोमीटर दूर अंतरावरून पायी येतात आणि शिकतात. इतक्या गरीब कुटुंबातील ही मुले शाळेत आल्यावर अतिशय आनंदी असतात. शाळेच्या खोल्या न बांधता नुसते डोम बांधल्याने निसर्गात शांतिनिकेतन फील येतो. मातीकाम व इतर कलांसाठी खूप वेळ ठेवलेला आहे.मुले वस्तू छान बनवतात. भामरागड ची दुर्गमता या शाळेकडे जाताना लक्षात येते. अनिकेत आमटेसोबत गेलो तेव्हा रस्ते नसलेले रस्ते आणि कडेला दाट जंगल यातून जाताना भीती वाटते. या रस्त्याने शिक्षक आणि समीक्षा आमटे जातात. समीक्षा आमटे शिक्षक समृद्धी, उपक्रम व शाळा उभी करण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. ज्या कुटुंबात कोणीच शिकले नाही अशा कुटुंबातील ही मुले भामरागड च्या जंगलात फाड फाड इंग्रजी वाचतात आणि आम्ही मुलांना मराठी वाचन लेखन नयायला अनेक कारणे सांगत राहतो.



                      गुंजकर गुरुजींची शाळा

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात तरोदा येथील शाळेत देविदास 
गुंजकर या शिक्षकाने मुलांच्या क्षमता टोकाच्या विकसित केल्या  आहेत. २ री च्या मुलांनी १० वी चे पाठयपुस्तकातील अनेक कठीण शब्द लिहून दाखविले. हे सर्व गाव आदिवासी लोकवस्तीचे आहे. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सर्व अडचणीवर मात करून गुरुजींनी मुले विकसित केलीत. ते शिक्षक कार्यशाळा घेतात आणि समोर शिक्षक बसवून मुलांना अध्यापन करतात. आतापर्यंत त्यांच्या ८० कार्यशाळा झाल्यात.देविदास गुरुजीचे समर्पण थक्क करणारे आहे. ते म्हणतात " जो शिक्षक fast शिकवतो त्याची मुले slow शिकतात आणि जो शिक्षक slow शिकवतो त्याची मुले fast शिकतात...

                                                                        हेरंब कुलकर्णी
                                                             herambkulkarni1971@gmail.com
                                                                      फोन ९२७०९४७९७१
  



टिप्पण्या